हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
श्री गणेशाय नमः
आज आपण ज्या गणपतीची माहिती घेणार आहोत तो आहे रामचंद्रांनी रामेश्वर स्थापने पूर्वी पुजलेला त्रिनेत्र गजानन.
पण हे मंदिर दक्षिणेत नसून
सवाई मधोपुर जिल्ह्यातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या रणथंबोर किल्ल्यात आतील बाजूस आहे. हे प्राचीन मंदिर राजस्थानातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक समजले जाते. इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे
हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे गणेशाचे संपूर्ण कुटुंब गाभाऱ्यामध्ये आहे.
गणेश चतुर्थी चे सुवर्ण जडीत रूप
रिद्धी आणि सिध्दी यांच्या जवळच डाव्या बाजूस त्यांचे पुत्र शुभ व लाभ दिसत आहेत..
मंदिर निर्मितीच्या कथेनुसार 1299 साली रणथंबोर येथे राजा हमीर आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू होते. राजा हमीर किल्ल्या मधून या युद्धाचे नेतृत्व करत होते अनेक वर्ष चाललेल्या या युद्धामध्ये दोन्ही पक्षांचे नुकसान देखील झाले होते. राजा हमीर हे गणपतीचे अनन्यसाधारण भक्त होते. युद्धाच्या काळातही रोज गणपतीची पूजा अर्चना ते न चुकता करत असत. एके रात्री साक्षात गजानन त्यांच्या स्वप्नात रामायणात वर्णन केलेले श्री रामचंद्रांनी पूजन केलेले त्रिनेत्र गजानन या स्वरूपा आले आणि म्हणाले की उद्या सकाळी तुझ्या पुढच्या समस्यांचा मी अंत करीन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर राजा हमीर यांना किल्ल्याच्या भिंती वरती त्याच गणेशाची प्रतिमा उमटलेली दिसते आणि याहूनही आश्चर्य म्हणजे काहीही तह न घडता काहीही विशेष न होता अल्लाउद्दीन खिलजी सैन्यासह अचानक माघारी फिरला आणि युद्ध समाप्त झाले. अनेक वर्ष चाललेल्या या युद्धामध्ये रिकामी झालेली धान्याची गोदामे पूर्णपणे भरलेली दिसली. या चमत्कारा नंतर राजा हमीर यांनी ज्या भिंतीवर गणेशाची प्रतिमा उमटली होती तेथेच गणपतीचे एक सुंदर मंदिर बांधले या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये गजानना सह त्याच्या दोन्ही पत्नी रिद्धी सिद्धी तसेच दोन्ही पुत्र शुभ आणि लाभ व गणेशाचे वाहन असलेला मूषक या सर्वांच्या वेगळ्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या. अशा तऱ्हेने गजाननाचे संपूर्ण कुटुंब असलेले हे मंदिर इसवी सन तेराशे साला मध्ये पूर्ण झाले.
राजाला स्वप्नात दिसलेला गणपती हा त्रिनेत्र असल्याने या मंदिरातील मूर्ती देखील त्रिनेत्र स्वरूपातील आहे. विक्रम संवत या संवत्सराची सुरुवात करणारे राजा विक्रमादित्य उदयपूर होऊन या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी चालत जात असत.
पारंपारिक राजस्थानी शैली मध्ये बांधले गेलेले हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये एकूण 36 कोरीव पाषाणाचे खांब आहेत. दोन बाजूस देवळ्या आणि तीन घुमटाकार कळस असलेले मुख्य गर्भगृह अशी ही रचना आहे.
इथल्या गणेशाचा शृंगार देखील राजस्थानची परंपरा दाखवण्याचा असाच असतो. या गणेशाचा पोषाख जयपुर मध्ये तयार केला जातो. सामान्यतः सर्व दिवशी चांदीच्या वर्खाने लिप्त असलेला हा गजानन गणेश चतुर्थी माघी जयंती व इतर महत्त्वाच्या दिवशी संपूर्णपणे सुवर्णमंडीत असतो.
या गणपतीला सुपारीच्या फुलांचा हार घातला जातो. ती फुले खास मुंबईहून मागवली जातात आणि ताजी रहावी म्हणून विमानाने तिथे पोहोचवली जातात. मंदिराच्या परिसरात असलेले एक विशिष्ट प्रकारचे गवत इथल्या आरतीसाठी वापरले जाते हे गवत सोडून त्याच्या भोवती खूपशा कापूस गुंडाळून या वाती म्हणून आरती मध्ये वापरल्या जातात.
तर असे हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट असलेले आणि गणेशाच्या संपूर्ण कुटुंबाचे दर्शन देणारे जगातील एकमेव मंदिर. समोरच्या अभयारण्याला वाघ बघण्यासाठी जेव्हा भेट द्याल त्यावेळी या मंदिरातील चिंतामणी त्रिनेत्र गणेशाचे दर्शन घ्यायला विसरू नका.
माहिती संकलक …. योगिता गुर्जर
खूप छान माहिती. आत्तापर्यंत न वाचलेली, न ऐकलेली कथा कळली. खूप स्तुत्य उपक्रम. धन्यवाद 🙏