ट्रायपॉड – मकरंद कापरे 90490 56284
ट्रायपॉड –
“अशोक, बास करू या आता…मला भूक लागली आहे…दुसरी पंगत झाली…मी…सगळे आवरायला घेतो…या लोकांचे फोटो काढणे काही संपतच नाहीये..” दिनेश त्राग्याने म्हणाला. “काका, हा लास्ट फोटो ह..अजून दुसरा पण एक कार्यक्रम आहे…” अशोक म्हणाला. “माझे दिवा घेऊन…तीन चार फोटो काढाल का..फक्त पाच मिनिट…” वधू सुलभा म्हणाली. “प्लीज …लवकर आवरा…” अशोक म्हणाला. दिनेश ने बाकी लाइट्स चे ट्रायपॉड आणि दुसऱ्या कॅमेऱ्याचे ट्रायपॉड आवरून त्याच्या वेगवेगळ्या बॅगेत भरले, आणि तो तिसऱ्या पंगतीला जाऊन बसला. अशोक ने बाकी आवरून तो पण त्याच पंगतीला बसला. “हे लोक विचित्रच आहेत…काही संपयलाच तयार नाही यांचे…” अशोक म्हणाला. जेवण करून सामान पट पट गाडीत भरले आणि ते निघाले. घरी पोचल्यावर, सामान अशोक च्या घरी ठेवून दिनेश त्याच्या घरी निघाला. “संध्याकाळी, ५ ला ये रे…स्वप्नपूर्ती हॉल ला… ” अशोक म्हणाला. संध्याकाळी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता.
संध्याकाळच्या कार्यक्रमाची मांडणी त्यांनी चालू केली. “ओह… शीट..” अशोक म्हणाला. “सिल्व्हर ट्रायपॉड ची बॅग कुठे आहे…?” अशोक म्हणाला. “सगळे सामान आपण जसे पॅक केले तसेच तुझ्याकडे ठेवले होते…” दिनेश म्हणाला. “मग मी पण तसेच आणले आहे राजा…कुठे आहे मग..” अशोक म्हणाला. “सकाळच्या हॉल वर राहीले की काय…पण कसे शक्य आहे…” दिनेश म्हणाला. अशोक ने सकाळी ज्या हॉल वर कार्यक्रम होता त्यांना,” काका…मी अशोक जोशी बोलतोय…सकाळी…जो कार्यक्रम झाला त्याचा फोटो ग्राफर ”
” हा.. हा..बोला ना..” काका म्हणाले. “आमच्या एका कॅमेऱ्याचा ट्रायपॉड तुमच्या हॉल वर राहीला आहे जरा…चेक करून सांगता का?..” अशोक ने विचारले. “ट्रायपॉड? म्हणजे? ” काकांनी विचारले. “तीन पायाचा कॅमेरा ठेवायचा स्टँड असतो ना..तो हो काका…” “अच्छा, ओके..ओके…मी चेक करून सांगतो..” आणि फोन ठेवून दिला.
कार्यक्रमाचे फोटो सेशन उरकून ते घरी आले..घरी परत चेक केले पण ती बॅग काही नव्हती. “असू दे…मी सकाळी जातो हॉल वर त्या वानखेडे काकांना भेटतो..फोन पण नाही केला त्यांनी” अशोक म्हणाला. “ओके…मी येऊ का..” दिनेश ने विचारले. “नको मी जातो..स्टँड मिळाला की फोन करतो तुला”
दुसऱ्या दिवशी तो परत हॉल वर गेला. “काका नमस्कार…तुम्ही चेक केले का…सापडला का स्टँड..” अशोक ने विचारले. “नाही हो.. सगळा हॉल शोधला..पण कुठेच नाही हो सापडला…कसा होती बॅग नक्की..” त्यांनी विचारले. “काळ्या कलर ची बॅग होती… साधारण चार फूट लांब…” अशोक म्हणाला. “एवढा छोटा होता..” काकांनी विचारले
“नाही हो ..सहा फूट उंची होते त्याची.. ऍडजस्ट करता येते…” अशोक ने सांगितले. “कालचे यजमान होते ना मुलाचे वडील त्यांच्या पाहुण्यांना पाहिले मी, ते अशी बॅग घेऊन जाताना पाहिले मी…” काका म्हणाले. “ते कशाला घेऊन जातील…त्यांना विचारा ना…त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर..”अशोक म्हणाला.
