भागवत पुराण – दर आठवड्याला सात श्लोक आणि त्याचा अर्थ असा उपक्रम
याचे सादरकर्ते श्री राजेश सहस्त्रबुद्धे हे आहेत
भागवत पुराण
भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; श्री कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत महापुराण होय.
वेत्थ त्वं सौम्य तत्सर्वं तत्वतत्सदनुग्रहात् |
ब्रूयु: स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्युत || ८ ||
तात्पर्य:
अध्यात्मिक जीवनात यशप्राप्तीचे गूढ म्हणजे श्री गुरूला संतुष्ट करणे आणि त्यायोगे त्यांचे आंतरिक आशीर्वाद प्राप्त करणे होय. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्या गुर्वाष्टकात म्हटले आहे,” मी माझ्या श्री गुरूंच्या चरणकामळांशी सादर वंदन करतो. केवळ त्यांना संतुष्ट करूनच भगवंतांना संतुष्ट करणे शक्य आहे आणि जर ते असंतुष्ट असतील तर आध्यत्मिक साक्षात्काराच्या मार्गात केवळ अनर्थच आहेत.” म्हणून हे आवश्यक आहे की शिष्य श्री गुरूंशी आज्ञाधारक व एकनिष्ठ असावा. शिष्य म्हणून आवश्यक ते सर्व गुण श्रील सूत गोस्वानींजवळ असल्याने त्यांना श्रील व्यासदेव आणि इतर विद्वान व आत्मसाक्षात्कारी गुरूंकडून कृपेची देणगी प्राप्त झालेली होती. नैमिषारण्यातील ऋषींना पूर्ण विश्वास होता की, श्रील सूत गोस्वामी प्रामाणिक आहेत,म्हणून ते त्यांच्याकडून श्रवण करण्यास उत्सुक होते.
तत्र तत्रान्नसायुष्मन् भवता यद्वीनिश्चितम् “|
पुंसामेकान्तत: श्रेयस्तन्न: शंसितुमर्हसि || ९ ||
तात्पर्य:
भगवद्गगीतेत आचार्यांच्या सेवेचा निर्देश केला आहे. आचार्य आणि गोस्वामी हे नेहेमी सामान्य जनांच्या कल्याणाच्या विचारात निमग्न असतात,विशेषतः ते त्यांच्या अध्यात्मिक कल्याणाच्या विचारात निमग्न असतात. अध्यात्मिक कल्याणातून आपोआपच भौतिक कल्याण होत असते. या कलियुगातील किंवा कलहाच्या या लोहयुगातील लोकांच्या पतित अवस्थेचे निरीक्षण करून ऋषींनी सूत गोस्वामींना सर्व धर्मशास्त्रांचा सारांश सांगण्याची विनंती केली. वर्तमान युगातील पतित जीवांचा उद्धार व्हावा हाच त्यांचा हेतू होता. म्हणून ऋषींनी त्यांना परम परिपूर्ण कल्याण कोणते हे विचारले आहे, कारण परम कल्याण लोकांकरिता आहे.या युगातील लोकांच्या पतितावस्थेचे वर्णन खालील श्लोकात केले आहे.
प्रायेणाल्पायुष: सभ्य कलावस्मिन् युगे जना: |
मन्दा: सुमन्दमतयो मन्दभाग्या ह्युपद्रुता: || १० ||
तात्पर्य:
कलियुग नामक ह्या लोहयुगात लोक अल्पायुषी आहेत,भांडखोर आहेत,आळशी आहेत,मार्ग चुकलेले आहेत,दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत.
या कलियुगात आयुष्याचा काल अल्प झालेला आहे,तो अपुऱ्या अन्नामुळे नव्हे तर अनिमयीतपणाच्या सवयींमुळे झाला आहे. नियमित सवयी आणि साधे अन्न ह्यामुळे आपले आरोग्य सांभाळणे सहज शक्य आहे. गरजेपेक्षा जास्त अन्न खाणे,गरजेपेक्षा जास्त इंद्रियतृप्ती करणे,दुसऱ्याच्या कृपेवर अनावश्यक अवलंबून राहावे,आणि जीवनाचा कृत्रिम आदर्श यामुळे मनुष्याच्या जीवनशक्तीचा नाश होतो. त्यामुळे आयुष्यमान सुद्धा कमी झाले आहे.
