सम – विषम भाग १० लेखक मकरंद कापरे
सम – विषम भाग १० लेखक मकरंद कापरे
“उद्या तुम्ही ऍडमिट व्हा…पुढच्या तीन दिवसात कधीही डिलिवरी होऊ शकते…” डॉक्टरांनी चेक अप नंतर सांगितले. आणि आसावरी ने सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये रेखा ला ऍडमिट केले.
” अभिनंदन…छान गोंडस मुलीला जन्म दिला आहे” नर्स बाहेर येत म्हणाली. बाहेर श्रेयस ची आत्या..श्रेयस, ईशा, दीपिकाताई आणि अशोक उपस्थित होते.. आणि सगळ्यांनी श्रेयस चे आणि दीपिका ताईंचे अभिनंदन केले. “सिस्टर…आम्ही कधी बघू शकतो बाळाला…” श्रेयस ने विचारले. “थोड्या वेळात रूम मध्ये शिफ्ट करू…मग पाहू शकता…दोघेही एकदम ओके आहेत, काही काळजी करू नका” सिस्टर म्हणाल्या. ” ओके…धन्यवाद.” श्रेयस म्हणाला
तासाभरात रेखाचे आई बाबा पण आले, सर्वांना बाळाला पहायची घाई झाली होती. “किती गोंडस आहे ना…डोळे अगदी रेखासारखे आहेत..” रेखाची आई बाळाला पहात म्हणाली. ” हो…आणि चेहऱ्याची ठेवण… श्रेयस सारखी आहे…” श्रेयस ची आत्या म्हणाली. दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. बाळासाठी घर छान सजवले होते दीपिका ताईंनी खेळणी, फुगे, लाकडाचा पाळणा स्वेटर , टोपडी विणून कधीच तयार होती. बाळ घरी आल्यावर सगळेच कामाला लागल्यासारखे झाले होते.
“अभिनंदन श्रेयस…फॉर achieving most awaited moment, बाप झालास तू” पोतनीस सर श्रेयस च्या केबिन मध्ये येत म्हणाले. ” थँक्यू सर, “श्रेयस उठून उभे रहात म्हणाला. ” कम लेट्स गो फॉर मीटिंग कालच जॉन टांझानिया वरून आला आहे. आपल्याला तिथला प्लांट चालू करायचा आहे..”
दोघेही बोलत बोलत कॉन्फरन्स हॉल मध्ये आले. “जॉन, ब्रिफ अस..” जॉन रूथ जन्माने टांझानिया चा नागरिक होता, पण वडील भारतातले असल्याने बऱ्यापैकी हिंदी बोलत असे, वय पंचेचाळीस वर्षे, उंच धिप्पाड, रंगाने थोडा सावळा होता. ” माझी मीटिंग झाली…तिथल्या युनियन बरोबर…त्यांनी आपल्या अटी मान्य केल्या आहेत…त्यामुळे आपण पुढच्या महिन्यापासून काम चालू करू शकतो..पण प्लांट बरेच दिवस बंद आहे..त्यामुळे मशिनरी ऑडिट करावे लागेल…सो मी सजेस्ट करतो की माझ्या बरोबर …श्रेयस ला पाठवले तर बरे होईल” जॉन रूथ म्हणाला.
