ऐसे भी होता है :REAL STORY एक थरारक अनुभव पार्ल्याहून Terminal 2 ला जाणाऱ्यांसाठी सावधगिरी सोनिया पुरुषोत्तम चांदोरकर
Hello,….. ऐसे भी होता है :REAL STORY
एक थरारक अनुभव
पार्ल्याहून Terminal 2 ला जाणाऱ्यांसाठी सावधगिरी
9.11.2018
काल मी आणि रागिणी (माझी सून) गोवा येथे तिच्या माहेरी जाण्यास निघालो. टॅक्सी, ओला, उबेर काही नसल्याने ट्रेन ने एअरपोर्ट पर्यन्त जाण्याचा निर्णय घेतला- विमान रात्रीं 2.20 चे होते.
पार्ले पर्यंतचा प्रवास नीट झाला. पार्ल्यात स्टेशनला रिक्षा पकडली आणि घटना सुरू झाल्या.
एक चौक गेला आणि तो म्हणाला 150रू. होतील. मी त्याला म्हटले की तू बसतानाच का नाही सांगितले ? तू मिटर सुरू कर, त्याने होतील तेवढे देऊ. नाहीतर इथेच गाडी थांबव आम्ही बघतो काय करायचे. आश्चर्य म्हणजे तो थांबवायला तयार झाला. आम्ही उतरू लागलो तर म्हणाला दुसरी रिक्षा मिळवून देतो. पून्हा यू टर्न मारून एका रिक्षा पाशी थांबला आणि म्हणाला इनको पहुचाना है।
तेव्हा मला वाटले हा असे काय म्हणतो? मग एअरपोर्ट चे रिक्षा वाले वेगळे असतील सो त्यांना समजायला असे म्हटले असेल, असे वाटले. जायच्या नादात खूप अर्थ लावत बसले नाही.
आता रात्रीचे 11.45 झाले होते.
आम्ही बसलो. रिक्षात मी राईटला, मध्ये आमची फोर व्हिलर बॅग आणि लेफ्ट ला रागिणी. तिची पर्स खांद्याला तिरकी अडकवलेली आणि आमच्या दोघींच्या मध्ये ठेवलेली पूर्णपणे सेफ.
त्याने मिटर सुरू केले गाडी सुरू झाली. आता 5 मिनिटांत पोहोचू अशा विचारात दोघीजणी पण थोडा वेळ गेला तरी इंटरनॅशनल एअरपोर्ट येईना. रस्ता निर्जन, मनात शंकेची पाल चूकचुकली. रागिणी म्हणाली, विचारू या का ? आणि तेवढ्यात लेफ्ट साइडने रागिणीच्या बाजूने एक मोटरसायकल आली. एक जण गाडी चालवत होता आणि एक मागे बसला होता. दोघांनी काळे कपडे घातले होते.
डोक्यावर लाल हेल्मेट. गाडी जवळ आली आणि काय होते समजायच्या आत मागच्याने हात आत घालून पर्स खेचायला सुरुवात केली. रागिणीने पूर्ण शक्तीनिशी ती धरून ठेवली. अक्षरशः पिक्चर प्रमाणे थरार सुरू होता. दोघेही आपापल्या परीने ती खेचत होते. पण त्याने असा काही धक्का दिला की पर्स त्याच्या हातात आणि मागचा पट्टा रागिणी कडे आला. मला काय चालू आहे हे लक्षात आले पण मधली मोठी बॅग मला काहीच करू देईना. रिक्षावाल्याला म्हंटले गाडी लेफ्टला घे जेणे करून त्याला धक्का बसेल पण तो घाबरला होता किंवा त्यांचाच होता तो रिक्षा पॅरलली चालवत होता. हे सर्व होताना रस्ता निर्मनुष्य होता. ओरडून काहीच उपयोग नव्हता. रागिणी पर्स ओढण्याचा नादात खूप बाहेर जात होती. ती ओरडत होती,’ माझी पर्स, माझा मोबाईल.’ सगळे चालूच होते. अचानक मला जाणवले आपण काही करू शकत नाही आणि मी रागिणीला मागे आत खेचले. जाऊ दे पर्स, पैसे, मोबाईल आणि त्याच क्षणला बाईकवाल्याने पर्स हस्तगत केली.
रागिणी रडत होती, घाबरली होती. समोरून त्या बाइकवाल्याने मागे वळून विजयाने पर्स उंचावून दाखवली. मला खूप असहाय्य, हतबल झाल्यासारखे वाटले.
