मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सवयीचे होताना…. ©®सौ विदुला जोगळेकर

सवयीचे होताना….

©®सौ विदुला जोगळेकर

टेबलावर नाष्ट्याचे सगळे तयार करुन ठेवले आहे..‌डीश आणि चमचे देखील ठेवलेत.सगळ्यांनी आपापले घ्या..आणि उरलेले झाकून ठेवा.तिने डायनिंग टेबलापाशी थांबून, सगळ्यांना ऐकू जाईल..‌इतक्या मोठ्या आवाजात सांगितले…आणि आपल्या बेडरुम कडे ती वळली.पेपरमध्ये डोके घालून बसलेल्या नवऱ्याने,आणि पलिकडे पुजेत गुंतलेल्या सासुबाईंनी, कपाळावर आठी घालत..‌आता हे काय नवीन!अशा अर्थाने तिच्या कडे बघितले.ती रुममध्ये शिरेपर्यंत,त्यांची नजर तिच्या पाठी चिकटलेली होती…हे तिला जाणवून गेले.थोडे दिवस घराला ही आपली वेळ सवयीची होईपर्यंत,हे तिरकस बाण येणारच. थोडंस दार लोटत…तिने online योगा क्लास जाॅईन केला.

नुसती अस्ताव्यस्त वाढत चालली आहेस झालं आजकाल…नवऱ्याची घरातल्या सगळ्यांसमोर तिच्यावर होणारी वारंवार टिपण्णी तिला टोचलीच…! तिलाही जडपणा जाणवत होताच की.
बाकी सगळे मख्ख चेहऱ्याने ऐकत …पण सगळ्यांच्या सगळ्या तऱ्हा सांभाळून आपल्यासाठी काही करायला तिला वेळ मिळाला तरी ती आतून विझून गेलेली असायची. कुणात मिसळण्याऐवजी….एकटं बसावं…काही करु नये…अगदी स्वतः साठी सुद्धा…इतका तटस्थ/निरुत्साही भाव आजकाल तिच्यात आला होता.
आपल्याशी कुणाला काही देणेघेणे नाही…फक्त त्यांच्या वेळा सांभाळणारे आपण एक माध्यम आहोत…या भावनेने तिला एकदम घेरुन टाकले होते.

अगदी सुरुवातीला तिला आपण एक गृहकर्तव्यदक्ष गृहिणी आहोत,यात धन्यता वाटत असे.सुखवस्तू संसाराची मालकीण आहोत याचं समाधान ती रिकाम्या वेळेत मिरवत राहायची….पण आजकाल त्यातील पोकळपणा तिच्या लक्षात येऊन गेला होता.

ताई उद्या माझी सुट्टी आहे बरं का?
लादी पुसणाऱ्या मालनने तिला तंद्रीतून जागं केलं…साधारण पस्तीसीची…पण भलती चटपटीत..‌!लवकर लग्न झालेली…घर संसारात मुरलेली.

हो आहे लक्षात…उद्या काय घरातली जास्तीची कामं करतेस काय ग सुट्टी घेऊन?
तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारले….

हो सकाळी घेते थोडी कामं आवरुन,दळणं, बाजारहाट ,साफसफाई…पण दुपारी मात्र न चुकता आम्ही बाजुच्या दोघी तिघी मिळून सिनेमाला जातोच.महिन्यातून एक तरी सिनेमा बघायचाच आपण…ठरवलंय आम्ही…
सासू नवरा काही बोलत नाहीत का….दरवेळी जातेस तेंव्हा…तिचं कुतूहल जागं झालं…
असं कसं हुईल बरं ताई…आपल्या प्रत्येक गोष्टीत टोकणं…हे तर त्यांचे कामच जणू!
ते नातंच तसं असतंय…मी नाही लक्ष देत…नवरा मुलं सासू आणि ही कामाची ठिकाणं…सगळ्यांच्या सगळ्या तऱ्हा रोज सांभाळतेच की मी…पण त्याबदल्यात कामाचा मोबदला मिळतो फार तर….संसारात तर ते कर्तव्यच आहे… !
त्यासाठी कधी आपल्याला कोणी बक्षीस देणार नाहीत.
पण महिन्यातले चार पाच तास तरी आपल्या मनाप्रमाणे जगायचा आपल्याला अधिकार असावा की नाही ?
आणि असे अधिकार‌ कोण देतं नसतय…आपणच मिळवायचे असतात बघा…
तिचा आत्मविश्वास… तिच्या देहबोलीतून जाणवून गेला.
नेटाने या आपल्या काही गोष्टींसाठी /वेळेसाठी उभं राहावं लागतं…घरच्या लोकांना…आपल्या वेळेची सवय होईपर्यंत…!
मग मात्र आपसूक आपला वेळ आपला होऊन जातो.

आधी लयी खडखड करायची सासू नवरा…पण…मी आपली त्यांच्या कडे दुर्लक्ष करून…माझ्या ठरलेल्या दिवशी सिनेमा नाहीतर तीन तास खुशाल फिरुन यायची…पण ठरलेल्या वेळी बाहेर पडायचं म्हणजे पडायचेच!
आता त्यांना, मुलाला माझं जाणं सवयीचं झालयं बघा…

काही गोष्टी…काही अधिकार….आपल्या काही आवडी निवडी…कोणी आपल्याला हातात आणून देत नसतात…त्या समोरच्या पर्यंत फक्त पोहचवायच्या असतात.त्यासाठी रडणं,कुढणं, स्वतः ला फाजील सहानुभूतीत गोंजारणं…यापेक्षा काही ठाम पाऊल उचलणं केंव्हाही योग्यच…!
पण त्यासाठी स्वतः ला आधी काय हवंय हे समजणं फार गरजेचे असते. आपल्या इच्छा,आवडींचे महत्त्व आपल्याला आधी समजायला हवंय…तरच ते दुसऱ्यांना समजेल.

तिला खरोखर पटलं….आपल्यासारखी शैक्षणिक डीग्री ची भेंडोळी भले मालनपाशी नसेल…पण जगात वावरताना लागणारं सारं व्यवहार ज्ञान ती जवळ बाळगून आहे.आणि त्या जोरावर ती ठामपणे घरसंसारा साठी आणि स्वतःसाठी देखील उभी आहे…तिच्या रोजच्या संघर्षाना ही ताठपणे सामोरे जाते….तिला त्या मालनमध्ये गुरुच भेटल्याचा भास झाला.

येस्…आपल्याला हव्या असणाऱ्या छंदाची, विशिष्ट वेळेची आधी सवय आपल्याइतकीच….घरातील लोकांना लावायला हवीय…आणि त्यासाठी आपण केलेल्या संकल्पात सातत्य ही हवं…इतकंच तर….!

तिला तिच्या गंजून जुनाट झालेल्या पोकळ व्यथेची जणू किल्लीच मिळून गेली….सवयीचे‌ होणे… स्वतः साठी आणि दुसऱ्यांसाठी ही!

©®सौ विदुला जोगळेकर

Related Articles

One Comment

  1. खूप छान कथा जणू आपलीच कहाणी असावी असे वाटले धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}