“मी सांगतो पुढचे…” पोतनीस सर म्हणाले. “श्रेयस… तुझ्याबरोबर…तुझे दोन टीम मेंबर्स असतील…अजून पंधरा दिवस आहेत..तुझ्या घरी नुकतीच नवीन पाहुणी आली आहे…तिला पण तुला वेळ द्यायचा आहे…पण तू पहात असलेल्या बाकी तीन प्रोजेक्ट मध्ये तू मागच्या वर्षभरात भेटी देऊन …ज्या सुधारणा केल्या…त्या पाहून जॉन ने तुझ्या नावासाठी आग्रह धरला.. तुझे काय म्हणणे आहे यावर…” पोतनीस म्हणाले. “सर..मी नक्कीच जाईन सर..नो प्रोब्लेम…मी तिथली माहिती मागच्या काही मीटिंग मध्ये जॉन कडून घेतली आहे. मी प्लॅन करतो…”
“ओके…तुम्ही प्लॅन तयार करा…मी एक तासाने परत जॉईन करतो…” आणि पोतनीस सर निघून गेले. श्रेयस ने प्लॅन तयार करून त्यांची परत केबिन मध्ये भेट घेतली. “ओके..प्लॅन चांगला आहे..मला आवडला..आणि तिथे राहण्याचा तुझा खर्च अर्थातच कंपनी करेल…आपले मोठे गेस्ट हाऊस आहे…समुद्र किनाऱ्याला लागून…मला माहित आहे मुलीच्या जन्मानंतर लगेच ट्रीप वर जाणे थोडे अवघड आहे…पण पंधरा दिवसांनी तू परत येऊ शकतोस…पण तिथे प्रोडक्शन चालू होईर्यंत तुला तिथे रहावे लागेल…फॅमिली ला घेऊन जायचे असेल तर माझी काही हरकत नाही…” पोतनीस म्हणाले. तेव्हड्यात HR ची निशा आली. “आणि…तुझा परफॉर्मन्स पाहून तुला कंपनी जनरल मॅनेजर म्हणून..प्रमोशन देत आहे…निशा handover him the letter” आणि निशा ने प्रमोशन लेटर त्याला दिले.
संध्याकाळी घरी आल्यावर त्याने सगळे रेखाला आणि आईला सांगितले. “वा…अभिनंदन, पंधरा दिवसांचा प्रश्न नाहीये…तुला पिलुबरोबर खूप कमी वेळ मिळेल ना रे…म्हणून वाईट वाटते…आणि प्रमोशन देऊन पाठवत आहेत..मग जायला काहीच हरकत नाही…हो ना आई…” रेखा म्हणाली. “हो, जाऊन ये काही हरकत नाही..आम्ही मॅनेज करू …आणि फॅमिलीसोबत तयार आहेत ते पाठवायला…मग बघू या आल्यावर.” आई म्हणाली. आणि श्रेयस टांझानिया ला जाण्याच्या तयारीला लागला.
पंधरा दिवसांनी त्याचे विमान डोडोमा इंटरनॅशनल एअरपोर्ट वर उतरले. त्याच्या बरोबर त्याची टीम होती. अर्थात जॉन पण होता. डोडोमा वरून संध्याकाळी दुसऱ्या विमानाने दर ए सलाम ला जिथे प्लांट होता तिथे पोहचले. गेस्ट हाऊस आल्यानंतर, समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. बीच वरच्या लाइट्स वरून अंधुक अशा लाटा दिसत होत्या. सकाळी उठल्यावर त्याने पाहिले तर खूपच मनोहारी दृश्य होते. “तुला हे रोजच दिसेल इथून पुढे…” जॉन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. “आणि तुला आवडीची गोष्ट पण आहे इथे.. गेस..” जॉन म्हणाला. “टेनिस कोर्ट?” श्रेयस ने विचारले. “येस..इथून जवळच टेनिस कोर्ट आहे…जिथे इंटरनॅशनल मॅचेस पण होतात…” जॉन म्हणाला. “वाव…पण पंधरा दिवस येणार म्हणून मी रॅकेट नाही आणली..बरोबर…” श्रेयस म्हणाला. “नो प्रोब्लेम… कम” आणि जॉन त्याला वरच्या मजल्यावर घेऊन गेला. एक कपाट उघडून दाखवले. “ऑल न्यू रॅकेट…” जॉन म्हणाला. दहा नवीन रॅकेटस, टेनिस बॉल्स, गोल्फ स्टीक्स, पलीकडच्या रूम मध्ये बिलियर्ड टेबल असे सर्वच होते. “वाव ग्रेट…” श्रेयस म्हणाला. “आज आपण चार पर्यंत परत येऊ…संध्याकाळी तू टेनिस खेळ नंतर आपल्याला.. इथले जे पार्टनर आहेत त्यांनी पार्टी ठेवली आहे तिकडे जायचे आहे…” जॉन म्हणाला.
