मंथन (विचार)

॥ इसूमामा कासार ॥  चित्रे – चंद्रगुप्त इंद्रजीत

॥ इसूमामा कासार ॥  चित्रे – चंद्रगुप्त इंद्रजीत

पंचमी, दिवाळी,संक्रांत सारख्या सणांच्या आसपास इसूमामा हयातनगरहून आमच्या गावी येत असत. त्यांचं हयातनगर हे गाव आमच्या गावाच्या पूर्वेला सहा किलोमीटर अंतरावर होतं. ते घोड्यावर बसून येत असत. दोन्ही बाजूला काकणांचे पेटारे लटकवून घोड्यावर मधल्या भागी ते बसलेले असत. आणि हयातनगरवाटेनं पांदी-पांदीनं घोडं येत असे. इसूमामाचं घोडं दिसलं की आडावर धुणं धुणार्‍या बाया एकमेकींना सांगत, इसूमामा आला, इसूमामा आला. त्या दिवशी दिवसभर इसूमामा बायांना काकणं भरत राहत. घरोघरी जात. गावात आल्याबरोबर आपल्या घोड्याला कळवा घालून ते गावखरी सोडून देत. आमच्या गावखरी खूप वाढलेलं पंधाडगवत दिवसभर खाऊन त्यांचं घोडं टम्म फुगत असे. संध्याकाळी जाताना मोठ्या आनंदात आपल्या मालकाला पाठीवर घेऊन जात असे. परत जाताना काकणांचं बरचसं ओझं कमी झालेलं असे.

सणावाराला आलेल्या लेकीबाळी ह्या काही घरच्या बायांसारख्या सगळं काम उरकून गडबडीनं शेताला जाणाऱ्या नसत. त्या दिवसभर आपापल्या आईबापाच्या घरीच असत. त्यामुळं एकीचं झालं की एक अशी सगळ्या घरी, सगळ्या लेकीबाळींना काकणं भरत इसूमामा फिरत असत. बांगडी, बिल्लोर, चुडा या शब्दांना आमच्याकडं काकणं हा पर्यायी शब्द होता. हा निजामाचा प्रदेश असल्यामुळं हिंदीउर्दूच्या प्रभावातून कंकण या शब्दाचाच काकणं हा मराठवाडी शब्द तयार झालेला असावा. काकणं भरायला इसूमामा बैठकीत येऊन बसत तेव्हा आधी माय त्यांना चहापाणी, जेवणाचं विचारी. जे हवं ते देत असे. ते झालं की मग आमची एकेक बहीण इसूमामा समोर बसत असे. काकणं पसंद करीत असे. हव्या त्या रंगाची, हव्या त्या सजावटीची काकणं निवडली जात. आणि पसंद केलेली काकणं भरण्यापूर्वी इसूमामा नमस्कार केल्यासारखे हात जोडून समोर बसलेल्या बहिणीच्या हात हातात घेऊन, मनगटाच्या आकाराचा अंदाज घेऊन, त्यांनी सांगितलेल्या रंगाच्या बांगड्यांचा पेटारा बाहेर काढीत असत आणि एक एक बांगडी मनगटावर चढवत असत. या बाया कधीच कोण्या परक्या पुरुषासमोर डोळा उचलून वर पाहत नसत. पण कासाराला मात्र निस्संकोचपणे आपला हात हातात देत असत. त्याचं कारण त्या दोघांचं नातं बहीण भावाचं समजलं जात असे. त्या संदर्भात आई जात्यावर ओवी म्हणायची,

कासार माझा दादा माझ्या माईच्या गावचा
येरे दादा भर चुडा नंदी देते मी गाईचा
कासारा माझ्या दादा तुव्हं मव्हं काय नातं
बांगडीसाठी देते भाऊ हातामधी हात
भरल्या बाजारात कासार झाला मायबाप
बाई माझी ती सावळी चुड्याला देती हात
बारीक बांगडी माझ्या मनगटी दाटती
भावासारखे सज्जन मला वैराळ भेटती

