★★सुख वेचता★★
ओंकारचं प्रमोशन झाल्याची पार्टी सुरू होती. मित्रांचा जल्लोष, शॅम्पेनचा फेस, रॉक संगीत,त्याच्या तालावर नाचणारे त्याचे ऑफिसमधले मित्र आणि मैत्रिणी! अठ्ठावीसाव्या वर्षी सिनिअर मॅनेजर झालेल्या ओंकारच्या यशाच्या मागे त्याची अपार मेहनत,त्याची बुद्धिमत्ता आणि नवीन आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी कारणीभूत होती. बालवयापासून ओंकारला आपण हुशार आहोत ही समज आली होती. पण त्याच्या त्याने योग्य वापर करून त्याचं ध्येय साध्य केलं. एमबीए करून तो लगेच नोकरीला लागला. आणि जिद्दीने त्याने हे पद मिळवलं.
“ओंकार, क्या बात है यार! इतक्या लहान वयात ही गरुडझेप घेतलीस. आम्ही आत्ता कुठे नोकरीत स्थिरावतोय.”
“अमेय, तू माझा शाळेतला मित्र! तुला तर माहितीच आहे. मला खूप मेहनत करून खूप पैसा कमवायचा आहे. आम्ही कायम मध्यमवर्गीयच राहिलो. मला ते लेबल पुसून टाकायचं आहे.”
“घर,अभ्यास,कंपनी,पगार ह्यातच तू रमला आहेस. हे सगळं ठीक आहे, पण त्याचा उपभोग घेणारी घरी कधी आणतोस?” संदीप ओंकारच्या पाठीवर थाप मारत म्हणाला
“बघू रे! वेळ आल्यावर जी नशिबात असेल ती येईलच.” ओंकार हसत म्हणाला.
“तुझ्यावर फिदा होऊन इतक्या जणी लाईनमध्ये उभ्या होत्या पण तू अभ्यासाच्या लाईनीत! आता पुढची पार्टी तुझा एंगेजमेंटची हवी.”
“शुअर,डन!” ओंकारने संदीपला टाळी दिली.
ओंकारच्या आईवडिलांनी त्याचं नाव वधु-वर सूचक मंडळात नोंदवलं. पण त्यातली एकही मुलगी ओंकारला पसंत पडत नव्हती. ओंकारला त्याच्यासारखीच अँम्बीशस मुलगी हवी होती, जिचं ध्येय त्याच्याशी मिळतं जुळतं होईल अशी कुणीच नव्हती. शेवटी ओंकारने आईला सांगितलं की त्याच्या मनासारखी मुलगी मिळेपर्यंत तो लग्नच करणार नाही.
नीती कंपनीत नव्याने जॉईन झाली आणि तिचे आणि ओंकारचे सूर जुळले. नीती देखील अभ्यासू, मेहनती होती. तिचा मित्र परिवार खूप मोठा होता आणि तिला समाज कार्याची देखील आवड होती. ओंकारने तिला लग्नाची मागणी घातली आणि नीतीने होकार दिला.
दोघांचा दिवस सकाळी सहाच्या ठोक्याला सुरू व्हायचा तो रात्री दहाला संपायचा. दोघेही आपल्या कामावर,आयुष्यात खुश होते. लग्नानंतर काही दिवसांनी नीतीला हे प्रकर्षाने जाणवलं की ओंकारचे मित्र देखील फक्त कंपनीतले होते. दुसरे कुठले त्याचे मित्र तिने बघितलेच नव्हते. रोजच्या त्याच त्याच रुटीनचा नीतीला कंटाळा आला. तिने परत तिचं सोशल वर्क सुरू केलं. त्यासाठी तिने ही लठ्ठ पगाराची नोकरी सोडून पार्ट टाईम नोकरी बघितली. सकाळी अकरा ते दोन नोकरी आणि त्यानंतर ती एका अनाथ मुलांच्या शाळेत गणित आणि विज्ञान शिकवायला जाऊ लागली.