प्लांट वर जाऊन आल्यावर, संध्याकाळी टेनिस खेळताना व्हिएतनाम च्या खेळाडू बरोबर भेट झाली, श्रेयस चा खेळ पाहून तो खूपच इंप्रेस झाला. संध्याकाळी पार्टी मध्ये श्रेयस ची आणि त्याच्या टीम ची ओळख जॉन ने करून दिली. मोठ्या बंगल्या बाहेर च्या लॉन वर पार्टी रंगली होती. वाईन..शॅम्पेन …व्हिस्की आणि बरोबरच व्हेज नॉन व्हेज…जेवण. जेवण करून जॉन आणि श्रेयस बाकी लोकांबरोबर गप्पा मारत बसले होते. इतक्यात काही पाच सहा जीप मधून लोक आले आणि त्यांनी मशीन गन मधून गोळ्या झाडायला सुरवात केली. “खाली झोपा सगळे…” जॉन ओरडला. सगळे खाली झोपले. आलेल्या..लोकांपैकी दोन तीन जणांना बरोबर घेऊन ते निघून गेले. थोड्याच वेळात पोलिस आले त्यांनी सर्वांची विचारपूस केली. “कोण होते हे लोक, जॉन… मरता मरता वाचलो आपण…असे असेल तर मी नाही काम करू शकणार इथे…”
“नो..नो..काम डाऊन…हे युनियन चे दुसऱ्या गटाचे लोक होते…डोन्ट वरी…आपल्याला यांचेकडून काही धोका नाहीये…” जॉन म्हणाला. “अरे पण…त्यांनी काही लोकांना पकडुन नेले…” श्रेयस म्हणाला. “ओके…लेट्स गो टू गेस्ट हाऊस…मी नंतर सांगतो” जॉन म्हणाला. झाल्या प्रकारामुळे दुसऱ्या दिवशी फॅक्टरी ला जायचे नाही असे ठरले. रात्री घडलेला प्रकार त्याने पोतनीस सरांना आणि रेखाला फोन करून सांगितला. “श्रेयस…जपून रहा रे…मी खूप टेन्शन मध्ये आहे आता…रेखा म्हणाली. “नाही..काळजी नको करुस जॉन आहे बरोबर, तो म्हणत होता असे नेहमी नाही होत इथे” श्रेयस ने तिला समजावले. व्हिडिओ कॉल करून बाळाशी पण गप्पा मारल्या.
सकाळी काही कामाने बाहेर गेलेला जॉन अकरा वाजता परत आला “मी चौकशी केली…ज्यांना पकडून नेले त्यांना…पोलिसांनी सोडवले आहे…आणि ज्यांनी गोळीबार केला त्यांना अटक झाली आहे” जॉन म्हणाला. ” त्यांनी…गोळ्या झाडल्या..आपल्याला गोळी लागली असती तर केव्हड्यात पडले असते ते…” श्रेयस म्हणाला. “असे नेहमी घडत नाही इथे…आज संध्याकाळी तुझे टेनिस खेळून झाले की नाईट क्लब ला जाऊ या..” जॉन म्हणाला.
