मंथन (विचार)मनोरंजन
बासरी …………… प्रदीप केळुसकर
बासरी
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९/
९३०७५२११५२
झपझप चालत बापट बाई सहावीच्या वर्गात आल्या. मुलांनी गुड मॉर्निंग मॅडम म्हणत बाईंचे स्वागत केले. बाईंनी पण गुड मॉर्निंग म्हणत मुलांना बसायला सांगितले. बाईंनी डस्टर, खडू टेबलावर ठेवले आणि मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. हा वर्ग त्यांच्या विशेष आवडीचा. गेल्यावर्षी पण पाचवीत बापट बाईच या वर्गाच्या क्लास टीचर होत्या. तोच वर्ग पाचवी पास करत सहावीत आला. सर्व मुले त्यांच्या ओळखीची. फक्त एक सोडून….
बाईंच्या कपाळावर आठी आली. या मुलाचे काय करायचे ? यंदाच दुसर्या शाळेतून आलेला हा मुलगा इतर मुलांमध्ये मिसळत नव्हता. अभ्यास करत नव्हता. बोलत नव्हता. गप्प राहून फक्त बघत रहायचा. बापट बाईंना कळेना या मुलाला हसता खेळता कसे करावे ? आज बापट बाई डेस्कवरुन उतरुन खाली आल्या. त्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलाला म्हणाल्या,
‘‘अरे मुला, बोल काहीतरी, नाव काय तुझे ?’’
‘‘कृष्णा, कृष्णा सदाशिव शिंदे’’
‘‘ गेल्यावर्षी कुठल्या शाळेत होतास तू?’’
‘‘देवबाग हायस्कूल’’
‘‘मग यंदा मालवणला कसा काय आलास ?’’
‘‘वडलानी तिकडंच काम सोडलं, आत्ता हिथ काम धरलयां’’
‘‘कुठ काम करतात तुझे वडिल?’’
‘‘तेलींच्या गोडावूनमध्ये हमाल हाय.’’
‘‘बरं! तू आता पुढे बसशील का ?’’
आणि कृष्णा पुढून दुसर्या बेंचवर बसू लागला. बाईंनी गणित शिकवायला सुरुवात केली. अधून मधुन त्यांचं कृष्णाकडे लक्ष जात होतं. कृष्णा स्थिर नजरेने पाहत होता.
बाकीची मुलं वहित लिहून घेत होती कृष्णाने वही उघडली नव्हती. मध्येच बाई थांबल्या. कृष्णाला म्हणाल्या –
‘‘कृष्णा ! बोर्डवरचं लिहून घेत नाहीस?’’
हु नाही की चु नाही. बाईंनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. कृष्णा तसाच बघत राहिला. बापट बाईंचा वर्ग संपला तसा कृष्णा पुन्हा शेवटच्या बाकावर बसायला गेला. मधल्या सुट्टीत बापट बाई मुख्याध्यापक सामंत सरांना भेटायला गेल्या.
‘‘सर, सहावीतील एका मुलाबद्दल बोलायचं होतं.’’
‘‘हा, कुठला मुलगा ?’’
‘‘कृष्णा शिंदे, देवबाग हायस्कूलला पाचवीत होता. यंदा सहावीत आपल्या शाळेत आला. तो काही वेगळाच आहे. निर्विकार डोळ्यांनी समोर पाहत असतो. वही उघडत नाही की पुस्तक उघडत नाही. बोर्डावरचे काही लिहून घेत नाही. इतर मुलांमध्ये मिसळत नाही. खेळायला जात नाही. काय करायचं या मुलाचं ?’’
‘‘देवबाग हायस्कूलमधून आलाय का? माझी वहिनी त्याच शाळेत नोकरी करते. एक दोन दिवसात मी वहिनीची भेट घेतो आणि कृष्णाची चौकशी करतो.’’
बापट बाई गेल्या. शाळा संपवून घरी गेल्या. बाई आणि बाईंचा मुलगा अवि दोघेच मालवणात रहायचे. बाईंचे मिस्टर पुण्याला बँकेत होते. रोज सारखी बाईंची घरकामे सुरु झाली. त्यांनी देवाला निरांजन लावले. चौथीत असलेल्या अवीचा स्कॉलरशीपचा अभ्यास घेतला. बाई सर्वकाही करत होत्या पण डोळ्यासमोर होता शेवटच्या बाकावर बसलेला आणि निर्विकार डोळ्यांनी पाहणारा कृष्णा.
दोन दिवसानंतर बाई शाळेत पोहोचल्या. तेवढ्यात प्युनने सामंत सर बोलवल्याचा बाईंना निरोप दिला. बाईंनी आपली पर्स लॉकर्समध्ये ठेवली आणि त्या मुख्याध्यापकांच्या रुममध्ये गेल्या.
‘‘या बापट बाई ! तुम्ही त्या कृष्णा शिंदेची चौकशी करायला सांगितलेली ना ? माझी वहिनी देवबाग हायस्कूलमध्ये शिकवते. तिच्याकडे चौकशी केली या कृष्णा बद्दल.’’
‘‘हो का ? मग ?’’
‘‘अहो, हा कृष्णा दोन वर्ष सतत पहिल्या नंबरावर होता. अत्यंत हुशार मुलगा पण…’’
‘‘पण काय ? ’’
‘‘फार वाईट वाटते सांगायला. हे शिंदे तिकडे सातारकडचे. मासे पकडायला समुद्रात बोटी जातात ना तशा बोटीवर शिंदे कामाला होता. या बोटीवरील खलाशांचे जेवण या शिंदेची बायको म्हणजे कृष्णाची आई करायची. जेव्हा बोट किनार्यावर असेल तेव्हा खलाशी घरी जेवायला येत किंवा बोटीवर जाताना डबे घेऊन जात. त्यातील एका मलबारी खलाशाबरोबर कृष्णाची आई पळून गेली.’’
‘‘काय?’’ बापट बाई किंचाळत बोलल्या.
‘‘होय बाई आणि या कृष्णाला एक लहान बहिण आहे चार वर्षाची. तिला ती बरोबर घेऊन गेली. याचा बाप बिचारा रडला, भेकला पण यांना कुठे शोधणार तो ? ती दोघ केरळच्या बाजूला गेल्याची बातमी होती. त्याने ७-८ दिवस वाट पाहिली आणि बोटीवरची नोकरी सोडली आणि इथे मालवणात तेलींच्या गोडाऊनमध्ये नोकरी पकडली. या कृष्णाला घेऊन तो मालवणात आला आणि आपल्या शाळेत त्याचं नाव घातलं.’’
‘‘अरे बाप रे ! काय सोसतोय हा पोरगा.’’ बाई कळवळून म्हणाल्या.
‘‘होय बाई, कोवळ्या वयात मोठा आघात बसलाय या कृष्णावर म्हणून तो निश्चल झालाय. रोज डोळ्यासमोर असणारी आई आणि छोटी बहिण नाहीशी होणे हे किती भयानक आहे ? बाई आपण या मुलाला पुन्हा हसता खेळता करायला हवा. आणि त्याकरिता तुम्हाला त्याच्या बाई नव्हे आई व्हायला लागेल.’’
‘‘हो सर, माझ्या लक्षात आलय ते, मी प्रयत्न करणारच. येते सर !’’