काकांनी त्यांना फोन लावला. “नमस्कार, मी वानखेडे बोलतोय… काल तुमच्या बरोबर…ते पाहुणे होते ना… पांढरा शर्ट आणि ब्राऊन पँट घातलेले…त्यांचे नाव काय हो…” “गोसावी म्हणून आहेत…काय काम होते त्याच्याकडे…” काकांनी थोडक्यात सांगितले. “ठीक आहे…मोबाईल नंबर पाठवतो…बोलून घ्या त्यांच्याशी…”
थोड्याच वेळात मेसेज आला. त्या मोबाईल वर अशोक ने फोन केला, नंबर अस्तित्वात नाही असे येत होते. परत काकांनी फोन केला..”त्यांचा फोन लागत नाहीये…पत्ता सांगू शकाल का” आणि अशोक ने पत्ता लिहून घेतला. त्याची बाकी कामे करून तो संध्याकाळी पाच वाजता गोसावी साहेबांच्या घरी पोचला. बेल वाजवली. दार उघडले, “या…या..” खुद्द गोसावी साहेबांनी स्वागत केले. “बसा…” सोफ्याकडे हात करत त्यांनी इशारा केला. अशोक खुर्चीवर बसला, समोर पहातो तर काय..दहा बारा लोक त्याच्याकडे पहात होते. तीन चार लहान मुले…चार प्रौढ बायका, तीन पुरुष, दोन तरुण मुली.
“प्राजू पाणी दे ना पाहुण्यांना” गोसावी साहेब म्हणाले. “ही प्राजू विशाखा ची धाकटी बहीण” गोसावी म्हणाले. “विशाखा??” अशोक ने गोंधळात पडत कसेबसे विचारले “आवरणे चालू आहे, येईलच आता…हे विशाखा चे थोरले मामा…” गोसावी ओळख करून देत म्हणाले. ट्रायपॉड साठी एवढ्या ओळखी कशाला, अशोक संभ्रमात पडला. “आई बाबा नाही आले…” गोसावी म्हणाले. “नो प्रोब्लेम…त्यांना नंतर भेटता येईल…तुम्ही काय करता?” मामांनी विचारले. “मी प्रोफेशनल फोटोग्राफर आहे…” ते ऐकल्यावर विशाखा चा धाकटा भाऊ आई च्या कानात म्हणाला, “ती तर म्हणाली प्रोफेसर आहेत…” ” प्रोफेशनल फोटोग्राफर असे म्हणाली असेल…” मामा त्याचे वाक्य तोडत म्हणाले, त्यांची काय कुजबुज चालू आहे हे अशोक ला समजत नव्हते. “मी ॲक्च्युअली…ट्रायपॉड” अशोक म्हणाला. “असू द्या, नो प्रोब्लेम…घ्या पोहे घ्या…” मामा म्हणाले. इतक्यात पोहे पण आले. एव्हाना बघण्याचा कार्यक्रम आहे हे अशोक च्या लक्षात आले. जावू द्या, पोहे खाऊन घ्या…त्याने विचार केला. “किती तुमचे पॅकेज आहे…” मामांनी विचारले. “महिना अडीच लाख आहे साधारण…” अशोक म्हणाला. पोहे पण संपले होते, आता आपण इथून निघावे असा विचार त्याने केला. “मी थोडे अर्जंट काम आहे..जाऊन येऊ का…पाच मिनिटात…” अशोक म्हणाला. आणि समोरच्या दारातून विशाखा चहा घेऊन आली. तिने टीपोय वर चहाचा ट्रे ठेवला आणि समोर पाहिले. “तुम्ही?” ती दचकून ओरडत म्हणाली. मेक अप केल्यामुळे त्याला आधी ओळखता आले नाही मग नीट चेहरा पाहिल्यावर तो पण ओरडला, “तू..तुम्ही”. “तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरी यायची” विशाखा म्हणाली. “मी माझा ट्रायपॉड घ्यायला आलो होतो…मला बोलूच दिले नाही या लोकांनी” अशोक उभा रहात म्हणाला. “ट्रायपॉड…कसला ट्रायपॉड…” विशाखा म्हणाली. “काल लग्नाला आले होते ना काका…ते वानखेडे म्हणाले…गोसावी काका घेऊन गेले…आणि हा पत्ता दिला.” अशोक ने सांगितले. “बाबा..या माणसाला आधी घरा बाहेर काढा…परवा अपमान केला या माणसाने माझा बँकेत…” विशाखा म्हणाली. ” हे आजचे पाहुणे नाहीत का…” गोसावी म्हणाले. “नाही…यांचे नाव पण मला माहित नाही…” विशाखा म्हणाली. “तुम्हाला कुणाकडे जायचे होते” गोसावी काकांनी विचारले. “तुम्ही काल ज्या लग्नाला आला होतात ना…त्यांनी हा पत्ता दिला…माझा ट्रायपॉड …तुमच्याकडे आहे म्हणून” अशोक ने सांगितले. “मी काल कुठल्याच लग्नाला गेलो नव्हतो. शेजारच्या बिल्डिंग मध्ये प्रभाकर गोसावी म्हणून आहेत…त्यांच्याकडे जायचे होते बहुतेक तुम्हाला…काही हरकत नाही…दुसऱ्या मजल्यावर राहतात.” गोसावी काका म्हणाले. “मी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण हे तुमचे मामा नो प्रोब्लेम..नो प्रोब्लेम म्हणून पुढे बोलूच देत नव्हते…” विशाखा कडे पहात अशोक म्हणाला आणि तिथून निघाला. दार बंद होताच आतून जोरात हसण्याचा आवाज आला….
