Classified

मुक्ती.. © स्वाती नितीन ठोंबरे

मुक्ती..

योगिनी सकाळी लवकरच उठली.. आज वर्षश्राध्द होते ना तिचे… चोच घासली.. पंख फडफडवले… आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी..

वर्षभरापुर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिने सगळ्यांचा.. तसा कारभार लवकरच आटपला होता तिचा… क्षुल्लक आजाराचे निम्मित झाले… मग एकात एक दुखणी…. वर्ष-दिड वर्ष अंथरुणात.. आणि एक दिवस सकाळी खेळ संपला… अगदी भरल्या संसारातून उठावे तसे झाले… मोठी २० वर्षांची आणि धाकटी १७ वर्षाची… म्हटले तर दोघी सज्ञानच.. पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा..

मोठी जगन्मित्र… सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा… बहुदा घराबाहेरच बराचसा वेळ… अभ्यासात तशी हुशार… पण फारसे लक्ष नसायचे तिचे अभ्यास करण्यात… hi mom… bye mom.. केले कि पायात sandal सरकावून scooty ला किक मारून पोरगी पसार….

कधी घरात सापडलीच, तर चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोयनाही… mom.. lecture नको. मित्रपरिवार चांगला असला तिचा, तरी या वयात नको ती आकर्षणे काय कमी असतात का…. मग योगिनी चिंता करत बसायची…

धाकटीचे तंत्र वेगळेच… ती अगदीच घुमी होती… सगळ्यात अलिप्त… तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितले.. ना कधी दु:ख… तिच्या मनात काय चालू आहे, याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही… कधी कधी योगिनीला वाटायचे, ही आपलीच मुलगी का… कसलाच संवाद नाही तिच्याशी… योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुदा…. कारण तोही असाच अलिप्त.. कोरडा… ऑफिसात पाटी टाकून घरी आले कि, बराचसा वेळ टिव्ही बघण्यात.. सोफ्यावर लोळण्यात जायचा त्याचा…

डोंबिवली- चर्चगेट प्रवास करून.. दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची, तरी हा सोफ्यावरच… तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही…. योगिनी होती म्हणून चार माणसे जोडून होती… नातेवाईकांचे येणे-जाणे, रीतीप्रमाणे देणे-घेणे.. कार्याला हजेरी… कुणाचे हळदीकुंकू.. डोहाळजेवण.. बारसे.. मुंज.. लग्न.. सगळे हिनेच बघायचे..

योगिनी आता घराकडे झेपावली… मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली ती… जरा कानोसा घेतला kitchen च्या खिडकीत बसून पण काही हालचाल दिसेना… काव.. काव… पंख सावरत… कठड्यावरून चालत योगिनी hall च्या खिडकीपाशी आली.. फोटो दिसला तिचा भिंतीवर… हार घातलेला.

नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर.. अंगाने भरली ही… धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली.. घर तसे टापटीप दिसत होते.. ती जाताना जसे होते तसेच… तिने लावलेल्या तुळशीने पण चांगलाच जोम धरला होता… खिडकीबाहेर कपडे वाळत घातले होते.. अगदी एका रेषेत… सुरकुतीसुद्धा नाही… योगीनीला जरा नवलच वाटले.. इतका टापटीपपणा ना कधी नवऱ्याने दाखवला.. ना कधी मुलींनी…. श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना… योगिनी हिरमुसली…

जरासेच पुढे माहेर होते तिचे… आई थकली असेल… वाट बघत असेल…. योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली.. तिची आवडती जागा होती ती… तिथे बुचाचे गच्च भरलेले झाड होते.. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा.. आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला… हातात ताट घेवून थबकत आई कठड्यापाशी आली… नजरेनेच खुण पटली…

घे बाई.. भरपेट खा… तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेयत… केळ्याची कोशिंबीर… आणि साय-भात.. तुला आवडतो तस्साच…. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात.. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेने काळजी घेते… मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी… मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमाने होतायत.. आणि जावईबापूसुद्धा जातीने कुकर लावतात… अगदी basic पण थोडा स्वयंपाकही करतात…

श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज होवू नको.. तुझी मोठी.. तुला आवडणारा शिरा घेवून सकाळीच गेलीये अनाथाश्रमात मुलांना वाटायला… धाकटीने तुला आवडणारे बटमोगरयाचे रोप लावले आज अंगणात…

घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची… तू होतीस म्हणून सगळे लाडावलेले होते… मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस, त्या वळणाने हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा…. आता गुंत्यातून मोकळी हो… तू २२ वर्षे सिंचलेले संस्काराचे रोपटे छान फोफावले आहे… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेवून भक्कमपणे उभे आहे…. हे बघ आज आणि निश्चिंतपणे मुक्त हो…

© स्वाती नितीन ठोंबरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}