बापट बाई स्टाफरुममध्ये आल्या आणि आपल्या खुर्चीत बसल्या. त्यांच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा येत राहिला. काय निष्पाप पोर हे, या वयात काय काय सोसावं लागतयं या मुलाला. बाईंना आपला चौथीतला आपला मुलगा अवी आठवला. अवी पेक्षा हा फक्त दोन वर्षांनी मोठा. या मुलाला मायेची गरज आहे. आईची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. बाईंनी रुमालाने तोंड पुसले Dााणि बेल झाली तशा त्या सहावीच्या वर्गात गेल्या. नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग वगैरे झाल्यावर त्यांचे कृष्णाकडे लक्ष गेले. गेले दोन दिवस कृष्णा त्यांच्या तासाला दोन नंबरच्या बेंचवर बसत होता. बाई कृष्णा जवळ आल्या. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. बाई म्हणाल्या –
‘‘कृष्णा दाखव तुझं दप्तर, पुस्तक, वही वगैरे काही आणलेस का?’’
कृष्णा खाली मान घालून गप्प बसून होता. बाईंनी त्याचे दप्तर पाहिले. दप्तरात पाचवीची एक वही होती आणि एक जुनं पेन होतं.
‘‘अरे आता तू सहावीत आहेस बाळा ! सहावीची पुस्तकं-वह्या घेतली नाहीस का ?’’
‘‘नाही.’’
‘‘ठिक आहे, तो पर्यंत या राहूलच्या पुस्तकात बघ, उद्या आपण वह्या पुस्तकांचा बंदोबस्त करुया.’’ अस म्हणत बाई पटकन स्टाफरुममध्ये गेल्या आणि एक वही आणि एक पेन घेऊन आल्या.
‘‘कृष्णा, ही वही घे आणि पेन. आता मी बोर्डवर लिहीते ते वहीमध्ये लिही मग मी तुझी वही तपासणार’’असं म्हणत बाई गणित शिकवू लागल्या. त्यांच लक्ष होतं. कृष्णा बोर्डावरचे लिहून घेत होता. शिकवता शिकवता बाई डायसवरुन खाली आल्या आणि कृष्णाची वही पाहू लागल्या. कृष्णा वहीत लिहित होता. बाईंनी पाहिले कृष्णाचे अक्षर मोत्यासारखे होते. लिहिण्यात टापटिपी होती. भूमितीची पदे व्यवस्थित एकाखाली एक लिहिली होती. बाईंनी कृष्णाची वही हातात घेतली आणि सर्व मुलांना कौतुकाने दाखवली.
‘‘बघा मुलांनो, या कृष्णाची वही पहा. काय टापटिप आहे. अक्षर मोत्यासारखं आहे. बघा !’’
मुलं पाहू लागली. एवढ्या दिवसात हा बावळट वाटणार्या मुलाबद्दल त्यांनाही कौतुक वाटू लागलं. मुलांची कृष्णाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कृष्णापण खुश झाला. या नवीन शाळेत त्याच्या कोणी ओळखीचे नव्हते. वर्ग संपला तशा बापट बाई वर्गाबाहेर गेल्या. पण नवीन तास घेणार्या शिक्षकांना कृष्णाबद्दल सांगून त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत होत्या. अस करता करता सर्वच शिक्षकांमध्ये कृष्णा बद्दल चर्चा होत गेली आणि सर्वजण त्याच्याकडे विशेष लक्ष देऊ लागले.
मधल्या सुट्टीत वर्गातील सर्व मुले आपआपले डबे घेऊन बाहेर पडले. एकटा कृष्णा वर्गात बसून होता. एवढ्यात बापट बाई डबा आणि त्यांचा चौथीत शिकणारा मुलगा अवि याचा हात धरुन वर्गात आल्या. आणि एकट्या बसलेल्या कृष्णाकडे पाहून म्हणाल्या –
‘‘कृष्णा ! डब्यातून काही आणलसं का रे ?’’
कृष्णाने मान हलवली. बापट बाईंनी पाहिले कृष्णाच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.
‘‘हरकत नाही. हा बघ माझा मुलगा अवि. हा चौथीत आहे. चला आपण डबा खाऊ. कृष्णा या अवि सोबत बाहेर जा. हातपाय धुवून या तो पर्यंत मी डबा उघडते. अविने कृष्णाचा हात पकडला आणि ते दोघे बाथरुममध्ये गेले. तो पर्यंत बाईंनी आपला आणि अविचा डबा उघडला आणि दोन डब्याचे तीन डबे केले. कृष्णाला जास्त जेवण ठेवलं. दोघेही येताच त्यांच्या हातात एक-एक डबा दिला आणि आपल्या हातात एक डबा घेतला. कृष्णा डब्यातले अन्न खायला संकोचू लागला तेव्हा बाई ओरडल्या.
‘‘कृष्णा आता मी रागवेन. झटपट डबा संपवायचा. मला पुन्हा पुढल्या तासाला जायचयं.’’
तसा कृष्णा डब्यातली चपाती भाजी खाऊ लागला. अविला नेहमीची सवय होतीच. त्यामुळे त्याने झटपट डबा संपवला. बाईंनी कृष्णाला दाखवले –
‘‘हे बघ, चपाती आणि भाजी एकत्र खाल्ली की मध्ये मध्ये लोणच्याची फोड तोंडात घालायची. लोणच्याने तोंडाला चव येते. तहान लागली की पाणी प्यायचं.’’
बापट बाईंनी पाहिलं कृष्णा जवळ पाण्याची बाटली नव्हती. बाईंनी आपली बाटली कृष्णाला दिली.
‘‘पी हे पाणी, भरपूर पाणी प्यायला हवं, आणि वर्गात नुसतं बसून रहायचं नाही. इतर मुलांबरोबर थोडं बाहेर जायचं, बाथरुमला जाऊन यायचं, कळलं का ?’’
अस म्हणत बाईंनी डबा आवरला आणि त्या अविच्या हाताला धरुन बाहेर गेल्या. कृष्णा विचार करु लागला.
‘‘माय व्हती तवा डबा दित होती, आज खूप दिसानी चांगलं चुंगलं खायाला मिळालं, सांच्याला बाबा दमून येतो नी भाकरी बडवतो. भाजी हाटेलातून आणतो. कवातरी भात शिजवतो. मग भात आणि भाजी खायची. अस जेवण मला रोज रोज कुट मिळाया ? पोटात अन्न गेलं तर मी शिक्षण घेईन. अभ्यास करेन. पण मला मायची लय आठवण येते. किनीची पण आठवण येते. मग काय करायचं फक्त रडायचं. माय कुठं नाहीशी झाली, किनी नाहीशी झाली.’’ कृष्णाला आईच्या आणि बहिणीच्या आठवणीने गदगदुन आलं.
पाच वाजता शाळा सुटली तसा कृष्णा वर्गाबाहेर पडला. गेटच्या बाहेर पडणार एवढ्यात बापट बाई अविचा हात धरुन जवळ आल्या.
‘‘कृष्णा थांब, सोबत जाऊ. कुठं राहतोस तू?’’
‘‘रामेश्वराच्या देवळापाशी, तिथं एक चाळ हाय, तिथं र्हाहतो आमी.’’
