मनोरंजन

निरांजन ©मुग्धा जोशी.

निरांजन

-मुग्धा जोशी

मी मिनू,

कोपऱ्यातली पणती मंद तेवत होती…. सासूला जाऊन ९ दिवस झाले…. घरावर अजूनही दुःखाचे सावट पसरले होते… बाहेर पाऊस कोसळत होता आणि मनातून मी… दोन्हीकडे काळोखी आणि विचित्र रिकामपण साचून होते….
सासू आणि नवरा डॉक्टर, अशा घराने माझ्या सारख्या जेमतेम शिकलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारावे हे जरा समजायला अवघडच गेले होते सगळ्यांना… अगदी माझ्या घरच्यांना सुद्धा… माप ओलंडून घरात आले आणि कधी साखरे सारखी विरघळून गेली ही कळले सुद्धा नाही….
घरात २-२ डॉक्टर म्हटल्यावर मला माझ्या शिक्षणाची लाजच वाटायची.. पण सासूबाईंनी आणि नवऱ्याने मात्र तसे कधीही भासवले नाही… “ह्या घरची आणि पर्यायाने आमची आता आई आहेस तू, ह्या घरात कधी काय करायचंय हे तू ठरव आम्ही फक्त १२ व्या स्थानावराचे खेळाडू असू…” असे सांगून आश्वस्थ केले मला… ना जेवणात दोघांची तक्रार ना बाकी कशात….एकंदर संसार टूकीने चालू होता…
एक मात्र होते, सासूबाई कितीही घाईत आणि कामात असल्या तरी रोज संध्याकाळी एक कॉल करून “निरांजन लावले ना ग? ” हा प्रश्न करायच्या? सुरुवाती सुरुवातीला काही वाटले नाही, पण नंतर नंतर मात्र चीड यायला लागली… ‘रोज काय तेच विचारायचं?.. एकदा सांगून राहील की माझ्या लक्षात… किंवा नाही लावलं एखाद्या दिवशी निरांजन तर काय होणारे?’ असे विचार मनात यायचे, अर्थात मी कधी ओठाबाहेर नाही येवू दिले … कारण सगळं छान असताना ह्याची ती काय तक्रार करायची असे स्वतःलाच समजावयाचे…
एक दिवस सकाळी ७ वाजले तरी सासूबाई का उठल्या नाहीत हे पाहायला त्यांच्या रूम मध्ये गेलेली मी, त्या शांतपणे झोपलेल्या पाहून काहीशी घाबरले… तातडीने नवऱ्याला बोलावून आणले तेव्हा रात्रीत केव्हातरी झोपेतच गेल्या असे कळले….
नातेवाईक, ओळखीचे, हॉस्पिटल, अशा सगळ्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना निरोप दिल्यावर घरात उरले ते फक्त मी आणि आठवणी….
दुःख कितीही मोठे असले तरी डॉक्टर ह्या नात्याने ह्यांना घरी बसणे शक्य नव्हते, त्यामुळे तिसऱ्या दिवसापासून त्यांचे रूटीन चालू झाले. दिवस कार्य करायचेच नव्हते… मी मात्र माझ्या समाधानासाठी कोपऱ्यात पणती लावली होती….
विचारात किती वेळ गेला कोणास ठावूक, पण सलग वाजणाऱ्या बेल मुळे भानावर आले.. दरवाजा उघडला तर हे आलेले…
“तब्येत बरी आहे ना? इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला? आणि घरात असा काळोख का आहे?” प्रश्नाची सरबत्ती करतच हे आत आले…
“सगळं ठीक आहे. तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा ठेवते.”
जेवणाची वेळ झालीच होती म्हणून चहा सोबतच एका बाजूला जेवणाची तयारी सुरू केली. आता पटकन होईल म्हणून खिचडी टाकूयात…. ‘खिचडी’ म्हणताच पुन्हा सासूबाई आठवल्या…. आठवड्यातून दोनदा तरी त्या मला खिचडी कर म्हणायच्या… पुन्हा डोळे भरून आले…