पंजामधून बांगडी आत नेणं मोठं अवघड जात असे. पण इसूमामा त्यात वाकबगार होते. हात दुखू न देता, बांगडी टिचू न देता इसूमामा बांगड्या चढवत. पण एखाद्या बाईचा हातच जड असेल तर सुमामाही थकून जात. त्यांच्या अनेक बांगड्या फुटत. एखाद्या बांगडीचा पिचकोर बाईच्या मनगटालाही रुतत असे. त्या बाईच्या डोळ्यात टचकन पाणी येत असे. तेव्हा इसूमामाही कळवळत असे. पण असं क्वचित एखाद्या बाईच्या संदर्भात होत असे. बांगड्या भरून झाल्या की इसूमामा त्या बाईला हात जोडत असत आणि ती बाईही इसूमामाला हात जोडत असे. मग इसूमामा पुढच्या घरी निघून जात असे. देण्याघेण्याचा व्यवहार जो काही ठरलेला असेल तो वडील घरी असतील तर ते नाही तर आई पूर्ण करीत असे. वडील घरी नसतील आणि आईला शक्य नसेल तर पुढच्या वेळी तो हिशोब पूर्ण केला जायचा. त्यासाठी इसूमामा कधी अडून बसत नसत. टिचलेल्या बांगड्या इसूमामा हिशोबात धरीत नसत.

कधीकधी इसूमामा लवकर येत नसत आणि माझी वाखारीची बहीण चतूरबाई जाण्याची घाई करीत असे. तेव्हा तिच्या सासरी जाण्याच्या रस्त्यावरच इसूमामाचं गाव असल्यामुळं जाताना इसूमामाच्या घरून बांगड्या भरून ती बहीण पुढं जात असे. एकदोनदा या बहिणीच्या सोबत मीही इसूमामाच्या घरी गेलो होतो. तेव्हा इसूमामाचं हयातनगरमधलं मुसलमानगल्लीमधलं साधं पत्राचं घर मी पाहिलं होतं. पहिल्यांदा गेलो तेव्हा विचारत विचारत आम्ही इसूमामाच्या घरी गेलो होतो. नंतर इसूमामाचं घर आमच्या ओळखीचं झालं होतं. पण असं क्वचितच इसूमामाच्या घरी जावं लागत असे. शक्यतो इसूमामा वेळेवर आमच्या गावी येत असत. सणावाराशिवाय आठवड्यातला एक दिवसही इसूमामानं आमच्या गावासाठी राखून ठेवलेला होता. त्यादिवशी ते येत आणि सगळ्या लेकीबाळींना बांगड्या भरून जात. काही काही कारणानं गावातल्या बायकांच्या बांगड्या टिचत असत. त्या टिचलेल्या बांगड्या पुन्हा भरणं गरजेचं असे. काही घरांमधून नवऱ्यानं केलेल्या मारझोडीतही बायकांच्या बांगड्या फुटत असत. काही घरी सवाष्णी घालण्याचा कार्यक्रम असे तेव्हाही सवाष्णीसाठी बोलावलेल्या बायांना बांगड्या भराव्या लागत. लग्नसमारंभात तर सर्वच वऱ्हाडनींना बांगड्या भराव्या लागत. तेव्हा इसूमामा खूप पेटारे घेऊन आमच्या गावी येत असत. लग्नसराईतल्या सगळ्या तारखा लक्षात ठेवून इसूमामाला यावं लागत असे. कारण सगळ्या बाया त्यांच्या भरोशावर बसत असत. इसूमामाही कधीच कुणाची बेजारी होऊ देत नसत. कधी कुणाच्या घरी अचानक काही कार्यक्रम ठरला तर मी हयातनगरच्या शाळेत होतो तेव्हा इसूमामाला निरोप देण्याचं काम मी करीत असे. आणि इसूमामा वेळेवर येत. सर्व बायांना बांगड्या भरून जात.

पुढं पुढं इसूमामाचा व्याप वाढल्यावर इसूमामाला सारखं सारखं येणं जमेना. त्यामुळं त्यांनी त्यांच्या आईला आमच्या गावात आणून भिवराबाईंच्या घरी ठेवलेलं होतं. त्यांची वृद्ध आई आमच्याच गावात राहत असे. बांगड्यांचे काही पेटारे इसूमामा आपल्या आईजवळ ठेवून जात. तेही अधून मधून येत तेव्ह आणखी काही पेटारे आईजवळ ठेवत. त्यांच्या वृद्ध आई भिवराबाईंच्या गोठ्यात एका कोपऱ्यात राहत असत. या वृद्ध बाईंची भिवराबाईंच्याच घरून जेवणाची व्यवस्था केलेली होती. दोन वेळ जेवून आणि दिवसभर या त्या घरी जाऊन बायकांना गप्पा मारत बसणं एवढंच त्या म्हातारीचं काम होतं. आनंदानं ती म्हातारी आमच्या गावात राहत असे. भिवराबाई विधवा होत्या. त्यांनाही त्या म्हातारीची सोबत होत असे. पुढं खूप थकल्यावर इसूमामा आपल्या आईंना घेऊन गेले. मग त्यांचा मुलगा येऊ लागला. बाकी इतर गोष्टींमध्ये वस्तूविनिमय चालत असे. पण बांगड्या मात्र नगदी पैसे देऊन भराव्या लागत. कारण तिथं वस्तुविनिमय चालत नसे. कारण ज्या बांगड्या इसूमामा घेऊन येत असत त्या त्यांना नगदी पैसे देऊन आणाव्या लागत. त्यामुळं तेही त्यांचा भाव ठरवून नगदी पैसे घेत असत.

