मनोरंजन

।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )

★★तुझ्यासाठी काही पण★★    ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे.

★★तुझ्यासाठी काही पण★★    ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे.

श्रुतीने चेहऱ्यावर टचअप केलं आणि आरशात मागून,पुढून स्वतःला निरखून बघितलं.लेटेस्ट फॅशनचा पार्टीवेअर गाऊन ,खांद्यापर्यंत मोकळे सोडलेले केस आणि हलकासा मेकअप.ती स्वतःच्या प्रतिबिंबावर खुश झाली. इतक्यात तुषार खोलीत आला.
“ओहो,स्टनिंग, गॉर्जस दिसतेय.” श्रुतीकडे बघून तुषार म्हणाला.

“तुषार,खरं तर मी ह्या सगळ्यात कम्फर्टेबल नाहीय.तू मागे लागलास म्हणून मी मेकओव्हर केला.माझे इतके सुंदर लांबसडक केस कापले.मेकअपच्या तर मी कधी वाटेलाही गेले नव्हते. साध्या,बाळबोध श्रुतीला तुझ्यामुळे बदलावं लागलं.”श्रुती हसत म्हणाली.

“खरंय ग,पण मी सीईओ झालो आणि माझं सर्कल बदललं.पहिल्या पार्टीला तुला नेलं होतं तेव्हा तू सगळ्यांसमोर काकूबाई दिसत होतीस. ती एक वेणी,कपाळावर मोठी टिकली.वास्तविक मला तू तशीच आवडते पण कधी कधी इतरांसाठी स्वतःला बदलावं लागतं.”

“किती नाटकी वाटतात रे काहीजणी! सगळं वरवरचं! मुळात आपण लहानपणापासून वेगळ्या वातावरणात वाढलो आहे त्यामुळे ह्याची आपल्याला सवय नाही.खरं तर हे खूप कॉमन झालं आहे.” श्रुतीने हलकासा परफ्यूम कपड्यांवर शिंपडला.

“श्रुती,तो मुखवटा आपण दोन तीन तासांसाठी चढवायचा.घरी आलो की आपलं खरं रूप.काही गोष्टी नाईलाजास्तव कराव्या लागतात. मी चेंज करतो, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग.”

श्रुती रूमच्या बाहेर आली आणि तिने नंदनला हाक मारली,” नंदन,जरा बाहेर ये.”

नंदन त्याच्या रूममधून बाहेर आला आणि श्रुतीला बघून त्याच्या कपाळावर आठी पडली.श्रुतीला हल्ली हे वारंवार जाणवत होतं की नंदन तिला बघितलं की तोंड फिरवतो,नीट बोलत नाही.

आताही त्याने तुटकपणे विचारलं,”कशाला बोलावलंस?”

“आम्ही बाबांच्या कंपनीच्या पार्टीला चाललोय.यायला उशीर होईल.मी सगळं करून ठेवलंय.तू जेवून घे.लॅचची किल्ली घेऊन जातोय आम्ही.” तिने किल्ली पर्समधे टाकली.

“नवीन काय त्यात आई, हल्ली दर शनिवारी तू मला हेच सांगते. ही वाक्य मला आता पाठ झाली आहेत.” नंदन तुटकपणे बोलला आणि रूममधे निघून गेला.

आठवीतला नंदन,त्याचं कोवळं रूप संपून पौगंडावस्थेतील चिन्ह दिसू लागली होती. एकलकोंडा झाला होता.प्रत्येक गोष्टीत स्वतःचं खरं करायचा स्वभाव झाला होता. ह्या गोष्टी नैसर्गिकच होत्या.पण श्रुतीला त्याचं तिच्याशी वागणं खटकत होतं. कारण मात्र कळत नव्हतं.

गाडीत बसल्यावर तिने तुषारजवळ विषय काढलाच.” तुषार,हल्ली नंदन जरा विचित्र वागतोय असं नाही वाटत का तुला?”

“श्रुती,ही इज ऑन द व्हर्ज ऑफ प्युबर्टी.ह्या वयात हे सगळं नॅचरल असतं. फार विचार करू नकोस.होईल तो नॉर्मल.”

श्रुतीने मग जास्त विषय वाढवलाच नाही.
पण तिला आतून अस्वस्थ वाटायचं.

तुषार अतिशय हुशार आणि महत्वाकांक्षी होता.अगदी लहान वयात त्याच्या मेहनतीने आणि हुशारीने त्याने नोकरीत उच्चपद मिळवलं होतं. घरची सगळी जबाबदारी श्रुती समर्थपणे पेलत होती.’बाबा’ सतत व्यस्त त्यामुळे ‘आई’ हेच नंदनचं विश्व झालं होतं. एकुलता एक असल्यामुळे सतत आईभोवती घुटमळणं. तो लहान असताना त्याच्या वयाच्या मुलांबरोबर देखील रमायचा नाही.मग निरनिराळे गेम्स खेळून श्रुती त्याचे मनोरंजन करत असे. थोडा मोठा झाल्यावर तो जरा मित्रांमध्ये रमायला लागला.तसा तो फार बोलका किंवा मोकळा नव्हताच पण हल्ली त्याचं सतत त्याच्या रूममधे असणं, श्रुतीशी संवाद कमी होणं, हे तिला बेचैन करत होतं.

