मंथन (विचार)

#एअरपोर्ट ©स्वप्ना मुळे(मायी) छ. संभाजीनगर

#एअरपोर्ट ©स्वप्ना मुळे(मायी)
छ. संभाजीनगर
©स्वप्ना…
टापटीप असलेल्या खोल्या अगदी अस्ताव्यस्त झालेल्या होत्या,.. ती अगदी धावपळीत बॅगा भरत होती,..वर्षभर परदेशी राहायचं आणि महिनाभर इकडे सगळ्यांमध्ये यायचं त्यात सासर,माहेर, गुरुघर,देवदर्शन आणि तिकडे जे मिळत नाही त्याची भलीमोठी यादी डोक्यात ठेवून गल्लीबोळातल्या मार्केटमध्ये फिरणं आणि शिवाय सून म्हणून वर्षभर न राबता येणाऱ्या सासूच्या हाताखालची आदर्श सुन होण्यासाठी चोविसतास झटणं ह्या सगळ्यात अंगावर निघणारी बारीकसारीक दुखणी ती ही शक्यतो इथल्याच डॉक्टरकडून बरी करून घेणं.ह्या सगळ्यात महिना कुठे हरवून जायचा तिचं तिलाच कळत नव्हतं आणि मग इथून उडण्याचे दिवस जवळ यायचे,..घरभर पसरलेला संसार परत दोन बॅगामध्ये बसवताना त्याची आणि तिची दमछाक व्हायची,..खरंतर सगळं मिळते ग तिकडे अगदी गायीच्या शेणाच्या गौऱ्या देखील मिळतात पण इथे रुपयाची वस्तू तिथे दोनशे रूपायला घेताना भारतीय मानसिकता म्हण नाहीतर माझ्यातली संसारी बायको म्हण जागी होतेच हे सांगताना ती पुढे म्हणते,”पण हा असतो ना अगदी कट्टर नवरा,..हे कशाला घेतलं ?ह्यानी वजन वाढेल सामानाचं असं म्हणत अर्धी बॅग परत घरीच रिकामी करतो,..बाजूला बसलेली आई एकदोन गोष्टीवर जरा हिरमुसते आणि म्हणते,” अरे ते मेतकूट तुला आवडतं म्हणून खास करून दिलंय आणि लोणचं पण,..”
त्यावर तो म्हणतो,”आई ते लोणचं जर तेल पसरवत बसल तर तुला कळतंय का काय भाव जाईल,..? काही नको आणि हल्ली गरम भात मेतकूट खायला वेळ नसतो ग माय माझी ,म्हणत मेतकूटची पुरचुंडी हिरमुसली होऊन तिथेच सोफ्याच्या कोपऱ्यात पडते कारण ती उचलायला देखील वेळ नसतो,..”
सातचं फ्लाईट आहे आपल्याला चार वाजताच निघायचं आहे घरातून त्याच्या सूचना आईच्या डोळ्यातलं तळ भरून आणतात ती सुरकूतल्या हातांनी भोवताली माकडचाळे करत उडया मारणाऱ्या नातवाला जवळ ओढून घट्ट मिठी मारून पापे घेते,..नातू आता आजीची मजा घेत असतो,..”गंगा,जमुना डोळ्यात उभ्या..आजीच्या..”त्याच्या गाण्यावर ती अश्रू पुसत कसनुषी हसते,.. समजदार नात मात्र आजीला हातात हात घेऊन म्हणते,” येतोच ग पुढच्यावर्षी..”
तो मात्र आजी नातीचे प्रेम पाहात त्यालाही आलेला कढ दाबत म्हणतो,”चला रडापडी नको आता आवरा लवकर आणि त्या एअरपोर्ट वरही रडायचं नाही हं…. ती तर ह्या सगळ्यात कुठेच नसते आणि असतेही,….मध्ये दोन दिवसच राहून आलेलं माहेर तिच्या डोळ्यासमोर तरळत असते,..सकाळी केलेल्या दोन तरी खव्याच्या पोळ्या बाबांना देऊन याव्या पटकन आणि परत एकदा निरोप घ्यावा असं वाटून ती एवढ्या गडबडीत नवऱ्याला पटवतेच,..”मी अगदी उभ्या उभ्या निघेल रे,..फक्त पाच मिनिटं चल, आहेत एकाच गावात म्हणून म्हणते परत दिसत नाहीत रे वर्षभर..प्लिज.”
