श्रद्धा.. समजुती.. भाबडेपणा.. ✍️नीलिमा क्षत्रिय
श्रद्धा.. समजुती.. भाबडेपणा..
✍️नीलिमा क्षत्रिय
आज पोळी भाजताना पोळीवर पाऊल उमटले, ‘अरे, तवा फारच तापला वाटतं’ म्हणत पटकन गॅस बारीक केला, तवा मध्यम तापमानाला येऊ दिला. पुढच्या पोळीला पुन्हा पाऊल वगैरे तसं काही झालं नाही..
पण मनात आलं.. विज्ञान, शिक्षण, सोशल मिडिया.. ह्या सगळ्यामुळे माणूस नको तितका शहाणा आणि प्रॅक्टीकल झालाय ना.. पाच पन्नास वर्षांपूर्वी पर्यंत असं पाऊल उमटलं की बायका म्हणायच्या ‘कोण पाहुणा येतोय काय की’.. घरावर कावळ्याचं काव काव सुरू झालं की तो पण पाहुणे येण्याचा संकेत समजला जायचा.. लहान मुलं पण सगळ्यावर किती भाबडेपणाने विश्वास ठेवायची. पण आता मोबाइलमुळे सगळे सगळ्यांच्या संपर्कात असतात, घरातून निघाल्यापासूनचे अपडेट्स आता मोबाइलवर येऊन पडत असतात. त्यामुळे अचानक पाहुणे येण्यातली गंमत आता राहिली नाही किंबहुना अचानक पाहुणे येणे ही आता गंमतच राहिली नाही, तर ती गैरसोय झाली आहे.
दिवेलागणीला घर झाडायचं नाही, उंब-यावर बसून शिंकायचं नाही, संध्याकाळी दही द्यायचं नाही, डाव्या हाताने पैसे द्यायचे घ्यायचे नाही, तिन्हीसांजेला लक्ष्मी यायची वेळ असते म्हणून पैसे द्यायचे नाहीत.. दारिद्र्य येतं, मांजर मारली तर काशीला जाऊन सोन्याची मांजर वहावी लागते. भात एकदा वाढायचा नाही, सासरा गरीब मिळतो. काय काय समजुती असायच्या पण लोक सहसा त्यामागचं शास्त्र शोधण्यापेक्षा मोठी माणसं सांगतात म्हणून ऐकायची. त्यामागे अडाणीपणा पेक्षा भाबडेपणा जास्त असायचा.
पाण्याला नाही म्हणायचं नाही. कोणी पाणी मागितलं आणि दिलं नाही तर पुढच्या जन्मी बेडूक होण्याचा धाक असायचा. आताच्या पिढीला हा धाक घातला तर काय काय उत्तरं ऐकायला मिळतील.
परवा एका मैत्रिणीकडे संध्याकाळी तिच्या पायरीवर गप्पा मारत बसले होते. तिची सून फार बडबडी आहे. म्हणजे इतकी की कोणीही दोन व्यक्ती तिला सोडून बोलूच शकत नाही. ही लगेच तिचा प्रांत नसला तरी त्या संभाषणात मुसंडी मारतेच. त्याने घरात सगळेच वैतागलेले असतात. त्यांच्या अंगणात परवा मोठ्ठा बेडूक दिसला. बेडकाला बघून तिची बडबडी सून झाडांना पाणी घालायला घाबरायला लागली. म्हणून मैत्रीणीचा मुलगा पायरीवर बसल्या बसल्या बारीक बारीक खडे बेडकाकडे टाकून त्याला घाबरवत होता आणि हुसकवत होता. ते पाहून त्याची आजी जोरात ओरडली, ‘अरे बेडकाला दगड मारू नाही, पुढच्या जन्मी मुकी बायको मिळते बरं!!”
मुलगा पटकन बायकोकडे बघत म्हणाला, ‘लग्न झालेलं असेल आणि बेडकाला दगड मारला तर ह्याच जन्मी आहे ती बायको मुकी होते का आजी’..
पुस्तकांसाठी संपर्क:
https://nilimakshatriya.wixstudio.io/nilimakshatriya