ओंकारने तिच्या ह्या निर्णयाला होकार दिला पण कंपनीतले प्रॉब्लेम्स नीतीबरोबर सतत डिस्कस करायची त्याला सवय झाली होती. नीती त्याच कंपनीमध्ये असताना ती त्याला कधी कधी उत्तम मार्गदर्शन करीत असे. ओंकारला ही उणीव जाणवायला लागली.
नीतीचं विश्व बदललं. तिचा मित्र परिवार आणखीनच वाढला. तिच्याबरोबर सोशल वर्क करणारे तिचे मित्र आणि मैत्रिणी घरी येऊ लागले.
शाळेच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या चर्चा होऊ लागल्या.
एक दिवस शाळेला सुट्टी असताना नीतीने तिच्या सोशल वर्क करणाऱ्या मित्र मैत्रिणींना घरी बोलावलं. मुलांना प्रात्यक्षिक शिक्षण देण्यावर भर द्यावा ह्यासाठी चर्चा करायला तिने घरीच मिटिंग ठेवली होती. मिटिंग दोन तास चालली. नीतीने फोन सायलेंट मोडवर ठेवला होता. मिटिंग संपल्यावर तिने मोबाईल बघितला तर ओंकारचे दहा मिस्ड कॉल्स दिसले. तिने ओंकारला फोन लावला. “ओंकार, कशासाठी इतके फोन? काही इमर्जन्सी होती का?”
“काही इमर्जन्सी असेल तरच मी तुला फोन करायचा का?”
“तसं नाही रे! इतके कॉल्स बघून मी घाबरले.”
“ओह! म्हणजे तुला माझी काळजी आहे तर!”
“हे काय बोलणं झालं ओंकार?”
“माझं प्रेझेंटेशन आज अगदी वाईट झालंय. आय एम अपसेट. तुझ्याशी बोलायचं होतं, तर तुझा फोन सायलेंट!”
“ओके रिलॅक्स,तू घरी आल्यावर बोलू.” नीती शांतपणे म्हणाली.
ओंकारचं हे चिडचिड करणं हल्ली वाढतच चाललं होतं. त्याला कंपनीपलीकडे कुठलं जगच राहिलं नव्हतं. नीतीला आता आई होण्याची ओढ लागली होती पण ओंकारचे “नॉट नाऊ!” हे उत्तर कायम होतं. इतक्या लहान वयात एवढा यशस्वी झाला तरी ओंकार समाधानी नव्हता. सतत पुढच्या प्रमोशनसाठी ढोर मेहनत करणे एवढंच तो करत होता.
शाळेच्या मुलांना घेऊन नीती आणि काही शिक्षक सहलीला जाणार होते. नीतीने हे ओंकारला सांगितलं आणि तो चिडलाच. “नीती, स्टॉप धिस! मी कुठल्या क्रायसिस मधून जातोय ह्याची तुला पर्वाच नाही. कंपनीमध्ये सगळे माझे पाय खेचताहेत. तुला त्याचं काही गांभीर्य नाही. तुझी ती फडतूस अकरा ते दोन ची नोकरी आणि हे शाळेचं सोशल वर्क ह्यातच तू बिझी आहेस. इतकी शिकलेली आहेस तू आणि सगळं वाया घालवते आहेस. ती नोकरी सोड आणि परत माझी कंपनी जॉईन कर.”
“नाही ओंकार. मी शाळेची नोकरी सोडणार नाही. ती माझी आवड आहे.”
“कसली आवड? तुझे ते सोशल वर्क करणारे रिकामटेकडे मित्र घरात येऊन बसतात आणि फुकटच्या गप्पा मारतात. त्यातल्या एखाद्याला तुझ्यात इंटरेस्ट असेल.”
“ओंकार.” नीती जोरात किंचाळली.