पार्टीहून परत आल्यावर श्रुतीने ठरवलं,उद्या लताला फोन करायचा.लता;तिची शाळेतली मैत्रीण.आता प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ होती. तिने तुषारला हे काहीच सांगितले नाही,कारण त्याला हे पटण्यासारखे नव्हते.त्याच्या मते हे वयच तसं असतं. मुलं अशी वागतातच.

श्रुतीने लताला फोन लावला, “लता,कशी आहेस? मुद्दामच सकाळी लवकर फोन केला,मग दिवसभर तू व्यस्त असतेस.”

“अग, मी मजेत. पेशंट्सच्या गराड्यात व्यस्त आहे.फार वाढलीय सध्या मानसिक आंदोलनं! विशेषतः तरुण पिढीची. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी नसते.लगेच डिप्रेशन येतं.मला वाटतं आईवडील खूप जास्त काळजी घेतात,सतत मुलांचाच विचार, त्यामुळे ती कमकुवत होतात.मनाने हळवी,भीत्री असतात. तू कशी आहेस? खूप दिवसात भेट नाही ग आपली. भेटू लवकरच.मला पण ब्रेक हवा आहे.”
लता म्हणाली.

” एक विनंती करू का तुला?श्रुतीने विचारलं.

“विनंती कसली ग,हक्काने सांग.”

“लता,नंदन हल्ली खूप अबोल,तिरसट, एकलकोंडा झालाय ग.”

“आता तु पण त्यातलीच का?अग, त्याचं हे वयच आहे.ह्या वयात हार्मोनल चेंजेस होत असतात. मुलं अशीच वागतात.” लताने तिला समजावलं.

“ते सगळं मलाही कळतं ग.पण तो माझ्याशी जास्त तुटकपणे वागतो असं मला जाणवतंय.तू एकदा आम्ही दोघेही घरी नसताना ये आणि त्याच्याशी एकट्याशी बोल. क्लिनिकमधे त्याला घेऊन येणं तुषारला काही पटणार नाही आणि नंदन तर मुळीच येणार नाही.”

“ठीक आहे.एखाद्या रविवारी संध्याकाळी ठरव.”

“लता,ह्या रविवारीच ये. आम्हाला तुषारच्या बॉसकडे पार्टीला जायचं आहे.मी तुला वेळ कळवते.”

“ओके,येते मी,अँड डोन्ट वरी. ते काही फार सिरीयस नाही.”लता म्हणाली.

रविवारी पार्टीला निघायच्या आधी श्रुतीने लताला फोन लावला.”लता,आम्ही निघतोय,तू लगेच ये.आणि दोन तीन पुस्तकं काढून ठेवते,ती तुला हवी होती असं नंदनला सांग.”

“ओके,येते मी लगेच,यु एन्जॉय.”लता म्हणाली.

लताने डोअरबेल वाजवली.नंदनने दार उघडलं.
“हाय मावशी,ये न आत.व्हॉट अ प्लेझंट सरप्राइज.”
नंदनने हसून लताचं स्वागत केलं.

नंदनशी गप्पा मारताना, श्रुतीने फोनवर जे नंदनचं वर्णन केलं होतं, ते लताला कुठेही जाणवलं नाही.पण तिला आता एक डॉक्टर म्हणून त्याला बोलतं करायचं होतं.

“वा नंदन,कॉफी मस्त केलीस रे.कशी चाललीय शाळा तुझी?आता दोन वर्षांनी तुझं दहावीचे वर्ष.छान अभ्यास कर,खूप शीक.आणि आता अभ्यासासाठी आईवर अवलंबून राहू नकोस. तुझा तू करायला शीक.”

“आईवर अवलंबून राहायला आईला हल्ली वेळ कुठे असतो?तिचं पार्लर,बाबांबरोबर सारखं पार्टीला जाणं. मावशी,तू आईला बघितलं का इतक्यात? ती खूप बदलली आहे ग! मला ती माझी साधी आईच आवडत होती.आता काहीतरी नवीन फॅशनचे कपडे घालते,केस कापले.आय डोन्ट लाईक ईट.”नंदनची नाराजी लताला कळली.

“नंदन,बाबा आता मोठ्या पदावर आहे.पार्ट्या,सोशल लाईफ हे वाढतच बाळा.आणि आईला बाबाला साथ द्यायला हवीच न.आज बाबांच्या प्रगतीमुळे तू आणि आई इतकं ऐश्वर्य उपभोगताय. आणि थोडं बदलावंच लागतं रे! तू लहान असताना तिचं जग तुझ्याभोवती फिरत होतं बट नाऊ यु आर अ ग्रोन अप बॉय! आणि आईला तुझ्याबरोबर बाबांचेही मन राखायला हवे ना!” लताने नंदनचा हात हातात घेतला.

