शारदीय नवरात्रोत्सव माता कुष्मांडा लेखन : सौ. अनघा वैद्य
चौथा दिवस – माता कुष्मांडा
शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीच्या चौथं रुप म्हणजे माता कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची चौथी माळही कुष्मांडा देवीला समर्पित असते. या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात. या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर स्वार असून तिला आठ हात आहे असं तिचं रुप आहे. तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ असते. मालपुआ हे या देवीचा आवडता नैवेद्य आहे.
हतबलतेने, नैराश्याने ग्रासलेल्या भक्ताला जगण्यासाठी नवी प्रेरणा देणारी देवी असा देवी कुष्माण्डाचा लौकिक आहे.
या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात. कुष्मांड म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा. ज्यांच्यामधे निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्माण्डाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम + अण्डज म्हणजेच कुसुमासारख्या, फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती.
जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली, सृजनाची `एकोऽहम बहुर्यामी’ ब्रह्मांड निर्माण करण्याची! तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्माण्डाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे.
या देवीच्या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दहा दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा. दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. कितीही संकटे आली तरी डगमगू नका. पश्चिम दिशा सांगते मागील चूकातून शहाणा हो. मागील सुंदर आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभव. उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने हे व ध्रुव ताऱ्यासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढळ राहू दे. दक्षिण दिशेकडून वेळेचे, काळाचे महत्व जाण. उपदिशांकडून दोन गोष्टींमधले समत्व शीक. संसाधने जोडताना वेळेचे भान ठेव. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत व अधर अर्थात खालची दिशा सांगते तुला आसमंत गाठायचा आहे मग घे भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातील समाजासाठी होऊ देत.
अशी ही विश्वशक्ती ‘कुष्माण्डा’ हीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तुंची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्यांच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे.
ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी आहे, त्यांनी या शक्तीची उपासना करावी. आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे. जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्विकृती, किर्ती, सामर्थ्य, आरोग्य प्राप्त होते. हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दु:खं दूर होऊन संसाररूपी भवसागर तरुन जाण्याची शक्ती देते. तसेच आध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो.
मनुष्य नेहमी स्वत:मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्षा, घृणा, मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं म्हणून ही पूजा करतात.
बीज मंत्र: कुष्मांडा: ऐं ह्री देव्यै नम:
संपूर्ण भारतात एकच मंदिर आहे माता कुष्मांडाचे. उत्तरप्रदेशात कानपूर जिल्यात घाटमपूर येथे हे मंदिर आहे.
येथील मूर्ती ही पिंड स्वरूपात आहे आणि पिंडीला २ मुख आहेत. त्यामुळे देवी झोपलेल्या स्थितीत आहे, असे दिसते. या ठिकाणी पिंडीवर पाणी घालतात व ते पिंडीवरचे पाणी थोडे दिवस डोळ्याला लावल्यास डोळ्यांसंबंधीचे विकार दूर होतात, असे म्हटले जाते.
जय माता कुष्मांडा 🙏🏻🙏🏻
संकलन – सौ. अनघा वैद्य.
छान माहिती