“मिनू चहा आणतेस ना?” ह्या आवाजासरशी स्वतःला सावरत चहा घेवून बाहेर गेले… पण माझा एकूण अवतार पाहून ते म्हणाले, “अगं पुरे आता… तू स्वतःची अशी अवस्था करून घेणे आईला पण आवडणार नाही… ती नेहेमी तुला म्हणायची ना की आनंदी रहा…. ती ही सुखा समाधानात आणि काही त्रास न होता गेलीय… हा आता अशी एक्झीट मनाला चटका लावून गेली तिची पण ह्यावर आपला कंट्रोल नाही ना.”
त्यांचेही डोळे भरून आले आई च्या आठवणीने… डोळे पुसून बोलणे सुरू ठेवत म्हणाले,
“आई सांगायची तिचे लग्न झाले तेव्हा सासर माहेरची परिस्थिती ही सारखीच, म्हणजे जेमतेम होती. तिच्या वडिलांनी तिला दहावी पर्यंत शिकवले आणि पुढे लग्न लावून दिले..
इकडे घरी बाबा आणि आजी… तत्कालीन परिस्थितीनुसार आहे ह्यात संसार करणे हेच बाईचे आद्यकर्तव्य.. तो काळच असा होता की ‘चूल आणि मूल’ यापलीकडे बाईने काही करणं म्हणजे असंस्कृत पणा मानला जाई….
एकदा कुठलासा पेपर आला घरी.. आई अगदी मन लावून वाचत होती… तेवढ्यात आजी माजघरात आली नी आईला वाचताना पाहिले…. आईला काही न बोलता माघारी फिरली….
रात्री जेवायला बसले तेव्हा आजीने बाबांना प्रश्न केला, “तुस ठावूक आहे का की तुझी बायको शिकलेली आहे ते?”
बाबांनी आईकडे पाहिले, आई थरथर कापत होती..
“ते… मी.. पेपर…” भीतीने आईच्या तोंडून शब्द फुटत नव्हता… हा विषय इथेच थांबला.
एक दिवस अचानक तालुक्याहून परत येताना बाबांचा अपघात झाला आणि सगळे होत्याचे नव्हते… सोबत म्हातारी सासू, पदरात ४ वर्षाचा मी, ना डोक्यावर हक्काचे छप्पर ना हातात पैसा…
दुःखाचे दहा दिवस सरल्यावर सगळ्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली… पोटापाण्यासाठी काहीतरी करणे भाग होते…
एक दिवस हिम्मत करून आईने आजीला पुण्यात जाण्याबाबत विचारले. आजीने संमती देताच सगळे गुंडाळून आम्ही पुण्यात आलो. आईच्या वडिलांच्या ओळखीने एका दवाखान्यात नोकरी धरली आणि त्या डॉक्टर च्या ओळखीने खोलीही मिळाली.. मी आणि आजी दिवसभर घरीच असायचो.
दिवस तसे बरे चालले होते. संसाराला हातभार म्हणून आजी वाती करून विकायची. लवकरच माझेही सरकारी शाळेत नाव नोंदवले.
एक दिवस आजीने आईला पुढील शिक्षणासाठी विचारले, पण आहे त्या पगारात आणि वेळेत काही करता येणे शक्य नव्हते आईला. पण आजीने हट्ट धरला की ‘तू ही डॉक्टर हो…..’
नशिबाने आई ज्या दवाखान्यात काम करायची ती माणसं भली होती. सध्या कामात थोडी कपात आणि शिकण्यासाठी पैसे अशा दोन्ही बाजूंनी त्यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली, अर्थात नंतर आई तिथेच काम करेल ही अट सुद्धा…
आता सकाळी कॉलेज, मग दवाखाना आणि रात्री अभ्यास असे आईचे चक्र चालू झाले… आजीने एकहाती मला आणि घराला सांभाळले. दरम्यान जवळच्या मंदिरात आजीला सकाळ संध्याकाळ धूप दीप करण्याचं काम मिळालं.