“तोंड सांभाळून बोल. आज तू माझा फार घाणेरडा अपमान केला.” नीती रडत खोलीत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी ओंकार सकाळी उठला तर घरात त्याला नीती दिसली नाही. टेबलवर एक चिठ्ठी दिसली. त्याने ती उघडून वाचली.
ओंकार…
काल तू जे मला बोललास तो माझ्या प्रेमाचा,एकनिष्ठतेचा पराभव होता. तू माझ्यावर अतिशय गलिच्छ आरोप केला. तुझ्या हुशारीवर, मेहनती वृत्तीवर मी भाळले होते. तुझं करिअर तू तुझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे नेशील ह्याची खात्री होती. पण काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की तू तिथेच आहेस. तुझं विश्व म्हणजे तुझी कंपनी, तुझा बॉस,तुझे तिथले मित्र आणि तुझं करिअर इतकंच आहे. तुझ्या वर्तुळाचं परीघ तू सीमित ठेवलंस. वर्तुळाचा आकार बदलला की परीघ देखील बदलतं पण तुझं वर्तुळ तू वाढवलंच नाही. जरा बाहेरचं जग बघ. कितीतरी करण्यासारखं आहे. जगात दुःख किती आहे हे तुला कळेल. आपण त्यांना फुल नाही फुलाची पाकळी तर देऊ शकतो. म्हणूनच मी सोशल वर्क करते. मला त्यात आनंद मिळतो आणि मनशांती मिळते. गेल्या वर्षभरात तुझ्या आवडीची सिनेमाची गाणी तरी तू ऐकलीस का? तिथेच घुटमळतो आहेस. परिघाची लांबी वाढव,त्यात खूप सुख वेचता येईल. प्रयत्न करून बघ. मी महिनाभर आईकडे राहणार आहे. तू काल जे काही मला बोललास, ते विसरण्यासाठी मला काही वेळ दे.
सौ नीती
ओंकारने चिठ्ठी बंद केली. मनात विचारांचा कल्लोळ साचला. नितीचे पत्र वाचून तो अस्वस्थ झाला. नीतीवर असा आरोप करून तिची अस्मिता आपण दुखावली,ह्याची त्याला जाणीव झाली. खरंच काय चुकलं होतं नीतीचं? मी फक्त पैसा आणि करिअरच्या मागे आहे. ह्या वर्षात नीतीबरोबर एखादा सिनेमा किंवा नाटक सुद्धा बघितलं नाही. आईबाबा कोल्हापूरला दोन दिवस सुट्टी घेऊन ये म्हणून सांगून थकले.
ओंकारने मोबाईल घेतला आणि नीतीला फोन लावला, “नीती, तुला एक गुड न्युज द्यायची आहे.”
“कसली? प्रमोशन होणार का?” नीती संथ स्वरात बोलली.
“नाही ग,’दादा एक गुड न्युज आहे’ ह्या नाटकाची मी तिकीट बुक करतोय. घरी परत ये. माझं परीघ मी वाढवायचा मी प्रयत्न करतो आहे. खूप छान काही करण्यासारखं आहे पण तुझ्या सोबतीशिवाय ते सगळं अपूर्ण आहे. तुझी साथ हवी आहे. येशील ना?”
“हो, येतेय!…” नितीच्या डोळ्यात अत्यानंदाने अश्रू आले. तिची भरलेली बॅग तशीच होती,ती तिने उचलली आणि ओरडली,”आई, मी निघते ग!”
“अग आली काय, लगेच चालली काय. महिनाभर राहणार होतीस ना?”
“माझा प्लॅन अचानक बदलला आहे.मी नंतर परत येईन.” नीती बॅग उचलत म्हणाली.
घरी जाताना नीतीला हलकं हलकं वाटत होतं. भविष्यातील एक छानसं स्वप्न डोळ्यात साठवत, आज नीती ओंकारशी एकरूप होणार होती….
××समाप्त××
सौ मधुर कुलकर्णी, पुणे