हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
माहिती संकलक .... योगिता गुर्जर
श्री गणेशाय नमः
आज आपण या मालिकेमध्ये भेटणार आहोत एका अशा गणपतीला जो दुपारी एक ते चार चक्क एसी लावून झोपतो.
नाही….हा गणपती पुण्यातला नाही तर पुद्दुचेरी अर्थात पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातला आहे .
या मंदिराचे नाव आहे…
मनकुला विनयागर मंदिर
पॉंडिचेरी येथे फ्रेंच शासन येण्यापूर्वीच्या काळातील हे पुरातन मंदिर आहे. दक्षिणेतील वैशिष्ट्यपूर्ण अशा स्थापत्यशैलीचा नमुना असलेले भव्य गोपूर काळ्यापाषाणांमध्ये बांधलेले असून त्यावर पुरातन काळातील अनेक कथा अनेक देवदेवता चित्र विचित्र आकाराचे प्राणी या सर्वांची चित्रे कथा इत्यादी कोरलेले आहे.
मंदिराचे बांधकाम या प्रदेशावर फ्रेंच कब्जा झाल्याच्या आधीचे, म्हणजे किमान पाचशे ते सहाशे वर्षे जुने आहे.
मंदिराचे नाव मनाल म्हणजे ‘वाळू’ आणि कुलम म्हणजे ‘समुद्राजवळ तलाव’ या दोन तमिळ शब्दांवरून पडले आहे. पूर्वी हेच मंदिर कुलूथू विनायगार या नावाने देखील प्रसिद्ध होते
डुप्लेक्सच्या कार्यकाळात , मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेथील हिंदू लोकसंख्येच्या तीव्र निषेधामुळे आणि ब्रिटिश आणि मराठ्यांच्या प्रदेशावरील आक्रमणाच्या धोक्यामुळे हा अनर्थ टळला.
मंदिराला चारीही दिशांना चार मोठी प्रवेशद्वारे असून ही प्रवेशद्वारे अतिशय सुंदर अशा शिसवी लाकडामध्ये कोरीव काम असलेली आहेत अंबारी सह हत्ती आत जाईल इतक्या उंचीची आणि रुंदीची ही दारे आहेत.
चारही प्रवेशद्वारांवर दक्षिणात्यशैलीची सुंदर गोपुरे आणि त्यावर झुलत असलेले भगवे झेंडे , आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उभा असलेला देवाचा गजराज हे पाहून अनुभवावे असेच दृश्य. आजूबाजूला पूर्ण फ्रेंच शैलीत असलेले अनेक बंगले इमारती चर्चेस या सर्वांच्या गजबजाटात अगदी मधोमध असे हे भव्य मंदिर सहज लक्ष वेधून घेते आणि नतमस्तक व्हायला लावते.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अष्टविनायक आहेत तसेच दक्षिणेतही अष्टविनायक आहेत आणि हा मनकुला विनायगार हा त्या अष्टविनायकां पैकीच एक आहे. मंदिराचा सभामंडप अत्यंत भव्य आहे आणि या सभा मंडपामध्ये मुख्य गाभाऱ्याच्या बाजूने छोटी छोटी देवळे करून त्यामध्ये अष्टविनायकातील बाकीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे तसेच त्या गाभाऱ्यांच्या वरही छोटी छोटी शिल्पे कोरली आहेत.
.मंदिरात वर्षभर अनेक सण आणि उत्सव आयोजित केले जातात, तरीही ब्रह्मोथसंवम, 24 दिवसांचा उत्सव सर्वात महत्वाचा आहे. हा उत्सव विजयादशमी ला संपन्न होतो या उत्सव काळामध्येच या गजाननाची सोन्याच्या रथातून अत्यंत सुंदर अशी मिरवणूक काढली जाते. मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांना दररोज आम्रपत्रे आणि खूप सारी फुले यांचे आरास केलेली असते विजया दशमी उत्सवामध्ये ही आरास विशेष लक्षवेधी असते. मिरवणुकीचा सोन्याचा रथ हा केवळ भक्तांनी दिलेली देणगी व सोने यातून निर्माण केला गेला आहे. या रथात वापरण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन 7.5 किलो असून अंदाजे 35 लाख रुपये आहे. रथाची उंची आणि रुंदी 10 फूट आणि 6 फूट आहे. रथ संपूर्णपणे सागवानाच्या लाकडात बनलेला होता आणि तांब्याच्या पत्र्याने मढवलेला होता तो पत्रा बदलून आता शुध्द सोन्याचा पत्रा त्यावर चढवला गेला आणि सोन्याच्या रेक् वापरून याचे जोड बनवले आहेत.
सर्वप्रथम ०५-१०-२००३ रोजी या सुवर्ण रथाची मिरवणूक काढली गेली त्यानंतर वर्षातून एकदा म्हणजे विजयादशमीच्या दिवशी हा सुवर्ण रथ मंदिराच्या बाहेर चारही प्रवेशद्वारातून गजानन मूर्तीस मिरवत नेतो.
सुमारे 300 वर्षांपूर्वी थोलैकत्तू सिद्दर ( सिद्दर् म्हणजे संत) या तामिळनाडूतील एका संतांनी या मंदिरामध्ये समाधी घेतली. त्यांचे समाधी स्थळ देखील मंदिराच्या विहिरीजवळ आहे आणि तेव्हापासूनच नवजात बालकांना या मंदिरामध्ये या संतांच्या समाधीच्या दर्शनास आणण्याची प्रथा पडली आहे.
इथे अजून एक विशेष बाब म्हणजे जसा दुपारी एक ते चार या गणपतीच्या झोपण्याची विशेष एसी असलेल्या गाभाऱ्यात सोय केली आहे त्याचप्रमाणे गणपतीसाठी विशेष शयन कक्षा असून दररोज रात्री या गणपतीची एक प्रतिमा रिद्धी सिद्धींसह मंदिरापासून थोडेसे दूर असलेल्या पलीराई या शयन कक्षामध्ये मिरवत नेली जाते व सकाळी भूपाळीच्या गायनानंतर पुन्हा ही प्रतिमा मूळ गाभाऱ्यामध्ये आणली जाते. कदाचित अशी काही प्रथा याखेरीज इतर कुठल्याही मंदिरात अथवा देवस्थानात असल्याचे ऐकिवात व पाहण्यात नाही.
तर असा हा दुपारी एक ते चार झोपणारा, पण पुण्यातील नसणारा श्रीगजानन.. मनकुला विनयागर मंदिर
बाहेरच्या सभामंडपाचे छत….थोडे झूम करून पाहिल्यास…गणपती व रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा इथे चित्रित केला आहे….
रंग, आकार, देवतांची वस्त्रे, आयुधे सर्व तपशील अजूनही अगदी सुरेख ठळक आहेत
माहिती संकलक …. योगिता गुर्जर
बाप्पा मोरया!