‘‘बरं बरं, आम्ही पण त्याच बाजूला रोज जातो. मी भरडावर राहते. तुला माझं घर दाखवते. शाळेत जाताना थोडा लवकर ये. मग आपण एकदमच शाळेत जाऊ.’’
‘‘व्हयं’’ असं कृष्णा म्हणाला. वाटेतील एका बेकरीकडे थांबून बाईंनी दोन बिस्किट पुडे विकत घेतले. कृष्णाच्या हातात ते पुडे ठेवत म्हणाल्या, ‘‘बाबा किती वाजता घरी येतात ?’’
‘‘लई रात झाल्यावर येतो.’’
‘‘मग तोपर्यंत काय करतोस?’’
‘‘काय न्हाई, बसून र्हाहतो.’’
‘‘असं बसून राहू नये कृष्णा, या पुड्यातील बिस्किटे खा आणि तिथे मुलं खेळत असतील ना तेथे खेळायला जा. उद्या मी तुला सहावीची पुस्तके आणि वह्या घेऊन देणार. रोज शाळेत शिक्षकांनी सांगितल्ोला अभ्यास पुरा करायचा आणि मला दाखवायचा.’’
भरडावर आल्यावर बाई एका चपलाच्या दुकानाकडे थांबून त्यांनी कृष्णासाठी चप्पल घेतले. कृष्णा मनात म्हणाला – वर्गातल्या सर्वांच्या पायत चप्पल हाई पण माझ्या पायात काही नाही आता सहावीत गेल्यावर बाईंनी चप्पल घेतलं. आता शाळंत जाताना मजा येईल.’’
भरडावर गेल्यावर बाईंनी आपले घर दाखवले. बाई म्हणाल्या –
‘‘ही सरनाईकांची चाळ, पुढं त्यांच औषधं दुकान आहे. मागे आम्ही राहतो. उद्या लवकर आमच्या घरी यायचं मग आपण एकदम शाळेत जायचं, कळलं ?
‘‘व्हयं’’ म्हणत कृष्णा नवीन चप्पल घालून ऐटीत घरी गेला. घरी गेल्यावर कृष्णाने पिशवी खोलीत टाकली आणि बिस्किटाचा पुडा फोडला. बिस्किटे खात खात तो नारायणाच्या देवळाजवळ आला. तिथे एक झेंडा उभा करुन खाकी हाफ पॅन्ट घातलेली मुलं झेंड्याभोवती बसली होती. मोठा दादा त्यांना गोष्ट सांगत होता. गोष्ट संपल्यावर त्यांनी वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हटलं. तो मोठा दादा कृष्णाकडे पाहत म्हणाला –
‘‘कुठ राहतोस रे तू ?’’
‘‘इथं देवळाच्या मागं’’
‘‘बरं, नाव काय तुझं?’’
‘‘कृष्णा, कृष्णा शिंदे’’
‘‘हा. तर कृष्णा उद्या शाळा सुटली की इथं देवळापाशी ये. आमची इथे शाखा असते. ही मुले आम्ही सर्व इथं जमतो. रोज इथं यायचं.’’
‘‘हूं, येतो साहेब’’
‘‘साहेब नाही म्हणायचं, दादा म्हणायचं….’’
‘‘हा दादा उद्या येतो.’’
कृष्णाला कोण आनंद झाला. आज दुपारी जेवण मिळालं, चप्पल मिळाली, बिस्किट पुडा मिळाला, आणि आता हे दादा आणि सवंगडी मिळाले. कृष्णाने घरी येऊन दिवा लागला. एकच बल्ब घरात होता. आईने पांडुरंगाचा फोटो आणला होता. आता आई गेली पण पांडुरंग आहे. कृष्णाने पांडुरंगाला नमस्कार केला आणि शाळेत सांगितलेला अभ्यास तो वहीत उतरवू लागला.
सकाळी लवकर उठून विहीरीवर दोरीने पाणी काढून कृष्णाने आंघोळ केली. कृष्णाच्या बाबाने काल येताना पाव आणला होता. चहात पाव बुडवून खाल्यावर बाबा कामावर गेला. आणि कृष्णा नवीन चपला घालून भरडाच्या दिशेने चालू लागला. बापट बाईंच्या घरी तो बाहेर उभा राहिला. अवि बाहेरच बसला होता. अभ्यास करत होता. त्याने आईला आत जाऊन कृष्णा आल्याचे सांगितले. बापट बाई बाहेर आल्या. कृष्णाला हात धरुन आत घेतलं. पटकन आत जाऊन दोन थाळीत दोन दोन चपात्या आणि दुधाचे दोन कप बाहेर आणले. आणि कृष्णासमोर चपाती दूध ठेवून खायला सुरुवात करा असं म्हणत आपली तयारी करायला आत गेल्या. कृष्णा भिरभिरत्या नजरेने बाईंचे घर पाहत होता. बाईंचा आणि बाईंच्या नवर्याचा एक फोटो दिसत होता. एक कपाट होतं. त्याच्यावर रेडिओ ठेवला होता. एक कॉट होती. त्यावर गादी गुंडाळलेली दिसत होती. दोन चटया गुंडाळलेल्या होत्या. कृष्णाने असं चटपटीत घर पाहिलं नव्हतं. कृष्णाने अविकडे पाहत चपाती दुधात बुडवून खाल्ली. अविप्रमाणेच अंगणात नळावर जाऊन ताटली कप धुतला आणि घरात नेऊन ठेवला. तो पर्यंत बाईंची शाळेत जायची तयारी झाली होती. बाई, अवि आणि कृष्णा तिघेही शाळेत जायला निघाले. पुढे बाजारात आल्यावर बाई नेवाळकरांच्या दुकानात गेल्या. दुकानातून कृष्णाच्या साईजच्या दोन पॅन्टी, बनियन, दोन शर्टस् दाखवायला सांगितले. कृष्णा भिरभिरत्या नजरेने एवढं मोठं कपड्याचं दुकान पाहत होता. बाईंनी कृष्णाला कपडे घेतले आणि पुढे खंडाळेकरांच्या दुकानातून सहावीची पुस्तके एक डझन वह्या, दोन पेन, पेन्सिल, कंपासबॉक्स आणि हे सर्व ठेवण्यासाठी स्कूलबॅग विकत घेतली. कृष्णाला खूपच आनंद झाला. आपल्या बाबाला एवढी वह्या पुस्तकं घ्यायला कधीच जमली नसती याची त्याला कल्पना होती.
आता कृष्णा सर्व तासांना व्यवस्थित लक्ष देऊ लागला. सर्व तासांचे शिक्षक त्याच्यावर खूश होते. त्याचा अभ्यास चांगलाच होता. शाळा सुटली की तो बापट बाई आणि अवि बरोबर घरी जात होता. कृष्णाचा बाबा कृष्णाला म्हणाला –
‘‘आरं नव चप्पल, पुस्तकं, कापडं देतं तरी कोण ?’’
कृष्णाने शाळेत बापट बाई आहेत त्यांनीच हे सर्व दिलं असं सांगितलं.
तेव्हा कृष्णाचा बाप म्हणाला, – ‘‘आरं ही बाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी समज. ती सांगल तसं वागायचं, तिला कधी तरास द्यायचा न्हाई आणि अभ्यास करायचा.’’
