“दोन चाकांची सर्कस…!” निवृत्ती सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री,
“दोन चाकांची सर्कस…!” निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी,
फुलंब्री,
जसं जसं मला बाहेरचं जग कळू लागलं तसतसं माझी विचारांची कक्षा रुंदावत गेली….! वेगळं असं काही त्यात नव्हतंच. इतरांच्या बाबतीत जे घडायचं ते माझ्याही बाबतीत घडत होतं परंतु मी थोडा वेगळ्या अंगाने विचार करायचो. का कुणास ठाऊक? पण मला राहून राहून सायकलच्या अन् बैलगाडीच्या त्या दोन चाकांची गंमत वाटायची. खेड्यात तेव्हा मोटरसायकली कमीच होत्या जर असत्या तर त्यांचंही असंच काहीतरी चांगलं आठवलं असतं…!
लहानपणी बऱ्याचदा आजीबरोबर काल्याच्या कीर्तनाला गेलो म्हणजे तिथं हमखास श्रीकृष्णाच्या त्या कुंजवनातल्या गवळणींसोबत झालेल्या करामती कीर्तनकारबाबा सांगायचे, मथुरेच्या बाजारला लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणींना तर कान्हा कशा प्रकारे बेजार करायचा हे ऐकणाराला डोळ्यासमोर दिसायचं.. , चेंडूफळीचा खेळ सुद्धा मला तेव्हाच पहिल्यांदा देवाने खेळला आहे असं समजलं! ते बाबा म्हणायचे,“ या पृथ्वीचा करता करविता म्हणजे भगवान श्रीकृष्ण…!, गोकुळचा सर्वेसर्वाही तोच अन् त्या भगवान श्रीकृष्णाचं अश्र म्हणजे…. सुदर्शन चक्र…! ते एवढं प्रभावी कि अन्यायाचा समूळ नायनाट करायचा म्हणजे श्रीकृष्णप्रभू त्याचा वापर केल्याशिवाय राहत नसायचे.”
म्हणजेच जगात कुठेही गेलं तरी चाकाशिवाय काहीच शक्य नाही असाच त्याचा मतितार्थ असायचा . ते तंतोतंत जगाच्या प्रत्येक का नको परत तेव्हाही लागू व्हायचं अन् आजही होतंय. चाकाच्या प्रत्येक हालचालीत प्रगती दडलेली होती हे मात्र नक्की खरं होतं. तिथून शाळेत आलं म्हणजे इकडं शाळेत मास्तर फळ्यावर गोल गोल निसर्गाचक्र, जलचक्र, ऋतुचक्र, अन्नसाखळीचे चक्र,असं सर्व काही शिकवताना मला त्या करता-करवित्या श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र सारखं डोळ्यासमोर यायचं. भूगोलाचे मास्तर सुद्धा वर्गात तासावर येताना तो पृथ्वीचा गोल हातात घेऊन गोल गोल फिरवत यायचे.
मला नेहमी आमच्या एका जवळच्या पाहुण्यांच्या घरी मला जावं लागायचं. बऱ्याच ठिकाणी तेव्हा लग्नात आलेल्या घरातल्या लोखंडी पत्रांच्या कपाटांना नवे पडदे आले होते, आमच्या त्या पाहुण्यांच्या कपाटाला पण पडदा लावलेला होता.तिथं गेलं म्हणजे तो लांबूनच दाराबाहेरून दिसायचा. त्यावर लिहिलेलं होतं ,“यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत….” असा तो भगवद्गीतेला श्लोक मला कायम फुकटात वाचायला मिळायचा…! मात्र ते वाचून कळत काहीच नव्हतं…? शाळेत संस्कृत विषय नव्हता परंतु ते देवनागरीत लिहिलेलं मी जोड जाड करून त्याचा शेवटचा शब्द डोळ्याखालून घालत भरभर गाठायचो. पुढं थोडा मोठा झाल्यावर ते काय होतं ते कळलं . .! लहानपणी माझ्यासारखे तो श्लोक वाचलेले अनंत असतील परंतु कळणारे किती होते काय सांगू…? मी मात्र त्या विचार कक्षेच्या पलीकडचा होतो म्हणून कळत नव्हतं असं मान्य करायला मी यत्किंचितही शरम बाळगत नाही. पुढे येऊन का होईना मी तो अर्थ माहित करून घेतला व मला बऱ्याच वर्षांनी अर्थ समजल्याचं मनाला समाधान मिळालं..! ते पडद्यावरचं लिहिलेलं कुरुक्षेत्रावर घडलेल्या महाभारतापासून जगाला सांगत होतं…हे प्रभू ज्या ज्या वेळी या जगावर,या देशावर, या प्रांतावर ,या भूमीवर ग्लानी येईल ,मूर्च्छा येईल तेव्हा तेव्हा तू त्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी इथं अवतार धारण कर…! सुरुवातीलाच जेव्हा तो श्लोक मी वाचला तेव्हा एका शिकल्या सवरलेल्याला त्याचा अर्थ विचारण्याचं धाडस सुद्धा केलं होतं परंतु माझा तो प्रयत्न सपशेल आपटला! तेव्हाच त्यांच्याकडे बघून मला त्यांनी थातूरमातूर उत्तर दिलंय असं सांगून गेलेला त्यांचा चेहरा अजून डोळ्यासमोर येतोय…! असे मी एक दोन प्रयत्न अजून करून पाहिले पण पाठांतर प्रेमामुळे अर्थाला जास्त महत्व न देणारे हुशार जास्त आहेत असं मला कळून चुकलं व मी तो नाद तेव्हापुरता बाजूला ठेवला. शेवटी जगाच्या प्रगतीसाठी चाकाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते त्या कपाटाच्या पडद्यावरही श्रीकृष्णाच्या तर्जनीवर सारखं मला फिरताना दिसायचं…
शाळेत असताना रोज आजूबाजूला सायकली पळताना मला दिसायच्या म्हणून मला या दोन चाकांचं खूपच नवल वाटायचं. यावर विचार केला तर फार गंमतशीर गोष्ट माझ्या मनात शिजायची…!मी स्वतःशीच म्हणायचो,“ श्रीकृष्णाच्या एका चाकानं आख्ख्या जगाची एवढी मोठी प्रगती तर मग मलाही माझ्या भल्यासाठी साधीसुधी सायकलची दोन चाकं तरी मिळू दे..? मला बाकी काहीच नको…” धर्मावर आलेल्या संकटाचा मी माझ्या वैयक्तिक अडचणींशी ताळमेळ जुळवून देवाला परस्पर काही घेणं देणं नसताना माझं गाऱ्हाणं मांडत होतो .
शाळेत बऱ्याच दिवसांपासून मी मळ्यातून गावात तीन किलोमीटर पायी पायी जायचो. कुणाची सायकल बाजूने जाताना दिसली की मी लगेच श्रीकृष्णाचं सुदर्शनचक्र माझ्या तर्जनीत यायचं अन् बराच लांब ती सायकल डोळ्यासमोरून अंधुक होईपर्यंत मी माझी तर्जनी पायी चालता चालता मोकळीच फिरवायचो! शाळेत गणितात बऱ्याच वेळा मास्तर ‘x ’ ‘y’ असं गृहीत धरायला सांगायचे म्हणून आता मी माझ्या तर्जनीतसुद्धा चक्र असल्याचं गृहीत धरू लागलो होतो. कधी कधी संध्याकाळी गावात मारुतीच्या मंदिरातला हरिपाठ उरकल्यावर जर समोरच्या वाळूवर खेळत असलो तर माऊलींचं पसायदान ‘ जो जे वांछील तो ते प्राणीजात ’ असं कानी यायचं.. त्याप्रमाणे मला फक्त सायकल हवी होती. इकडं जाता येता बऱ्याच लोकांच्या सायकली, कुठं शहरात कधी जाणं झालं तर तिथं तीन चाकाच्या रिक्षा आणि शाळेच्या बाजूने जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर चार चाकी, सहा चाकी मालट्रक, एस्ट्या सारख्या इकडून तिकडं पळतांना दिसायच्या. असं दिसल्यावर मनात सारखं सारखं यायचं, “ देवा ,त्यांना मिळाली म्हणून मी मागत नाही पण मला खरोखरच गरज आहे म्हणून तरी दे. रोज पायी चालून थकून जातोय संध्याकाळी, सायकल मिळाली तर वाचलेला वेळ नक्की अभ्यासात घालवीन हा शब्द देतो … ”
युरोप यंत्राने खूप पुढे चाललाय असं इतिहासात शिकायला मिळत होतं. इकडं भारतात माणूस राब राब राबूनही म्हणावं तेवढं काम झालं असं दिसत नव्हतं. तेच तिकडं यंत्राने म्हणजेच चाकावर कमी श्रमात अन् वेळेत व्हायचं. शेवटी सगळी यंत्रसामुग्री चालायची ती गोल फिरणाऱ्या चाकांमुळेच आणि म्हणूनच तिकडं प्रगतीला गती आली होती, याला इतिहासच साक्षीदार होता. सर्वत्र जगभर या चाकांमुळे गती येते तर मग आपल्याही जीवनात दोन चाकंआली तर आणखी आपण वेग धरून पुढे जाऊ….” असं मी बराच वेळ त्या विषयात कितीतरी खोलवर गुंतून जायचो.
