भागवत पुराण — आज पासून दर आठवड्याला सात श्लोक आणि त्याचा अर्थ असा उपक्रम
याचे सदारकर्ते श्री राजेश सहस्त्रबुद्धे हे आहेत
ॐ नमो भगवते वासुदेवाय
जन्माद्यस्य यत:अन्वयात्इतरत:च अर्थेषुअभिज्ञ: स्वराट् तेने ब्रह्म हृदा य आदिकवये मुह्यन्ती यत्सुरय: |
तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गोsमृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि ||१||
अर्थात:
हे प्रभू वासुदेवनंदन श्रीकृष्णा,मी तुम्हाला सादर प्रणाम करतो मी सदैव तुमचे ध्यान करतो,कारण तुम्हीच परम सत्य आहात तसेच ह्या सृष्ट ब्रह्मांडाच्या उत्पत्ती,स्थिती,लयाचे कारण आहात. तुम्हीच संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहात, तुमच्या पलीकडे कुठलेही कारण नाही. तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्हीच आदिजीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले. तुमच्यामुळेच देवता आणि ऋषीमुनी अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा आभास व्हावा त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात. तुमच्यामुळेच प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात.तुम्ही भौतिक जगाच्या मायिक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्यधमात शाश्वत स्थितीत विराजमान आहात.
धर्म: प्रोज्झितकैवोsत्र परमो निर्मत्सराणाँ सतां
वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद् भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वर: सद्यो हृद्यवरुध्यतेsत्र कृतिभि: शुश्रूषुभिस्तत्क्षणात् ||२||
अर्थात
भौतिक हेतूने प्रेरित असलेल्या सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यांना पूर्णपणे नाकारून येथे हे जे भागवत पुराण आहे ते आपल्याला परम सत्याचे प्रतिपादन करते आणि केवळ आणि केवळ विशुद्ध हृदयाच्या भक्तांनाच ते गमक माहिती आहे. परम सत्य जे आहे ते लोकहितार्थ मायेपासून वेगळे केलं गेलेल वास्तव आहे, हेच सत्य आपल्यातील त्रितापांचे निर्मूलन करते आणि म्हणून महर्षी व्यासांद्वारे रचित सुंदर अस भागवत पुराण हे भगवत्-साक्षात्कारासाठी परिपूर्ण आहे. हे असलं की मग इतर शास्त्रांची आवश्यकता आपल्याला रहातच नाही. भागवताचा संदेश जो मनुष्य धार्मिक आहे त्याने जर तत्परतेने आणि एकाग्रतेने श्रवण केला तर ह्या ज्ञानाच्या संवर्धनाने प्रभू श्रीकृष्ण त्याच्या हृदयात त्याक्षणीच सथापीत होतात.
निगमकल्पतरोर्गलितं फलं
शुकमुखादमृतद्रवसंयुतम् |
पिबत भागवतं रसमलायं
मुहुरहो रसिका भुवि भावुका: ||३||
अर्थात,
पूर्वीच्या दोन श्लोकात आपण जाणलं की भागवत हे उदात्त वाड्•मय आहे आणि ते स्वतःचा दिव्य गुणांमुळे इतर अनेक वाड्•मयांत श्रेष्ठ आहे. सर्व लौकिक कर्मे आणि लौकिक ज्ञान यांच्यापेक्षा ते उच्चतर आहे. या श्लोकात असे म्हणले आहे की भागवत हे सर्व वाड्•मयांचे परिपक्व फळ आहे, भागवत हे सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे. ह्या सर्वाचा विचार करून ह्याचे शांतपणे आणि नम्रतापूर्वक श्रवण करणे फार महत्वाचे आहे. समस्त मानवजातीने मोठ्या आदराने आणि एकचित्ताने भागवताच्या संदेशाचे श्रवण करावे आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचा अंगिकार करावा.हे श्री शुकदेव गोस्वामींच्या अदरातून निघालेले अमृत आहे आणि हे फळ आता अधिकच रुचकर झालेले आहे.
