।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )
★★चिल★★ ©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★चिल★★ ©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
कपाळावर घामाचे थेंब साचायला लागले तसं ऐश्वर्याने गॅस बंद केला.पंखा फुल स्पीडवर करून जरावेळ खुर्चीवर बसली.सगळं झालंच होतं. बटाट्याची भाजी,सांबार,चटणी. आता चटणीवर तडका मारला की गरम डोसे करून वाढायचे.आज रविवार स्पेशल बेत तिने केला होता.सांबार करताना त्याच्या सुवासाने ती स्वतःवरच खुश झाली.चटणीसाठी तडका करायला ती उठली.
छोट्या कढईत तेल तापल्यावर त्यात बारीक मोहरी,कढीलिंब,हिंग आणि सुकी लाल मिरची टाकली.मिरचीचा तडका इतका लागला की सारंग खोलीतून स्वयंपाकघरात आला.
“काय करते आहेस ऐश.ठसका लागला.”
“सारंग,तुला किती वेळा सांगितलं आहे,मला ऐश म्हणू नकोस.”
“आत्ता ते महत्वाचं नाहीय”सारंग वैतागून म्हणाला.
“अरे,ह्याला जिवंत फोडणी म्हणतात.” ऐश्वर्या हसत म्हणाली.
“कसली जिवंत फोडणी.इथे मरायची पाळी आलीय.”
“आई,काय केलंस ग,सगळा धूर घरात.”ऐश्वर्याची लाडकी कन्यका रिया कानाला हेडफोन लावून बाहेर आली.
ऐश्वर्याच्या मनात आलं, हिला हे बरं ऐकू आलं आमचं बोलणं.एरवी कामाच्या वेळेस दहा वेळा बोलावलं तरी ऐकू येत नाही.
“ओह गॉड, काय हा वास.” चिरंजीव राज खोलीतून बाहेर आलेत.
“चला, थँक्स टू माय फोडणी.तुम्ही तिघेही खोलीच्या बाहेर आलात.आता लगेच डिश भरते.गरमागरम डोसे देते.” ऐश्वर्या म्हणाली.
तिघेही खुर्चीवर आपापल्या मोबाईल मधे डोकं खुपसून बसले. ऐश्वर्याने डिश भरल्या आणि गरमागरम डोसे सगळ्यांना वाढत होती.रिया आणि राज कानाला हेडफोन लावून समोर आहे ते खात होते.सारंगचेही तेच.खाता खाता फोनवर बोलणं. एकानेही तिला असं म्हटलं नाही की छान झालंय, टेस्टी झालंय. झाल्यावर तिघेही उठून आपल्या खोलीत गेले.
ऐश्वर्याने तिची डिश भरून घेतली आणि पहिलाच घास घेताना तिच्या डोळ्यात पाणी आलं.सकाळपासून पीठ मिक्सर मधून काढण्यापासून ती राबत होती.आणि कुणालाही तिच्या एफर्ट्सचे कौतूक वाटले नाही.खर तर ही पहिली वेळ नव्हती.असं नेहमीच व्हायचं.तिने एखादा स्पेशल पदार्थ केला तरी तिघांनाही कधी तिची तारीफ करावी असं वाटत नसे.आज का कुणास ठाऊक तिला संतापच आला.तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतानाच रिया पाणी प्यायला आली.तिला ऐश्वर्या रडताना दिसली.
“आई,काय झालं?आर यु ओके?”
“रिया,तुलाही असं वाटलं नाही का ग की आई इतके श्रम घेते तर निदान तिच्या समाधानासाठी तरी त्या पदार्थांची तारीफ करावी.” तिने रियाला रागानेच विचारले.
“ओह कमॉन आई,चिल..तू चांगलंच करते.त्यात काय सांगायचं.” रिया पाण्याची बाटली घेऊन तिच्या रूम मधे गेली.
ऐश्वर्याने सगळं आवरलं आणि प्रीतीला फोन केला.