असचं एकदा शाळेतून येताना फोकांड्याच्या पिंपळाजवळ एक बासरीवाला काखेतील पिशवीत भरपूर बासर्या घेऊन विकायला आला होता. एक बासरी ओठांत ठेवून मधुर वाजवत होता. पिंपळावर बसलेली माणसं, जाणारी येणारी माणसं, शाळेत जाणारी येणारी मुलं त्या बासरीवाल्याकडे पाहत होती. त्याचे ते मधुर बासरी वादन ऐकत होते. कृष्णाचे आणि अविचे लक्ष त्या बासरीवाल्याकडे गेलेच. बापट बाई बरोबर चालताना ते दोघं मान मागे मागे करत परत परत त्या बासरीवाल्याकडे पाहत होते. कृष्णाची पावलं रेंगाळत आहेत हे बापट बाईंच्या लक्षात आलं. बाईंच्या मनात आलं. पोराची आई असती तर त्याने हट्ट धरुन बासरी विकत घेतली असती. बाईंच्या काळजात कालवा कालव झाली. बाईंनी मागे येत त्या बासरीवाल्याला म्हटलं –
‘‘कशी दिलीस रे बासरी ?’’
तो बासरीवाला आपल्या पिशवीतील सर्व बासर्या दाखवू लागल्या. बाई कृष्णाला म्हणाल्या – ‘‘कृष्णा तुला बघ कुठली आवडते यातली?’’
कृष्णा पिशवीतल्या सर्व बासर्या चाळू लागला. एक अत्यंत आकर्षक बासरी त्याने निवडली. तसा बासरीवाला म्हणाला – अरे वाजीव की, कृष्णाने तोंडात बासरी धरली आणि मघा बासरीवाला वाजवत होता तसा वाजवू लागला. बाईंनी बासरीवाल्याला किंमत विचारली आणि त्यांनी त्याचे पैशे दिले. अवि पण तशीच बासरी मागू लागला. बाईंनी त्या बासरीवाल्याला आणखी एक तशीच बासरी द्यायला सांगितली. पण त्या बासरीवाल्याकडे त्या पध्दतीची एकच बासरी होती. बाईंनी वेगळ्या प्रकारची एक बासरी घेतली आणि अविला दिली. त्याने अवि हिरमुसला झाला. तो एक सारखा कृष्णाच्या हातातल्या बासरीकडे पाहत होता. बाईंनी अविला डोळे वटारले आणि त्याचा हात धरत, ओढत घराकडे निघाल्या. रडत रडत अवि आई बरोबर चालला होता. कृष्णा मजेत उड्या मारत चालला होता. घरी आल्यावर अवि आईशी वाद घालू लागला. तेव्हा बापट बाईंनी अविला समोर घेऊन सांगितलं – अरे तुझी आई तुझ्या समोर उभी आहे आणि त्या कृष्णाला आई नाही लक्षात घे. तेव्हा उगाच हट्ट करु नकोस. अविच्या रडण्याकडे दुर्लक्ष करुन बाई घरकामाला लागल्या.
कृष्णा घरी आला. शाळेची बॅग घरात टाकून नारायण मंदिराकडे आला. त्याठिकाणी दादाभोवती बरीच मुलं जमली होती. हात छातीजवळ घेऊन मुलं म्हणत होती –
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
कृष्णा पण त्या मुलांसमवेत छातीजवळ हात घेऊन प्रार्थना म्हणू लागला. त्या मुलांसमवेत कृष्णा तल्लीन होऊन दादाचे म्हणणे ऐकत होता. काळोख पडू लागला तशी मुलं आपआपल्या सायकली घेऊन घरी निघाली. दादापण आपली सायकल घेऊन घरी जाण्याच्या तयारीत असताना कृष्णा पुढे झाला. त्याने दादाला आज बाईंनी घेऊन दिलेली बासरी दाखवली.
‘‘दादा, ही बघ माझ्या बापट बाईंनी बासरी घेतली.’’
‘‘अरे व्वा कृष्णा ! छानच आहे.’’
‘‘पण दादा, मला बासरी वाजीवता येईना, तुला येत का ?’’
‘‘थोडी थोडी येते’’
‘‘मग मला शिकीव नां’’
दादाने बासरी हातात घेतली आणि बासरीचे सहा होल दाखवले. वरच्या तीन होलावर डाव्या हाताची बोट धरुन प्रत्येक होलावरील एक एक बोट कमी करत – सा रे ग म कसे वाजवावे हे त्याने दाखवले. बासरी फुंकावी कशी हे पण दाखवले आणि रोज बाकीची मंडळी घरी गेली की बासरी शिकवायचे मान्य केले. कृष्णा घरी गेला आणि दादाने दाखविल्या प्रमाणे बासरीवर सारेगम वाजवू लागला. बर्याच वेळा सराव केल्यानंतर त्याला थोडा थोडा सारेगम वाजवायला येऊ लागला. दुसर्या दिवशी दादाने खालचे तीन होल हळू हळू उघडून सारेगम उलट कसं वाजवाचं हे शिकवलं आणि कृष्णाचा हा रोजचा कार्यक्रम झाला. शाखेत जायचं, शाखा संपली की दादाकडून बासरी शिकायची.
एका महिन्यात कृष्णाने बापट बाईंना बासरी वाजवून दाखवली तेव्हा त्यांना कमाल वाटली. अविला काहीच वाजवता येत नव्हते. अविने बासरी आणली ती कपाटावर ठेवली ती परत हातातपण घेतली नाही. सहामाही परीक्षेत कृष्णा वर्गात तिसरा आला. बाईंना आनंद झाला. पाच महिन्यापूर्वी वर्गात तोंड न उघडणारा कृष्णा आता वर्गात सर्वांत मिसळू लागला.
दिवाळीत अवीचे बाबा पुण्याहून आले तेव्हा त्यांनी अविसाठी टीशर्ट, फुलपॅन्ट आणली तशीच कृष्णासाठी पण आणली. अर्थात बापट बाईंनी पत्राद्वारे आपल्या नवर्याला तसं कळवलं होत. बापट काकांनापण कृष्णा आवडला. त्याचा अभ्यास, त्याची बासरी याच्या ते प्रेमात पडले. शाळेच्या गॅदरींगमध्येपण कृष्णाने बासरी वाजवली. त्याची सर्वांनी प्रशंसा केली. वार्षिक परीक्षेत कृष्णा संपूर्ण वर्गात पहिला आला. रिझल्ट नंतर मुख्याध्यापक सामंत सरांनी बापट बाईंना बोलावून घेतले.
‘‘बापट बाई, तुम्ही कमाल केलीत, सात-आठ महिन्यापूर्वी ज्या मुलाची तुम्ही काळजी करत होतात तो मुलगा वर्गात पहिला आला.’’
‘‘हो सर, मी खूप आनंदात आहे. तुम्ही म्हणाला होतात – त्याच्या बाई नव्हे आई व्हा, मी आई होण्याचा प्रयत्न केला.’’
‘‘हो बाई, तुम्ही यशस्वी झालात, मी पाहतोय रोज शाळेत येताना जाताना तो तुमच्या बरोबर असतो. माझ्या माहिती प्रमाणे मधला डबा सुध्दा तुम्हीच देता, हे पुण्य आहे बाई.’’