दोन वर्षे गेली… आई ची प्रगती उत्तम होती, पण सततच्या ताणामुळे तिच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत होती. सततच्या आजारपणाने बेजार झाली होती. खरंतर औषधाबरोबरच ताकद परत येण्यासाठी पौष्टिक आहार सुद्धा गरजेचा होता. पण तेव्हा आमचीच हातातोंडाची जेमतेम गाठ पडत होती तिथे हे चोचले पुरवणे शक्य नव्हते.
पण कुठून कोण जाणे, आजीने व्यवस्था केली आणि तुपावर परतलेली तांदूळ मुगाची खिचडी आईसाठी बनवू लागली. सगळ्याचा एकत्रित परिणाम आणि आईची इच्छाशक्ती ह्याने परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली…
पण एक घात झाला… ज्या मंदिरात आजी दिवा लावायला जायची त्या यजमानांनी आजीवर चोरीचा आळ घेतला.. चोरी सुद्धा कसली, तर निरंजनासाठी ठेवलेल्या तुपाची.. समोरचा माणूस वाट्टेल ते बोलला आणि आजीने खालमानेने सगळे ऐकून घेतले…
आई त्यावेळेस दवाखान्यात होती, तिला जाऊन कोणीतरी कळवले.. आई धावत आली.. मंदिराच्या ओसरीवर आजी उभी होती आणि तिला धरून मी.. आई आमच्या समोर उभी राहिली… “बोललात तेवढे पुष्कळ झाले.. निदान त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा होतात.. तुमचे तुपाचे किती पैसे झालेत ते सांगा, १ महिन्याच्या आत मिळून जातील तुम्हाला… खबरदार त्या माऊलीला आता तुम्ही काही बोलाल तर…”
आम्ही तिघेही घरी आलो. आजी झाल्या अपमानाने नुसती थरथरत होती… तिला बसवून आईने खिचडी रांधली… इच्छा कोणाचीच नव्हती पण दोन दोन घास घशाखाली ढकलून आम्ही तो दिवस संपवला… खूप मोठा ओरखडा होता सगळ्यांच्या मनावर..
आणि मग एक दिवस आला.. माझी आई डॉक्टर झाली. त्या दिवशी तिने आजीच्या मांडीवर डोके ठेवून मनसोक्त रडून घेतले.. आजीनेही काही न बोलता तिला मोकळे होवू दिले…
हळूहळू परिस्थिती सुधारली. पैशाचे ऋण उतरले तर काही ऋण मनात जपून ठेवले. तुला सांगतो मिनू, ज्या दिवशी आईने कर्जाचा शेवटचा रुपया चुकवला ना त्या दिवशी तिने घरात निरांजन लावायला सुरुवात केली… आजी असेपर्यंत आजीच्याच हाताने लावून घेतले… जणू रोजच्या निरांजनाच्या प्रकाशात झालेल्या अपमानाचा काळोख हळूहळू नाहीसा होत होता…
दिवस मग भराभर पालटले, आई ज्या दवाखान्यात काम करायची तेच आम्ही खरेदी करू एवढी नशिबाने साथ दिली…पुढे मीही डॉक्टर झालो आणि आपल्या इथेच काम करू लागलो…”
आठवणीचा पुर ओसरला आणि आकाश निरभ्र झाले… बाहेरचे आणि माझ्या आतलेही… जेवायची तयारी घ्यायला मी उठून आत आले… सगळ्यात आधी देवाजवळ निरांजन लावले आणि आता जीवात जीव असेपर्यंत ते रोज लावणार होते… त्या निरांजनाच्या प्रकाशात माझा संसार सुखाचा असणार होता…. नव्हे अशी खात्रीच पटली माझी….
जेवायला बसताना खिचडी पाहून हे हलकेसे हसले… आणि मी समाधानाने…

©मुग्धा जोशी.
🎉✨

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}