शारदीय नवरात्रोत्सव माता ब्रह्मचारिणी लेखन : सौ. अनघा
दिवस दुसरा…. माता ब्रह्मचारिणी
माता दुर्गेच्या शक्तींचे दुसरे रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाची चारिणी, जो तपस्या करतो. ब्रह्मचारिणी देवीचे रूप पूर्णपणे तेजस्वी आणि अतिशय भव्य आहे. तिच्या उजव्या हातात नामजपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे.
ब्रह्मचारिणी देवी हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली होती. नारदांच्या उपदेशाने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले.
आख्यायिकेनुसार तिने हजार वर्षे फक्त कंदमुळं आणि फळं खाल्ली. अनेक दिवस कडक उपवास करून बेलाच्या झाडाखाली तिने तपश्चर्या केली. देवीने पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रास सहन केला.
तपश्चर्येनंतर तिने जमिनीवर पडलेली फक्त पाने खाऊन हजार वर्षे भगवान शंकराची पूजा केली. त्यामुळे देवीचे एक नाव ‘अर्पण’ असंही पडलं.
अनेक हजार वर्षांच्या या कठोर तपश्चर्येमुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले, तिची अवस्था पाहून तिची माता मेना खूप दुःखी झाली आणि तिने तिला या कठीण तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘उमा’ हाक मारली.
तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असेही पडले.
ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि तप, त्याग, वैराग्य, सद्गुण, संयम यांसारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते. जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही.
ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते. वासनेपासून मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे.
तेजस्वी गौरवर्णाची ही दुर्गा शांत स्वरूपाची आणि भव्य आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असे तिचे स्वरूप आहे. तप करीत असल्यामुळे तिची वृत्ती स्थिर आहे त्यामुळे तिचे कोणतेही वाहन नाही. स्वरूप शांत असल्यामुळे हातात कोणतेही अस्त्र वा शस्त्र नाही.
माता ब्राह्मचारिणीची उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होते.
माता ब्रह्माचारिणीला दूध वा दुधाचे पदार्थ तसेच पांढऱ्या रंगाचे पदार्थ अर्पण केले जातात. तसेच पांढऱ्या रंगाच्या फुलांच्या माळा वाहिल्या जातात. ह्या दिवशी कुमारिका भोजन केले जाते. ज्यांचे अजून लग्न झालेले नाही अश्या कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन दिले जाते.
भौतिक सुखाच्या मागे धावून धावून दमलेल्या साधकास प्रज्ञादायिनी, मोक्षदायिनी असणारी ही माता ब्रह्माचारिणी आहे.
माता ब्रह्मचारिणी बीज मंत्र: ह्रीं श्री अम्बिकायै नम:।
कालच्या लेखात आपण नऊ ह्या संख्येविषयी वाचले…. त्याचे विवरण खालील प्रमाणे
”नऊ”(९) ही संख्या विशिष्ट आहे. ९ ला एकाने भागल्यास नऊच येतात. ९ ला २ ने गुणल्यास १८ येतात. १ आणि ८ ची बेरीज ९ च येते. ९ ला ३ ने गुणल्यास २७ ही संख्या येते. २ आणि ७ ची बेरीज ९ च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास ९ हीच संख्या येते त्यामुळे ९ ही संख्या ब्रह्मतत्व सूचविते.’’
माता ब्रह्माचारिणी ची भारतात ११ मंदिरे आहेत.
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात भागडी या गावात चुलबंद नदीच्या जवळ मंदिर आहे.
वाराणसी क्षेत्री सप्तसागर, कर्णघंटा येथे मंदिर आहे.
तसेच हरियाणा मधे जिंजोली या गावात आहे. उत्तर प्रदेशात तीन मंदिरे आहेत. बिहार मधे आहे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात सुद्धा आहे. राजस्थान, पंजाब प्रांतात ही माता ब्रह्मचारिणीची मंदिरे आहेत.
जय माँ ब्राह्मचारिणी 🙏🏻🙏🏻🚩🚩
लेखन : सौ. अनघा
८८०६८०९०४३
vaidyaanagha71@gmail.com
खूप छान माहिती मिळाली देवी ब्रह्मचारिणी बद्दल. धन्यवाद. अशीच माहिती देवी कवच स्तोत्रमध्ये ज्या अनेक देवींची नावे येतात त्यांच्या विषयी व त्याची मंदिर कुठे आहेत हे जाणून घ्यायची इच्छा आहे.