मनोरंजन

।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )

★★कोशिंबीर★★    ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★कोशिंबीर★★    ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

ताटात वाढलेली कोशिंबीर बघून जाईच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिला कोशिंबीर हा प्रकारच आवडत नव्हता. नुसत्या फोडी,मीठ,मिरपूड लावून खायला तिला आवडायच्या.
“आई, तुला किती वेळा सांगितलं, माझ्या ताटात कोशिंबीर वाढत जाऊ नकोस.” जाई चिडून म्हणाली.

“अग, कोशिंबीर खावी,म्हणजे कोशिंबिरीसारखी मिसळशील.” वसुधा हसून म्हणाली.

“कोशिंबिरीसारखी मिसळशील म्हणजे?”

“मोठी झाली की कळेल तुला.”

जाईने नाक मुरडतच ताटातली काकडीची कोशिंबीर संपवली.

वसुधा एक सुगृहिणी. गणित विषय घेऊन एम एस सी झाली होती. नोकरी देखील करत होती पण वसुधाचं लग्न विलासशी झालं आणि तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. विलास लहान असतांनाच,आईच्या मायेला पोरका झाला होता. वडिलांनी दुसरे लग्न न करता,विलासला मोठे केले. इतक्या वर्षात घरात स्त्रीचा हात फिरलाच नव्हता. तिने आनंदाने गृहिणीपद स्वीकारले. सासऱ्यांची मनोभावे सेवा केली. वसुधाच्या संसारवेलीवर आलेलं गोड फुल म्हणजे जाई.

जाई जरा तापट स्वभावाची होती. वसुधाचे सामंजस्य तिच्यात नव्हते. जाई जशी मोठी होत गेली तशी वसुधाला काळजी वाटायला लागली.
“विलास, जाई फार तापट आहे. मुलीच्या जातीला थोडा संयम हवा,उद्या सासरी गेल्यावर आपल्या दोघांचा उध्दार होईल.”

“त्याचा इतका विचार करू नकोस. होईल ती समजूतदार. मुली सासरी गेल्या की त्यांना आपोआप शहाणपण येतं,. ” विलास जाईची बाजू घेत म्हणाला.

जाई इंजिनिअर झाली आणि वसुधाची मैत्रीण, सुवर्णा हिने तिच्या मुलासाठी जाईला मागणी घातली.सुवर्णाचा मुलगा राजू अतिशय हुशार आणि देखणा होता. तो आणि जाई एकमेकांना ओळखतच होते. पण सुवर्णाचा स्वभाव वसुधाला माहिती होता. समोरच्या माणसाची भीडभाड न ठेवता,स्पष्टपणे बोलून टाकायची. तिच्या ह्या स्वभावापायी तिच्याशी फार कोणी संपर्क ठेवत नसे. वसुधा मुळातच शांत होती,त्यामुळे ती सुवर्णाशी जुळवून घ्यायची. त्या घरात जाईला दिलं तर सासू सुनेचं पटणं,कठीणच आहे,असं वसुधाला वाटलं. तिने विलासला हे बोलून दाखवलं.
“विलास,सुवर्णाने जाईला मागणी घातलीय खरी,पण मी तिला चांगलं ओळखते. ती अतिशय घमेंडी, आणि फटकळ आहे.”

“वसु, जाई राजुशी लग्न करणार आहे. तो अतिशय बुद्धिमान आणि धडाडीचा आहे. केवळ सुवर्णाच्या स्वभावापायी तू इतकं चांगलं स्थळ नाकारणार का?”

“अरे पण आपल्या लेकीला,त्या सुवर्णासारखाच पटकन राग येतो. कसं पटायचं दोघींचं?”

” दोघीही एकमेकींना समजून घेतील. परिचयातले आहेत,शिवाय राजू आणि जाई एकमेकांना चांगलंच ओळखतात. तू सांगितलेलं कारण न पटण्यासारखे आणि क्षुल्लक आहे. जाईची हरकत नसेल तर स्थळ चांगलं आहे.” विलासने विषय बंद केला.

जाई आणि राजुने संमती दिली आणि लग्न ठरले. लग्नाचे मंगळसूत्र आणायला जाई गेली होती,तेव्हा सुवर्णाच्या स्वभावाची कल्पना जाईला आली. जाईची पसंती बाजूलाच राहिली. सुवर्णाने तिच्याच आवडीचे मंगळसूत्र घेतले. जाई नाराजच झाली पण आईने सांगितले होते की,ती सासरची माणसं आहेत. वाद घालू नको.
नवीन नात्यात कटुता नको म्हणून जाई शांत राहिली.

लग्न होऊन जाई सासरी आली. जाईचा स्वभाव वसुधाला चांगलाच माहिती असल्यामुळे तिने जाईला अनेक सूचना दिल्या होत्या. नवीन घरात जाई स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण सासूच्या स्वभावाची तिला पूर्ण कल्पना आली. घरात सुवर्णा म्हणेल ती पूर्व दिशा असायची. माहेरी आईबाबांना परखडपणे बोलणाऱ्या जाईची घुसमट व्हायला लागली. प्रत्येक गोष्टीत सुवर्णा, जाईची चूक काढायला लागली. आईवडिलांनी वळण लावले नाही,असे वारंवार म्हणू लागली.

जाईच्या संयमाचा कडेलोट एका प्रसंगाने झाला. सुवर्णाने जाईला नोकरी सोडण्याचा आग्रह केला.
“राजू,जाईला नोकरी करायची गरज नाहीय. आपल्याकडे कशाची कमतरता नाही. तिने घरात राहून मला मदत करावी.” सुवर्णाचा नेहमीचाच तोरा होता.