संध्याकाळी टेनिस खेळून झाल्यावर एक जण त्याला भेटायला आला. “श्रेयस भारद्वाज…” तो बऱ्यापैकी श्रेयस च्या नावाचा उच्चार नीट करत म्हणाला. “येस..” श्रेयस म्हणाला. “हाय.. आय एम रसेल ओंबारू…कॅन यू कम विथ मी… वॉन्ट टू टॉक टू यू…” एखाद्या हिंदी चित्रपटात दिसणाऱ्या काळ्या धिप्पाड कुरळे केस असलेल्या खलनायका सारखा दिसणाऱ्या माणसाला पाहून श्रेयस बुचकळ्यात पडला. जॉन पण बरोबर नव्हता. पण तो माणूस त्याला हाताला धरून टेनिस कोर्ट समोरच्या बिल्डिंग मध्ये घेऊन आला. तिथे केबिन बाहेर असलेल्या गार्ड ने ओंबारू ला सॅल्युट करून केबिन चा दरवाजा उघडला. “कम हॅव ए सीट…” श्रेयस त्याने दाखविलेल्या सोफ्यावर बसला. ” आय एम प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन ऑफ टांझानिया” ओंबारु ने सांगितले. “ओह माय गॉड…सॉरी सर..I thought…” ” Here gangster and gentlemen looks same” ओंबारु त्याचे वाक्य मध्येच तोडून म्हणाला. नंतरचा त्यांचा संवाद इंग्रजीत झाला, तो मराठीतून समजून घेऊ या “सर..तुम्ही मला कसे ओळखले..” श्रेयस ने विचारले. “मी तुझा कालचा आणि आजचा खेळ पाहिला..मी सहज तुझे रजिस्टर मधले नाव गुगल केले आणि तुझी प्रोफाइल सापडली…18 गोल्ड मेडल, 13 सिल्वर आणि 9 ब्राँझ मेडल इंटरनॅशनल मॅचेस मध्ये तुम्ही मिळविले आहेत. तुमचे वर्ल्ड रँकिंग 123 आहे. आणि आता तुम्ही जेमिनी स्टील चा जो प्लांट बंद पडलेला आहे तो चालू करायला आला आहात…बरोबर ना” ओंबारू ने थोडक्यात त्याची कुंडली सांगितली. ते ऐकून श्रेयस पण थक्क झाला. “हो…सर…माझी पूर्ण माहिती आहे तुमच्याकडे…” श्रेयस म्हणाला.
“चाय…पिणार की कोल्ड ड्रिंक” ओंबारू ने विचारले. “कोल्ड ड्रिंक चालेल सर” श्रेयस म्हणाला. कालच्या घटनेमुळे तो अजूनही थोडा अस्वथ दिसत होता. “तुम्हाला कसले टेन्शन आहे का?” ओंबारू ने विचारले. मग श्रेयस ने घडलेला किस्सा सांगितला. “ओके…तुमच्या शहरात पण असे कधी कधी घडते…पण तुमच्या समोर घडत नाही…म्हणून तुम्हाला धक्का बसला आहे…इथे असे नेहमी घडत नाही काळजी करू नका…” ओंबारू म्हणाले. तेव्हड्यात कोल्ड ड्रिंक आले. “मिस्टर श्रेयस…तुमचा खेळ पाहिला आणि मी खुश झालो…म्हणून मी एक ऑफर देतो आहे तुम्हाला… आम्ही कोच च्या शोधात होतो आमच्या टीम साठी, तुम्हाला टांझानिया च्या टेनिस टीम चे कोच व्हायला आवडेल का…”
त्यांचे ते बोलणे ऐकून एकदम संमिश्र भाव श्रेयस च्या चेहऱ्यावर उमटले, आपले आश्चर्य लपवत तो म्हणाला. “पण सर..मी इथे काही दिवसांसाठी आलो आहे, पण थोडे डिटेल दिलेत तर मला विचार करायला पण बरे पडेल…मी पुण्यात टेनिस कोचिंग करत होतो…आणि माझ्या फॅमिली ला रहायला काय सोय असेल?” श्रेयस ने विचारले.
“ओके, मी डिटेल सांगतो, 5 वर्षाचा करार असेल…तुम्हाला फर्निचर असलेला बंगला मिळेल. 25000 US dollars दर महिन्याला मिळतील..वर्षातून दोन फॅमिली ट्रीप चा खर्च तुम्हाला मिळेल…फॅमिली इन्शुरन्स, मेडिकल…घरी कूक आणि एक नोकर असेल. फॉलो युवर पॅशन् यंग मॅन, यू हॅव गुड opportunity…” ओंबारू म्हणाले.
