असं म्हणतात, मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टक ऐकू नये. कारण, ते सुर मन हळवं करतात मानसी देशपांडे विरार.
असं म्हणतात, मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टक ऐकू नये. कारण, ते सुर मन हळवं करतात. जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते,बागडते तिच जेव्हा सासुरवाशीण व्हायला निघते तेव्हा त्या मुलीला देखील माहेरचे पाश सोडणं अवघड असतं. एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरीबावरी होते. पण जेव्हा झाल हा विधी करण्याची वेळ येते तेव्हा कोणतीच आई आपला हुंदका आवरु शकत नाही. व.पु. म्हणतात तसं, ” सासरी मुलगी सजवली जाते,रुजवली जात नाही..” हे लिहिण्याचे कारण म्हणजे, आपल्याकडे लग्नात ‘ विहिण..’ म्हणण्याची पद्धत आहे. ही विहीण म्हणजे मुलीची आई, मुलाच्या आईला माझी मुलगी तुमच्या पदरात घालते आहे, तिचा सांभाळ करावा ही केली जाणारी विनंती म्हणजे विहिण.. मुलीची पाठवणी करताना डोळे का पाणावतात माहित आहे? कारण, तिने घरात घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे ती आता परक्याचे धन झाले आहे हे सुचित करते. मग या भावना शब्दांत व्यक्त करणे सोपे असते? पण तरीही एका आईचं हृदय हे समजण्यासाठी आई होणं गरजेचं असतं. म्हणून तर व.पु. म्हणतात, ” भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे..” एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात मुलीचा विरह हे असून देखील ती विहिणबाईंना विनंती करते,ते या गीतातून,
” ओटीत घातली मुलगी विहिणबाई,
सांभाळ करावा हीच विनवणी पायी..”
एका ठराविक वयानंतर आई मुलीची मैत्रीण होते. तिला जन्म देताना ज्या कळा सोसाव्या लागतात त्याही ती सोसते. कारण, ही मुलगी म्हणजेच ती तिच्यात स्वतःला बघत असते. काळजाचा तुकडा जेव्हा सासरी पाठवायचा असतो तेव्हा मन गलबलतेच. तो घालवलेला कोणताही क्षण परत येत नसतो.आई आणि मुलीच्या त्या सहवासाची किंमत होऊच शकत नसते. पण असं आहे ना, तुम्ही आई म्हणून मुलीला कितीही जीव लावला तरी एक दिवस तो पाठवणीचा क्षण येतोच. अमाप सुख देऊन जाणारी मुलगी विहीणबाईंच्या पदरात घालताना त्या आईची अपेक्षा इतकीच असते, ज्या स्त्रिला देखील एक मुलगी आहे ती माझ्या मनातली ही गोष्ट नक्कीच समजू शकते. कारण,ती देखील वधूमायच आहे ना!! जेव्हा विहीणबाई आईला मुलीची काळजी करू नका असं आश्वस्त करतात तेव्हा त्यांचा हात धरुन हुंदका अधिक वाढतो. म्हणून तर व.पु. म्हणतात, ” समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..”
” मी पदर पसरते जन्मदायिनी आई,
सांभाळ करावा हीच विनवणी पायी..”
आईच्या पोटात किती प्रेम साठलेलं असतं याचा अंदाज कधीच लावता येत नाही. जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा जावयाच्या हातात तो हात बघितला की तिला मुलीचे ते लहानपणीचे दिवस आठवतात. त्या आठवणी डोळ्यासमोर येतात. आईचा हात धरून दुडूदुडू चालणारी मुलगी आता संसारात पदार्पण करणार हे बघून नवीन घरात आईच्या रुपात असणाऱ्या विहीण बाईंशी ती मनातलं एक गुज व्यक्त करते, बघा, व.पु. म्हणतात, ” ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही..” मुलगी म्हणजेच त्यांची सून ही किती प्रेमळ आहे हे आईला माहित असतं. पण त्याहीपेक्षा माहेरी लाडाकोडात वाढलेली असल्यामुळे तिला आता माझी आठवण कधीही आली तरी तुम्हीच माझ्या जागी राहून प्रेम द्यावं ही विनवणी आई करते..
” तुम्हीच या पुढे,तिजसी माझ्या ठायी,
सांभाळ करावा हीच विनवणी पायी..”
ही विहिण कधीही ऐकली तरी डोळ्यांतून अश्रू येतात. कोणत्याही आईसाठी मुलीची पाठवणीची वेळ म्हणजे साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आई आई म्हणून मागे मागे जाणारी कळी आता उमलली हे आई ओळखून असते. म्हणून तर, सासरी जाताना आईचा हात सोडवत नाही. तुम्ही तुमच्या आईशी कितीही भांडलात तरी जेव्हा लग्न होऊन सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा आईच्या गळ्यात पडूनच मन मोकळे होते. व.पु. म्हणतात, ” श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही..” बरोबर आहे. घरी आल्यावर मुलीच्या वस्तू या तिच्या आठवणी जाग्या करतात. पण तिचा सहवास देऊ शकत नाही. तसंच, मुलीला देखील आईची आठवण आली तर ती फोनवर बोलू शकते पण त्या वेळी आईचा प्रत्यक्ष सहवास तिला मिळत नाही. मला तर वाटतं, जेव्हा लग्नाला काही दिवस कशाला, बॅग भरायची वेळ येते तेव्हा कधी आईकडे कधीही पाहिलं तरी तिच्या नजरेला नजर देता येत नाही. कारण, आपलेच डोळे पाण्याने भरलेले असतात. ती आपली सगळं देत असते, पण एक असा क्षण येतोच जेव्हा तिच्या कुशीत शिरून रडावसं वाटतं. हे नातंच वेगळं आहे हो!! ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही..
.. मानसी देशपांडे
विरार.