शारदीय नवरात्रोत्सव माता कात्यायनी लेखन : सौ. अनघा वैद्य
शारदीय नवरात्रोत्सव माता सिद्धिदात्री लेखन : सौ. अनघा वैद्य
दिवस नववा – माता सिद्धिदात्री
शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रातही देवीचे पूजन केले जाते. मात्र, दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि विशेष कृपादृष्टी लाभण्यासाठी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात करण्यात येणारे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रुपांचे पूजन केले जाते. देवीच्या प्रत्येक स्वरुपाचे महत्त्व, मान्यता अगदी विशेष आणि वेगळ्या आहेत. भागवत पुराण, दुर्गा सप्तशती यांमध्ये देवीच्या या स्वरुपांविषयी माहिती देण्यात आली.
नवरात्रात महानवमी तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे. नवरात्रातील नववी माळ दुर्गा देवीचे नववे स्वरुप असलेल्या सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे. चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातांमध्ये कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता आहे.
नवव्या दिवशी देवीला ऋतुकालोद्भव फळे, साखर-फुटाणे, पुरी, काळे चणे, खीर आणि श्रीफळ अर्पण करावे, असे सांगितले जाते.
देव, यक्ष, किन्नर, दानव, ऋषि-मुनी, साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात. देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते.
या देवी सर्वभूतेषु मां सिद्धिदात्री रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
अर्थ : हे देवी आई ! सर्वत्र विराजित आणि देवी सिद्धिदात्रीच्या रुपात प्रसिद्ध अंबे, तुला माझा वारंवार नमस्कार. हे आई, मला तुझ्या कृपेचा पात्र बनू दे.
या दिवशी शास्त्रीय विधीपूर्वक आणि पूर्ण निष्ठेने साधना करणार्या साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. सृष्टीत त्यासाठी काहीही अगम्य राहत नाही. त्या भक्तांवर ब्रह्मांडावर पूर्ण विजय प्राप्त करण्याचे सामर्थ्य येतं.
मार्कण्डेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व- या आठ सिद्धी आहेत. ब्रह्मवैवर्तपुराणाच्या श्रीकृष्ण जन्म खंडात ही संख्या १८ सांगण्यात आली आहे.
त्या पुढीलप्रमाणे – १. अणिमा २. लघिमा ३. प्राप्ती ४. प्राकाम्य ५. महिमा ६. ईशित्व, वाशित्व ७. सर्वकामावसायिता ८. सर्वज्ञत्व ९. दूरश्रवण १०. परकायप्रवेशन ११. वाक्सिद्धी १२. कल्पवृक्षत्व १३. सृष्टी १४. संहारकरण सामर्थ्य १५. अमरत्व १६. सर्वन्यायकत्व १७. भावना १८. सिद्धी
माँ सिद्धिदात्री ही भक्तांना आणि साधकांना सर्व सिद्धी प्रदान करण्यास समर्थ आहे. देवी पुराणानुसार भगवान शिव यांना त्यांच्या कृपेनेच या सिद्धी मिळाल्या होत्या. त्यांच्या कृपेने भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे झाले. या कारणास्तव ते लोकांमध्ये ‘अर्धनारीश्वर’ या नावाने प्रसिद्ध झाले.
माँ सिद्धिदात्रीचे चार हात आहेत. देवीचे वाहन सिंह आहे. देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. त्याच्या खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे. माँ सिद्धिदात्रीची कृपा मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्याच्या कृपेने अनंत दु:खाच्या रूपाने जगापासून अलिप्त राहून, सर्व सुखांचा उपभोग घेऊन भक्त मोक्ष प्राप्त करू शकतो.
नवदुर्गांमध्ये माँ सिद्धिदात्री शेवटची आहे. इतर आठ दुर्गांची शास्त्रीय रीतिरिवाजानुसार पूजा करून, दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी भक्त त्यांच्या पूजेत गुंततात. या सिद्धिदात्री मातेची आराधना केल्यानंतर भक्तांच्या आणि साधकांच्या सर्व प्रकारच्या ऐहिक, दिव्य इच्छा पूर्ण होतात.
आधुनिक स्त्री जरी सिद्धी देणारी नसली तरी तिच्या सिद्ध हस्ताने ती नेहमीच सगळ्यांना काहीं ना काही देत असते. पोटभर, मनभरून चांगले – चुंगले खायला देत असते. मुलाबाळांना, नवऱ्याला माया देत असते, सासू सासाऱ्यांना आदराची जागा देत असते, प्रसंगी लग्न झाल्यावर देखील आई – वडिलांना आधार देत असते. नोकरी – व्यवसायात देखील येन केन मार्गाने तिचे सहकार्यांप्रति, कर्मचाऱ्यांप्रति हे दातृत्व चालूच असते. मुलांना चांगले संस्कार देणे हे तर तिचे अविरत पणे चालूच असते.
ज्याप्रमाणे सिद्धीदात्री देवीने प्रकुपिता ब्रह्मा ना सृष्टी निर्माण करायला सांगितले, भगवान विष्णू ना ती व्यवस्थित कार्य करतेय ना ह्यावर लक्ष ठेवायला सांगितले आणि महादेवांना दुष्ट प्रवृत्तीच्या विनाशाची जबाबदारी घ्यायला सांगितले.
त्याप्रमाणेच स्त्री ही एक उत्तम नियोजन करणारी असते.. एक उत्कृष्ट व्यवस्थापक असते.
जशी व्यवसायात ती Employees KRA – Key Responsibilities ठरवून देते, त्याप्रमाणे काम होतेय की नाही हे बघते. तसेच ती घरातही कुटुंबाचे KRA ठरवून देते. जबाबदाऱ्या वाटून देते. स्वतः काय करायचे, नवऱ्याने काय करायचे, मुलांनी कोणती कामे वाटून घ्यायची हे कुशलतेने ठरवते, आणि त्यांना त्याचे महत्व पटवून देऊन, कामे करूनही घेते.
घरातील प्रत्येक कार्य, ते कितीही लहान असो किंवा मोठे असो, सणवार – उत्सव असोत, महिला सगळ्याचे यथासांग – व्यवस्थित नियोजन करून ते पार पाडते.
प्रत्येक स्त्री मधील सिद्धिदात्री ला मनापासून प्रणाम !
माता सिद्धिदात्री बीजमंत्र – ह्रीं क्लीं ऐं सिद्धये नम:.
माता सिद्धिदात्रीचे उत्तर प्रदेशात माधोपूर जवळील शूलटणकेश्वर येथे मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.
संकलन – सौ. अनघा वैद्य.