मग गाडीला एक किक की तिच धावतपळत जाणं डबा आईच्या हातात देत,..”आता बसत नाही निघायचं आहे ग चारला,..उद्या करेल निवांत फोन..बाबा येते म्हणते तेंव्हा बाबा उगाचच डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून,..टिव्हीकडे बघत हो कळव पोहचली की एवढंच बोलतो,..ती ही मग गुंतत नाही आई वडील कसे थकत चालेल हे डोळ्यात गच्च भरून घेते,..मनोमन माहेरच्या देवघराकडे बघून मागणं मागते असच ठेव माझं माहेर येतेच पुढच्यावर्षी,..लहानपणापासून तिला बघणारा बाप्पा हळूच त्याची सोंड तिच्या डोक्यावरून फिरवतो,..ती मागे वळून न बघता,..धावत सुटते खाली तो निघण्याच्याच बेतात कारण आता दोघांनाही डोळ्यासमोर दिसत असतं फक्त एअरपोर्ट,..
बॅगा गाडीत जातात,..काढून टाकलेल्या वस्तू हिरमुसुन त्या बॅगेतल्या वस्तूंचा निरोप घेतात,..वर्षभर आता कपाटात अडकणारे खेळणे,गाड्या,सायकल सगळेच डोळे पुसत असल्यासारखे जाणवतात कारण सगळ्यांना जीवंतपणा हे लेकरू वर्षभराने आल्यानंतरच येणार असतो,..ते सगळं तसंच सोडून गाडी सुसाट निघते..
झगमगणार एअरपोर्ट सगळीकडे कुटुंबच कुटुंब कुठे दोघांचं एकाला एक सोडायला आलेलं तर कुठे चौघा पाच जणांचं,.. सगळे एकमेकाना निरोप द्यायला आलेले,..तो धावत पळत येतो,” चला लवकर आत जावं लागेल..वळून म्हणतो आई नेहमीसारख काचेच्या पलीकडून मी तुला हात करेल मग तू जा..”इतकावेळ उगाच हसू चेहऱ्यावर आणून फिरणारी आई खळकन रडते,..नातवंड,सुन ह्यांना जवळ घेते,..नातू परत गाणं म्हणतो,”गंगा,जमुना डोळ्यात उभ्या का..?”तो मात्र लगेच म्हणतो आई, “आता नवीन का आहे आमचं असं जाणं उगाच रडारडी नको ग..चल डोळे पूस लोक बघताहेत…त्याच्या वाक्यावर मात्र ती चिडून म्हणते,”लोक बघतात म्हणून रडायचं नाही का?अरे भावना आहेत त्या..”एवढ्यावेळ त्याच ऐकणारी बायको आता डोळ्यांनी त्याला दटावते..तो आईला जवळ घेतो….तेवढ्यात एक घोळका अगदी ग्रामीण भागातला शेजारून जातो..समोर एक हार घातलेली मुलगी अगदी आत्मविश्वासाने चालत असते..आणि ही ग्राममंडळी तिला ह्या झगमगणाऱ्या एअरपोर्टवर सोडवायला आलेली असतात….सगळ्यात मागे नऊवारीवर असणारी बाई..,लेक काचेच्या दरवाज्याकडे जाताच हंबरडा फोडते आणि सगळं एअरपोर्ट त्या अजागळपणावर त्या बाईकडे बघत तेंव्हा ती हार घातलेली मुलगी धावत येऊन आईच्या गळ्यात पडते म्हणते,”माय तुला म्हंटल होत ना एअरपोर्टवर रडू नकोस,..”त्यावर माय म्हणते,”ते विमान तुला दूर घेऊन जाईल नवं आयुष्य दाखवायला तू तिकडे रमशील ग पण रोज आकाशातलं विमान तुझी आठवण देईल तेंव्हा माझे अश्रू दिसणार नाहीत तुला ते ह्या एअरपोर्टवरच बघून घे की लोक नाव ठेवतील म्हणून काय रडू नको का मी,..मला तर रडू येणारच आणि मी रडणारच आपलं माणूस दूर जातंय हे ह्या एअरपोर्टवरून इथं शिष्टपणा करत अश्रू दाबायचे कशाला,..खोटे नाटकी मुखवटे आणायचे कशाला..?हे प्रेमच आहे ग माय म्हणत दोघी मायलेकी गळ्यात पडून रडतात,..हे सगळं बघण्यात रमलेल्या सासूबाईंना आता काचेच्या पलीकडून उडया मारत हात दाखवणारा नातू दिसतो,..त्यांचेही डोळे इतके गच्च भरून येतात की त्यात सगळं एअरपोर्ट धूसर होतं.., स्पष्ट दिसते फक्त ती नऊवारीवाली मनसोक्तपणे रडणारी बाई…

वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..पुस्तकांसाठी @9822875780 सम्पर्क करा.

©स्वप्ना मुळे(मायी)
छ. संभाजीनगर
कथाविश्व – आपले कथांचे अनोखे विश्व 🎉

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}