“सर मी पंधरा दिवसांनी घरी जाणार आहे, मी तुम्हाला काही दिवसात कळवले तर चालेल का..आणि मला ऑफर लेटर मिळाले तर अजून सोपे होईल निर्णय घ्यायला.” श्रेयस म्हणाला. “Your offer letter is ready” ओंबारू ने सही केलेले जवळजवळ 20 पानी ऑफर लेटर श्रेयस पुढे सरकवले. “सर थॅन्क्स फॉर ऑफर लेटर, मी लवकर कळवतो.” श्रेयस म्हणाला.
” मी अजून दोन दिवस आहे इथे, कधीही येवून भेट…” आणि ओंबारू ने त्याला त्याचे visiting कार्ड दिले. पहिल्यांदाच टी शर्ट आणि हाफ चड्डीत श्रेयस ने इंटरव्ह्यू दिला होता आणि तो पास पण झाला होता. अनपेक्षित पणे मिळालेली संधी त्याला खूपच आनंदित करून गेली. हीच संधी आहे आपले टेनिस मधले करिअर पुढे चालू ठेवायची. श्रेयस मनात विचार करत गेस्ट हाऊस वर पोहचला. थोड्या वेळाने त्याने घरी फोन करून आनंदाची बातमी रेखाला आणि आईला सांगितली. “बाप रे, पंचवीस हजार डॉलर म्हणजे जवळ जवळ सतरा लाख महिन्याला…त्यांना परत भेटून राहायची सोय काय आहे बघ ना..” रेखा म्हणाली.
संध्याकाळी जॉन आणि इतर टीम मेंबर बरोबर नाईट क्लब मध्ये एन्जॉय करून रात्री परत येवून गेस्ट हाऊस ला झोपले. दुसऱ्या दिवशी परत श्रेयस…ओंबारू ला भेटला त्यांच्याबरोबर एक फोटो काढला. आणि दोघे टेनिस पण खेळले, ती मॅच पण त्याने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली. “चल आपण जाऊन येऊ या तुला मी तुझे घर दाखवतो…” ओंबारू म्हणाले. “सर पण मला गेस्ट हाऊस वर परत कोण सोडेल…” श्रेयस म्हणाला. “त्याची गरज नाही पडणार…” ओंबारू हसत म्हणाले. आणि त्यांनी तो जर जॉईन झाला तर कोणत्या घरात राहील ते दाखवले. छान बंगला होता मागे स्विमिंग पूल आणि पुढे समुद्र किनाऱ्याला जायला एक गेट होते. “याच्या दोन गल्ल्या पलीकडे तुझे गेस्ट हाऊस आहे” ओंबारू म्हणाले. खरंच सुंदर परिसर होता. “मी बेंगलोर आणि दिल्लीला बरेचदा आलो आहे…पुढच्या महिन्यात चेन्नई ला पण येणार आहे.” ओंबारू म्हणाले. “छान सर, घर खूपच छान आहे…आवडले मला…” आणि श्रेयस निरोप घेऊन गेस्ट हाऊस वर आला.
पंधरा दिवस झाले होते. तो आणि जॉन परत पुण्यात आले. त्यांनी बनवलेला जाडजूड रिपोर्ट मॅनेजमेंट ला सादर केला.
संध्याकाळी, रेखाला अपॉइंटमेंट लेटर दाखवले. “वा पूर्ण डिटेल दिले आहे…मला वाटते ही ऑफर तू घ्यावीस…तसेही तुला टेनिस पूर्णपणे करिअर करावे असे वाटत होते…ती संधी आली आहे…तुम्हाला काय वाटते आई…” रेखाने विचारले. “हो…इतका पगार तुला इथे मिळणार नाही…आणि टेनिस कोचिंग चे तुझे स्वप्न पूर्ण होईल” आई म्हणाली.
” आजच मेल वर कळवतो मी ओंबारू यांना…” श्रेयस म्हणाला. एक महिन्याने सर्व सोपस्कार पूर्ण करून श्रेयस पूर्ण फॅमिली बरोबर टांझानिया ला नवीन क्षितिज गाठायला झेप घेतली.