अशोक निघून गेल्यावर थोड्याच वेळात दुसरे नियोजित पाहुणे विशाखाला पहायला आले.
इकडे अशोक प्रभाकर गोसावी काकांकडे पोचला. दार उघडताच त्याने ओळख करून दिली. “मी अशोक जोशी, ट्रायपॉड घ्यायला आलोय”
“टीपोय ? या ना आत या…बसा…” खुर्चीवर बसल्यावर त्याने विचारले,” तुम्ही प्रभाकर गोसावी ना…?”
टेबलावर ठेवलेले श्रवणयंत्र कानाला लावत ते म्हणाले,” ह…बोला आता काय काम होते तुमचे…”
“तुम्ही प्रभाकर गोसावी ना…” अशोक ने विचारले. “हो मीच प्रभाकर गोसावी, तुमचे नाव आणि काय काम होते”
“मी अशोक जोशी, काल तुम्ही लग्नाला आला होतात ना, तिथे मी फोटोग्राफर होतो, माझा ट्रायपॉड तुमच्या कडे आला आहे असे कळले…म्हणून आलो आहे तो घ्यायला” अशोक ने एका दमात सगळे सांगितले. “नाही हो…मी चुकून दुसऱ्या कुणाची तरी छत्री घेऊन आलो, ट्रायपॉड तर मी कुणाचा नाही आणला” गोसावी काकांनी सांगितले.
“ठीक आहे, मी येतो…” अशोक उठून उभा रहात म्हणाला. “माझे एक काम कराल का प्लीज, माझा चार दिवसांपूर्वी सत्कार झाला…त्या संस्थेने मला साडे सात हजाराचा चेक दिला आहे…तो तुम्ही बँकेत भराल का…मला या पायाच्या दुखण्यामुळे कुठे जाता येत नाही…” गोसावी काका म्हणाले. “काका, उगीच माझ्याकडून कुठे गहाळ झाला तर प्रोब्लेम येईल…काही सांगता येत नाही…उगीच तुमचे नुकसान नको माझ्यामुळे…” अशोक म्हणाला.
“नाही होणार, तुम्ही माझ्याकडे आलात, यात स्वामींचे काहीतरी प्रयोजन आहे…तुम्ही भरा बँकेत मी तुम्हाला बँक डिटेल देतो…” समोरच्या स्वामींच्या फोटो कडे पहात ते म्हणाले. आता अशोक चा नाईलाज झाला. त्याने पासबुक च्या पहिल्या पानाचा फोटो काढला आणि चेक घेऊन तो निघाला. “चेक भरला की मी तुम्हाला फोन करतो, तुमचा मोबाईल चालू आहे ना…”
“हो माझा मोबाईल चालू आहे”
आणि त्यांचा निरोप घेऊन तो निघाला. सोमवारी सकाळी चेक बँकेत भरून त्याने फोन करून त्यांना सांगितले. संध्याकाळी भरत नाट्य मंदिर ला डान्स प्रोग्राम चे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग होते. पोहचल्यावर त्याने कार्यक्रमाचे पोस्टर वाचले. भरतनाट्यम चा कार्यक्रम होता आणि नृत्य करणाऱ्या तीन चार नावात एक नाव होते,” विशाखा गोसावी”
तीच तर नाही ना ही, अशोक मनात म्हणाला. आणि त्याची शंका खरी झाली पहिला डान्स तिचाच होता. डान्स करताना विशाखा आपल्याकडे रागाने पहात आहे असे उगीचच त्याला वाटत होते. छान डान्स करत होती विशाखा, दीड तासाच्या कार्यक्रमात तिचे वेग वेगळ्या फॉर्म मध्ये डान्स होते. प्रेक्षकांनी छान प्रतिसाद दिला. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गृप चे अजून काही फोटो अशोक ने काढले. सगळे आवरून झाले आणि अशोक तिथून निघायच्या बेतात होता. “तुम्ही मला मित्रमंडळ चौकात सोडाल का? ” विशाखा ने अशोक ला विचारले. अशोक तिला उत्तर द्यायला, मागे वळला तिचे ते डान्सर चे रुप पाहून काही क्षण तो तिच्याकडे पहात राहीला, एकदम परी सारखी दिसत होती ती. “मी हे..कोथरूड… ला जाणार आहे…”
