*ऋण* श्रध्दा जहागिरदार
*ऋण*
समाजकार्य करण्याची केतकीला पहिल्यापासूनच आवड होती. लग्नाच्या आधी पण ती बालसुधारगृहात जाऊन तेथील मुलांसोबत ती गप्पा मारत असे.
त्या गप्पातून त्यांना संस्काराच्या चार गोष्टी शिकवायची. अनाथाश्रमात जाऊन तेथील मुलांसोबत ती खेळ खेळत असे, त्यांना गोष्टी सांगत असे. लग्नानंतर तिचे हे कार्य तिने चालूच ठेवले. योगायोगाने तिला नवर्याने पण चांगली साथ दिली. “केतकी, तू अनाथ मुलांसाठी खुप चांगले कार्य करतेस. त्याच्या आड मी येणार नाही. तुझे कार्य तसेच चालू ठेव.” ईश्वर कृपेने नवरा आपल्याला साथ देतो हे
पाहून केतकी खुष होती. घरातील कामे करुन ती समाजकार्य करत असे.
आजपण केतकीला एका वृध्दाश्रमाला भेट द्यायची होती. वृध्दाश्रमाचा बाहेरचा परिसर केतकी न्याहाळत होती. तेवढ्यात तिचे लक्ष
स्वयंपाकघराकडे गेले. तिला नर्मदा काकू दिसल्या. 3-4 वर्षांनी ती नर्मदा काकूंना पहात होती. काकूंना पाहून तिला खुप आनंद झाला पण काकू येथे कशा या विचाराने थोडी चलबिचल पण झाली. तिने व्यवस्थापकांकडे चौकशी केली काकूंबद्दल. “15 दिवंसापुर्वीच त्यांच्या मुलाने त्यांना ईकडे आणून सोडले” त्यांनी सांगितले. ती धावतच स्वयंपाक घराकडे गेली. नर्मदा काकू म्हणून तिने हाक मारली. काकूंनी केतकीला पाहताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.
केतकीचे लग्न झाल्यावर मुंबईला केतकी ,नर्मदा काकू राहत होत्या त्याच सोसायटी मध्ये रहायला आली.
काकूंच्या शेजारचाच फ्लॅट तिने घेतला. केतकी नवीन नवरी. काही अडचण आली की ती आपुलकीने काकूंकडे जायची व अडचण सोडवायची. काकू अनुभवाने व वयाने पण मोठ्या त्या तिला स्वयंपाकातील पदार्थ शिकवायच्या. संसारातील गुपिते तिला सांगत असत. दोघींची छान गट्टी जमली. काकूंना पण केतकी ला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. दिवसभर बोलणे झाले नाहीतर खिडकीतून एकमेंकींचे बोलणे होत असे.
आणि अचानक नियतीने केतकीच्या
आयुष्यावर घाला घातला. तिच्या मिस्टरांचे ॲक्सिडेंट मध्ये निधन झाले.
केतकी वर आभाळ कोसळले होते.
दु:खाच्या खाईत केतकी खंगत चालली होती. पण नर्मदा काकू तिच्या
पाठीशी भक्कम उभे राहिल्या. तिला मानसिक आधार दिला. रोज तिच्याकडे जाऊन तिच्याशी गप्पा मारणे, अनुभवाचे बोल तिला ऐकवणे
परत तिला समाजकार्यात गुंतवण्यासाठी त्यांनी तिला प्रोत्साहित केले. अशा संकटकाळी काकूंनी जी मदत केली त्याचे ऋण आपण कसे फेडणार, असे तिला नेहमी वाटत असे.
आता केतकी सावरली होती. तिचे कार्य जोरात चालू होते. काकूंच्या मुलाची बदली पुण्याला झाली. मुलासोबत काकूंना पण जावे लागणार होते. काकूंच्या सहवासात केतकीला आईचे वात्सल्य मिळाले होते. काकू आपल्याला आता सोडून जाणार म्हणून ” देवाने आपल्यावर अजून एक आघात केला” या विचाराने ती कासावीस झाली.
जाताना दोघी गळा पडून खुप रडल्या “काकू आपल्यात आई – मुलीचे नाते निर्माण झाले आहे. हे नात तुटताना आपण कधी पाहतो का!! नक्कीच मी परत तुमच्याकडे धावत येणार आहे. आईची माया लेकराला पोरके करत नाही.” असे म्हणून तिने जड अंत: करणाने काकूंना निरोप दिला.
आज वृध्दाश्रमात काकूंना पाहून केतकी मनात म्हटली ” आमच्या आंतरिक ओढीने आम्हाला आज परत भेटवले”.
रात्रभर केतकी विचार करत होती कांकूवर आज ही वेळ आली आपण काहीतरी करायला पाहिजे. मनाशी
निश्चय करुन केतकी निद्रेच्या आधिन झाली.
सगळी आवराआवरी करुन केतकी वृध्दाश्रमात गेली. ” नर्मदा काकू मी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आले आहे.” हे वाक्य ऐकून काकूंना गहिवरून आले. पण एकिकडे त्यांना तिच्याकडे जाणे संकोचित वाटले.
“मुलगी निराधार झाली तर तिला माहेरचा आधार असतो. आज माझी आई निराधार झाली आहे तिला मी माहेरी न्यायला आले” केतकीचे हे वाक्य ऐकून नर्मदा काकूंचे मन नर्मदे सारखे तिच्याकडे वाहत गेले.
आज केतकीला एकदम हलके हलके वाटत होते. काकूंना आपण आपल्या घरी घेऊन आलो, एका मार्गाने त्यांचे ऋण फेडले. आपल्यावर दु: खाचा डोंगर कोसळला पण काकूंनी तो डोंगर झेलत आपल्याला आधार दिला. जगण्याची नवी उमेद दिली. मनाला उभारी दिली. नर्मदा काकू केतकी जवळ आल्या तिच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवत म्हटल्या” पोरी मुलीला जसे माहेर हे हक्काचे घर वाटते, तसे तू मला आज हक्काचे घर दिलेस. ”
” काकू तुमच्या ऋणातून मी आज मुक्त झाले” असे म्हणत केतकी काकूंना बिलगली.
श्रध्दा जहागिरदार🙏
Khup Chaan Lihile
छान