हे पुन्हा लिहावंसं कधीच वाटलं नाही – समीर गायकवाड
हे पुन्हा लिहावंसं कधीच वाटलं नाही मात्र अलीकडील काळात घडलेल्या काही घटना भयंकर अस्वस्थ करून गेल्या म्हणून पुन्हा पोस्ट करतोय.
कुणाच्या दुनियेत कोणती दुःखे असतात याचा अंदाज लावणं कठीण असतं.
श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेशमार्गे पश्चिम बंगाल आणि तिथून आपल्या देशातील सर्व मेट्रो शहरातल्या वेश्यावस्तीत एक नवं खूळ आलं, वाऱ्याच्या वेगानं पसरलं आणि अनेकांचे कान टवकारले गेले.
आता मेट्रो शहरातून छोट्या शहरातही याची ‘कीर्ती’ पसरली आहे.
म्हटलं तर याला कायद्याच्या चौकटीत अडकावणं कठीण आहे आणि सरकारने मनात आणलं तर यासाठी जेलची हवा पक्की होऊ शकते. पण मूळ दुखणंच इतकं गुंतागुंतीचं आणि जुनाट होऊन गेलंय की त्याला आता जळवा लागू लागल्यात..
या नव्या प्रॉब्लेमचं नाव एक विशिष्ट प्रकारचं स्टिरॉइड!
ही एक गोळी आहे, यात वेगळ्या प्रकारचे स्टिरॉईड ड्रग आहे. मनुष्यासाठी त्याची ५ मिलीग्रामची गोळी येते. ती अनेक (ब्रान्डनेम्सनी) नावांनी आपल्या देशात उपलब्ध आहे. यात व्हेटर्नरीचे (पशुंसाठीचे) डोसेस चाळीस ते शंभर मिलीग्राम पॅकचे आहेत.
मरतुकडी जनावरे फुगीर दिसावीत, त्यांचे आचळ फुगून यावे म्हणून अनेक अडाणचोट शेतकरी हे औषध त्यांच्या अशक्त / मरणासन्न / विक्रीस काढलेल्या गायी म्हशींना खाऊ घालतात. वास्तवात हा त्या गोळ्यांचा उपयोग नसून साईड इफेक्ट आहे. पण आपल्याकडे इफेक्टपेक्षा साईड इफेक्ट लवकर लोकप्रिय होतात त्याला हे स्टिरॉइड कसे अपवाद राहील ? असो.
या गोळ्या मुलतः त्वचाविकार, एलर्जी आणि ग्रंथी असंतुलित होण्यावर वापरल्या जातात पण याचे वर दिलेले साईड इफेक्ट आहेत. यात ग्रंथी असलेले मांसल भाग सुजतात.
श्रीलंकेतल्या एका सायकोरेपिस्टने ह्या गोळ्या एका अल्पवयीन मुलीला खाऊ घातल्या आणि अनाहूतपणे त्यातून एक नवा शोध ‘चमडीबजार’च्या हाती आला.
बघता बघता याचं लोण पूर्ण दक्षिण आशियायी देशात पसरलं आहे.
आधीच प्रॉस्टिट्युशनचे वय घटत जाऊन ते बालवयावर आलेले आहे. ज्या वयात भातुकलीचा खेळ मांडायचा, बाहुलीशी खेळायचं, टेडीबिअरला दोस्त बनवायचं त्या वयात यांना निमूटपणे कुस्करलं जातं. आणि त्यात आता हा नवा फंडा आला आहे. या गोळ्या कुठल्याही पशुऔषधी दुकानात मिळतात. नानाविध ब्रांडनेम्सने त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत.
जनावरांसाठीच्या या गोळ्या अल्पवयीन, अज्ञानी, अल्पशिक्षित मुलींना टॉनिकच्या गोंडस नावाखाली त्यांच्या इवल्याशा हातावर ठेवल्या जातात. त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाहीत तर त्यांची उपासमार केली जाते. वेळप्रसंगी मारहाण देखील होते. या गोळ्या नेमक्या कशासाठी दिल्या जाताहेत आहेत हे त्या मुलींना सांगितले जात नाही.
पोरीने आठवडाभर जरी रोज एक गोळी खाल्ली तरी ती सात आठ वर्षाची असली तरी तिचे अवयव उभारून येतात, (खरे तर ही सूज असते), तिच्या ठराविक अंगावर गोलाई येते, तिचा चेहरा देखील सुजल्यासारखा वाटू लागतो आणि त्यातला बालिशपणा जाऊन एक रासवटपणा चेहऱ्यावर येतो.
जेणेकरून तिला रात्रभर उसंतच मिळू नये.
तिचे अंथरून रक्ताने माखले तरी हा खेळ चालू राहतो !!!!!