“मग नाही जमणार का, ठीक आहे मी रिक्षा ने जाईन” विशाखा म्हणाली. “नाही…जमेल ना..तू यांना सोड मित्रमंडळ चौक ला… मी तो हॉल पाहून येतो…उद्याच्या कार्यक्रमाचा.. सोडेल तो नो प्रॉब्लेम…” दिनेश परीस्थिती चे गांभीर्य ओळखून म्हणाला. “ओके, मी आलेच ड्रेस बदलून” आणि विशाखा ड्रेस चेंज करायला गेली. “कोणता हॉल रे दुसरा?” अशोक ने विचारले. “वहिनी बरोबर तुला प्रायव्हसी मिळेल ना..म्हणून म्हटले” दिनेश म्हणाला. “वहिनी…डोकं फिरल का तुझ… काल तिचा बघण्याचा कार्यक्रम होता… ठरलेही असेल लग्न.. ” अशोक म्हणाला. “मला नाही वाटत, मग तुला कशाला म्हटली असती मला सोडता का?” दिनेश म्हणाला. “निघ तू, उगीच काही अंदाज लावू नकोस” सगळे सामान गाडीत ठेऊन दिनेश निघून गेला…जाताना गुड लक करून.
गाडीत बसल्यावर बराच वेळ अशोक काही बोलला नाही. “तुम्ही ड्रायव्हिंग करताना बोलत नाही का?” विशाखा ने विचारले. “अभिनंदन, लग्न ठरले असेल ना तुमचे काल?” अशोक ने विचारले. “तुम्हाला नाही आवडले का? माझे लग्न ठरले आहे ते”
“मला न आवडण्याच काय कारण?” अशोक म्हणाला. “तुमच्या बोलण्यावरून तसे वाटले…” विशाखा म्हणाली. “सॉरी, मी बँकेत तुमच्याशी तसे बोलायला नको होते, त्या क्लार्क ने खिडकी बंद केल्याचा राग मी तुमच्यावर काढला, माझे काम झालेच नाही त्या दिवशी” अशोक म्हणाला. “मला माहित नव्हते तुम्ही रांगेत आहात, मी आले आणि त्यामुळे तुमचे काम नाही झाले”
“ठीक आहे, नो प्रोब्लेम, मी दुसऱ्या काऊंटर वर गेलो होतो, त्याच कामासाठी काही डिटेल घ्यायचे होते” अशोक म्हणाला. “माझे लग्न नाही ठरले काल..तो आलेला मुलगा…घरच्यांना पसंद नाही…थोराड वाटत होता… वय पण जास्त आहे…” विशाखा म्हणाली. “पोहे छान होते काल केलेले, माझ्या आई च्या हाताची चव अशीच आहे” अशोक म्हणाला. “काल तुम्ही आल्या आल्या का नाही सांगितले, की तुम्ही ट्रायपॉड न्यायला आलाय ते अर्थात नसलेला” विशाखा म्हणाली. यावर दोघेही खूप हसले. “तुमचे मामा भारी आहेत…नो प्रोब्लेम…नो प्रोब्लेम…काही ऐकतच नव्हते” अशोक म्हणाला. “तुम्ही गेल्यावर सगळे इतके हसले…बाप रे” विशाखा म्हणाली.
“आता कधी तुमचा कार्यक्रम, परत?” “परत..कधी असेल माहीत नाही…का हो..”
“काही नाही त्या निमित्ताने भेट झाली असती तुमची” अशोक म्हणाला. “ओह…तुम्ही जर भेटायला बोलावले तर येईन मी चहा किंवा कॉफी साठी” विशाखा म्हणाली. “तेच विचारायचे होते मला…उद्या भेटायचे संध्याकाळी..” अशोक ने विचारले. संध्याकाळी अशोक खुश होता, दिनेश ला पण त्याने सांगितले, रात्री वानखेडे काकांचा फोन आला,”तुमचा ट्रायपॉड सापडला आहे, स्टेज खाली गेला होता…दुसऱ्या कार्यक्रमाची अरेंज मेंट करताना.
आणि लवकरच दुसऱ्या पण अधिकृत कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला, विशाखा आणि अशोक लवकरच विवाह बंधनात अडकले.