नैमिषेSनिमिषक्षेत्रे ऋषय: शौनकादय: |
सत्रं स्वर्गायलोकाय सहस्त्रसममासत ||४||
अर्थात:
वायविय तंत्रात असे म्हणले आहे की या विश्वाचे शिल्पकार ब्रह्मदेव यांनी संपूर्ण विश्वाला आवृत्त करू शकेल अशा एका महान चक्राचे चिंतन केले. या महान चक्राची नाभी हे नैमिषारण्य नामक ठिकाण आहे. वराहपुराणात नैमिषारण्याचा दुसरा एक उल्लेख आहे, त्यात म्हणले आहे की या ठिकाणी यज्ञ केल्यास राक्षसी वृत्तीच्या लोकांची शक्ती क्षीण होते, ह्याच कारणास्तव श्री शौनक ऋषींनी अशा प्रकारचा यज्ञ नैमिषारण्यात करण्याचे ठरविले.
सामान्यपणे थोर ऋषीमुनी जनकल्याणार्थ नेहेमीच उत्सुक असतात. त्याप्रमाणे शौनक ऋषींनी आमंत्रित केलेले सर्व ऋषीमुनी या यज्ञ समारंभाला एकत्र आले होते.
त एकदा तु मुनय: प्रातहु्तहुताग्नय: |
सत्कृतं सूतमासीनं पप्रच्छुरिदमादरात् ||५||
अर्थात:
प्रात:काल हा अध्यात्मिक चर्चेसाठी सर्वश्रेष्ठ असतो. त्या महर्षींनी,ज्याला ‘व्यासासन’ म्हणतात किंवा श्री व्यसदेव -पीठ म्हणतात असे उच्चासन आदरपूर्वक रीतीने भागवताच्या त्या प्रवक्त्याल दिले. श्री व्यासदेव हे सर्व मानवांचे मूळ अध्यात्मिक गुरू आहेत. इतर सर्व गुरूंना व्यासदेवांचे प्रतिनिधी समजतात. श्री व्यासदेवांनी श्रील शुकदेव गोस्वामींना शिक्षण दिले आणि सूत गोस्वामी यांनी श्रील शुकदेव गोस्वामींकडून भागवाताचे श्रवण केले.
ऋषय ऊचु:
त्वया खलुपुराणानि सेतिहासानि चानघ
आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत ||६||
अर्थात:
ऋषी म्हणाले हे आदरणीय सूत गोस्वामी तुम्ही पूर्णपणे निर्दोष व निष्पाप आहात, धार्मिक जीवनात प्रसिद्ध असलेल्या अशा सर्व धर्मग्रंथात तुम्ही पारंगत आहात, तसेच पुराणे आणि इतिहास यांतही तुम्ही पारंगत आहात. तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली त्यांचे अध्ययन केले आहे आणि त्यावर व्याख्यानही केले आहे.
गोस्वामी किंवा श्री व्यासदेवांचा जो प्रामाणिक प्रतिनिधी आहे त्याने सर्व प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त असले पाहिजे. कालियुगाचे मुख्य चार प्रकारचे दुर्गुण आहेत. १) स्त्रियांशी अवैध संबंध, २) पशुहत्या,३)व्यसन आणि ४) जुगार.
यानि वेदविदां श्रेष्ठो भगवान बादनारायण: |
अन्ये.च मुनय: सूत परावरविदो विदु: ||७||
अर्थात:
भागवत हे ब्रह्मसूत्र अथवा बादनारायणी वेदांतसूत्रावरील स्वाभाविक भाष्य आहे. येथें ‘स्वाभाविक भाष्य’ असे म्हणले आहे,कारण श्रील व्यासदेव हे वेदसाहित्याचे सार अशी जी वेदांत-सूत्रे व भागवत अशा दोन्हींचेही रचनाकार आहेत. श्रील व्यासदेवांच्या व्यतिरिक्त षड्दर्शनांचे गौतम,कणाद,पतंजली,जैमिनी,अष्टावक्र इत्यादी ऋषी आहेत. आस्तिकवाद पूर्णपणे वेदांत-सूत्रात स्पष्ट केलेला आहे आणि इतर ज्या मनोधर्मी दार्शनिक पद्धती आहेत त्यांत सर्व कारणांच्या मूळ कारणाचा जवळजवळ उल्लेखच नाही. श्रील सूत गोस्वामी योग्य अध्यापक होते, म्हणून नैमिषारण्यातील ऋषींनी त्यांना उच्चासनावर आरूढ केले.येथे श्रील व्यासदेवांना भगवान असे संभोधण्यात आले आहे,कारण ते आधुनिक शक्त्यावेश अवतार आहेत.
प्रेरणा श्री राजेश सहस्त्रबुद्धे यांची आहे