मला वाटतं ते बरं वाटणं म्हणजेच त्याची कृपा आहे
देवळात जोडपी पाया पडायला येतात.
माझं इतक्या वर्षांच निरिक्षण असं आहे की बरेचदा दोघांपैकी ती उत्साहात आणि तो तिच्या बरोबर तिचं मन राखायला आल्यासारखा,
त्याचा एक आज्ञाधारक मूड, देवाबाबत काहीसा उदासीन, ती सगळे सोपस्कार मनोभावे पार पाडते.
त्याची तिच्या बरोबर उगीच कवायत.
तो हात जोडतो घंटा वाजवतो प्रदक्षिणाही घालतो.. पण हे सगळं तिने खुणेने सुचवल्यावर.. मग दानपेटीत पैसे टाकायची वेळ येते तो तिच्यापुढे नकळत हात पसरतो(तो तिच्याकडॆ असे पैसे मागतो ते ही मला बघायला आवडतं) ती ही पटकन पर्स मधून दोन चार नाणी त्याला देते तो ती पेटीत टाकतो आणि तरा तरा चालायला लागतो.
ती आर्जवाने म्हणते “अरे.. असं तरा तरा जाऊ नये देवाच्या इथे बसावं क्षणभर” .
तो ते ही ऐकतो अवती भवती बघतो.. कठड्यापाशी जाऊन तो टेकतो त्याचा अंदाज घेत ती ही बसते त्याच्या जवळ.
त्याचा मूड ओळखून ती दोन मिनिटात उठायला लागते..तसा तो घोगर्या आवाजात पुटपुटतो बस जरावेळ… बरं वाटतय
त्याला बरं वाटतं तर तिला आनंद होतो.. मग दोघं रेंगाळतात, बोलत नाहीत एकमेकाशी,….
नुसतेच एकमेकाची सोबत अनुभवत राहतात…
तो जे आंतर्मनापासून म्हणतो ना बस जरावेळ बरं वाटतय..
मला वाटतं ते बरं वाटणं म्हणजेच त्याची कृपा आहे..जी आपल्या लक्षात येत नाही.. लक्षात आलं तर त्या बरं वाटण्याचा हा कालावधी वाढवत न्यायचा…
धीरे धीरे हळू हळू… काय मज्जा…
~चंद्रशेखर गोखले