शारदीय नवरात्रोत्सव माता ब्रह्मचारिणी लेखन : सौ. अनघा वैद्य
तिसरा दिवस – माता चंद्रघंटा
शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसर्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने व्यक्तीचा स्वभाव चांगला होतो आणि त्याच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होते, असे मानले जाते.
चंद्रघंटा देवीला दहा हात आहेत. देवीच्या उजव्या चारपैकी एका हाताची अभयमुद्रा, तर उर्वरित तीन हातांत धनुष्य, बाण आणि कमळपुष्प आहे. पाचवा हात गळ्यातील माळेवर आहे. तिच्या डाव्या हातांमध्ये कमंडलू, वायुमुद्रा, खङ्ग, गदा, अग्नी आणि त्रिशूळ आहे. गळ्यामध्ये फुलांचा हार, कानात सोन्याचे आभूषण, डोक्यावर मुकुट, वाहन सिंह आहे.
तिचा तिसरा डोळा नेहमीच उघडा असतो, जो वाईटाविरुद्धच्या लढाईसाठी तिची शाश्वत तयारी दर्शवतो.
देवीचे वाहन सिंह आहे. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. चंद्राघंटा देवीच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर होतात.
देवीच्या या स्वरूपात मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र धारण केलेला आहे, म्हणून या देवीचे नाव चंद्रघंटा आहे.
दशभुजा म्हणजे दहा हातांत शस्त्रे, वाहन सिंह असूनही चंद्रघंटा देवीचे स्वरूप शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. युद्धासाठी सदैव सज्ज अशी मुद्रा असूनही भक्तांना अभय देणारी आहे. वाहन सिंह असल्याने या देवीचे उपासक पराक्रमी निर्भय होतात, असे म्हटले जाते. म्हणजे देवीची मुद्रा उग्र आहे, परंतु ती केवळ दुष्ट, असुर विध्वंसक शक्तीच्या नाशासाठी. सज्जन, भक्त यांच्यासाठी ती संरक्षक देवता आहे.
या दिवशी देवीच्या साधकाचं मन ‘मणिपूर’ चक्रात प्रविष्ट होतं. चंद्रघंटेच्या कृपेनं अलौकीक वस्तुचं दर्शन होतं. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचं हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे.
माता चंद्रघंटा देवीचं रूप अत्यंत सौम्य आणि शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.
आवाजात मधुरता येते.
माता चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपलं मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करावी. तिची उपासना केल्यामुळे सर्व संसारिक संकटातून मुक्ती मिळते. आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावं. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचं लक्ष आहे.
एके काळी महिषासुर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती. त्याच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ माजली होती. देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासुर खूप शक्तिशाली झाला होता. तो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. स्वर्गातील देव भयभीत झाले. राजा इंद्रही काळजीत पडला. महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते.
त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेव, देवाधी देव महादेव आणि भगवान विष्णू यांच्याकडे गेले. राजा इंद्राने महादेव, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांना महिषासुराबद्दल सांगितले. ब्रह्मदेव व भगवान विष्णू अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले. हे तेज म्हणजेच ऊर्जा त्यांच्या मुखातून प्रकट झाली. या उर्जेतून एक देवी प्रकट झाली. ती माता चंद्रघंटा होय.
त्या वेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिले. इंद्राने घंटा दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली.
त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासुर यांच्यात भयंकर युद्ध झाले असे शास्त्रात नमूद केले आहे. या युद्धात महिषासुर देवीपुढे टिकू शकला नाही. त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले.
चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. आईच्या हातातील घंटेचा आवाज वासना, क्रोध, मत्सर, लोभ, माया यासह जीवनातील इतर अनेक गोष्टी दूर करतो.
माता चंद्रघंटा बीज मंत्र – ऐं श्रीं शक्तयै नम:
माता चंद्रघंटाची भारतात १२ मंदिरे आहेत.
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात भागडी या गावात चुलबंद नदीच्या जवळ मंदिर आहे.
वाराणसी क्षेत्री माणिकर्णिक घाटापासून जवळच मंदिर आहे.
तसेच राजस्थानमधे जयपूरला आहे. उत्तर प्रदेशात चार मंदिरे आहेत. मध्यप्रदेशात तीन मंदिरे आहेत. बिहारमधे पचलाखी येथे आहे, उत्तराखंड, झारखंड मधे सुद्धा माता चंद्रघंटाचे मंदिर आहे.
जय माता चंद्रघंटा 🙏🏻🙏🏻🚩🚩
लेखन : सौ. अनघा अनिरुद्ध वैद्य
८८०६८०९०४३
vaidyaanagha71@gmail.com