*निवृत्ती नंतर??* श्रध्दा जहागिरदार
*निवृत्ती नंतर??*
खुप दिवसांपासून जोशी काका -काकूंना घरी बोलवत होते. काका-काकूंची आणि आमची खुप जुनी ओळख. जवळ रहात होतो त्यावेळी नेहमी त्यांचे आमच्याकडे येणे, आमचे त्यांच्याकडे जाणे असायचे. तसे ते आम्हाला वयाने मोठे पण जेथे मैत्री, विचार जुळतात तेथे वय आड येत नाही. त्यामुळे आमचा दोघांचा चांगलाच घरोबा होता. कालांतराने आम्ही दुसरीकडे रहायला गेलो. रिटायर झाल्यावर खुप दिवसांनी काका-काकू घरी आले होते.
दोघांचे चेहरे एकदम खुश दिसत होते. कारण काका नोकरीवर असताना काकूंची नेहमी तक्रार असायची “माझ्यासाठी कधीच ह्यांना वेळ नसतो, सारखं काम- काम. आपणहून कधीही म्हणत नाहीत चल आज आपण ईकडे जाऊ, तिकडे जाऊ. मी एकटी घरात बसून कंटाळवाणी होते गं. पण ‘ ह्यांना’ कधी हे जाणवतच नाही त्या कामा पुढे” अशी काकूंची नेहमी तक्रार असायची. पण काकू आज खुष दिसत होत्या.
गप्पांच्या ओघात काकूंनीच सांगितले ” मला आत्ताच आमचे लग्न झाल्यासारखे वाटत आहे. ह्यांचा सहवास मला आता खरा मिळत आहे. ह्यांची निवृत्ती ही माझ्यासाठी पर्वणी ठरली आहे गं. निवांत 8 वाजता दोघे जणं उठतो. कधी कधी तुझे काका माझ्या हातात चहाचा कप आणून देतात”.
ज्या व्यक्तीने स्वत: चा चहाचा कप कधी उचलला नाही. ती व्यक्ती चहा करुन काकूंच्या हातात देते. नाष्टा घरी करा वाटला तर करतात, नाहीतर दोघे मस्त पैकी गाडीवर बसून बाहेरच नाष्टा करुन येतात.
मुलगा परदेशी असल्यामुळे कोणतीही जबाबदारी नव्हती. गप्पा मारत मारत दोघे निवांत जेवण करतात. दुपारचा आराम करुन संध्याकाळी बाहेर फिरायला जातात नाहीतर चक्क दोघेच जण गाण्याच्या भेंड्या खेळ, पत्त्याचा डाव मांड.
“मला पहिल्यांदा वाटले गं, दोघात खेळण्यात काय मजा येणार. त्या गाण्याच्या भेंड्या खेळताना जुने सिनेमे आठवतात, मग त्यातील प्रसंग एकमेकांना सांगायचे. त्यातूनच दोघांच्या गप्पा रंगतात. हास्याचे कल्लोळ उठतात. जुन्या आठवणी निघतात. वेळ कसा जातो कळत नाही बघ. तुझ्या काकांचे हे रुप मला या आधी कधीच पहायला नाही मिळाले.”
“त्यांच्या सहवासात दिवस कुठे जातो कळत नाही बघ” काकू भरभरुन काकांचे कौतुक करत होत्या.
निवृत्तीनंतरचा काळ हा नवरा- बायकोला अधिक जवळ आणण्याच काळ असतो. संसाराची ही दोन चाके
मोडकळीस आलेली असतात. एकमेकांना आधार देत, एकमेकांची काळजी घेत पुढची वाटचाल करायची असते.
तरुणपणी पुरुष नोकरी मागे धावत असतात. पाहिजे तेवढा वेळ ते घरात देऊ शकत नाहीत. आता तर बायका पण नोकरी करतात. दिवसभर दोघांना एकमेकांचे चेहरे दिसत नाहीत. रात्री बाईला दुसर्या दिवसाचा दिनक्रम आखावा लागतो. दोघेही थकलेले असतात. एकमेकांशी नीट बोलणे पण होत नाही.
अशावेळी कधीतरी बाईला किंवा पुरुषाला वाटते ‘ही’ ‘हा’ मला पुरेसा वेळ देत नाही.
पण निवृत्तीनंतरचा काळ, जीवन हे तुमचे असते. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे त्याचा तुम्ही वापर करु शकता. एकमेकांची करमणूक एकमेकांनीच करायची. कारण मुलं ही त्यांच्या संसारात रमलेली असतात.
“भाजी आणायला आता एकटे गाडीवर जाऊ नका. आताशा तुम्ही एकटे बाहेर जातच जाऊ नका. तुम्ही येईपर्यंत मनाला हुरहुर लागते बाई” या वाक्यामागे बायकोची नवर्याविषयी
वाटणारी काळजी आहे. किंवा “रोज आपण आता बरोबरच जेवण करत जाऊ “हे वाक्य ऐकल्यावर बायकोच्या अंगावर मुठभर मांस नक्कीच चढेल.
रिटायर झाल्यावर काय करावे हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो.
पण एकमेकांसोबत कधी थट्टा- मस्करी, कधी काळजी, कधी भांडण कधी तेवढेच वाटणारे प्रेम दाखवले. भरपूर मित्र परिवार जोडला. तर मला नाही वाटत ‘ काय करु’ हा प्रश्न उद्भवेल.
काकू जाताना तोंड भरुन, खुश होऊन ‘ येते गं ‘ म्हटल्या. जाताना काका- काकूंकडे मी कौतुकाने पहात होते.
आणि नकळत मी ‘ ह्यांना ‘ प्रश्न विचारला ” तुम्ही रिटायर कधी होणार ओ? ”
आयुष्यात धावून धावून
थकायचे असते।
साथीदाराच्या आधाराने
जगायचेअसते।
निवृत्तीनंतर पण खुल्या मनाने
स्वातंत्र्य अनुभवायचे असते।
भांडण- तंटा हे संसाराचे गुपीत असते
या वयात पण
‘ देखो मगर प्यार से ‘ असे
एकमेकांस म्हणायचे असते।।
श्रध्दा जहागिरदार🙏🙏
मस्त!