ह्या युगात लोक सांसारिक दृष्टीने नव्हे तर आत्मासाक्षात्कार करण्याच्या बाबतीत पण आळशी आहेत त्यामुळे आपण कोण आहोत,हे जग काय आहे आणि परम सत्य म्हणजे काय हे मनुष्याला समजले पाहिजे.
ह्याच युगात लोक वेगवेगळे राजकीय पक्ष आणि पंथाच्या आहारी गेले आहेत. भौतिक सुखे,इंद्रिय उपभोग हाच संस्कृतीचा आदर्श मानला गेला आहे. अशा भौतिकवादी सुधारणांसाठी मनुष्याने गुंतागुंतीची राष्ट्रे आणि समाज निर्माण केले आहेत आणि या निरनिराळ्या गटात सतत प्रकट आणि शीत युद्धाचा ताणतणाव असतो. अशा विकृत मूल्यांमुळे अध्यात्मिक स्तर उंचावणे कठीण झाले आहे,ऋषीमुनी पतित जीवांच्या उद्धारार्थ चिंतीत आहेत, म्हणून श्रील सूत गोस्वानींकडे उपायांची विचारणा करत आहेत.
भूरीणि भूरिकर्माणि श्रोतव्यानि विभागश: |
अत: साधोSत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषया |
ब्रूहि भद्रायभूतानां येनात्मा सुप्रसीदति || ११ ||
तात्पर्य:
आत्मा हा जडाहून आणि भौतिक तत्वांहून भिन्न आहे.तो स्वभावत: अप्राकृत,दिव्य आहे आणि म्हणून तो कोणत्याही भौतीक योजनांनी संतुष्ट होत नाही. सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. असे अनेक प्रकारचे उपाय आहेत,ते निरनिराळ्या ठिकाणी सांगितले गेले आहेत,म्हणून शास्त्रांची संख्या असंख्य आहे. या विविध धर्मग्रंथात निरनिराळ्या पद्धती आणि ठराविक कर्तव्ये सांगितली आहेत. या कलियुगातील सामान्य लोकांची पतित स्थिती लक्षात घेऊन, नैमिषारण्यातील ऋषींनी असे सुचवले आहे की,श्रील सूत गोस्वामींनी सर्व धर्मग्रंथाची सर्व प्रकारची शिकवण सारग्रहीत करावी. या युगात पतित जीवांना वर्ण आणि आश्रम पद्धतीनुसार दिलेले शास्त्रांतील उपदेश समजावणे आणि पालन करणे शक्य नाही.
वर्णाश्रम पद्धतीचा समाज ही उत्तम समाज रचना समजली जाते,कारण त्यामुळे मनुष्याची आध्यात्मिक स्तरावर उन्नती होते,पण कालियुगामुळे या पद्धतीचे नियम व विधाने पाळणे शक्य नाही,सामान्य लोकांना वर्णाश्रम संस्थेत सांगितल्याप्रमाणे आपापल्या कौटुंबिक संबंधापासून वेगळे होणे शक्य नाही,सर्व वातावरण विरोधाने भरलेले आहे आणि म्हणूनच सामान्य मनुष्यांचा आध्यात्मिक उद्धार होणे फार कठीण झाले आहे. या बाबतीत ऋषींनी सूत गोस्वामींना जे कारण सांगितले आहे, त्याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले गेले आहे.