“आई,तिचं शिक्षण काय कामाचं मग? घरी बसण्यासाठी ती इतकं शिकली का? आणि ती जमेल तशी मदत करतेच की तुला. घरात नोकरही आहेत.” राजू नाराजीनेच बोलला.

“तुझं लग्न काय झालं,आणि तू बायकोची बाजू घेऊन मला शहाणपण शिकवतोस?” सुवर्णाचे वाद घालणे सुरू झाले. राजू काही न बोलता तिथून उठून गेला. राजुचे वडील सर्वच बाबतीत अलिप्त होते.

जाईच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती जोरात ओरडली,”मी नोकरी सोडणार नाही.” तिला संतापाने रडू आलं आणि ती खोलीत गेली.

दुसऱ्या दिवशी तिने रजा टाकली आणि माहेरी गेली.
घरात शिरल्याबरोबर ती वसुधाच्या गळ्यात पडून रडायला लागली.
“आई,मला आज असह्य झालं म्हणून मी रागाच्या भरात सुवर्णामावशीवर ओरडले.”

“अग पण झालं तरी काय?”

“मी नोकरी सोडावी अशी मावशीची इच्छा आहे. आई,मी नोकरी सोडणार नाही.”

“अग हो,नकोच सोडू. शांत हो आणि जेवायला बैस. मी जेवण वाढतच होते. बाबा आत्ताच जेवून ऑफिसमध्ये गेले.”

वसुधाने जेवणाची ताट घेतली. काकडीची कोशिंबीर जाईच्या पानात वाढत म्हणाली, ” जाई,मला सांग,ह्या कोशिंबिरीत आपण काय काय घालतो?”

“काहीतरी प्रश्न काय विचारतेस? मला सतत कोशिंबिरी करायला सांगायची आणि खायला लावायची. पाठ झाल्या आहेत सगळ्या कोशिंबिरी. काकडी,लिंबू,मीठ,साखर,दाण्याचा कूट आणि वरून मिरचीची फोडणी.”

“संसार कोशिंबिरीसारखाच असतो बाळा. कुणी काकडी सारखं कडक पण आत खोलवर पाण्याचा झरा. कोणी लिंबासारखं आंबट पण त्यांच्याशिवाय घरात मजा नाही. कोणी साखरेसारखं गोड,कोणी मीठासारखं,जे नसलं तर चव येत नाही आणि असलं तर पदार्थाची लज्जत वाढवतं. कोणी दाण्याच्या कुटासारखं,ह्या सगळ्यांना एकत्र आणून संसाराची लज्जत वाढवणारं. मिरचीची फोडणी म्हणजे संसारात वाद विवाद,मतभेद होणारच. त्याशिवाय तो खमंग कसा होणार? तुला दाण्याचा कुटासारखं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं आहे आणि जिभेवर साखर ठेऊन संसाराची गोडी वाढवायची आहे.”

जाई हसली.” म्हणून तू मला सारख्या कोशिंबिरी खायला घालत होतीस का?”

“तसं नव्हे ग जाई. तू नोकरी सोडू नकोस पण हे योग्य तऱ्हेने सुवर्णाला पटवून दे.”

“ते अवघड आहे. मावशीचा स्वभाव विचित्र आहे आणि माझे सासरे आणि राजू तिच्याशी वाद घालत नाहीत.”
संध्याकाळी चहा घेताना, मोबाईलची रिंग वाजली म्हणून जाईनेव
जाई तातडीने दवाखान्यात पोहोचली. सुवर्णाचे कमरेचे हाड मोडले होते. ऑपरेशन करावं लागणार होतं. जाईने ताबडतोब आठ दिवसांच्या रजेचा अर्ज टाकला. ऑपरेशननंतर सुवर्णाला शुद्ध येईपर्यंत जाई, तिच्याचजवळ बसली होती. सुवर्णाने डोळे उघडले. जाईने तिचा हात हातात घेतला, “मावशी,घरची काळजी करू नकोस.मी मॅनेज करेन सगळं. मी थोडे दिवस रजा घेतलीय.पुढचं होईल ऍडजस्ट.”
सुवर्णा मंद हसली.

जाईने खरंच तिचा शब्द खरा करून दाखवला. रजा होती तोवर सुवर्णाची सेवा केली. त्यानंतर दिवसभराची बाई ठेऊन,नोकरी सांभाळून जाईने घर व्यवस्थित सांभाळलं. सुवर्णाचा तोरा कमी झाला. ती घरात चालू फिरू लागल्यावर जाईला म्हणाली,
“जाई,उद्या रविवार आहे. सगळे घरी असणार. वसुधाला आणि तुझ्या बाबांना जेवायला बोलाव.”

“ठीक आहे मावशी,मी आईला फोन करते.”

वसुधा आणि विलास जाईकडे आले. आपली लेक इतकी जबाबदार झाली हे बघून दोघांनाही तिचा अभिमान वाटला. सुवर्णा तर तिचं कौतुक करताना थकत नव्हती.
“वसुधा,लेकीवर उत्तम संस्कार केलेस ग. मीच कधीतरी चुकले असेल तिच्या बाबतीत.”

“सुवर्णा, असं का म्हणतेस? सगळेच चुकत असतात ग. परिपूर्ण कोणीच नसतो.” वसुधा सुवर्णाचा हात हातात घेत म्हणाली.

“आणि जाई सुगरण पण खूप आहे हं. विशेषतः कोशिंबिरी फार छान करते. सगळं अगदी योग्य प्रमाणात असतं.” सुवर्णा कौतुकाने म्हणाली.

सुवर्णाचे हे वाक्य ऐकून वसुधा आणि जाई,दोघीही एकमेकींकडे बघून गालात हसल्या. त्या हसण्यामागचं कारण फक्त त्या दोघींनाच तर ठाऊक होतं…..

★★समाप्त★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}