Classifiedदेश विदेशब्रेकिंग न्यूजमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

दुर्मिळ वस्तू माझ्या संग्रहासाठी……….  श्री अनंत कुलकर्णी, नाशिक.

श्री अनंत कुलकर्णी, नाशिक.

तसा मी ब्रिटिशकालीन व रिपब्लिकन करन्सीचा संग्रहक, परंतु नोटा नाण्यांचा संग्रह करताना, तसेच नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात असल्याकारणाने त्या ठिकाणाहून काही संग्राह्य नोटा नाणी, तसेच दुर्मिळ वस्तू गोळा करीत असे. असेच कोईमतुर या ठिकाणी कंपनीच्या कामानिमित्त गेलो असताना मला तेथील जुन्या बाजारामध्ये शाईच्या दोन दौती मिळाल्या, त्यांचा आकर्षक आकार आणि रूप पाहून मी त्यांच्या प्रेमातच पडलो, आणि माझ्या संग्रहासाठी त्या विकत घेतल्या.

बऱ्याच वेळा संग्रहक व्यक्ती त्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वस्तू, नोटा, नाणी असे जमा करत जातो, पण इतर संग्रहकांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की एक कुठलीतरी थीम पकडून त्याचा संग्रह केल्यास ते अधिक उपयुक्त ठरते. मला संग्रहसाठी वेगळा विषय हवा होता आणि तो मला मिळाला. मग मी माझ्या संग्रहासाठी मध्ययुगीन काळातील लेखन साहित्य, या विषयाची थीम निवडली. एकदा थीम ठरवल्यानंतर मग त्याचा अधिक खोलवर अभ्यास करत असताना मला मध्ययुगीन काळातील लेखन साहित्य, या विषयाची गोडी निर्माण झाली, आणि गेली अनेक वर्ष हा संग्रह मला आनंद देत आहे.

फार पूर्वीच्या काळापासून मानव त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे जमिनीवर, लाकडावर, गुहेच्या भिंतीवर कोरून, रंगकामाद्वारे अथवा लिखाणाद्वारे उतरवून ठेवत असे.

     

जुन्या काळातील लेखन संस्कृती अर्थात शाईच्या विविध आकारातील दौती, टाक, लेखणी, पेन, नीब यांचा स्पेशली संग्रह आहे

     

ही संपूर्ण भरीव पितळी असलेली, ग्रीक शैलीतील दौत आहे. हिचे वजन चार किलो, 730 ग्रॅम आहे.

लिखाण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रलिपी असे. वेगवेगळ्या चिन्हाद्वारेही लिपीचा वापर केला असे. लेखनासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर केला जाई. यात गुहेतील चित्रे, दगडांवर केलेले खोदकाम, दगडावर कोरलेली विविध लिपी यांचा समावेश होतो. परंतु हे एका जागी स्थिर होते आणि हाताळता येत नव्हते.
नंतर हळूहळू मानवाने लिखाणासाठी झाडाची भूर्जपत्र यांचा वापर केला असावा, यामध्ये भूर्जपत्र वरील लिखाण कुठेही नेता येऊ शकत होते. लिहिण्यासाठी सहज हाताळता येण्यासारख्या घटकाची आवश्यकता होती, यातूनच शाईचा जन्म झाला असावा. शाई मुख्यत्वे करून नैसर्गिक घटकांपासूनच बनवलेली असे, जसे की दिव्याची काजळी, झाडाचा डिंक, निसर्गाद्वारे मिळणारे विविध रंग यांचा वापर शाईमध्ये केला जाई. मग ही शाई पातळ असल्यामुळे साठवून ठेवण्यासाठी विविध छोट्या आकारातील भांड्यांचा वापर करण्याची गरज भासली, यातूनच शाईच्या दौतींचा जन्म झाला. दगडी खळगा, मातीचे भांडे यात शाई तयार करून वापरली जायची. पुढे त्यात कालानुरूप बदल होऊन धातूच्या , संगमरवरी, काचेच्या छोट्या आकारातील बाटल्या यांचा वापर दौत म्हणून केला जाऊ लागला.
लिहिण्यासाठी सहजगत्या हाताळता येणाऱ्या वस्तूची गरज होती, यासाठी मोरपीस, विविध पक्षांची पीसे, यांचा वापर सुरू झाला. पीसातील मध्यभाग पोकळ असल्याकारणाने त्यात शाई शोषली जायची, आणि जास्त वेळ लिखाण व्हायचं. पुढे वेळूच्या झाडाचा मध्यभाग असलेल्या बोरूचा वापर होऊ लागला. परंतु जास्त वेळ वापर केल्यानंतर याला पुन्हा तासण्याची गरज असे, यातूनच पुढे नीबचा जन्म झाला असावा.
छोट्या हातात धरणेयोग्य लाकडी दांडीला पुढे नीब लावून, लिखाण सुरू झाले. याला टाक म्हणत. याद्वारे लिखाण सुबक आणि वळणदार होई.
लिहिण्यासाठी शाईच्या दौती, बोरू आणि टाक, यांचा वापर बऱ्याच काळ चालला. विविध आकारातील शाई च्या दौती आपल्याला बघायला मिळतात. विविध आकारातील दौती, बोरू, टाक हे कालानुरूप वापरण्यास सोपे आणि दिसण्यात अतिशय मनमोहक आणि कलात्मक होऊ लागले. कालानुरूप सोने, चांदी, जस्त, पितळ, काच, सिरॅमिक यांचा वापर दौतीसाठी होऊ लागला. लिहिण्यासाठी सोपे आणि कुठेही नेता येण्यासाठी प्रवासात वापरता येणाऱ्या दौती टाक पण फार थोड्या प्रमाणात तयार झाल्या. सद्यस्थितीत या मिळणे दुर्लभ आणि दुर्मिळ आहे.
दौत टाकाच्या लेखनासाठी टाक पुन्हा शाईत बुडवण्याची गरज असे, यातूनच पुढे शाईच्या पेनची उत्क्रांती झाली. ज्यात शाई एकदा भरली ती बरेच दिवस चालत असे, परंतु ती संपल्यावर पुन्हा भरण्याची आवश्यकता भासे.
गरज ही शोधाची जननी असल्याकारणाने त्यावर उपाय म्हणून सद्यस्थितीत वापरात असलेल्या बॉलपेन चा वापर सुरू झाला. यात पातळ शाई हद्दपार होऊन, रिफील किंवा वापरून फेकून देता येण्याजोगे पेन आता वापरात आहेत. परंतु अजूनही विविध ठिकाणी आवर्जून शाईच्या पेनचा वापर हा केला जातो.