” हाय ऐश्वर्या, कशी आहेस ग?आणि भर दुपारी झोपायचं सोडून मला कशाला फोन केला?” प्रीती चेष्टेने म्हणाली.
“प्रीती,काय करते आहेस?”.
“आज यु ट्यूब वर मस्त जुन्या फिल्म्स बघणार,ऋषिकेश मूखर्जींच्या. नवरा टूरवर गेलाय आणि आमचे युवराज ट्रेकिंगला.घरात मी एकटीच. आज माझ्या मनासारखं जगणार.” प्रीती हसत म्हणाली.
“मी येऊ का तुझ्या घरी आत्ता?” ऐश्वर्याने विचारलं.
“येऊ का काय विचारतेस. लगेच ये.मस्त दोघी मिळून जुना ‘चुपके चुपके’ बघू.धमाल करू.”
“तासाभरात पोहोचते ग.” ऐश्वर्याने मोबाईल बंद केला.
ऐश्वर्याला तयार होताना बघून सारंगने विचारलं,
“कुठे निघालीस?”
“जरा फिरून येते,काही वस्तू आणायच्या आहेत.”
“आत्ता दुपारी? मी झोपतोय हं,मी काही दार उघडणार नाही.तू लॅचची किल्ली घेऊन जा.”सारंगने लगेच झोपायची तयारी सुरू केली.
ऐश्वर्या राजच्या खोलीत आली.तिथला पसारा बघून ती चिडलीच.
“राज,काय हा पसारा.निदान आपली खोली तरी नीट ठेवावी.”
“चिल आई, कोण बघतंय माझी खोली?” राज बेफिकीरपणे बोलला.
‘चिल’ हा शब्द ऐकूनच ऐश्वर्याच्या डोक्यात तिडीक गेली.ती तशीच खोलीच्या बाहेर आली.रियाच्या रूममधे डोकावली.तिचं फोनवर बोलणं सुरू होतं.ती काही न बोलता बाहेर आली,लॅचची किल्ली घेतली आणि प्रीतीकडे जायला निघाली.
—————————————————————–
बेल वाजली म्हणून प्रीतीने दार उघडलं.दारात ऐश्वर्याला बघून तिला आनंद झाला.
“ऐश्वर्या, किती दिवसांनी आलीस.एवढी कसली बिझी असतेस ग? घरीच तर असतेस.”
“प्रीती,तू पण हेच बोलतेय.घरीच असते म्हणून.घरी असणाऱ्या बाईला कामं नसतात का?” ऐश्वर्या चिडून बोलली.
ऐश्वर्याचा तो नूर बघून प्रीतीला कळलं,काहीतरी बिनसलं आहे.
“ऐश्वर्या, व्हाट्स राँग विथ यु.”
“वैताग आलाय ग.कितीही मरमर करा,माझी किंमतच नाही घरात कुणाला.”ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी तरळलेलं प्रीतीने बघितलं.
प्रीतीने ऐश्वर्याचे हात धरले आणि म्हणाली, चिल ग.होतं असं कधीकधी.”
प्रीतीच्या तोंडून चिल शब्द ऐकला आणि ऐश्वर्या भडकलीच. ” खबरदार तो चिल शब्द परत उच्चारला तर.तिडीक जाते माझ्या डोक्यात.”
प्रकरण चांगलंच तापलं आहे,हे प्रीतीच्या लक्षात आलं. “अग पण झालं काय तुला इतकं चिडायला ऐश्वर्या?”
ऐश्वर्याने सकाळचा प्रसंग प्रीतीला सांगितला.
“अच्छा,ये बात है.तू एक काम कर,आज रात्रीपर्यंत घरी जाऊच नकोस.माझ्याकडे आली आहेस हे सांगितलं आहेस का घरी?”प्रीतीने विचारलं.
“मी काहीही सांगितलं नाही.गृहीत धरतात सगळे मला.बाहेर जातेय इतकंच बोलले.”
“बेस्ट,आता तू चिलची गोळी घे आणि माझ्याकडेच थांब ” प्रीती हसत म्हणाली.