याच दरम्यान टीव्हीला एका रविवारी ‘गोरा कुंभार’ हा चित्रपट लागला. जुलै महिन्यात पावसाची रिमझिम सारखी सुरूच होती म्हणून त्या दिवशी वावरातबी काही काम नव्हतं. शेळ्यांना बांधाचं कापून आणलेलं गवत अन् भूसारातलं कोरडं तुर अन हरभऱ्याचं भूस एवढाच चारा होता. माणूस जसा एखाद्या दिवशी उपवासाला फक्त खिचडी खातो तसं पाऊस असला म्हणजे शेळ्यांना बळजबरीचा उपवास धरायला लागायचा. त्यादिवशी पावसानं घरीच मोकळा बसून असलो तरीही,“ जा अन् पिक्चर पाहून ये.”असा कोणताही पालक वर्ग मनमोकळ्यापणाने म्हणत नव्हता. तेव्हा पिक्चर म्हणलं की नट नट्यांची हुल्लडबाजी, नाच गाणे अन् त्यांना सगळा धिंगाणा वाटायचा. त्यांचंही त्यावेळी बरोबर होतं.“ लहान वयात पोरांच्या मनावर नको नको ते बघून विपरीत परिणाम तर होणार नाहीत ना ?” अशी मनात त्यांना धास्ती वाटायची. एवढं असूनही मी त्यादिवशी ‘गोरा कुंभार’ पिक्चर जाऊन पाहिलाच, तो बघताना मनात अन् शाळेत सुरू असलेल्या चाकाबाबतीतल्या कल्पनांना त्या पिक्चरमधून आणखी दुजोरा त्यातल्या गाण्यातून मिळाला…
“फिरत्या चाका वरती
देसी मातीला आकार
विठ्ठला तू गोरा कुंभार
विठ्ठला तू गोरा कुंभार…..” दुसऱ्यांच्या घरात जाऊन कोपऱ्यात बसून निमुटपणे पाहिलेल्या पिक्चरमधून मला माझ्या जीवनाला आकार मिळायला खूप काही मिळालं. आपल्याला काय करायच? घर कुणाचं का असू द्या ना, माझ्या विचारांना खतपाणी मिळायचं ते मिळालं होतं अन् मी आता त्यादिवशी रात्री सायकलचाच विचार करत झोपी गेलो..
दररोज सहा सात किलोमीटरची पायपीट अन् शाळेच्या अगोदर घरी तसंच दिवसभर शाळेत माझे पाय अजिबात जाग्यावर थांबत नव्हते. संध्याकाळी घरी आलो म्हणजे अभ्यासाला अजिबात हुरूप राहिलेला नसायचा. तसंही मी दिवसभर शाळेत अन् संध्याकाळी दिवस मावळायच्या आत जो काही अभ्यास होईल तेवढाच करायचो. चिमणीच्या उजेडात मला डोळे फोडणं कधीच शक्य झालं नाही म्हणून पुढं आपला दिवा कसा व किती लागेल हे उपप्रश्न मला नेहमी सतवायचे. पण सायकल आल्यावर आपली शाळा आणखी चांगली होईल..,गोऱ्या कुंभाराच्या चाकाप्रमाणे माझ्याही डोक्यातल्या विद्येला आकार येईल म्हणून मी आता शाळेत जाता येता आवर्जून कुणाची सायकल दिसली म्हणजे, “ जुनी पाणी का होईना पण देणा रे देवा?” असं विचार करत मीच माझी बोळवण करत थोड्या वेळाने मलाच शांत करायचं. तसं पाहिलं तर अजून शिटावर बसून पाय चांगले पुरत नव्हते परंतु तेवढं मी ऍडजेस्ट करणार होतो. काही दिवस उंची पुरली नाही तरी नळीतून का होईना चालवू असं मी मनाशी ठरवलं होतं.
रोज अशा अनेक बारीक-सारीक प्रश्नांची सरबत्ती आतल्या आत मलाच गोंधळात टाकायची. मी घरच्यांना मला सायकल नसली अन् सायकल असली यातले बरेच फरक स्पष्ट करून सांगायचो…शाळेत फरक स्पष्ट करा या सदरामुळे मला घरच्यांना सांगणे इतपत मी नक्कीच पारंगत झालो होतो कारण एक चाकाचं सुदर्शन चक्र अन् निसर्गाची सर्व चक्र यावरून जगाची होणारी प्रगती मिळणारी दिशा हे मी बऱ्याच दिवसांपासून घरच्यांना कसं सांगायचं अन् त्यांचं मतपरिवर्तन करून सायकल कशी मिळवून घ्यायची इथपर्यंत तरी मी माझ्या बाजूने शहाणा झालो होतो.
