#मंगळसूत्र ♥️♥️ सौ बीना समीर बाचलं . ✍️
#मंगळसूत्र ♥️♥️
सौ बीना समीर बाचलं . ✍️
एक सामान्य रिक्षा वाला, आला दिवस ढकलण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न, काबाड कष्ट करावेत आणि मिळेल ते दोन घास सुखाने खावे एवढाच काय तो जगण्याचा मंत्र!
एक दिवस रोजच्या प्रमाणे घरातून निघताना बायकोची नजर शेजारणीच्या नवीन मंगळसूत्रावर खिळलेली त्याने पहिली , कधी बोलली नाही ती ,पण आपण ही साधे सोन्याचे दोन मणी घेऊ शकलो नाही तिच्यासाठी ही त्याची खंत पुन्हा डोकं वर काढू पाहत होती,पण नाईलाजाने त्याने केवळ एक उसासा टाकत घर सोडले. आज किती लोक(passanger) रिक्षात बसले ,किती नाही इकडे लक्ष लागत नव्हते त्याचे! सतत बायकोचा तो चेहरा आठवत होता. संध्याकाळी घरी निघण्यापूर्वी शेवटचे passanger घेतले त्याने ,मागचा सुख संवाद ऐकू येत होता, ” अहो,इतकं महाग मंगळसूत्र घ्यायचं काही आवश्यक होतं का हो? लेकाच्या bike साठी साठवत होतात पैसे आणि मधेच ह्या मंगळसूत्राच काही अडलं होतं का?”
“अग गेली कित्येक वर्षं ती काळ्या मण्याची पोत घालते आहेस, आणि बोलून दाखवल नाहीस तरी जाणत होतो की तुला मंगळसूत्राची किती हौस होती ती, पण मी तीही पुरी करू शकत नव्हतो,आज अखेरीस ठरवलं की तुला हे घ्यायचं” वगरे वगरे.
तेवढ्यात मागच्या दोघांचं उतरायचं ठिकाण आलं आणि घाईत ते उतरले देखील. हा मात्र ‘त्या’ दोघांचा सुख संवाद ऐकून अजूनच बेचैन झाला’ काय नशीब आहे आपलं, आपण कधी असलं मंगळसूत्र घेऊ शकू की नाही कोण जाणे !!त्या तंद्रीत त्याचं घर कधी आलं कळलं देखील नाही, तो रिक्षा जागेवर लावून उतरणार तोच त्याचं लक्ष मागच्या सीट वर गेलं,एक छोटीशी पिशवी तिथे कोणी विसरलं होतं, त्यानं उघडं करून पाहिलं तर त्या पिशवीत चक्क सोन्याचं मंगळसूत्र!! काय नियती आहे बघा, सकाळपासून हे मंगळसूत्राचे विचार आपली पाठ सोडत नाहीयेत आणि दिवसा अखेर हे आपल्या हातात आहे, आता असेच हे पुडके बायकोच्या हाती नेऊन दिले तर आनंदाने वेडी होईल ती, काय करावं बरं?मनात काहूर माजलं, पण मगाशी पाठच्या सीट वरचा सुख संवाद आठवला आणि त्यानं पुन्हा रिक्षा दामटली ,दहा मिनिटात मगाच च्या सोसायटी समोर येऊन तो हजर झाला, तिथल्या watchman कडे त्याने चौकशी केली, तो watchman त्याला आत सोसायटीत घेऊन गेला, तो ते मगाच जोडपं अजूनही तिथेच उभं होतं, त्यातल्या तिची नजर तर भिरभिरत होती आणि खूप रडून झालंय हेही सांगत होती. तो अचानक त्यांच्या समोर उभा ठाकला आणि त्या दोघांनी काही बोलायच्या आत ती छोटी पिशवी ठेवत निघू लागला,अगदी त्या दोघांनी भानावर येत त्याचे आभार मानण्यापूर्वी च तो तेथून निघाला, त्याचे डोळे ही पाणावले होते,आज त्याचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं होतं पण समाधान ह्याचं होतं की आपल्या सारखं अजून कोणीतरी हेच स्वप्न पाहिलं होतं, ते मात्र पूर्ण करण्यात आपला हातभार लागला हेही नसे थोडके!!गेट बाहेर पडताना दारात एक गजरेवाला दिसला त्याला ,त्याच्याकडून मोगऱ्याचा गजरा घ्यायला मात्र तो विसरला नाही!!
सौ बीना समीर बाचल. ✍️