थँक्यू सर म्हणत बापट बाई बाहेर पडल्या. आज सामंत सरांनी त्यांच कौतुक केलं याच त्यांना समाधान वाटलं. कृष्णा सातवीत गेला. अवि पाचवीत गेला. कृष्णाचे रोज लवकर बापटांकडे येणे, न्याहारी, मग बाई आणि अवि समवेत शाळेत जाणे, दुपारी बापट बाईंच्या घरचा डबा, सायंकाळी परत घरी गेल्यावर शाखेत जाणे आणि मग बासरीची प्रॅक्टीस. सातवीतपण कृष्णा पहिला आला. शाळाचा रिझल्ट लागला आणि बापट बाई अविसह पुण्याला गेल्या. पुण्यात अविच्या बाबांनी लहानसा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तूपूजा आणि बाईंची तब्येत तपासणीपण करायची होती. बाई कृष्णाला म्हणत होत्या – तू पण चल आमच्या बरोबर. पण कृष्णा म्हणाला – ‘‘बाबा येकटा आय इथं, मी इथं राहतो तुमी जावा’’
बापट बाईंना हल्ली लवकर थकवा येत होता. पुण्यात केलेल्या तपासणीत मधुमेह निघाला. बाईंच्या माहेरी आईलापण मधुमेह होता. डॉक्टरांनी खाण्यावर बंधने आणली आणि औषधे लिहून दिली. दिड महिना पुण्यात राहून बापट बाई आणि अवि पुणे मालवण एसटीने मालवणात आले. जून महिन्याचा पहिला आठवडा होता. मालवणात थोडा थोडा पाऊस सुरु झाला होता. बापट बाई बसमधून उतरल्या, बाईंनी ब्रेड आणि दूध घेतले आणि दोघे भराडावर बिर्हाडी आले. दार उघडून आत आल्या आल्या बाई अविला म्हणाल्या – अवि आंघोळ कर आणि सायकल घेऊन कृष्णाकडे जा. कृष्णाला घेऊन ये. तो पर्यंत मी आंघोळ करते आणि तुमच्यासाठी खाणे करते. बाईंनी नळावरुन पाणी भरले आणि गॅसवर पाणी गरम करुन अविला दिले. अविने आंघोळ केली आणि सायकल घेऊन कृष्णाच्या घरी निघाला. बाहेर पावसाची भूरभूर सुरु होती. तसाच भिजत अवि गेला आणि सात-आठ मिनिटात परत आला. बाईंचे आत-बाहेर सुरु होते. कधी एकदा कृष्णाला पाहते असे झाले होते त्याला. अवि सायकल लावून घरात आला तो सांगत – ‘‘अगं आई त्या घरात दुसरेच कोणीतरी राहत आहेत. कृष्णा आणि त्याच्या बाबांनी हे घर सोडले आणि ते गावाला गेले.’’ बाई आश्चर्यचकित झाल्या.
‘‘काय ? पण कुठल्या गावाला ?’’
‘‘ते माहित नाही, पण त्या घरात आता माने म्हणून रहायला आलेत, ते म्हणाले शिंदेनी ही जागा सोडली आणि मग आम्ही इथे रहायला आलो.’’
बाईंना वाटले मालवणात दुसरीकडे रहायला गेले असतील किंवा आजूबाजूच्या गावात कुठेतरी गेले असतील. दोन वर्षापूर्वी देवबाग सोडून मालवणात कसे आले तसे. पण बाईंना चैन पडेना. थोडा पाऊस कमी झाला तसा त्या म्हणाल्या, ‘‘अवि चल मी येते तुझ्याबरोबर आपण परत एकदा कृष्णाच्या घरी जाऊया.’’ बाई आणि अवि छत्री घेऊन चालू लागले. नारायण मंदिराजवळ बाई आल्या. चाळीच्या खाली मालक भेटले. त्यांना विचारले – ‘‘ओ शिंदे कुठे गेले माहिती आहे का?’’
मालक म्हणाले – ‘‘शिंदे त्यांच्या गावाक गेले. शिंदे म्हणा होते तेंचा लगीन ठरला हा. त्यांच्या गावच्या लोकांनी हेंचा दुसर्यांदा लगीन ठरल्यानी. म्हणून ते झिलाक घेवन गेले. आता ते थयसरच रवतले. झिलाक थयल्याच शाळेत घालतले असा म्हणा होते.’’
‘‘क्काय ?’’ बापट बाई चित्कारल्या.
‘‘ पण कुठल्या शाळेत ?’’
‘‘ता म्हायत नाय ओ, कराड सातारा भागात आसा खयचा तरी खेडेगांव, आता येवचे नाय ते. हयला तेलयाकडचा कामपण सोडल्यानी तेनी’’
‘‘हो का, बरं बरं. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल काही कळलं तर मला कळवा हां ! मी येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे – बापट. बरे येते मी.’’
बापट बाई आणि अवि बाहेर पडल्या. तेवढ्यात जोराचा पाऊस सुरु झाला. बाई नारायण मंदिरात येऊन बसल्या. अवि एकसारखा कृष्णा केव्हा येईल गं म्हणून विचारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत बापट बाई पावसाकडे पाहत विचार करत होत्या.
कुठं असेल हा पोरगा ? कुठल्या शाळेत, कुठल्या गावात ? शिंदेंनी परत लग्न केलयं तर ह्याला धड जेवणतरी मिळत असेल काय? शाळा सुरु असेल ना याची ? एवढा हुशार मुलगा वाया जायचा. विचार करता करता बाईंच्या छातीत थोड थोड दुखू लागलं. त्यांनी अविला एखादी रिक्षा मिळते का पहायला सांगितलं. रिक्षा मिळाली आणि बाई आणि अवि घरी आले. घरी आल्यावर सुध्दा बाईंना अस्वस्थ वाटायला लागले. त्या त्यांच्या घराजवळ असलेल्या झांटयेच्या दवाखान्याकडे गेल्या. डॉक्टरनी त्यांना तपासलं.
‘‘बाई ! ब्लडप्रेशर फार वाढलयं, बर झाल तुम्ही लगेच आलात. आता मी इंजेक्शन देतो आणि एका महिन्याच्या गोळ्या देतो. रोज सकाळी एक गोळी घ्यायची. कसला विचार करताय का?’’
‘‘तसं नाही, आज सकाळीच प्रवास करुन आले ना !’’
‘‘ठिक आहे, काळजी घ्या. दगदग करु नका. आठ दिवसांनी पुन्हा दाखवायला या.’’
बाई बाहेर पडल्या. त्यांना जेवण करण्याचापण कंटाळा आला. त्यांनी अविला महाजनांच्या खाणावळीत पिटाळलं आणि त्या कॉटवर झोपी गेल्या. सायंकाळी थोड बर वाटल्यावर बाई अविला सोबत घेऊन शाळेचा क्लार्क कांबळी यांच्या घरी गेल्या.
‘‘कांबळी, सातवीत कृष्णा शिंदे नावाचा मुलगा होता त्याचा दाखला कोणी नेला काय?’’
‘‘हो बाई, कृष्णाचा बाबा आला होता स्वतः’’
‘‘कुठल्या शाळेत कृष्णाचे नाव घालणार, काही म्हणत होते ?’’
