रविवारची कथा…… एक सूक्ष्म कथा गिरीश मिठारी 9561404599
रविवारची कथा……
एक सूक्ष्म कथा……….!!!
…………………………………………..
आज ते फार कंटाळले होते.ऑफिस मध्ये काही फाईल वर सह्या करून त्यांना घरी लवकर जायचे होते. त्यांच्या एका सहीला देखील खूप महत्व होते.शासनाच्या शेत जमिनीशी संबधित एका खात्यात ते सरकारी अधिकारी होते आणि एका उच्च पदावर विराजमान होते.
आज त्यांच्या पायाशी जरी सारी सूखे लोळण घालत असली तरी एके काळी त्यांना एक वेळच्या जेवणाला देखील मुकावं लागले होते.घरची अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हौस मौज त्यांची कधीच झाली नाही. परीक्षेची फी तर नेहमी त्यांच्या शिक्षकांनी भरली पण त्या गरिबीला जणू त्यांनी शत्रू समजले आणि तिला हरवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून सरकारी अधिकारी ते बनले.पण फक्त अभ्यास करण्याइतपत त्यांना अडचणी आल्या नाहीत.ते जेव्हा पास झाले तेव्हा त्यांची पोस्टिंग लवकर होत नव्हती.शेवटी ते स्थानिक आमदाराकडे गेले. त्या आमदाराकडे जाण्यासाठी त्यांना अगोदर त्या आमदारादाच्या स्वीय सहायकापर्यंत पोहचावे लागले.तिथून खरे त्यांचे समाजाबद्दल सेवा करण्याचे विचार बदलू लागले.
ज्या आई बापाला समाजात गरिबीमुळे मान सन्मान मिळत नव्हता तो आपण एक सरकारी अधिकारी बनून समाजाची सेवा करून त्यांना मिळवून द्यायचा हे विचार त्यांचे बदलू लागले.त्यांना इतक्या कठीण परीक्षा पास होण्यासाठी जितका त्रास झाला नाही तो ह्या राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे झाला.त्यांना आमदाराची शिफारस, मंत्री महोदयांच्या काही अटी आणि अशा बऱ्याच अडथळ्यातून जावे लागले.दरम्यान ह्या प्रत्येक टप्प्यावर इतरांचे खिसे गरम करत असताना त्यांना शिक्षणासाठी नाही पण ह्या कारणासाठी आपली जमीन विकावी लागली आणि तिथेच त्यांच्या मनातील समजाची निस्वार्थ सेवा करण्याची भावना संपुष्टात आली आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी कामाची पद्धत न शिकता प्रत्येक सहीचे पैसे वेगळ्या माध्यमातून कसे घेता येतील हे शिकून घेतले.
आई बापाला त्यांची जमीन तर मिळवून दिलीच पण सोबत बंगला चार चाकी गाडी सारे काही दिले.लग्न देखील एका छान अप्सरा वाटावी अशा मुलीसोबत केले आणि अतिशय सुखात आयुष्य ते जगत होते.अफाट पैसा जरी खात असले तरी ते प्रत्येक ठिकाणी हिस्सा पोच करत असलेने त्यांना कुठलीही अडचण येत नव्हती.
आज मात्र त्यांच्या समोरच्या फाईल वर सही करताना त्यांना त्या फाईल च्या आत एक चिठ्ठी दिसली त्यात लिहिले होते,”साहेब,मी फार असहाय आणि गरीब तरुण आहे.मला माझ्या आईला आणि अर्धांगवायू झालेल्या वडिलांना शेवटचे चार दिवस सुखाचे दाखवायचे आहेत.ह्या फाईल वर सही झाली तर माझ्या जमिनीचा निकाल लागेल मला पुढच्या शिक्षणासाठी मदत होईल .मला देखील तुमच्यासारखे मोठे अधिकारी बनायचे आहे .तुम्हाला भेटता येत नव्हते आणि फाईल मध्ये पैसे ठेवल्याशिवाय शिपाई फाईल तुमच्याजवळ येऊ देत नव्हता म्हणून मी आईचे मंगळसूत्र मोडले आहे.बाप जिवंत असताना असे करताना माझ्या काळजाला खूप वेदना झाल्या आहेत.माझी विनंती असेल की ह्या फाईल वर सही करण्यासाठी आपण पैसे नका घेऊ.देव तुमचे भले करेल तुमच्या मुलाला उदंड आयुष्य लाभेल.”
शेवटची ओळ वाचून ते स्तब्ध झाले..
खरेच आज त्यांच्या पायाशी सारी सूखे लोळण घालत होती पण त्यांच्या एकुलत्या एका मुलाला रक्तदोष आजार होता ज्यात त्याचे रक्त वारंवार बदलावे लागत होते आणि डॉक्टर त्या मुलाच्या उदंड आयुष्याबद्दल जी शाश्वती देत नव्हती त्याबद्दल ही चिठ्ठी देत होते. आज पहिल्यांदा त्यांना हे जाणवू लागले की आजपर्यंत आपण वागलो ते योग्य की अयोग्य ,जिद्दीने शिकून समाजाची सेवा करायचे ध्येय आपण सोडून देऊन भलतीच वाट आपण पकडली आणि पळवाट म्हणून आपण राजकारणी लोकांना ग्रहीत धरून आपण सुध्धा तेच केले .खरेच आपण चुकलो शेवटी सुख हे फक्त पैसा किती कमावला यावर मोजता येत नाही.आज मी खरेच सुखी आहे का…?असे विचार त्यांच्या मनात येवून गेले आणि काही क्षणांत ते भानावर आले.
शिपायाला बोलवून त्यांनी काही सूचना केल्या फाईल मध्ये तसेच पैसे ठेवले सह्या केल्या त्यासोबत त्या तरुणाचे आभार मानणारी एक चिठ्ठी आणि त्यासोबत त्याच्या भावी वाटचालीसाठी काही संदेश लिहून ते घरी जायला निघाले.आज त्यांच्या मुलाचे रक्त बदलून घेण्यासाठी त्यांना हॉस्पिटल मध्ये जायचे होते पण आज त्यांना आपल्या मुलाच्या उदंड आयुष्याबद्दल आशा जाग्या झाल्या होत्या.
✍️ गिरीश मिठारी 9561404599
टिपः अभिप्राय स्वागतार्ह,तुमचा अभिप्राय वाचून मला छान वाटते ,काही उणीवा असतील तर मला सुधारणा करता येतात आणि तुम्हाला आवडले असेल तर मला लेखनाचे समाधान मिळते.