“प्रीती,काय हे? कसली चिलची गोळी?”
“त्या गोळीचीच तुला नितांत गरज आहे.डोकं शांत ठेव.सकाळी जे झालं ते विसर आणि आपण आता मस्त फिल्म बघू.उठ,मस्त सोफ्यावर आडवी हो आणि एकदाही घरची आठवण न काढता फिल्म एन्जॉय कर.”
फिल्म बघता बघता ऐश्वर्याने चार वेळा घड्याळ बघितलं.प्रीती काहीही न बोलता तिला निरखीत होती.संध्याकाळचे सहा वाजलेत आणि ऐश्वर्याची चुळबुळ सुरू झाली.
“प्रीती,मी आता घरी जाते.खूप उशीर झालाय.”ऐश्वर्या सोफ्यावरून उठत म्हणाली.
“ऐश्वर्या, तू कुठेही जाणार नाहीस.तुझी किंमत नाही म्हणतेस ना,मग येऊ दे मला त्यांचा फोन.तुझा मोबाईल स्विच ऑफ कर.”
अपेक्षेप्रमाणे सात वाजता रियाचा फोन आलाच.
“प्रीतीमावशी, आई आलीय का ग तुझ्याकडे?सगळ्या मैत्रिणींना फोन करून झाला. कुणाकडेच नाहीय ती.”
“छे ग,माझ्याकडे नाही आली.मी तर घरीच आहे.”प्रीती अगदी नॉर्मल आवाजात बोलली.
“हो का,बघते मग अजून काही ठिकाणी फोन करून.” रियाने फोन बंद केला.
“प्रीती,मी जाते ग,ते तिघेही काळजी करतील.”
ऐश्वर्या काकुळतीने प्रीतीला म्हणाली.
“अजून दोन तास तू इथून हलायचं नाहीस.नऊ वाजता तू निघ.करू दे त्यांना मॅनेज.तुझी किंमत कळेल.” प्रीतीने ठणकावून सांगितलं.
नऊ वाजेपर्यंत ऐश्वर्याने कसाबसा तग धरला आणि ती घरी जायला निघाली.
“घरी पोहोचल्यावर फोन कर.माझ्या जीवाला घोर लावू नकोस.”प्रीती म्हणाली.
“हो करते.”ऐश्वर्याने पर्स घेतली आणि निघाली.
पाठमोऱ्या ऐश्वर्याकडे बघून प्रीती मनात म्हणाली,
“वेडाबाई.”
—————————————————————-
ऐश्वर्याने लॅच उघडलं.बाहेर सोफ्यावर राज कुणालातरी फोन करत होता आणि रिया रडत होती.
दोघांना बघून तिला एकदम भरून आलं.
“राज,रिया” तिने हाक मारली.
ऐश्वर्याला बघून दोघांनीही तिच्याकडे धाव घेतली.
“आई,कुठे होतीस तू इतका वेळ?किती घाबरलो आम्ही.वाईट विचार मनात यायला लागले.” रिया रडतरडत बोलत होती.राजच्या डोळ्यातही पाणी आलं.
ऐश्वर्याने दोघांनाही जवळ घेतलं.तिच्याही डोळ्यात अश्रू आले.इतक्यात सारंग आला. दारातून त्याला ऐश्वर्या,राज,रिया एकमेकांच्या मिठीत दिसले.त्याने मोठा सुस्कारा सोडला.
“कुठे होतीस ऐश? ही काय पध्दत झाली वागायची?सगळ्या ओळखीच्या लोकांकडे जाऊन आलो.पायाखालची जमीन सरकली होती.” सारंग चिडून म्हणाला.
“सारंग,चिल.”ऐश्वर्या म्हणाली आणि राज,रियाने तिच्याकडे चमकून बघितलं.
“असं काय बघताय माझ्याकडे? चिल.”
ऐश्वर्या खळखळून हसत म्हणाली.
ऐश्वर्या, राज,रियाच्या हसण्यात सारंग देखील सामील झाला…..
——-समाप्त——
©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे