©️ स्नेहल अखिला अन्वित ✍️
💜💜 आज ना मला मुलाला अजिबात शाळेत पाठवायचं नव्हतं. मी तसं त्याच्या गाडीवाल्या काकांना सांगून सुध्दा टाकलेलं अगोदरच, शनिवारी तो काही यायचा नाही.
कालच चाचणी परीक्षा संपली आमची. मी एकतर अभ्यास करून खूsssप थकले होते. तो काल शेवटचा पेपर देऊन आला, अन् मला कुणी करकच्च बांधून ठेवलेल्या दोरखंडातून मोकळं केल्यासारखं वाटलं.
तो जेऊन खेळत बसला अन् मी अशी ताणून दिली की दोन तास इकडच्या कुशीवरून तिकडे पण झाले नाही. चार चार हाका मारून सुध्दा उठले नाही म्हणून मुलीने घाबरून छपाsक छपाsक करत पाणी शिंपडलं तेव्हा मी स्वप्नांच्या दूनियेतून वास्तवातल्या बेरहम दुनियेत परत आले.
पोरगा नेहमी परीक्षा संपल्यावर उद्याss मी शाळेला जाणार नाही; अशी घोषणा करतो.
यावेळेला त्याने ती घोषणाच केली नाही. म्हणून मीच त्याला संध्याकाळी अडून विचारलं, उद्या डब्यात काय देऊ रे तुला?
मुलगा म्हणाला, दे काहीही!
मला अपेक्षित उत्तर न आल्याने मी पुन्हा विचारलं, उद्या शाळा आहे तुम्हाला?
मुलगा म्हणाला, आहे ना!
मग मी हळूच त्याच्या कानात विचारलं, जाणार आहेस तू?
तो म्हणाला, होsssमग?
मी दुख:वेगाने आतल्या खोलीत गेले, मुलीच्या कुशीत शिरून म्हटलं, ह्याला उद्या शनिवार असून शाळेत जायचय. मी कंटाळलेय लवकर उठून उठून…..
मुलगी म्हणाली, नको पाठवू मग!
तो ‘नाही’ म्हणत नाहीये ना पण! मी कशी नको जाऊ म्हणू? बरं दिसत नाही ना ते! आईच मुलाला शाळा बुडवायला भरीस पाडते असं होतं ना!
मग बस तशीच! मुलीने माझ्यातलं लक्ष काढून मोबाईलमध्ये टाकलं. #हल्लागुल्ला
नेमकं काल मला काहीही होत नव्हतं. मुलाला न पाठवण्यासाठी एक कारण मिळत नव्हतं.
दोनदा काय चारदा प्रयत्न करूनही माझं बोट कुठल्याही दरवाज्यात चिमटलं नाही. डोकं सुध्दा कधी नव्हे ठणठणीत होतं. पोटात दुखण्यासाठी एक आणि अर्धा तास मी नुसती काही ना काहीतरी अरबट चरबट चरत बसले होते. माझ्या उदराने काहीही कुरकुर न करता ते सारं जिरवून सुद्गा टाकलं.
शेवटचा पर्याय म्हणून घरातच चालता चालता मी समोरून येणाऱ्या नवऱ्याच्या पायात पटकन पाय सुध्दा अडकवला, ज्याने मी जराशी कलंडले अन् तो मात्र पुढे जाऊन भिंतीवर आपटला.
त्यानंतर मात्र आमच्या भोळ्या शंकराने तिसरा डोळा उघडून रुद्रावतार धारण करून तांडव घातला. अॕक्च्युअल मधे मला पडायचं होतं, हे मी त्याला बाजूला नेऊन हळूच सांगितलं. मात्र तो, ते खरं मानायला तयारच होईना.
शेवटी मी घाबरून आत पळाले. मुलगा दप्तर भरत होता
त्याला म्हटलं, मी तुझ्या काकांना तू येणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्यांना फोन करू का?
मुलगा म्हणाला, कर.
मी पुन्हा विचारलं, करू?
तो पुन्हा म्हणाला, हो कर.
आमची रात्रीची जेवणं झाली. माझं मन कशातच लागत नव्हतं.
साडे दहा वाजले. मी एकदम किंचितशी ओव्हर अॕक्टिंग करत ओरडले, अय्याss! फोन करायचा राहिलाच!
मुलगा म्हणाला मेसेज कर. जागे असतील ते.
अखेर मी सहनशक्तीचा कडेलोट होऊन पोराच्या जवळ गेले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अन् म्हणाले, बाळा खरंच जाणार आहेस उद्या शाळेत? बघ आराम कर एक दिवस!
मुलगा म्हणाला, हो मम्मी जाणार आहे. आमच्या बाईंनी सगळ्यांनी यायचंच म्हणून बजावलय. अन् खास करून मला. मी दर शनिवारी दांड्या मारतो म्हणून. गेलो नाही ना तर सोमवारी मला शिक्षा करणार आहेत त्या!
मेरी आखरी बचीकुची उम्मीद भी मिट गयी…….
मी मनावर मोठ्ठा धोंडा ठेऊन रात्री बरोब्बर ११ वाजून १२ मिनिटांनी गाडीवाल्या काकांना ‘पोरगा शाळेत जाणार आहे’, म्हणून मेसेज केला.
माझ्या दुःखाने परमोच्च बिंदू गाठला होता, मी त्याच मन:स्थितीत साडेपाचचा गजर लावला अन् डोक्यावर चादर ओढून आतल्या आत धुसमुसत मुसमुसत बसले.
बरं! अशा खेदजनक परिस्थितीत एखादं सॕड साँग तरी मनात बॅकग्राऊंडला वाजावं की नाही?
पण कसं सांगू! सकाळी केवळ अपघाताने समोर आलेलं, हुसन तेरा तौssबा तौबाs तौबाs हे असलं थिल्लर गाणं मनात नॉनस्टॉप वाजून मला आधार देण्याचा प्रयत्न करत होतं. अन् त्यावर कडी म्हणजे डोळ्यासमोर येत होत्या त्यावर थिरकणाऱ्या नॉन कमनीय बांध्याच्या काक्या, मावश्या अन् ओल्ड एज आज्या!
माझ्या त्यावेळच्या मन:स्थितीशी ते फारच विसंगत होतं वाचकहो🙃
©️ स्नेहल अखिला अन्वित ✍️
पूर्वपरवानगी शिवाय लेखाचा उपयोग कुठेही केलेला आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.