माणूस जसजसा प्रामाणिक व सुंदर विचार करतो तसतसं त्याच्या आयुष्यात घडत चालतं असं म्हणतात म्हणजेच पुढच्या आयुष्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी सुरुवातीला त्याच्यात चांगल्या विचारांची निर्मिती होणं गरजेचं आहे असा त्यातला अर्थ असावा. काही का असेना मी सरते शेवटी सायकलच्या बाबतीत सर्वांना आताच्या भाषेत कन्व्हेन्स करण्यात सक्सेस झालो होतो . माऊलींच्या पसायदानात सांगितल्याप्रमाणे मला मनातून वाटणारी गोष्ट जुनी का होईना एकदाची मिळाली अन् माझी तिथपासून पुढं माझी दोन चाकांची सर्कस सुरू झाली….!!!!
अनेकांच्या बाबतीत असंच कमी अधिक प्रमाणात झालेलं असणार यात काही वावगं नाही..! प्रत्येकाला काहीतरी शक्कल लढवूनच ह्या दोन चाकांच्या अतिप्रिय गोष्टीची प्राप्ती झाली नसेल तर नवलच.मला पण एका चाकापासून सुरू झालेला विचार प्रत्यक्षात दोन चाकांपर्यंत उतरवण्यास खूप दिवस डोकं खाजवण्यात निघून गेले होते. काही का असेना मी बरेच न जुळणारे अस्ताव्यस्त संदर्भ जुळवून का होईना सायकलवर स्वार झालेलो होतो. माझ्या सगळ्या प्रगतीत खरंच त्या दोन चाकांच्या सर्कसने खूपच कमाल केली …. जशी माझ्या शिक्षणाने तेव्हापासून गती घेतली ती अगदी शिक्षणाचा शेवट होईपर्यंत ती माझी सायकलदौड सुरूच होती….!
आजही सकाळी सायकल वरून फिरताना सहज मी थोडं भूतकाळात गेलो…संसारालाही दोन चाकं असतात परंतु ती समांतर असतात त्यास दिशा मिळते ती म्हणजे आपल्या कर्तुत्व , प्रामाणिक प्रयत्न व इच्छाशक्तीने. हे सगळं आपल्याला द्यायला एक तिसरी अनामिक शक्ती काम करत असते असं मला वाटतं. चाकामध्ये जग फिरवण्याची खूप मोठी ताकद आहे हे मला कळून चुकलं होतं. पृथ्वीचा चराचर चाकावरच अवलंबून होता म्हणून मीही त्याला अपवाद नसणार नव्हतो. खोलवर विचार केला तर सायकलवरच्या सर्कशीमध्ये जर संसारगाडा पाहिला तर खरं दिशा देणारं पुढचं चाक महत्त्वाचं वाटतं तर संसार पुढे पळवणारं जे चाक आहे ते मागचं असतं. कधी पुढच्याला मागं तर कधी मागच्याला पुढं असं केल्याशिवाय ती सर्कस पुढे पुढे जात नाही …म्हणूनच आपण म्हणतो,“संसाराचा गाडा चालायला दोन्हीं चाकं शाबूत चालली पाहिजेत….!” ईश्वराकडून हाता पाया पडून मी मागून घेतलेली दोन चाकांची सायकल माझ्या जीवनाला अजूनही नवचैतन्य निर्माण करत होती…तिच्यातच मला सगळा संसार दिसत होता…! एक चाक थांबलं म्हणजे दुसऱ्याला ब्रेक लावायची गरज नाही हे न सांगताही समजत होतं. दिशा देणाऱ्या चाकाने भरकटून चालणार नाही हे आपोआप लक्षात येत होतं. दोन्ही चाकांचा बॅलन्स सांभाळत कधी हाताने तर कधी पायाने रेटत कधी हळुवार तर कधी नेटाने पुढं जाऊन आपला पल्ला कसा गाठायचा हे सगळं डोळ्यासमोर दिसायचं. सकाळची सायकलस्वारी करून विचार करतच मी तिला पार्किंगमध्ये स्टँडवर लावली. शेवटी सीटावरून मायेने हात फिरवत आपण या दोन चाकांच्या सर्कशीने कुठून कुठं कसं काय आलो असं अचंबित विचारांनीच घरात शिरलो…..….अन् पुन्हा इकडं आम्हां नवरा बायकोच्या संसाराच्या दोन चाकांची सर्कस सुरू झाली….
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी,
फुलंब्री,
छत्रपती संभाजीनगर
९४२३१८०३९३