हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
श्री गणेशाय नमः
दहा दिवस दहा गणपती या आपल्या उपक्रमात आज आपण एका अतिशय अनोख्या अशा गणेश मंदिराविषयी माहिती घेणार आहोत.
कालच घरोघरी गौराई वाजत गाजत आल्या आहेत… आणि आज सगळीकडे गौरी पूजन व सवाष्ण भोजन हे सोहळे रंगलेले असतील.. मग आजच्या दिवसा इतका छान दिवस ह्या गणेश मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी असूच शकत नाही कारण आज गौरी रूपामध्ये नारीशक्तीची पूजा होत असताना आपली भेट घडवते आहे
नारी गणेश मंदिराची.
राजस्थान मधील भीलवाडा जिल्ह्यातील बिजौलिया या गावात हे अद्भुत मंदिर आहे. मंदाकिनी शिल्प मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेल्या, तेराशे वर्षाहून अधिक पुरातन अशा या मंदिरात नारी गणेशाच्या दोन मूर्ती आहेत.
एक मूर्ती प्रवेशद्वाराच्या आतील भागात आणि दुसरी मूर्ती प्रदक्षिणा मार्गावर दक्षिणाभिमुख छोट्या मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे.
मुख्य मंदिरातील गणेश मूर्तीच्या हातांमध्ये परशु, मोदक, गदा इत्यादी असून .. सोंड डावीकडील मोदकाच्या ताटाकडे वळलेली आहे. स्त्री देहधारी अशा या मूर्तीवर अत्यंत सुंदर असे अलंकार कोरलेले आहेत.
हिला वैनायकी लंबोदरी गणेशी गणेश्वरी अशा अनेक नावांनी संबोधले जाते. स्कंद पुराणानुसार वैनायकी ही 64 योगिनींपैकी एक असून ती शक्ती स्वरूपिणी आहे. देवी सहस्त्रनामात देखील हस्तिनी, वैनायिकी, विघ्नेश्वरी, गणेश्वरी, गणपति हृदया, अयंगिनी, महोदरा, गजवस्त्रा, लंबोदरा,तसेच महाकाया इत्यादी नावांचा उल्लेख सापडतो. बौद्ध पुराणांमध्ये देखील नारी रुपातील गणेशाचे वर्णन केले असून तिला गणपती हृदया असे संबोधले आहे. गृहात संहितेत देखील सप्तमातृकांमध्ये नारसिंही, वराही आणि वैनायकी यांचे उल्लेख आहेत.
मेवाड भागात नारी गणेशाला पुजण्याची पुरातन परंपरा आहे.
बिजौलिया क्षेत्रातील या मेनाल व मंदाकिनी मंदिर समूहाची निर्मिती नवव्या ते बाराव्या शतकातील असून इथले शिल्पकाम आजही बरेच सुस्थितीत आहे.
मेवाड प्रांतात या गणपतीची पूजा साथीचे रोग व शेतीचे टोळधाड तसेच कीड यापासून रक्षण करण्यासाठी विशेषतः केली जाते. भिलवाडा व मेवाड प्रांतातील, बेगू, बिजौलिया या भागात आज देखील शेतकरी इथे बियाणे अर्पित करून मगच पेरणी सुरू करतात. उंदीर व किडे हे बियाणे खाऊन टाकतात व पिकाचा नाश होतो त्यापासून वाचण्यासाठी या मूर्तींची पूजा केली जाते. स्त्री ही बीज धारक बीज रक्षक, उर्वरा शक्ती (Fertility) असलेली अशी असल्याने य स्वरूपात गणपती पूजनाची परंपरा निर्माण झाली असावी.
यंदाच्या गणेशोत्सवात देखील चतुर्थीच्या दिवशी लड्डू भोग अर्थातच हजारो लाडूंचा नैवेद्य दाखवून इथे उत्साहात या देवतांचे पूजन केले गेले. राजस्थान सारख्या कन्या मृत्यूचा सर्वाधिक दर असलेल्या भागातच गजानानाला नारी स्वरूपात पूजण्या ची इतकी पुरातन परंपरा काहीशी विरोधाभासी वाटते हे मात्र खरे.