आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली ★ही वाट वळणाची (2)★

युनिटी एक्स्प्रेशन ची अत्यंत प्रसिद्ध आणि आपली आवडती लेखिका – सौ मधुर कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेली
★ही वाट वळणाची (२)★
★स्वप्ना★
मी रितेशला रागाच्या भरात बोलून तर गेले पण मला जाणवलं,माझं हृदय,माझं मन त्याच्यात इतकं अडकलं होतं की तो राग मी विसरूनच गेले. मी त्याच्यावर प्रचंड प्रेम करायला लागले होते. त्याच्याशिवाय जगणं तर खूप दूर,रोजचे व्यवहार सुद्धा मी नीट करत नव्हते. सतत डोक्यात रितेश आणि डोळ्यात अश्रू! दोन दिवसांनी मी त्याला मेसेज टाकला…
–कधी परत येतो आहेस?–
–अजून दोन दिवस लागतील—
एवढंच त्याने उत्तर दिलं पण आता मीच माघार घेणार होते कारण मी रितेशशिवाय आता राहू शकत नव्हते. त्याचं मला समजून घेणं,मला एखाद्या लहान मुलीसारखी वागणूक देणं हे सगळं मला हवं होतं. लहान होऊनच त्याच्या कुशीत शिरायचं होतं… हो! आजवर आम्ही दोघांनी संयम पाळला होता,स्पर्शापासून दूर होतो पण आता मीच पुढाकार घेऊन त्याच्या मिठीत…नव्हे कुशीत शिरणार होते. तिथे मी माझं साठलेलं दुःख हलकं करणार होते. रितेशवरचा माझा राग क्षणात निवळला. मी त्याची आतुरतेने वाट बघू लागले.
दोन दिवसांनी बसस्टॉपवर मला रितेश दिसला. एखाद्या अवखळ तरुणीसारखी मी धावत सुटले. रितेशजवळ आले आणि नकळत त्याचा हात घट्ट धरला. आता तो हात मी सोडणार नव्हते. रितेशने माझ्याकडे बघितलं, डोळ्यात तीच दुःखाची किनार! हा काय लपवतोय माझ्यापासून? का सांगत नाहीय मला? पण नकोच,आत्ता ह्या क्षणाला मला फक्त त्याचा सहवास हवाय. पुरुषांना त्यांची दुःख अशी उघड करायला आवडत नाहीत. सांगेल तो मला! आम्हा दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज होती. आणि तेच माझ्यासाठी महत्वाचं होतं. रितेशचा हात घट्ट धरत मी म्हणाले,”आज हाफ डे टाकू,तू पण ऑफिसमध्ये कळव.”
“स्वप्ना, माझी ऑलरेडी पाच दिवस रजा झालीय. लगेच शक्य नाही. पुढच्या आठवड्यात! ओके?” माझ्या हातावर थोपटत तो म्हणाला.
“डन!” मी अगदी शहाण्या मुलीसारखी हसून मान डोलावली.
रोज रात्रीच्या व्हाट्स अप मेसेजेसमुळे आम्ही अधिक निकट येत होतो. तो त्याचे प्रोब्लेम्स कधीच सांगत नव्हता. मी विचारत देखील नव्हते. तो फक्त माझा आहे,ही भावनाच इतकी सुखावह होती की मी सगळं जग विसरायला लागले. माझ्या चेहऱ्यावर एक ग्लो यायला लागला,मरगळ दूर होत होती. बाबा गेल्यानंतरचं औदासिन्य पळून गेलं होतं. उत्साह ओसंडून वाहत होता.
***
ऑफिसमधून घरी आले आणि दारातच मोबाईलची रिंग वाजली. नंबर होता. मी हॅलो म्हणले तरी पलीकडून काहीच आवाज नाही. जरा वेळाने रडण्याचा आवाज आला.
“स्वरा?” मी नकळत ओरडले
“स्वरा,कशी आहेस? का रडतेय इतकी? अग, बोल ना,जीव चाललाय माझा इथे! तू सुरक्षित आहेस ना? का फसवली गेली आहेस?”