‘‘नाही, निश्चित सांगितले नाही. पण कराडच्या बाजूला त्यांच गाव आहे लहानस, तेथे तो शाळेत जाईल असं ते म्हणत होते.’’
‘‘हो का ? अहो मी नेमकी पुण्याला गेलेली दिड महिना पुण्यात होते. अविचे बाबा तिकडे असतात ना, बर मग येते मग, त्याच्याबद्दल काही कळलं, पत्र वगैरे काही आलं तर कळवा मला.’’
‘‘हो बाई’’
बाईंना कृष्णा नेमका कुठे गेला काही कळेना. त्यांनी नारायण मंदिराकडील शाखेच्या दादाकडे चौकशी केली. त्याला पण काहीच माहित नव्हत. कृष्णा त्यालापण न सांगता गेला होता.
मालवणात जोरदार पाऊस सुरु झाला आणि शाळा सुरु झाल्या. बापट बाई अविसमवेत शाळेत जाऊ लागल्या. रोज शाळा सुरु होण्यापूर्वी त्या अविसाठी नाश्ता आणत तशा अजून एक कृष्णासाठीपण. मग त्यांच्या लक्षात यायचं कृष्णा नाही येणार आता. शाळेत जाताना त्यांना नेहमी डाव्या उजव्या बाजूकडे पाहत जायची सवय. उजव्या बाजूला अवि असायचा डाव्या बाजूला कृष्णा. पण आता डाव्या बाजूला कोणीच नसायचं. फोकांड्याच्या पिंपळाकडे त्यांच लक्ष जायचं. येथेच तो बासरीवाला बासर्या विकायला आलेला आणि कृष्णाची नजर बासरीवर पडलेली. त्या आठवीच्या वर्गात जायच्या तेव्हा पुढील दुसर्या बेंचवर त्यांच लक्ष जायचं. तिथे दुसराच मुलगा बसलेला असायचा.
कृष्णा एखादं पोस्टकार्ड पाठवेल म्हणून बाई वाट पाहत असायच्या. पण कृष्णाचं कार्ड, पाकिट काही आलचं नाही. बाईच्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. मधुमेह कमी अधिक होणे, ब्लडप्रेशर सतत वर, चिडचीड सुरु झाली. शेवटी अविच्या बाबांनी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला आणि दिवाळीच्या सुमारास बापट बाईंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि अवि आणि त्या पुण्याला आल्या. पुण्यात आल्यानंतर चांगल्या हॉस्पिटलमधून तपासणी करुन बाईंना थोड बरं वाटलं. आता बापट बाई सकाळीची योगासनं, हास्यक्लब, चालणं, दुपारचा आराम, संध्याकाळी नाटक, सिनेमा, गाण्याचा कार्यक्रम, महिला मंडळ यात रमू लागल्या.
वीस वर्षानंतर….
अविचे बाबा बँकेतून निवृत्त झाले. अविने अमेरिकेत एम.एस. केलं आणि आता तो तिकडेच नोकरी करतोय. अजून तो अविवाहित आहे. वर्षातून एकदा तो भारतात येतो. बापट बाई त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या पण तो हसण्यावरी नेतो. बापट बाईंची तब्येत मात्र फारशी चांगली नाही. तरुणपणी मधुमेह जडल्याने त्या एवढ्यात थकल्या. ब्लड प्रेशर सतत वर खाली होण, धाप लागणं, झोप न लागणं अशा सतत तक्रारी सुरु झाल्या. दिवसाला १५-१६ गोळ्या, श्वासासाठी इनहेलर सुरु होतं. त्यात त्यांना नैराश्याने पकडलं होतं. कशातही लक्ष लागत नव्हतं. अधून मधून त्यांना मालवण शाळेचे दिवस आठवत. आयुष्यात मनापासून रमेल ते मालवणातच असे त्यांना वाटे. असच एका संध्याकाळी बापट आणि बापट बाई बागेत फेर्या मारत होते. फेर्या मारता मारता बापट बाई खाली बसल्या आणि धापा घालू लागल्या. बापट बाईंना उठताच येईना. बापटांनी तिथल्या माळ्याला बोलावून बाईंना रिक्षात घातले आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. डॉक्टरनी एन्जीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एन्जीओग्राफी नंतर लक्षात आले हृदयात नव्वद टक्के ब्लॉकेजीस आहेत त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.
बापट काळजीत पडले. मुलगा अमेरिकेत पण बापटांची बहिण पुण्यातच होती. भाचा भाची म्हणाले – मामा घाबरु नको. आम्ही येथेच आहोत, ऑपरेशन करुन घेऊया. हॉस्पिटलमधील डॉक्टरनी सर्व तयारी केली. ऑपरेशन करण्यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर येणार होते. त्या डॉक्टरना बाईंचे सर्व रिपोर्ट पाठवले गेले. एन्जीओग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टरनी ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली.
पंधरा ऑगस्ट हा ऑपरेशनचा दिवस ठरला. सकाळी सात वाजता ऑपरेशन सुरु होणार होते. आदल्या दिवशी पुन्हा एकदा बापट बाईंची सर्व तपासणी करुन रिपोर्ट ऑपरेशन करणार्या डॉक्टरना पाठविले गेले. सकाळी सहा वाजता डॉक्टर आले. त्यांना या हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री रानडे मदत करणार होत्या. डॉक्टर आल्या आल्या डॉ. रानडे यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या बॅगमधून डॉक्टरनी एक लहानसा फोटो काढला आणि टेबलावर ठेवला. डॉ. रानडेंना माहित होते की, हे डॉक्टर जेव्हा जेव्हा ऑपरेशन करायला येतात तेव्हा हा फोटो नेहमी काढून टेबलावर ठेवतात, त्याला नमस्कार करता आणि मगच ऑपरेशन सुरु करतात.
सर्व तयारी झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टर, डॉ. रानडे आणि नर्स स्टाफ ऑपरेशन थिएटरमध्ये आले. ऑपरेशन सुरु करण्याआधी डॉक्टरनी सहज बेशुध्द पेशन्टच्या चेहर्याकडे पाहिले आणि ते दचकले. त्यांनी पेशंटच्या रिपोर्टवरचे नाव पाहिले. त्यांच्या चेहर्यावरचे भाव भराभर बदलत गेले. डॉक्टरनी एक मिनिट डोळे मिटले. कसलेचे ध्यान केले आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. डॉ. रानडे सोबत होत्याच. त्यांनी पाहिले आज या डॉक्टरांचे हात थरथरत आहेत. डॉ. रानडेंनी या डॉक्टरांच्या हाताला हळूच टोचले. सावध केले. डॉ. रानडे विचार करायला लागल्या नेहमी सफाईने ऑपरेशनची सुरुवात करणारे हे डॉक्टर आज असे नर्व्हस का झाले ? पण लगेचच डॉक्टर सावरले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सफाईदार ऑपरेशन केले.