पोरीला आपल्याला काय होतेय हे कळतच नाही कारण या गोळीमुळे स्नायू ताठरून जातात आणि तिचं अंग ठणकणे, मांड्या भरून येणे, ओटीपोट ताणले जाणे यातले काहीच जाणवत नाही (खरे तर हाही एक साईड इफेक्टच आहे), त्यामुळे तिला तक्रारीस जागा राहत नाही….
असे काही महिने, वर्षे चालते…
पुढे जाऊन एक वेळ अशी येते की ती मुलगी त्या गोळीच्या व्यसनाधीन होते. गोळी खाल्ली नाही तर तिला बेचैनी वाटू लागते ! मग ती स्वतः होऊन गोळी मागू लागते.
या गोळ्या मुलींना खाऊ घालण्याचे प्रयोग जिथे आधी सुरु झाले त्याला आता आठ नऊ वर्षे झालीत. आता खरा आणि मोठा साईडइफेक्ट समोर येतोय.
आठ वर्षाची असताना पश्चिमी मिदनापूरच्या झरीनने (नाव बदललेले आहे) या गोळ्या पहिल्यांदा खाल्ल्या. नंतर किती वेळा आणि किती खाल्ल्या हे तिला नेमकं आठवत नाही. पण आता ती अधू झालीय!
तिचे गुडघे पूर्ण ठिसूळ होऊन त्याचा भुगा झालाय. साठीत होणारं ऑस्टिओपोरॅसिस तिला वयाच्या चौदाव्या वर्षी झालेय…
आता तर तिच्याकडे ‘गिऱ्हाईक’ही येत नाही कारण तिचा देह म्हणजे निव्वळ अस्थिपंजर उरलाय!
हे संकट मोठे आहे, तितकेच पुढे येणारे हातही पुष्कळ आहेत ही चांगली गोष्ट आहे.
या गोळ्यांचं सेवन किती हानिकारक आहे यात गुंतलेल्या अड्डेवाल्या आंटीच्या गळ्यात उतरवणं जिकीरीचं काम आहे पण अशक्य नाही.
आपली यंत्रणा फार हुशार आहे ती कायद्यावर बोट ठेवते.
हा मामला निपटण्याचं काम अन्न आणि औषध विभागाचे आहे की पोलिसांचं आहे यावर आधी किस पाडला जातो मग दोषी नेमकं कुणाला ठरवायचं हा प्रॉब्लेम मुद्दाम समोर आणला जातो.
गुन्हा नेमका कोणता आणि कोणावर नोंदवायचा याचीच इतकी चालढकल केली जाते की न्याय नको पण डोकेदुखी आवर अशी परिस्थिती येते.
चुकून गुन्हानिश्चिती झालीच तर मग गुन्हा कुठल्या ठाण्याच्या एरियात घडला याच्या सीमा ठरवल्या जातात.
तोवर एनजीओवाल्याचा कंड जिरलेला असतो..
गोळ्या आणणारा औषध दुकानात चिठ्ठी दाखवून गोळ्या घेऊन येतो, त्याचा वापर जनावराऐवजी चिमूरडया पोरींवर केला जातो तो देखील त्यांच्या तथाकथित रखवाल्यांकडून!
मुली आधी नकळत खातात आणि नंतर त्यासाठी व्याकुळ होतात. गोळ्या आणणारा, विकणारा हे कायद्याच्या कात्रीत अडकत नाहीत. तीच बाब खाऊ घालणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते.
गुन्हेगार निश्चिती होणे महाकठीण होऊन बसते.
कायदा, पोलीस, केसेस याचे वर्तुळ पूर्ण कधी होईल याचा कुणालाच थांगपत्ता नाही त्यामुळे मुलींचं आणि तिथल्या आंटीचेच कौन्सिलिंग करणे हा एकच पर्याय उरतो. सुदैवाने त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तोवर ज्यांच्या आयुष्याचे अक्षरशः भुस्कट पडते त्यांचं काय?
एकीकडे आपण आपल्या चिमूरडया मुलींना बोर्नव्हीटा देतो, कॅल्शियम देतो आणि त्याचवेळी याच जगाच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात त्यांच्या समवयीन मुलींना कुणीएक व्यक्ती नव्हे तर आपल्याच समाजाचा एक हिस्सा विष पाजत असतो !!
रेडलाईट एरियात आता नवी दुःखे आहेत आणि त्यांचे चेहरेही आगळे आहेत. तिथल्या ‘बार्बी’ला ‘पिरीयड’ येत नाही पण तिच्या डोळ्यातून ‘रक्त’ येते जे व्यवस्थेला कधी दिसत नाही…
– समीर गायकवाड