।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )
★★दिसतं तसं नसतं★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★दिसतं तसं नसतं★★
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
पूर्वा सोसायटीच्या आत आली आणि तिला स्कुटर पुढे नेता येईना कारण सामानाचा ट्रक उभा होता.तिने स्कुटर स्टॅण्डवर लावली आणि लॉक करून घराकडे निघाली.सामानाचा छोटा ट्रक नुकताच आलेला दिसत होता.ट्रकच्या बाजूला एक अतिशय आधुनिक तरुण मुलगी तिला उभी असलेली दिसली.स्लीवलेस टीशर्ट,शॉर्टस,डोळ्यावर स्टायलिश गॉगल,बॉयकट.पण चेहरा खूप गोड आणि हसरा.पूर्वाला ती एकदम आवडून गेली. ती त्या मुलीजवळ गेली.”कुठल्या फ्लॅट मधे आला?”
“फ्लॅट नंबर २०१,दुसरा मजला. दोन वर्षांसाठी भाड्याने घेतलाय.” ती मुलगी उत्तरली.
“ओह ग्रेट! म्हणजे आमच्याच शेजारी.आम्ही २०२ मधे राहतो.मी पूर्वा सबनीस.काही मदत हवी असेल तर नक्की सांगा.मराठी कळतं न?”
“आंटी, मला अहो नका म्हणू.आणि मराठी कळतं,मी मराठीच आहे.रिमा ओक.मुंबईची.आईवडील मुंबईत असतात.दोघेही डॉक्टर आहेत.मी इथे पुण्यात एमबीए करायला आलीय.” रिमा हसत म्हणाली.
“ओके रिमा, सामान उतरलं की घरी ये.पाण्याच्या बाटल्या देते मी.”
भाजीच्या पिशव्या घेऊन पूर्वा कुलूप उघडून घरात आली.दोन्ही मुलं, आर्या शाळेत आणि मुलगा अनिश कॉलेजमध्ये गेले होते.नवरा सकाळी आठ वाजताच कंपनीत जायचा.घरात एकटेच वयोवृध्द सासरे. नव्वदीच्या आसपास.हिअरिंग एड लावल्याशिवाय ऐकायला येत नव्हतं.डोळे कमजोर झाले होते.विस्मरण वाढलं होतं. ते घरात एकटे असले की पूर्वा कुलूप लावूनच बाहेर पडत असे.
पूर्वाने नुकत्याच आणलेल्या ताज्या कच्च्या कैरीचं पन्ह केलं आणि सासऱ्यांच्या खोलीत गेली.
“बाबा,पन्ह घ्या ताज्या कैरीचे.”
त्यांना काही ऐकू आलं नाही.त्यांनी प्रश्नार्थक चेहरा करून पूर्वाकडे बघितलं. पूर्वाने त्यांना हिअरिंग एड दिलं.
“खोकला व्हायचा ग पन्ह घेतलं की.परत तुम्हालाच सगळ्यांना माझ्या खोकण्याचा त्रास व्हायचा.”
“काही होत नाही बाबा.उन्हाळ्यात पन्ह घ्यायलाच हवं.शरीराला थंडावा मिळतो.” पूर्वाने त्यांच्या हातात ग्लास दिला.
पूर्वा भाज्या फ्रीजमधे ठेवत असतानाच शेजारच्या सायलीचा फोन आला.”पूर्वा, अग ती हिरॉईन बघितलीस का?”
“कुठली हिरॉईन?” पूर्वाने विचारलं.
“अग, आपल्याच मजल्यावर आलीय म्हणे भाड्याने.काय तो अवतार.कपडे बघितले का तिचे?असे ड्रेस घालायला लाज कशी वाटत नाही ग?” सायलीचं खोचक बोलणं.
“हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.आणि तिला ते शोभून दिसतंय.तिची फिगर त्याला साजेशी आहे आणि ती तरुण आहे.हल्ली फॅशनच आहे,शिवाय उन्हाळा,प्रवास,तिला कम्फर्टेबल वाटत असेल. हल्ली चाळीशीच्या वर असलेल्या बायका सुद्धा कम्फर्टसाठी जीन्स,टी शर्ट घालतात.” पूर्वाने तिला हटकलं.
“तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही पूर्वा. तुझं वेगळंच काहीतरी असतं. पण जपून ग बाई.तुझी सख्खी शेजारीणी आहे आणि तुझा मुलगा अनिश तरुणच आहे हं.” सायलीने खोचकपणे बोलून फोन बंद केला.
सायलीने कपाळावर हात मारून घेतला.एव्हाना रिमाचे सामान वर आले होते.फारसे नव्हतेच.एकट्या मुलीचे किती असणार?पूर्वा दोन पाण्याच्या बाटल्या आणि पन्ह घेऊन रिमाला द्यायला गेली.
“रिमा,हे घे पाणी आणि तुझं सामान लागेपर्यंत दोन दिवस मी डबा देते.”
“नको आंटी,तुम्हाला उगाच त्रास.”
“छे ग,त्रास कसला.सकाळी डबा असतोच सगळ्यांचा.संकोच करू नको.एकटीच राहणार की शेअर करणार रुम्स?”
“नाही एकटीच राहणार आहे.म्हणूनच वन बेडरुमचा घेतलाय.”
“ओके.संध्याकाळी ये घरी.माझ्या मुलांची ओळख करून देते.” पूर्वा म्हणाली.
**************
रिमाची आर्या आणि अनिशची चांगली मैत्री झाली.अनिश इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता आणि आर्या बारावीत.
पूर्वाच्या मजल्यावर एकूण चार फ्लॅट होते.बाकीच्या दोनमध्ये एका फ्लॅटमधे सायली आणि दुसऱ्यात वाणी राहत होती.दोघींनाही रिमा आवडलीच नव्हती.तिचं ती आधुनिक राहणी,सतत तिच्याकडे येणारी कॉलेजमधली मुलं, त्यांना आवडतच नव्हतं.
सायली आणि वाणी एक दिवस दुपारी पूर्वाकडे आल्या. “पूर्वा,अग तुला कसं चालतं त्या मुलीचं वागणं? आपल्या मजल्यावर सतत ते तरुण मुलं येतात.आमच्याही मुली आता वयात येताहेत.मी तर सोसायटीकडे तक्रारच करणार आहे की असे भाडेकरू आम्हाला चालणार नाही.”वाणी म्हणाली.
“दिसतं तसं नसतं ग.चांगली आहे ती मुलगी.तिच्या राहणीमानावरून निष्कर्ष काढू नका.साधी आहे ती.आणि ह्या पिढीत मुलं घरी येणं म्हणजे काय अगदीच कॉमन आहे.त्यांचे गृप प्रोजेक्ट असतात. त्यावर डिस्कशन असतं.त्यांची निखळ मैत्री असते.आणि ती मुलगी चांगल्या घरची आहे.तिचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत.सुशिक्षित घरातली आहे.बऱ्यावाईटाची तिला नक्कीच जाण असेल.”
“तुला सावध करायला आलोय.नाही पटलं तर सोडून दे.चल ग वाणी.” सायली एकदम उठून चालायलाच लागली.
त्या दोघींना कसं समजवावं पूर्वाला कळेना.
*************
आज पूर्वा आणि सुशीलच्या लग्नाचा वाढदिवस होता.रात्री चौघांनी हॉटेलमधे जेवायला जायचा बेत केला.पूर्वाने सासऱ्यांना वाढून दिलं आणि लॅच, कुलूप लावून निघाले.
रविवार असल्यामुळे हॉटेलमधे खूप गर्दी होती.वेटिंग मधे नंबर पाचवा होता.जेवून घरी यायला बारा वाजले.पूर्वाने कुलूप काढलं,लॅचला किल्ली लावली पण लॅच उघडेना.सुशील आणि अनिशने खूप प्रयत्न केला तरी लॅच उघडत नव्हतं.शेवटी दारावर जोरजोरात वाजवायला सुरवात केली.बाबा बाबा हाक मारली तरीही दार उघडेना.अर्धा तास चौघे दारावर थाप मारत होते. वॉचमनने देखील प्रयत्न केला पण उघडत नव्हतं.
आवाज ऐकू आला म्हणून रिमाने दार उघडले तर चौघेही तिला बाहेर उभे दिसले.
