देश विदेश

सुनीता विलीयम्स आणि बुच विल्मोर

सुनीता विलीयम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतरीक्षयात्री अवकाशात अडकून आता जवळपास ९० दिवस होतील. ८ दिवसांसाठी गेलेले ही दोन लोकं आता ९० दिवस झाले तरी परत कधी येऊ शकतील किंवा येऊ तरी शकतील का याची खात्री नाही. काय मानसिकता असेल या दोघांची !

आपण विचारही करू शकणार नाही अश्या परिस्थितीत ते आहेत. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत आणि ते क्षणोक्षणी शारीरिक दृष्टया खंगत आहेत. त्यांच्या दृष्टीवर, हाडांवर, पचन संस्थेवर दूरगामी परिणाम होत आहेत. एकटेपणाची आणि परतीच्या प्रवासाची काहीही खात्री नसतानाही ते अजून तग धरून आहेत ते केवळ त्यांच्या मानसिक बळावर.

किती खंबीर असतील त्यांची मने ! किती स्थिर असेल त्यांची मानसिकता, किती दृढ असेल त्यांचा विश्वास, किती तल्लख असेल त्यांची विचारशक्ती आणि बुद्धी ! या सगळ्याची आपण कल्पनाही करू शकत नाही किंवा अंदाजही बांधू शकत नाही. हा असा प्रकार होऊ शकेल याची त्यांना जाणीव असणारच पण ते प्रत्यक्ष सोसण्याची तयारी असेल का ! की ते त्यांनी सहज स्वीकारलं असेल ! आपण सगळेही मृत्यू, क्षय अटळ आहे या भावनेतच सतत वावरत असतो. एखाद्या शास्त्रक्रियेपूर्वी आपणही काही बरे वाईट झाले तर ते स्वीकारू अशी हमी देतोच की पण आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे याची आपल्याला खात्री असते. ते घडण्याची शक्यता तुलनेने कमी असते आणि असा अंत आपल्या समोर नसतो. निदान आपण जमिनीशी जोडलेले तरी असतो आणि तो आधार इतर सर्व आधारांपेक्षा जास्तं असतो.

ते त्यांच्या बाबतीत नाही. अधांतरी अवस्थेत असताना आपलं भान ढळू न देणे हे किती अवघड असेल ! रोज उगवणारा दिवस नवी आशा घेऊन येत असेल आणि मावळणारा दिवस ती शक्यता धूसर करत असेल. अंतरिक्ष यानात असताना तर असं म्हणतात की ते आपल्या एका दिवसात १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त बघतात म्हणजे दिवसातून ३२ वेळा त्यांना हे सहन करावं लागत असेल. उमेद आणि नाउमेद यांचा खेळ ऊन पावसासारखा सतत फेर घालत असेल पण तरीही हे सगळं सहजतेने स्विकारायचं हे केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरच शक्य आहे.

दोघांच्याही या विजिविषु वृत्तीला नमन आणि ते सुखरूप परत येवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.

🙏

सुवर्ण मेघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}