माझ्या मुलाच्या लहानपणची घटना.. ©® राजीव दिवाण
माझ्या मुलाच्या लहानपणची घटना..
खरी…त्यावेळी तो तिसरी -चवथीत असेल. त्याला स्केटींगबोर्ड हवा होता. मी ऑफिसातून येईपर्यंत त्याने आजी आजोबांना भंडावून सोडलं होतं.मी घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच मागणी समोर ठेवली. शांतपणे त्याला हो म्हणून मी कपडे बदलून, हातपाय धुऊन चहा घेता घेता त्याला विचारलं ” तू कूठे पाहिलंस स्केटींग?”.”टी व्ही वर स्पोर्टस् चॅनल वर दाखवलं.
माझ्याएवढा एक मूलगा ट्रकखालून जाताना दाखवला” .
मी सहजच चॅनल सर्फींग करत करत स्पोर्टस् चॅनल लावले त्यावर फुटबॉलपटू पेलेची मॅच दाखवंत होते.त्याला फुटबॉल आवडला….मग त्याची मागणी बदलली..
आता त्याला फुटबॉल हवा झाला. मी हो म्हणालो नी संध्याकाळ झाली म्हणून त्याला शुभंकरोती म्हणायला सांगीतले. नंतर त्याचा गृहपाठ घेतला. तोवर जेवणाची वेळ झाली नि आम्ही सारे जेवायला बसलो. अचानक मला म्हणाला “पपा…मला भरवा ना!!”..मला जाणवलं स्वारी आज वेगळ्याच मूडमध्ये आहे. मीही जेवत जेवत त्याला भरवत होतो. “” पपा …बास…पोट भरलं…पपा तूम्ही भरवता ना तेव्हा मला नेहमी पेक्षा जास्त जेवल्यासारखं वाटत “.
मला एकदम गलबलून आलं. रात्री झोपताना माझ्या कुशीत शिरून मला म्हणाला “पपा गोष्ट सांगा ना” त्याच्या जिजीने म्हणजे माझ्या आईमूळे त्याला लागलेली सवय.रात्री झोपताना गोष्ट ऐकायची.”तू मगाशी फूटबॉलपटू पेलेची मॅच पाहिली ना त्याच्या लहानपणची गोष्ट..
शाळेत असताना पेलेची फूटबॉल हीच आवड होती. घराच्या आजूबाजूच्या मुलांच्या बरोबर तो खेळत असे. पेलेचे वडील एक खाण कामगार होते घरची परिस्थिती अत्यंत बिकट…दिवस कसाबसा निघून गेला कि दूसर्या दिवशी पुन्हा कष्ट करून पोटापूरती सोय करायची…असा दिनक्रम….एक दिवस पेलेनं वडिलांच्याकडे फुटबॉल शूजची मागणी केली. वडील म्हणाले ठीकाय देइन थोड्या दिवसांनी..
पेलेची परत मागणी…. वडील म्हणाले ठीकाय देइन थोड्या दिवसांनी.
असेच दिवस जात होते…एक दिवस पेलेनं हट्टच धरला “मला शूज पाहिजेत म्हणजे पाहिजेत..
नाहीतर मी उद्या मॅच खेळणार नाही.” वडिलांनाही ठाऊक होतं आपला मूलगा चांगला फुटबॉल खेळतो. पण परिस्थितीमुळे त्यांना त्याचा हट्ट पुरवणं कठीण जात होतं..ते पेलेला म्हणाले ” हे बघ बेटा..असा हट्ट करू नये…आणि तू तर छानच खेळतोस. शूज नाहीत म्हणून न खेळण्याचा तूझा निर्णय मलातरी पटत नाही…हे बघ, माणसानं नेहमी आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे याचा विचार करावा.ठिकाय…देईन मी तूला शूज…पण एका अटीवर…मी उद्या मॅच पहायला येइन..
काहीही झालं तरी खेळावरील लक्ष विचलित होऊ देऊ नकोस..”झालं पेलेला आनंद झाला नि त्या आनंदात तो झोपला. दूसर्या दिवशी मॅच सुरू झाली..पेले भलताच फाॅर्ममधे होता. त्याने एका मागोमाग तीन गोल केले. पुन्हा खेळ खेळत खेळत
फुटबॉल पासींग करत करत तो गोलच्या जवळ आला…आणि गोल करण्यासाठी किक् मारणार..
इतक्यात त्याचं लक्ष गोलपोस्टच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या वडिलांच्या कडे गेलं….आणि त्याचा पाय थांबला..
वडिलांच्या शेजारी एक मुलगा पेलेला टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होता.पण तो मुलगा दोन्ही पायांनी अधू होता.उभा होता तो कुबड्यांच्या आधाराने. खेळ संपला नि मॅच जिंकली म्हणून पेलेला बक्षीस मिळालं….तो पळत पळत गेला नि वडिलांच्या पायाला मिठी घालत म्हणाला “” पापा..मला कळलं.. मी परत नाही हट्ट करणार…आज मला कळलं माझ्याकडे काय आहे??””
माझं पिल्लू गोष्ट ऐकता ऐकता झोपलं वाटतं असं वाटून त्याच्या गालावरून हात फिरवला.. तर गाल ओला लागला..
मी काहीही बोलायच्या आतच पिल्लू बोललं.”पपा..मला कळलं तुम्ही ही गोष्ट का सांगीतलीत ते..
तूम्ही पण मला नाही म्हणू शकला असतात.
कदाचित हट्ट केला तर मारलं ही असतंत..पण तूम्ही इतक्या प्रेमानं मला सांगीतले की.
“पुढे त्याला हुंदका आवरला नाही तसाच हुंदके देत देत म्हणाला “”पपा..मला काहीही नको..फक्त असंच माझ्यावर प्रेम करा””
आज या गोष्टीला कैक वर्षे उलटली पण.
आजही त्याचा एकंच हट्ट, पपा माझ्यावर असंच प्रेम करा!!!
खरंच ….मुलांना काय हवं असतं आपल्या आई वडिलांकडून…
पैसा????… इस्टेट????…. छे छे….हवं असतं ते फक्त प्रेम… ..दुधावर येणार्या सायीसारखं..
©® राजीव दिवाण
९६१९४२५१५१