“मला कळतं ग मावशी.पण तिचं ते मॉडर्न राहणं मला आवडत नाही. ती परकी वाटते मला! आधी किती छान दिसायची.”नंदनच्या डोळ्यात पाणी आलं.

“ओके ओके,रिलॅक्स नंदन.आई खूप साधी होती आणि अचानक तिचं राहणीमान बदललं तरी ती आईच आहे रे.वरून ती बदलली असली तरी तिच्या तुझ्याविषयी असलेल्या भावना,तिची माया थोडीच बदलणार आहे. थोडा वेगळ्या दृष्टीने विचार कर, तुला नक्की उत्तर सापडेल बघ. मी निघू आता? आणि तुझ्या माझ्यात जे बोलणं झालं ते आईला अजिबात कळू द्यायचं नाही हं! ते आपल्या दोघांचं सिक्रेट! मी पुस्तकं घ्यायला आले होते हे सांग आईला. व्हॉट से?”
लताने हसून विचारले.

“डन मावशी.”नंदनने तिच्या हातावर टाळी देत हसला.

रात्री घरी आल्यावर श्रुतीला वाटलं, लताला फोन करावा पण बराच उशीर झाला होता.सकाळी तिला जाग आली तेव्हा तुषार वॉकला गेला होता. नंदन झोपला होता.तिने लगेच लताला फोन लावला.
“लता,झालं का ग तुझं नंदनशी बोलणं?काय झालंय त्याला?”

“रिलॅक्स ग,काहीही झालं नाहीय त्याला. माझ्याशी त्याने छान गप्पा मारल्या.”

“मग माझ्याशी का असा वागतोय ?”

“श्रुती,फार काही सिरिअस प्रॉब्लेम नाहीय. तुझं राहणीमान आधी इतकं साधं होतं. तुझ्यातला अचानक झालेला बदल स्वीकारणं त्याला जड जातंय.तुझं राहणीमान आधीपासूनच आधुनिक असतं तर त्याला काहीच वाटलं नसतं.हा प्रॉब्लेम काही मुलांमध्ये येतो. मुलं आईच्या बाबतीत खूप पझेसिव्ह असतात.त्याच्या जागी मुलगी असती तर तिला फारसं काही वाटलं नसतं. आणि त्याचं वय नाजूक आहे. तू त्याच्यापासून दूर जातेय असा त्याचा समज झालाय.त्याला मी समजावलं आहे. तू पण त्याला समजून घे.काही दिवस त्याच्या कलाने घे. होईल सगळं नॉर्मल.”

“म्हणजे काय करायचं मी?त्याच्या कलानेच तर घेतेय सगळं.” श्रुतीचा आवाज नकळत चढला.

“श्रुती,कलाने घे म्हणजे तुझं राहणीमान थोडं बदल.एक स्त्री साडीमध्ये, कपाळावर कुंकू असेल तर तितकीच सुंदर दिसते. त्यासाठी खूप मॉडर्न पेहेराव करायची काहीही आवश्यकता नाही. आणि तू मुळातच देखणी आहेस. तुला काहीही शोभून दिसतं.”

“आता तूच सांग, नवऱ्याचं ऐकू का मुलाचं?”श्रुतीला हसू आलं.

“सध्यातरी मुलाचं ऐक.त्याचं वय एका नाजूक टप्प्यावर आहे.त्याला सांभाळणं,त्याला तुझ्याबद्दल विश्वास वाटणं हे जास्त महत्वाचं आणि गरजेचं आहे. बाकी तुझ्या नवऱ्याला सांगायची जबाबदारी माझी.” लता हसत म्हणाली.

“थँक्स लता, तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटलं ग!

“थँक्स काय ग,नंदन मला मुलासारखा आहे.केव्हाही फोन कर. बाय, टेक केअर.”

श्रुतीने फोन बंद केला आणि किचनमधे चहा करायला आली.नंदन तिच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “आई,आज शाळेत दुपारी चार वाजता पेरेन्ट्स मीटिंग आहे. नववी,दहावीसाठी पेरेन्ट्सना गायडन्स आहे.”

“ओके,मी येते.”श्रुती म्हणाली. तिने हळूच नंदनकडे बघितले.आज तो तिच्याशी जरा नॉर्मल बोलला.

आज श्रुतीने छान बंगाली साडी घातली,कपाळावर मोठं कुंकू लावलं.केस बांधले आणि शाळेत जायला निघाली.

टिचरने पेरेन्ट्सना एका क्लासरुम मधे बसवलं होतं आणि मुलांना तिथे बोलावलं.एक एक स्टुडंट आत येत होता.श्रुतीला नंदन आत येताना दिसला.त्या दोघांची नजरानजर झाली आणि नंदन तिच्याकडे बघून अगदी मोकळं,दिलखुलास हसला.

श्रुतीला अगदी हलकं वाटलं.तिने तिच्या लाडक्या नंदनकडे बघितलं आणि मनात म्हटलं…
“तुझ्यासाठी काही पण!”

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}