आत्मज्ञान ©®प्रकाश फासाटे. मोरोक्को. +212661913052
…आत्मज्ञान………..
( एका खिसेकापूची ही कथा )
लोकल ट्रेन मध्ये नेहमी प्रमाणे प्रवासी अगदी खचखचून भरले होते. थोडंसं सुद्धा हलायला जागा नव्हती. सकाळच्या लोकल मध्ये अशी गर्दी नेहमीच असायची. प्रत्येक प्रवाशाला याची सवय झालेली होती. मुंबईकरांच आयुष्य या वेगाबरोबर धावत असत.
आयुष्याचा गाडा असाच प्रवास करत प्रत्येक जण पुढे ओढतांना स्टेशनवर दिसतो.काही क्षणात ती लोकल निघून गेली.
दादर स्टेशन !!!
नेहमी गजबजलेलं हे स्टेशन. हजारो प्रवासी रोज उतरतात आणि चढतात. प्रत्येक जण घाईत होता. कोणाला उतरण्याची घाई तर कोणाला चढण्याची.
जो तो आपल्या भविष्यासाठी पळताना दिसत होता.त्यात कोणी सुखी तर कोणी दुःखी!
कुणी तणावात तर कुणी बंधनात! प्रत्येकाच्या आयुष्याला वेग आलेला होता.
मात्र अशा हया लाखोंच्या गर्दीत विश्वास आपल सावज शोधत होता.
विश्वास, एक सराईत खिसेकापू !!
स्टेशन वर हात मारण्यासाठी कोणी मिळतंय का हे त्याच्या अनुभवी नजरेने शोधत होता.
विश्वास एक अट्टल गुन्हेगार, कित्येकांचे खिसे त्याने आजवर साफ केले होते.त्याचा यात हातखंडा झालेला.
विश्वास मूळचा सटाण्याचा. घरातील नेहमीची गरिबीची परिस्थिती सुधारण्याच नाव घेत नव्हती, शेवटी याच गोष्टीला कंटाळून त्याने नववीत शाळा सोडली.त्याला लिहता वाचता चांगले येत होते.
पैशाच्या अभावी आई वडिलांचे कर्करोगाने झालेले निधन तो आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हता. तो गावाकडे आपल्या बहिणीकडेच राहत असे . अधून मधून मुंबईला कामानिमित्त जायचा, सहा महिने राहायचा आणि परत गावाकडे येत असे. मुंबईत येऊन काय करतो हे मात्र बहिणीला कधीच कळाले नाही.
कामाच्या निमित्ताने व चुकीच्या मित्रांच्या संगतीने त्याला पाकीटमारीचा नाद लागला. आलेले पैसे निवांत उडवायचे आणि मजा करायची हा त्याचा उद्योग होता, शिवाय काहिही कष्ट न करता पैसा मिळत होता.
कष्ट न करता पैसा मिळाला की तो पैसा कधीच पुरत नसतो हे विश्वास च्या बाबतीत घडत होत.
तो समाधानी नव्हता.
दादर स्टेशवर तो सावजाच्या शोधात असतांना त्याला एक तरुण तिकीट खिडकीच्या लाईन मध्ये पाकीटबाहेर काढतांना दिसला. विश्वासच्या
चाणाक्ष नजरेने ते हेरलं, लगेच तो जवळ गेला आणि चोरट्या नजरेने पाकिटातील रकमेचा अंदाज घेतला. त्याच्या लक्षात आल की,शिकार चांगली आहे, पाकिटात हजारापर्यंत रक्कम असावी.त्याने आता ठरवलं होत आजचा हात याच तरुणावर वर साफ करायचा.
एव्हाना तो तरुण तिकीट घेऊन निघाला, विश्वासही लगेच सावध होऊन त्याच्या मागे निघाला. त्याला अगदी मोजक्या वेळेत त्याचे पाकीट काढायचे होते. परंतु याच वेळी आपण ओळखू नाही आलो पाहिजे यासाठी विश्वास ने पण आपला पेहराव हा नोकरपेशा व्यक्ती सारखा ठेवला होता. शर्ट इन केलेला,पायात सुंदर बूट आणि पाठीला लावलेली बॅग, जणू एखाद्या ऑफिस मधील चांगल्या पदावरील तरुण असेच कुणालाही वाटेल. त्याच्याकडे बघून कुणालाही संशय येणार नाही याची खबरदारी तो नेहमी घेत असे.
शेवटी विरारहून लोकल आली. ती काय फक्त काही क्षण थांबणार होती परंतु तेवढ्या वेळात त्याला हा सगळा उपदव्याप करायचा होता.
तो आता हळूहळू त्याच्या जवळ जाऊ लागला, आपली जागा निश्चित करून तो एका वेळी त्याच्या पाकिटाकडे व त्याच वेळी इतर लोकांकडे सुद्धा बघत होता त्याला कोणत्याही प्रकारची जोखीम उचलायची नव्हती.