अशा अनेकवीध आकारातील आणि अनेक प्रकारच्या दौती, टाक, बोरू, पूर्वीच्या काळातील शाई तयार करण्याची बाटली, शाई बनवण्यासाठी लागणारी काजळी, शाईच्या गोळ्या या सर्व गोष्टी भारतभरातून नोकरी आणि संग्रह प्रदर्शनाच्या निमित्ताने फिरत असताना विविध ठिकाणाहून कधी विकत, तर कधी वस्तू विनिमय दराने अशा पद्धतीने मिळवत गेलो. माझ्या संग्रहात असलेली खिशात ठेवण्याची एक बाय एक इंचाची शाईची दौत आणि त्याचा घडी घालता येणाऱ्या टाक, हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असून, तो मला मिळवण्यासाठी लखनऊच्या एका वयस्कर व्यक्तीकडे सलग तीन दिवस पाठपुरावा केल्यानंतर मिळाला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. या दुर्मिळ दौतीची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून माझ्या इतर संग्रहाची ही नोंद झाली आहे.
छंद हा माणसाचा खरा मित्र असून त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आज माझ्या संग्रहामध्ये अनेक विविध आकारातील, आणि प्रकारातील धातूच्या, सिरॅमिकच्या, काचेच्या, लाकडी कोंदण असलेल्या अशा १४४ दौती असून अनेक प्रकारचे टाक, बोरू असा संग्रह आहे.

नाशिकच्या एका शैक्षणिक संस्थेतील प्रोफे सरांनी त्यांच्या आजोबांच्या काळातील दौत, टाक आणि नीब बॉक्स मला सप्रेम भेट दिला. प्रदर्शनाला बऱ्याच मंडळींना आम्ही आवाहन करतो की त्यांच्याकडील जुन्या वस्तू आम्हाला पडून राहण्यापेक्षा देण्यात याव्यात, गरज असेल तर त्याचे योग्य मूल्य ही देण्यात येईल.
आमचा मुख्य उद्देश आपल्या नवीन पिढीला आपल्या वैभवशाली संस्कृतीची ओळख करून देणे हा आहे. जेणेकरून आम्हाला वेगवेगळ्या प्रदर्शनाद्वारे आपल्या संस्कृतीची ओळख मुख्यत्वे करून विद्यार्थी, मुले यांना करून देता येईल. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो.

अशा विविध आकारातील आणि प्रकारातील शाईच्या दौती, टाक, बोरू, शाई तयार करण्याची बाटली, मोरपीस लेखणी, प्रवासासाठी खिशात ठेवता येईल अशी आणि सहजगत्या नेण्याजोगी दुर्मिळ दौत, यांचा संग्रह नाशिकचे श्री अनंत कुलकर्णी ( 99708 64118) यांनी केला असून, त्यांच्या संग्रहातील काही दुर्मिळ दौतींची छायाचित्रे …🙏
या वेगळ्या संग्रहाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने पण सन्मानित केलेले आहे🙏

इतिहास कालीन दौती (लेखनी साहित्य) कधी पाहिली का ? ४० वर्षा पासून आपला छंद असा जोपासला जातोय पहा.. https://www.instagram.com/reel/C3QO_URoSvL/?igsh=MWNiemtic2RwaW44Yg==

श्री अनंत कुलकर्णी ( 99708 64118)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}