सुमारे पाच तासानंतर सर्व ऑपरेशन मनासारखे झाले. आणि अत्यंत समाधानाने सर्व डॉक्टर्स बाहेर आले. डॉ. रानडेंच्या केबिनमध्ये आल्यावर ऑपरेशन केलेल्या डॉक्टरनी छोटा फोटो बॅगेत ठेवला आणि ते पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला गेले. डॉ. रानडे पाहत होत्या. हे डॉक्टर स्वतः पेशन्टच्या नातेवाईकांना कधी भेटत नाहीत पण आज कसे काय? याचे आश्चर्य वाटत असताना डॉक्टर बापट काकांकडे गेले आणि त्यांच्या हातावर थोपटत थोपटत ऑपरेशन छान झाले कसलीच काळजी करु नका, पंधरा दिवस त्या फक्त हॉस्पिटलमध्ये राहतील असे सांगून त्यांची काळजी कमी केली.
आय.सी.यु.मधील उत्तम उपचार, फिजीओ उपचार, औषधे यांनी बापट बाईंना बरं वाटायला लागलं. आठ दिवसांनी आय.सी.यु. मधून बाहेर काढून त्यांना स्पेशल रुममध्ये घेतले. आता स्वतः बापट किंवा बापटांची बहिण, भाचरे सर्वजण बाईंना भेटू लागले. अमेरिकेहून अविचा रोज व्हिडीओ कॉल येत होता. ऑपरेशनला जवळ जवळ पंधरा दिवस झाले आणि बापट बाईंची तब्येत व्यवस्थित दिसू लागली. त्यांच्या छातीतील दुखणे कमी झाले. श्वासोश्वास व्यवस्थित चालू झाला. शुगर कंट्रोलमध्ये आली. ब्लडप्रेशर नॉर्मल झाले. बापट बाईंनी थोडा थोडा चालण्याचा व्यायाम सुरु केला आणि शेवटी बापट बाईंच्या डिस्चार्जचा दिवस उजाडला. सोमवार ८ सप्टेंबर रोजी बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार होता. ऑपरेशन करणार्या डॉक्टरांचे रोज हॉस्पिटलमध्ये फोन येत होते. बापट बाईंची विचारपूस करत असताना त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार हे कळताच, मी सोमवारी संध्याकाळी पाच वाजता येतो आहे, मी पेशंटला तपासतो आणि मगच डिस्चार्ज द्या असा डॉक्टरांचा निरोप आला.
सोमवार, ८ सप्टेंबर –
आज बापट बाईंना डिस्चार्ज मिळणार म्हणून हॉस्पिटलमध्ये पुन्हा सर्व तपासण्या झाल्या, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. औषधे, घ्यायची काळजी, आहार याबद्दल सर्व माहिती दिली गेली. सकाळ पासून बापटांचे नातेवाईक भेटून जात होते. शुभेच्छा देत होते. बाई पुन्हा पुन्हा या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्सना, नर्सेसना, वॉर्डबॉयना धन्यवाद देत होत्या. त्या सर्वांनी बाईंची खूपच काळजी घेतली होती. ऑपरेशन करणारे डॉक्टर पाच वाजता यायचे होते तेव्हा त्या त्यांचे आभार माननार होत्या.
संध्याकाळचे पाच वाजले आणि हॉस्पिटलसमोर डॉक्टरांची गाडी उभी राहीली. डॉक्टरांची पत्नीपण समवेत होती. दोघ दुसर्या मजल्यावरील हार्ट डिपार्टमेंटमध्ये आली. डॉ. रानडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दोन मिनिटे बोलून डॉक्टर आणि त्यांची पत्नी डॉ. रानडेंसह बापट बाईंच्या रुममध्ये आली. रुममध्ये बापट साहेब, त्यांची बहिण, भाचा-भाची सर्वजण होते. डॉक्टर आत आले आणि त्यांनी हळूच खिशातून काहीतरी बाहेर काढले. सर्वजण डॉक्टरांकडे पाहत होते. एवढ्यात डॉक्टरांनी बासरी आडवी करत ओठाकडे नेली आणि बासरीतून मधुर सुर बाहेर पडू लागले. रुममधील सर्व मंडळी डॉ. रानडे, नर्स, वॉर्डबॉय सर्वजन हे काय नवीन डॉक्टरांचं बासरी वादन असं म्हणत असताना, बापट बाई डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी हात अर्धवट वर घेत असताना बासरी तोंडात घेतलेले डॉक्टर त्यांच्या समोर आले. बाईंच्या डोळ्यासमोर अचानक मालवण, फोकांड्याचा पिंपळ, बासरीसाठी हट्ट धरणारा कृष्णा आठवला आणि तीच बासरी, बासरी तोंडात धरण्याची तीच पध्दत, तसेच वाजवलेले ते सुर कानात पडताच बापट बाई ओरडल्या – कृष्णा ! कृष्णा !!
रडत रडत डॉक्टर त्यांच्या पायावर कोसळत म्हणाले – होय बाई, मीच तुमचा कृष्णा.
गंगा-जमुना डोळ्यातून वाहणार्या बापट बाई त्यांचे तोंड हातात धरत म्हणाल्या,
‘‘कुठे होतास रे बाळा ? वेड्यासारखी आयुष्यभर शोधत राहिले रे कृष्णा ! काही न सांगता गेलास रे बाळा’’
गदगदलेल्या स्वरात डॉक्टर बोलू लागले – ‘‘होय बाई, तुमच्या कृष्णाला क्षमा करा किंवा तुम्ही क्षमा करावी म्हणूनच एवढ्या वर्षांनी तुम्ही याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलात. बाई सिनेमात असे योगायोग असतात, भाऊ-भाऊ अनेक वर्षांनी भेटतात, आई मुलाची ताटातुट होते, पुन्हा भेटतात आपण अशा सिनेमांची चेष्टा करतो, पण खरोखरच असा योगायोग माझ्या आयुष्यात येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते, किती छान योगायोग हा !’’ डॉक्टर रडत रडत पुढे म्हणाले – डॉ. रानडे त्या दिवशी ऑपरेशन करताना पेशंटच्या चेहर्याकडे लक्ष गेले आणि मी दचकलोच माझी आईच ऑपरेशन टेबलावर होती. ज्या हृदयात माझ्या बद्दल प्रेम, वात्सल्य काठोकाठ भरलेलं आहे तेच हृदय मला फाडायचं होतं. सुरुवातीला माझे हात थरथरु लागले. मी इमोशनल होत गेलो. पण डॉक्टर रानडे तुम्ही मला टोचलत आणि माझ्या लक्षात आलं समोर ऑपरेशन करायचं आहे ते माझ्या आईचं नव्हे पेशंटचं. पेशंट आपलं शरीर आम्हा डॉक्टरावर विसंबून स्वाधीन करतो, त्या पेशंटला मला बरं करायचयं, आणि मग मी सफाईने ऑपरेशन केलं.’’
बापट बाई आणि त्यांच्या पायाकडे बसलेले शिंदे पाहून इतरांच्या काही लक्षात येत नव्हते. कोण आई ! कोण बाई ? एवढ्यात तिथे बसलेले बापट साहेब पुढे झाले. त्यांनी कृष्णाला ओळखले. ‘‘कृष्णा ! आम्ही किती शोधलं तुला. या तुझ्या बाईंना वेड लागायचं बाकी होतं, तु निदान एखादं कार्ड तरी पाठवायचं, कुठं होतास तू?’’
‘‘मी एक कार्ड पाठवलं होत काका, पण ते कार्ड पत्ता चुकीचा म्हणून परत आलं, मग मी बारावी पास होऊन मेडिकलला अॅडमिशन मिळाली हे सांगायला मालवणला गेलो होतो तेव्हा तुम्ही मालवण सोडलं होत.’’