“आंटी,काय झालं?”
“लॅच उघडत नाहीय ग.सगळे प्रयत्न करून झाले.हेअरक्लिप पण घालून बघितली.आता यावेळी लॅचची किल्ली करणारा कुठून येणार? सॉरी ग,तुला डिस्टर्ब झालं.”
“नाही हो आंटी.तुम्ही चौघे माझ्याकडे येऊन बसा.बघू काही होतंय का?” रिमाने जबरदस्ती चौघांनाही आत बोलावलं.आतून पाणी घेऊन आली.
“आंटी,एक सुचवू का?” रिमाने हळूच पूर्वाला विचारलं.
“काय ग,बोल की.”
“तुम्ही चौघे आज इथेच झोपा, सकाळी किल्ली करणाऱ्याला घेऊन येऊ.म्हणजे तुमची हरकत नसेल तर.”
“अग पण तुला कशाला उगाच त्रास?”
“आंटी,त्रास कसला हो.उलट आज मला तुमची सोबत होईल.दोन गाद्या आणि दोन उशा आहेत.एक मोठी सतरंजी,बेडशीट्स आहेत.करू आपण ऍडजस्ट.चार पाच तासांचा तर प्रश्न आहे.”
पूर्वाने सुशीलकडे बघितलं.
“ओके बेटा. थँक्स.” सुशील म्हणाला.
“काका,थँक्स कसले हो.माय प्लेजर.” रिमाने लगेच आतून बाहेरच्या खोलीत दोन गाद्या सुशील आणि अनिशसाठी आणल्या आणि आतल्या खोलीत मोठी सतरंजी त्या तिघींसाठी टाकली.
तिची प्रसंगावधान बघून पूर्वाला आणि सुशीलला खूप कौतुक वाटलं.
*************
पहाटे पाचला पूर्वाला जाग आली.तशी झोप लागलीच नव्हती.तिने सुशीलला उठवलं.
“बाबा,चार वाजताच उठतात.एकदा बेल वाजवून बघू.”
सुशील आणि पूर्वाने बेल वाजवली आणि बाबांनी दार उघडलं.
“अरे,इतका उशीर तुम्हाला?पहाटेचे पाच वाजलेत.”
“बाबा,आत येतो,मग बोलू.”
“तुम्ही गेल्यावर मी आतून लॅच लावलं कारण किल्ली होती न तुमच्याकडे.”
पूर्वाला हसावं का रडावं कळेना.तिने लॅच बघितलं.
“सुशील,बाबांनी आतून लॅच लॉक केलं होतं,कसं उघडणार?”
“काय झालं ग पूर्वा?काही बोललीस का?”बाबा म्हणाले.
“काही नाही बाबा,चहा करते मग बोलू.”
तोपर्यंत अनिश,आर्या, रिमा आत आले.त्यांनाही काय झालं ते कळलं.
“रिमा,आता चहा घेऊनच जा आणि आज जेवायला इकडेच ये.” पूर्वा म्हणाली.
*************
सकाळी दहा वाजता सायलीचा फोन आला.
“पूर्वा,काल आवाज कसले येत होते ग दाराचे. चोर वगैरे आला होता का काय?वॉचमनशी बोलली का तू?”
“हो,ते चोर आम्ही चौघे होतो.आमच्याच दारावर थापा मारत होतो.तुम्ही दार उघडून सुद्धा बघितलं नाही.पण ती मॉडर्न कपडे घालणारी,मुलांशी बोलणारी रिमा आहे न,तिने आम्हाला आत घेतलं.तिच्याच घरी आम्ही रात्री झोपलो होतो.”पूर्वा चिडून बोलली.
“तुझा टोमणा कळला हं.एक कॉल केला असतास तर मी उघडलं असतं की दार.” सायली तोऱ्यात म्हणाली.
“जाऊ दे सायली,मला विषय वाढवायचा नाहीय.फक्त एकच सांगते,’दिसतं तसं नसतं’ हे समजून घे.”
पूर्वाने फोन बंद केला आणि रिमा जेवायला येणार म्हणून अनिशला आंबे आणायला पाठवलं….
××समाप्त××
©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
छान आहे!