सुत जानासि भद्रं ते भगवान् सात्वतां पति: |
देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया || १२ ||
तात्पर्य:
भगवान याचा अर्थ शक्तिमान प्रभू,जे श्री,सामर्थ्य,यश,सौंदर्य,ज्ञान,वैराग्य या षडैश्व़र्यांचे नियंता आहेत. तरी ते आपल्या भक्तांसाठी विशेष प्रकारे कृपाळू आहेत. सत् म्हणजे परम सत्य,जे परम सत्याचे सेवक आहेत त्यांना सात्वतस् म्हटले जाते आणि अशा शुद्ध भक्तांचे संरक्षण करणाऱ्या भगवंतांना ‘सात्वतांचे’ संरक्षक संबोधले जाते. भद्रं ते किंवा ‘तुमचे कल्याण असो’ हे शब्द, ऋषींची वक्त्याकडून परम सत्याविषयीची जिज्ञासा दर्शवितात. भगवान श्रीकृष्ण वसुदेवांची पत्नी देवकीच्या उदरी अवतरले. जेथे भगवंतांचे अवतरण होत असते,त्या दिव्य स्थितीचे वसुदेव हे प्रतीक आहेत.
तन्न: शुश्रूषमाणानामर्हस्यड्वानुवर्णितुम |
यस्यावतरो भूतानां क्षेमाय भवाय च || १३ ||
तात्पर्य:
परम सत्याचा दिव्य संदेश श्रवण करण्याबाबत ईथे नियम दिले आहेत.पहिला नियम असा की श्रोते अतिशय प्रामाणिक आणि श्रवणोत्सुक असावेत. वक्तादेखील अधिकृत आचार्यांपासून आलेल्या शिष्य परंपरेत असावा. कारण हा दिव्य संदेश भौतिकतेत निमग्न झालेल्यांना समजणे अशक्य आहे. श्री गुरूच्या मार्गदर्शनाखाली जीव क्रमाक्रमाने शुद्ध होतो. म्हणून प्रत्येकाने शिष्य परंपरेत असायला हवे. तसेच नम्रतापूर्वक श्रवणाची कला त्याने आत्मसात केली पाहिजे. श्रील सूत गोस्वामी आणि नैमिषारण्यातील ऋषींच्या बाबतीत ह्या सर्व अटी पूर्ण झालेल्या आहेत कारण सूत गोस्वामी हे श्रील व्यासदेवांचे अनुयायी आहेत आणि सर्व ऋषी सत्य समजून घेण्यास उत्सुक असणारे प्रामाणिक महात्मे आहेत. अशा रीतीने श्रेकृष्णाच्या अद्भुत कृती, त्यांचे अवतार,त्यांचे प्राकट्य,अविर्भाव,तिरोभाव,त्यांची अनेक रूपे,त्यांची नावे आणि इतर हे समजणे सहज शक्य आहे. कारण सर्व अटी इथे पूर्ण झाल्या आहेत. असे संवाद अध्यात्म मार्गावर सर्वांना सहाय्य करतात.
आपन्न: संसृतिं घोरां यन्नाम विवशो गृणन् |
तत् सध्यो विमुच्येत यद्वीभेति स्वयं भयम् || १४ ||
तात्पर्य:
जे जीव जीवनमृत्यूच्या दुःखपूर्ण चक्रात पडलेले आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे परम दिव्य नाम अजाणता जरी उच्चारले तरी ते त्वरित मुक्त होतात,कारण नामाला साक्षात भयसुद्धा भिते. सृष्टीमध्ये असा कोणीही नाही जो सर्वशक्तिमान भगवंतांच्या क्रोधाला भीत नाही. रावण,हिरण्यकश्यपू, कंस, आणि त्यांच्या सारखे इतर मोठे मोठे असुर जे फार बलवान होते तरी सुद्धा भगवंतांकडून ठार मारले गेले. सर्व गोष्टींचा संबंध त्यांच्याशी आहे आणि त्यांच्यात सर्व गोष्टींचे अस्तित्व आहे. श्रीकृष्णांचे नाव आणि स्वतः श्रीकृष्ण अभिन्न आहेत,म्हणून अत्यंत मोठ्या संकटातही,कोणालाही भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा आश्रय घेता येतो.
याचे सादरकर्ते श्री राजेश सहस्त्रबुद्धे हे आहेत