मी पुन्हा रिक्षा वाल्याला गाडी त्यांच्या मागे न्यायला सांगितली. त्यानेही केल्यासारखे दाखवले आणि अचानक 2/ 3 किंवा जास्त रिक्षा आमच्या दोघांच्या (बाईक व रिक्षा) मध्ये आल्या. आम्हांला पुढे जाता येईना. बाईकवाला मस्त निघून गेला. आता रिक्षावाला चोर चोर ओरडायला लागला. मी त्याला म्हटले अभी चिल्लाओ मत।
रागिणी सारखी गाडी थांबवायला सांगत होती तिच्या गळ्याला जोरदार हिसका बसला होता. तिथे तिला irritation सुरु झाले होते. त्याने ही एक टर्न घेऊन एका चौकात गाडी थांबवली. लगेच मागून 2 3 रिक्षावाले आले. काय झाले विचारू लागले? पर्स चोरी हुआ क्या? विचारले. मला आश्चर्य वाटले. मी त्याला म्हटले की तुम्हांला कसे कळले ? तर म्हणे आम्ही मागे होतो बघितले पण तेवढा स्पीड घेता आला नाही. पण हे पटणे शक्य नव्हते. बोलून काहीच उपयोग नव्हता. मग गस्तीचे पोलीस आले त्यांना सर्व सांगितले असे असे झाले. आमचे तिकीट गेले होते. रागिणीच्या नावावर बुक केलेले त्या मुळे तिचे आयकार्ड लागणार होते, ते गेले होते.
रागिणीचे म्हणणे होते आपण घरी जाऊ या. पण मला ते पटत नव्हते आणि बाकी रिक्षा वाले त्याचाही फायदा घेतील असे वाटत होते. मी ठरवले 12 वाजले आहेत 1 पर्यंत पोचायचे आहे. एक तास काही प्रयत्न करू या तिकीट साठी. आधी त्या पोलीसाला विचारले FIR करायची आहे. कुठे करू ? एक जण म्हणाला 2 तास जातील. एक म्हणाला 15 मिन. लागतील. मी विचारले नक्की उत्तर द्या. त्यांनी सांगितले की वेळ लागेल पण ती असेल तर कदाचित तुम्हाला एअरपोर्ट ला एन्ट्री मिळेल. मग त्याच रिक्षावाल्यांना म्हंटले पोलीस स्टेशनला घ्या. त्या इन्स्पेक्टर ला म्हटले तुम्ही बरोबर या, ती घाबरली आहे, रडते आहे, मी एकटी आहे. त्यानेही ऐकले, मग आम्ही रिक्षात आणि पोलीस त्याच्या गाडीवरून सहार एअरपोर्ट पोलिस चौकीवर निघालो. मधल्या काळात आमचा आधीचा रिक्षावाला आम्हाला सोडून जायचे म्हणू लागले. मी त्याच्या गाडीचा फोटो काढून घेतला. जो रिक्षावाला मदत करत होता त्याचा आणि गाडीचा फोटो काढून घेतला.
आम्ही पोलीस स्टेशनला आलो तर तिथे बरीच गर्दी. कोणी काहीच धड सांगेना. पण तितक्यात तो इन्स्पेक्टर आला आणि त्याने स्टेटमेंट लिहून घ्यायला सांगितले. त्यांची जेवणाची वेळ झालेली. ती पोलीस म्हणे अर्ध्या तासाने या. तिला विनंती केली तासाभरात आम्ही एअरपोर्टला नाही पोचलो तर काहीच उपयोग होणार नाही. प्लीज काहीतरी करा. मग दुसऱ्या एकाला तिने लिहून घ्यायला सांगितले. सगळे प्रश्न, पर्स मध्ये काय काय होते ? घराच्या चाव्या, बँकेची कार्ड्स, पॅनकार्ड, मोबाईल आणि काही कॅश.
मग सुचेताला (माझी बहिण) फोन केला घरी जाऊन लॉक बदल. ती आणि भुषणही(बहिणीचे यजमान) धावत जाऊन ते करुन आले.
रागिणीच्या बाबांना फोन तिकीट मला तिकीटाचा मेल करा. पोलिसांना विनंती FIR द्या. सगळे करेपर्यंत 1 वाजला. पुन्हा रिक्षा करून एअरपोर्ट. तिथे security ला सगळे सांगून माझे आयकार्ड दाखवून आत प्रवेश, आमचे काउंटर बंदच होत होते. लॉक करत होते. पुन्हा त्यांना सगळे सांगून FIR दाखवून तिकीट मिळाले. इंटरनॅशनल एअरपोर्ट वर डोमेस्टिक साठी आत गेट 47.
सगळी धावपळ. सगळे होई पर्यंत विमानात पोचेपर्यंत 1.50.
हुश्श
पण असेच सेम 1 2 महिन्यापूर्वी रागिणीच्या बाबांबरोबर ही घडले होते. पण त्यांनी आयत्यावेळी रिक्षावाल्याने सांगितलेली रिक्षा किंवा टॅक्सी पकडली नाही. मी बघतो म्हणाले.
अजूनही एकीच्या बाबतीत असे घडले. याचा अर्थ हे टोळके कार्यरत आहे. तरी सर्वांनी सावध असावे, याचसाठीच हा लेखन प्रपंच.
बाकी आम्ही सुखरूप आहोत. गोव्यात पोचले. वरील अनुभव इंटरनॅशनल एअरपोर्टवर T2 येतो. तरी सर्वांनी सावधगिरी बाळगावी.
सोनिया पुरुषोत्तम चांदोरकर