एकदाची लोकल स्टेशन वर आली आणि लोकांनी नेहमीप्रमाणे आत चढायला सुरवात केली. जो तो आत चढण्यासाठी भांबावलेला होता. सगळ्यांचे लक्ष हे आत जाण्यासाठी एकाग्र झाल , बिचारा तो तरुण सुद्धा इतरांपेक्षा काही वेगळा नव्हता. तो ही जिवाच्या आकांताने जसा आत शिरला त्याच वेळी विश्वासचा उजवा हात अगदी अलगद त्या तरुणांच्या खिश्यात गेला .
त्याने फक्त पाकीट हातात धरले आणि तो तरुण वेगात आत गेला पाकीट विश्वास च्या हातात आले होते.
“मला उतरू दया. पुढे थांबत नाही वाटत..” विश्वास ने उगाचच उतरण्यासाठी नाटक केले.
“अरे उतरायचं तर चढता कश्याला रे “.? गर्दीतून कोणीतरी ओरडलं.
विश्वासला हे नवीन नव्हतं. त्याच काम फत्ते झाल. पाकीट त्याच्या खिशात निवांत येऊन पडलं होत. गर्दीतून वाट काढत तो बाहेर आला.
कुणाला संशय येऊ नये म्हणून तो सरळ बाहेरील दादरच्या पुलावरून पलीकडे उतरून चहा, नाष्टा घेणार होता. त्याचा हा ठरलेला प्लॅन असायचा. जरी लोकल मध्ये बोंबाबोंब झाली तरी आपण सुरक्षित असतो हा त्याचा आजवरचा अनुभव होता.
” एक चहा आणि वडा सांबर. ” विश्वास ने ऑर्डर दिली.
खांद्यावरची बॅग जवळील खुर्चीवर ठेवून समोरील ग्लासाने एक घोट पाणी पिला.
तो आता निवांत झाला होता.
त्याने खिशातून चोरलेले पाकीट काढले. अगदी त्याच्या अंदाजाप्रमाणे बरोबर दहा हजार पाचशे रुपये निघाले. विश्वास खूप खूष झाला . पैश्याबरोबर पाकिटात आणखी काही आहे का हे त्याला बघण्याची नेहमीच सवय होती. कित्येक वेळा त्याला बँकेचे कार्ड, आधार कार्ड मिळायची तो सरळ ती फेकून देत असे.
या वेळी मात्र त्याला एक लिहलेली चिठ्ठी मिळाली, सहज उत्सुकता म्हणून त्याने तिची घडी उघडली. पांढऱ्या स्वच्छ कागदावर निळ्या पेनाने आणि सुंदर अक्षरात ती लिहली होती. तो वाचू लागला,
” प्रिय विश्वास,
अरे !!!! विश्वास ला आश्चर्य वाटले.
त्याच्याच नावाने चिठ्ठी सुरु झाली होती. मनातल्या मनात विश्वास हसला, त्याच्या लक्षात आले की ज्याच्या खिशातून हे पाकीट चोरले त्याचे नावही विश्वास असू शकते आणि त्याला ही चिठ्ठी
लिहलेली असावी.त्याला सगळं काही इंटरेस्टिंग वाटू लागल आणि त्याचा वाचण्याचा रस वाढला. तो पुन्हा वाचू लागला..
प्रिय विश्वास,
कसा आहेस.? मला माहित आहे तू किती प्रामाणिकपणे मुंबई मध्ये कष्ट करतोस.
गावाकडे आपण जे गरिबीतून दिवस काढले त्यातील एकही दिवस मी विसरलेलो नाही. तुझ्या आईने आम्ही लहान असतांना आम्हाला जो जीव लावला, आमचे आई वडील वारल्यानंतर आम्हाला तुझ्या आईने खऱ्या आईच प्रेम दिल हे मी कधीही विसरू शकत नाही. तूझी आई साक्षात परमेश्वराच रूप होत. आज तू किंवा मी जे काही आहोत ते केवळ तुझ्या आईमुळेच!!!
त्या उपकारांची परतफेड या जन्मात तरी होऊ शकत नाही.
‘ प्रामाणिकपणा हा आपल्या व्यक्तिमत्वातला हिरा असतो ‘ अस तूझी आई नेहमी म्हणायची. ते मी आजही लक्षात ठेवलंय.
तुझा मला आलेला मेसेज आणि आईची हॉस्पिटल मध्ये बिघडलेली तब्येत हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला सर्व जुने दिवस आणि आईने दिलेले प्रेम आठवले. आईची आणि माझी भेट होऊ शकत नाही हे जवळपास निश्चित आहे आणि आईला डोळ्यांनी दिसेनासे झाले आहे ते तू सांगितले. माझी शेवटची इच्छा आहे की तू शिवानी हॉस्पिटल, पनवेल ला गेलास की माझी चिठ्ठी आईला वाचून दाखवावी आणि सोबत दहा हजार रुपये पाठवत आहे ते आई साठी खर्च करावे ही विनंती….
तुझा मित्र,
आनंद.
टेबलावर बसून तो वाचतच राहिला त्याचे डोळे न कळत भरून आले.
किती हा योगायोग !!