इतर अनेक अलुतेदार बलुतेदारांची कामं बंद पडली पण कासार हा कधीच बंद पडणार नाही. कारण आपल्याकडं बांगड्यांना कधीच काही पर्याय असणार नाही. कारण ते एक सौभाग्यलेणं समजलं जातं. त्यामुळं बाया बांगड्या भरत राहणार आणि कासार हा कायम टिकून राहणार. त्यामुळं गावोगाव कासार असतातच. आमच्या गावात इसूमामा नंतर आज कोण बांगड्या भरतय हे मला माहित नव्हतं. गेल्या अनेक दिवसापासून गावाशी संपर्क नसल्यामुळं आता गावात कासार कोणता येतो हेही मला माहित नव्हतं. परवा माझा पुतण्या प्रणयच्या लग्नासाठी माझा भाऊ प्रभू यानं सगळ्या वऱ्हाडणींना मनसोक्त बांगड्या भरायला सांगितल्या. तेव्हा मी तिथंच होतो. तीन कासार भरपूर पेटारे घेऊन आलेले होते. ते बांगड्या भरत होते. बाया बांगड्या पसंत करत होत्या. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. हळूच मी बाहेर येऊन उभा राहिलो. आणि चौकशी केली हे कुठले कासार आहेत ? त्यांची नावं काय आहेत ? तर पुढं असं लक्षात आलं की ही इसूमामाचीच मुलं आहेत. या तिघांपैकी एक वयस्कर असलेला इसूमामाचा मुलगा होता आणि उर्वरित दोघं ही त्याची मुलं, म्हणजे इसूमामाची नातवंडं होती. आता तिसऱ्या पिढीनंही आमच्या गावाशी नातं टिकवून ठेवलेलं दिसत होतं. तेच आता आमच्या गावांमध्ये बांगड्या भरायला येतात. त्यामुळं ही बांगड्या भरण्याची इसूमामाची परंपरा मुलांनी पुढंही चालू ठेवलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो.

इसूमामा हे नाव मुळामध्ये विश्वनाथ मामा असं असेल असं मला वाटलं होतं. पण ते तसं नव्हतं. इसूमामा मुसलमान होते. त्यांचं नाव कदाचित इसहाक खान असं काहीतरी असावं. पण आमच्या गावातल्या सगळ्या बायका त्यांना इसूमामा असंच म्हणत असत आणि तेही सगळ्यांना मायबाई, मायबाई असंच म्हणत असत. पण तरी त्यांचा वेश मात्र मुसलमानासारखा होता. खाली चोळणा, वर शर्ट आणि वाढवलेली दाढी. तिला लावलेली मेहंदी. त्यामुळे ही टिपिकल मुस्लिम पर्सनॅलिटी होती. पण तेव्हा हेही माहित नव्हतं की हा वेश मुसलमानांचा असतो. पण नंतर हळूहळू माहित झालं की मामा हे मुसलमान आहेत. पण ते गावाशी एकरूप होऊन गेलेले होते. त्यामुळेच त्यांच्या आईला आमच्या गावातल्या एका घरात आश्रय मिळालेला होता. आणि त्यांच्या आईही आमच्या गावात एकरूप होऊन गेलेल्या होत्या.

💐

आजच्या दैनिक ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ या रविवार पुरवणीतील ‘डायरीची पाने’ या माझ्या सदरात प्रकाशित झालेला लेख, दिव्य मराठीच्या सौजन्याने इथे देत आहे.

चित्रे – चंद्रगुप्त इंद्रजीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}