बापट काकांनी बापट बाईंच्या पायाकडे बसलेल्या डॉ. शिंदेना वर उचलल आणि बाईंच्याच बाजूला बसवलं.
‘‘खूप आनंद झाला रे कृष्णा, अवि अमेरिकेला असतो. या पुण्यात हे आणि मी. गेली काही वर्षे मधुमेह आणि प्रेशरने मला त्रस्त केलं. मला कंटाळा येतो रे कृष्णा, एक सारखी मालवणची आठवण येते. आपली शाळा, ते मुख्याध्यापक सामंत, तो सहावीचा वर्ग आणि शेवटच्या बाकावर निश्चल डोळ्यांनी समोर पाहणारा कृष्णा.’’
डॉ. शिंदे बोलू लागले – ‘‘डॉ. रानडे, आज तुम्हाला हा प्रसिध्द हार्टसर्जन डॉ. शिंदे दिसतो तो या माऊलीमुळे. माझी आई मला लहानपणीच सोडून गेली तेव्हा मी सैरभैर झालो होतो. तेव्हा या माऊलीने आपल्या तोंडातला घास मला भरवला. आपल्या मुलासारखंच मला वाढवलं. पण मी एवढा कृतघ्न की यांना न सांगता बाबा बरोबर गावी गेलो. पण बाई, काका माझा नाईलाज झाला हो, मी होतो केवढा जेमतेम अकरा वर्षाचा आमच्या गाववाल्यांनी माझ्या बापाच लग्न ठरवलं आणि माझा बाप हुळहुळला. काही विचार न करता मालवण सोडूया म्हणाला, मी नाही म्हटलं तेव्हा मला बेदम मारलं आणि चार पाच भांडी गोणत्यात घालून एसटी पकडली. या परिस्थितीत मी पोटाकडून दडवून ठेवली ती ही बासरी. फोकांड्याच्या पिंपळाकडे आलेल्या एका बासरी विक्याकडून माझ्या मनात भरलेली ही बासरी या मातेने मला घेऊन दिली. तशीच बासरी यांच्या मुलाला अवि ला पण हवी होती. पण त्या बासरी विक्याकडे अशी एकच बासरी होती, अवि हट्ट करु लागला तेव्हा स्वतःच्या मुलाला अविला दोन चापट्या देऊन ही बासरी मला देणारी ही माझी माता. मालवण सोडताना ती बासरी तेवढी मी बरोबर घेतली.
आमच्या गावाकडे आल्यानंतर बाबाचे लग्न झाले आणि तो चेकाळलाच. माझ्या नवीन आईला मी नकोच होतो. पुन्हा एकदा दोन वेळच्या खाण्याची पंचाईत. पण बाबाने एक मोठी गोष्ट केली माझ्यासाठी सातार्यात रयत शिक्षण संस्थेत नेऊन माझा दाखला दिला आणि आयुष्यात दुसर्यांदा मला आधार मिळाला. रयत संस्थेत वसतीगृहात राहणे आणि शाळेत शिकणे या संस्थेने मला घडवले. इथेही चांगला अभ्यास केला. शाळेत सतत पहिला येत राहिलो. या सातारा शाळेचे मुख्याध्यापक कदम साहेब यांनी प्रोत्साहन दिले. दहावी, बारावीत बोर्डात आलो आणि या कदम साहेबांमुळे मेडिकलला गेलो. या कदम साहेबांनी आपली मुलगी मला दिली आणि तीच माझी पत्नी डॉ. जयश्री. बाई ही तुमची सून जयश्री.
जयश्री येऊन बाईंच्या बाजूला बसली. बापट बाईंनी जयश्रीला जवळ घेतले. किती गोड सून माझी ! मी अविच्या मागे लागले आहे, लग्न कर लग्न कर, पण अजून तो मनावर घेत नाही. पण कृष्णा तू मला पहिली सून दिलीस.
बाई किती वर्षांनी तुम्ही दिसलात. आज खरं तर हवी तशी चांगली बासरी मी विकत घेऊ शकतो पण आजही रोज नियमितपणे हीच बासरी वाजवतो तुम्ही घेऊन दिलेली. ही बासरी माझ्यासाठी अमूल्य आहे आणि माझ्या आईने ती मला घेऊन दिली आहे.
डॉ. रानडे आणि हा हॉस्पिटल स्टाफ, तुम्हाला कदाचित हा फॅमिली ड्रामा वाटत असेल तर तसे नाही. माझ्या डोळ्यात आलेले हे अश्रू अस्सल आहेत. मोत्यासारखे.
‘‘होय रे कृष्णा, यात खोटेपणा कसा असेल. आणि कृष्णा मी तुझ्यासाठी फार केल असं समजू नकोस, मुख्याध्यापक सामंत म्हणाले होते, ‘‘बाई या पोरक्या पोराची आई होण्याचा प्रयत्न करा, तसा मी प्रयत्न केला.’’
‘‘प्रयत्न केला नाही, आईच झालात तुम्ही बाई.’’
‘‘होय रे कृष्णा, मी आईच तुझी.’’
‘‘तर मग बापट काका, आई तुम्ही आता माझ्या म्हणजे आपल्या घरी जायचं. तसं तुम्हाला या ऑपरेशननंतर डॉक्टरची गरज आहेच. आम्ही दोघंही तुमची काळजी घेऊ आणि आपल्या घरात मला आईबाबा हवेत. जयश्रीला पण सासूसासरे हवेत. तेव्हा नाही म्हणू नका. आईबाबा आपल्या घरी चला.
‘‘कृष्णा आम्ही येतो तुझ्या बरोबर नाहीतरी आम्ही पुण्यात दोघंच राहून कंटाळलोय, आम्ही आपल्या घरी जाऊ आणि कृष्णा, जयश्री माझी एक इच्छा आहे, आपण लवकरच मालवणला जाऊया. मला ती आपली शाळा, तो मालवणचा समुद्र, तो फोकांड्याचा पिंपळ, ते भरड आणि तू शाखेत जायचास ते नारायण मंदिर सर्व डोळे भरुन पहायचं आहे.’’
‘‘होय आई, मला पण मालवणला जायची केवढीतरी घाई झाली आहे. आणि आईबाबा नुसतं मालवणात जायचं नाही, मालवणात आपलं घर बांधायचं.’’
‘‘होय कृष्णा माझीपण इच्छा आहे, आयुष्याची अखेर त्या मालवणात व्हावी. त्या मालवणच्या मातीत माझ्या अस्थी विरघळाव्या.’’
‘‘होय आई, चला आपल्या घरी.’’
डॉ. शिंदेनी खूणा करताच बापट बाईंच्या बॅगा, औषधे वॉर्डबॉयने डॉक्टरांच्या गाडीत नेऊन ठेवले आणि डॉ. शिंदे आणि जयश्री श्ािंदे आईबाबांना सांभाळत गाडीकडे घेऊन गेले. गाडी सुरु झाली आणि ड्रायव्हरने टेप चालू केली. बाबुजी सुधीर मोघेंचं गाण आळवत होते.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश….
दरी खोर्यातून वाहे, एक प्रकाश प्रकाश….
एक प्रकाश प्रकाश……