विश्वास ला काहीच सुचेना. तो क्षणभर स्वतःला विसरून गेला होता. त्याला स्वतःचे आई वडील आठवू लागले,आईच प्रेम काय असत याची आठवण यायला लागली आणि ते आठवून तो गहिवरून गेला.
त्याला पहिल्यांदा या प्रसंगाने चुकीच्या कर्माची आठवण करून दिली होती.त्याला आपण करत असलेल्या कृत्याची लाज वाटायला लागली. आपण आत्ता पर्यंत कित्येक पापात वाटेकरी झालोत हे त्याला आता उमगले.
काउंटर वर बिल देऊन विश्वास सरळ निघाला ते थेट पनवेलला!!
त्याला आता शिवानी हॉस्पिटल गाठायचे होते. त्याला त्याच्या कृत्याचा पच्छाताप झाला होता.
चिठ्ठी वाचण्याच्या नादात त्याच्या हातून पाकिटातील ओळखपत्र मात्र अजूनही तशीच होती.
शिवानी हॉस्पिटल. पनवेल.
काउंटरवर येऊन त्याने विचारले “,
विश्वास पाटील यांचे कोणी नातेवाईक हॉस्पिटलला ऍडमिट आहेत का ?”.
हो, आहेत दुसऱ्या मजल्यावर रूम न. 215
विश्वास पहिल्यांदा कोणाचे तरी चोरलेले पैसे परत करण्यासाठी आला होता.आपल्या कृत्याची एकाच वेळी भीती आणि लाज त्याला वाटत होती.
विश्वास रूम न. 215 जवळ पोहचला. हळूच दरवाजा ढकलून आत गेला. बेडवर सत्तर वर्षाच्या आजी झोपल्या होत्या. रूममध्ये कोणीही नव्हतं. विश्वासला काय करावं समजेना. जवळ असलेला स्टूल त्याने हळूच ओढून घेतला आणि थोड्या दूर अंतरावर बसून राहिला. बेडवरच्या आजीला कुणीतरी आल्याचा भास झाला त्यांनी हळूच आवाजात विचारलं “विश्वास,आलास का रे”?
विश्वास पुन्हा अचंबित झाला. त्याच्या नावाने सुरु झालेली चिट्ठी आता आजीने मारलेली हाक हे सगळं त्याला काही तरी संकेत देत होते. विश्वासच्या डोळ्यात पाणी आले होते.
आजीला वाटले आपलाच मुलगा विश्वास आला आहे. परंतु हा विश्वास दुसरा होता. हा विश्वास अट्टल गुन्हेगार होता. खिसेकापू होता.
” आई ,मी तुमचा मुलगा विश्वास नाही आहे. परंतु तुमच्या मुलामुळे आज माझे आयुष्य बदललंय. मी चोरलेल्या तुमच्या मुलाच्या पाकिटामध्ये मला आनंद ने लिहिलेले एक पत्र सापडले आणि ते पत्र मला तुमच्यापर्यंत घेऊन आले मी तसा चोर माणूस !!
परंतु कदाचित तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात बदल घडणार असेल म्हणून मला त्या चोरलेल्या पाकिटात आनंदची तुम्हाला लिहिलेली चिठ्ठी सापडली आणि ती वाचून मी तुमच्या पर्यंत पोहोचलो आज पासून माझं जीवन बदलणार आहे ते केवळ तुमच्या आणि तुमच्या मुळेच. मी तुमचा आणि विश्वास चा खूप आभारी आहे आज तुमच्या विश्वास मुळे हा विश्वास बदललाय.
” बाळा, माझ्यासाठी तू आणि माझा मुलगा सारखेच रे “.
योगायोग बघ किती, तुझही नाव विश्वास आणि माझ्या मुलाचे पण !!
माणसाचं आयुष्य कधी बदलेल हे सांगता येत नसत, पण जेव्हा ‘आत्मज्ञान ‘ होत तेव्हा बदल व्हायला वेळ लागत नाही.आम्ही निमित्तमात्र आहोत रे .!
तुझ्या बदलाला जर आम्ही कारणीभूत ठरलो तर आम्हाला त्याचा अभिमान आहे.
तेवढ्यात रूमचा दरवाजा हळूच उघडला.
स्टूलवर बसलेल्या विश्वासने दरवाज्याकडे बघितले.
समोर गंभीर चेहरा केलेला आजीचा मुलगा विश्वास आला होता.तोच ज्याचे पाकीट ह्या विश्वासने लंपास केले होते.
दोघेही एकमेकांकडे बघत होते.
क्षणभर त्यांनी एकमेकांकडे पहिले आणि लगेच स्टूलवरून उठून विश्वासने ‘ विश्वासला ‘ मिठी मारली.
आणि ढसढसा रडू लागला.
हा सगळा काय प्रकार चालला हा आजीच्या मुलाला समजेना.
आजींनी दोघांनाही शेजारी बसवले आणि झालेला सर्व प्रकार समजून सांगितला.सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते.चांगली गोष्ट ही होती की, सगळ्यांचे अश्रू हे आनंदाश्रू होते.
©®प्रकाश फासाटे.
मोरोक्को.
+212661913052