शारदीय नवरात्रोत्सव स्कंदमाता लेखन : सौ. अनघा वैद्य
शारदीय नवरात्रोत्सव स्कंदमाता लेखन : सौ. अनघा वैद्य
पाचवा दिवस – स्कंदमाता देवी
स्कंद म्हणजे ज्ञान आचरणात आणून कृती करणे. स्कंदमाता हे उर्जेचे एक रूप आहे जिच्या उपासनेचा उपयोग ज्ञान व्यवहारात आणण्यासाठी आणि पवित्र कर्मांचा आधार बनण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे इच्छाशक्ती, ज्ञान शक्ती आणि कृती शक्ती यांचा संगम असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. जेव्हा शिव तत्व त्रिशक्तीशी एकरूप होते तेव्हा स्कंद ‘कार्तिकेय’ जन्माला येतो.
स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. स्कंदमाता आपल्या भक्तांवर पुत्राप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करते. आईच्या स्मरणानेच अशक्य कामे शक्य होतात. माता स्कंदमातेच्या कृपेने संततीचे सुख मिळते.
स्कंदमाता कमळाच्या आसनावर विराजमान आहे, त्यामुळे तिला पद्मासन देवी असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये, स्कंदमाता ही सूर्यमालेची प्रमुख देवता मानली जाते. देवी स्कंदमाता हिला पार्वती आणि उमा या नावांनीही ओळखले जाते.
दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे.असे म्हणतात, की स्कंदमातेची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण होते. एवढेच नाही, तर भवसागर तरून पैलतीर गाठण्याचे, अर्थात मोक्षाचे दार खुले होते. स्कंद मातेच्या उपासनेत आपोआप स्कंद भगवानची देखील उपासना होते.
पुराणात त्यांना कुमार आणि शक्तीधर असे संबोधून त्यांचा महिमा सांगितला आहे, त्यांचे वाहन मोर आहे. स्कंदमातेच्या अवतारात भगवान स्कंदाजी बालकाच्या रूपात तिच्या मांडीवर बसलेले आहेत. शास्त्रानुसार, सिंहावर स्वार झालेल्या स्कंदमातृस्वरूपाणी देवींना चार हात आहेत, ज्यामध्ये देवी बाल कार्तिकेयाला उजव्या हातात घेऊन वरच्या उजव्या हातात कमळाचे फुल धारण केले आहे, वरच्या डाव्या कमळ फुलं आहे, आणि खालच्या डाव्या हाताची वरमुद्रा आहे.
साधकांना आरोग्य, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. तिच्या पूजनाने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. स्कंदमातेच्या पूजेने कार्तिकेयाचे बालस्वरूप पूजन केले जाते, हे व्रताचरण फक्त ह्या स्कंदमातेच्या पूजनानेच होते, म्हणून साधकाने त्यांच्या पूजेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या सुखासाठी आणि रोगमुक्तीसाठी स्कंदमातेची पूजा करावी.
स्कंदमातेला केशरी रंग आवडतो. अशा स्थितीत या दिवशी पूजा करताना केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
स्कंदमातेला केळी आवडतात असे म्हणतात. अशा स्थितीत या दिवशी आईला केळी अर्पण करणे शुभ मानले जाते.
नवरात्रीचा पाचवा दिवस, अर्थात ललितापंचमीचा. अतिशय महत्त्वाचा.
ललिता पंचमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शरद नवरात्रीला साजरा केला जातो. असे मानले जाते की, या दिवशी कामदेवाच्या भस्मातून जन्मलेल्या भंडासुराचा वध करण्यासाठी देवी ललिता अग्नीतून प्रकट झाली होती.
देवीची लालित्यपूर्ण वर्णने वाचून साधकाला बाह्य जगताचा विसर पडून तो आंतरिक जगतात रममाण होतो. तल्लीन होतो. लौकिक, सांसारिक, मायिक बंधनातून मुक्त होऊन त्याचे मन विशुद्ध होते. पद्मासनात ध्यानधारणा करून स्कंदमातेचे स्मरण करणाऱ्या साधकाला ध्यान-एकाग्र वृत्ती वाढवत पारमार्थिक मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते.
ललिता हे देवीचे कुमारी स्वरूप मानले गेले असल्याने कुमारिका मुलींचे पूजन ललिता पंचमीच्या दिवशी करण्याची पद्धती आहे.काही ठिकाणी ते अष्टमी आणि नवमी तिथीला केले जाते. याला उपांग ललिता व्रतही म्हणतात.
ललिता देवी ही दहा महाविद्यांपैकी एक आहे. नवरात्रीच्या ५ व्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत देखील केले जाते आणि विधीनुसार देवी सतीच्या रूपात ललिता देवीची पूजा केली जाते. ललिता देवीला चंडीचे स्थान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने आरोग्य मिळते. सुख-समृद्धी लाभते.
पुराणानुसार देवी ललिता शिवाच्या हृदयात वास करते. जेव्हा सृष्टीचा विनाश होतो होतो तेव्हा ही देवी प्रकट होते आणि नवीन सृष्टी निर्माण करते.
आपले मूल आत्मनिर्भर व्हावे, सुशिक्षीत, सुसंस्कृत व्हावे, हे प्रत्येक मातेचे स्वप्न असते.
अशा आईचा गौरव, सन्मान, पूजा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्रीत देवीच्या विविध रूपांमध्ये मातृरूपाचाही गौरव केला जातो. आपणही कृतज्ञ होऊन आपल्या तीन मातांपुढे नतमस्तक होऊया. एक, जिने आपल्याला जन्म दिला, ती आपली आई. दुसरी, जी आपले पोषण करते, ती मातृभूमी आणि तिसरी, जिने आपल्याला आश्रय दिला, ती भारतभूमी. यांच्याप्रती सदैव अभिमान बाळगून त्यांचे नाव उज्ज्वल करण्याचे दान ललिता मातेकडे मागुया…!
स्कंदमाता बीज मंत्र – ‘ह्रीं क्लीं स्वमिन्यै नमः’
भारतात दोन मंदिर आहेत स्कंदमातेची.
वाराणसी क्षेत्र मधे जैतापूरा येथे स्कंदमातेचे पुरातन काळातील मंदिर आहे.
मध्यप्रदेश मधे विदिशा येथे १९९८ साली बांधलेलं मंदिर आहे.