शारदीय नवरात्रोत्सव विजयादशमी / दसरा / दशहरा लेखन : सौ. अनघा वैद्य
दहावा दिवस – विजयादशमी / दसरा / दशहरा
विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारत आणि नेपाळच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्य आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये , विजयादशमी ही माता दुर्गापूजेची समाप्ती दर्शवते , देवी दुर्गाने महिषासुरावर धर्माची पुनर्स्थापना आणि संरक्षण करण्यासाठी केलेल्या विजयाचे स्मरण म्हणून केले जाते. उत्तरेकडील, मध्य आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये, हे रामलीला समाप्तीचे चिन्हांकित करते आणि देवता रामाच्या रावणावरील विजयाचे स्मरण करते.
विजयादशमीच्या उत्सवात नदी किंवा समुद्राच्या समोर मिरवणुकीचा समावेश होतो ज्यात दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मातीच्या मूर्ती घेऊन संगीत आणि मंत्रोच्चारांचा समावेश असतो, त्यानंतर प्रतिमा पाण्यात विसर्जित केल्या जातात. इतर ठिकाणी, वाईटाचे प्रतीक असलेले रावणाचे भव्य पुतळे, फटाक्यांसह जाळले जातात आणि वाईटाचा नाश करतात. विजयादशमीनंतर वीस दिवसांनी साजरा होणाऱ्या दिव्यांचा महत्त्वाचा सण दिवाळीची तयारीही या सणापासून सुरू होते.
नवरात्रीची सांगता ही दसऱ्याने होते. विजयादशमी म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतिक म्हटला जातो. अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करुन सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे, असे मानले जाते. तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या आयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात त्यामुळे या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. दसऱ्याला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पाने दिली जातात.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दसरा. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचे रुप धारण करुन महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते.
पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच विजयादशमीचा दिवस.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. म्हणून बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत.
क्षत्रीय लोकांप्रमाणे ब्राह्मण लोक देखील दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत.
दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गादेवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता आणि भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीरामाची योग्य प्रकारे पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते.
दसऱ्याच्या दिवशी खंड्या पक्ष्याचे दर्शन होणे अत्यंत शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी कुठेतरी खंड्या पक्षी दिसला तर तुमची कामे नक्कीच पूर्ण होतील, अशी श्रद्धा आहे. तसेच, दसऱ्याच्या आधी आपल्याकडे खंडे नवमीही साजरी केली जाते. खंड्या पक्षी म्हणजे किंगफिशर पक्षी.
दसऱ्याच्या दिवशी गोकर्णाच्या वेलीची पूजा केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते.
नेपाळमध्ये नवरात्रीला दशाई म्हणतात, विजयादशमी दशाईच्या सणानंतर येते. म्हणजे भारताप्रमाणेच. तरुण त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांना भेटतात, दूरचे लोक त्यांच्या मूळ घरी येतात, विद्यार्थी त्यांच्या शाळेतील शिक्षकांना भेटतात आणि सरकारी कर्मचारी राज्याच्या प्रमुखांना भेट देतात. वडिल आणि शिक्षक तरुणांचे स्वागत करतात आणि त्यांना पुढील वर्षात चांगले यश आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देतात. वडिल या वेळी आशीर्वादासह लहान नातेवाईकांना “दक्षिणा” किंवा थोडे पैसे देतात. शुक्ल पक्ष ते पौर्णिमा असे १५ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. लाल टिळा हे दुर्गा देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. लाल रंग रक्ताचे प्रतीक आहे जे कुटुंबाला एकत्र बांधते.
संकलन – सौ. अनघा वैद्य.