“ताई, माझी काळजी करू नकोस. तुला आणि आईला मी काहीही न सांगता हा निर्णय घेतला,तुमचा जरा सुद्धा विचार केला नाही, ही भावना मन पोखरत होती. ताई,मला माफ कर! बाबा गेल्यावर मी भावनिक रित्या खूप हळवी झाले होते,अशात बिपीन भेटला,त्याने मला खूप मानसिक आधार दिला. त्याच्याशिवाय जगणं असह्य वाटायला लागलं. तू आणि आई हे स्वीकारणं शक्यच नव्हतं म्हणून मी हे पाऊल उचललं. मला माफ कर.”
“स्वरा,एकदा ग,एकदा जरी बोलली असतीस तर नक्कीच काहीतरी मार्ग काढला असता. उथळ वागलीस तू! आईला जबरदस्त धक्का बसला आहे. पण तू ठीक आहेस ना?”
“ताई,बिपीनच्या आईला मी पसंत नाही. त्यांना गुजराती सूनच हवी होती. त्याच्या वडिलांनी मला स्वीकारलं आहे. पण त्यांच्या बिझिनेसमध्ये आत्तातरी बिपीन जॉईन होऊ शकत नाही. एका दुकानात तो अकाउंट्स बघतो. मी टुशन्स सुरू केल्या आहेत. होईल सगळं नीट,माझा विश्वास आहे. तुम्ही काळजी करू नका. मी मधून मधून फोन करत जाईन. आईशी नंतर बोलते. बाय!”
स्वराने फोन बंद केला आणि मनात विचार आला, वडील नाही म्हणून आम्ही दोघी पुरुषी आधार शोधत होतो का? स्वराने निर्णय घेतला कारण आईची काळजी घ्यायला मी आहे हे तिला ठाऊक होतं. पण मी? मी असं कदापिही करू शकणार नव्हते. आईचा विचार करूनच ह्यापुढंचं आयुष्य मला जगायचं होतं.
रात्री रितेशचा मेसेज आला…
—-स्वप्ना, उद्या रजा घेऊ शकशील का? मी उद्या रजा टाकतोय. निवांत भेटू,फिरू,गप्पा करू! फक्त तू आणि मी!—
—-येईन मी! तू म्हणशील तिथे!—-
मी त्वरित उत्तर दिलं. मला काहीही आजूबाजूचं भान नव्हतं. रितेशबरोबर आख्खा दिवस,ह्या कल्पनेनेच मी प्रफुल्लित झाले. मला एक दिवसासाठी माझ्या सगळ्या विवंचना विसरायच्या होत्या…!
***
मी ऑफिसमध्ये मी येत नाही हे कळवलं आणि श्रुतीला फोन लावला,
“श्रुती,मी आज दिवसभर बाहेर आहे. ऑफिसला येत नाहीय.”
“स्वप्ना,काय चाललंय तुझं? किती रजा घेते आहेस. अग तुला नोकरी टिकवायची आहे ना? नोकरी लागून तुला वर्ष पण झालं नाही.”
“मी माझ्या मामे बहिणीला भेटायला जाते आहे. बरेच दिवसांनी आम्ही भेटतोय. आणि तू माझ्यावर चिडू नकोस. ह्यानंतर मी रजा घेणार नाही.” मी जास्त बोललेच नाही.
घरातून निघताना आईला सांगितलं,
“आई,आज मी बिझी आहे,काही अर्जंट असेल तरच फोन कर.”
श्रुती आणि आई,दोघींशीही मी खोटं बोलले होते.पण मला कशाचीही पर्वा नव्हती. डोळ्यासमोर फक्त रितेश दिसत होता. ठरल्यावेळी मी स्टॉपवर आले. रितेश माझी वाटच बघत होता. मी हसत त्याचा हात धरत म्हणाले,
“अरे पण जायचं कुठे? आणि मला ऑफिस सुटतं त्यावेळी घरी जायला हवं!”
“आत्ता तर आली आहेस आणि लगेच जायच्या गोष्टी? आत्ता मस्त गरम चहा घेऊ,त्यानंतर इथल्या जवळच्या बागेत बसू,गप्पा करू. नंतर छान हॉटेलमध्ये जेवू!”
“हे चहा आणि जेवण ह्यासाठी तू मला बोलावलं आहेस का?” मी हसत म्हणाले.
त्याचा हात मी सोडलाच नव्हता. कुणी बघितलं तर काय? हा प्रश्नच मनात येत नव्हता. आज मला मुक्त जगायचं होतं,माझ्या प्रिय रितेशबरोबर! चहा घेतला,गरम भजी खाल्ली आणि बागेत येऊन बसलो. तो त्याच्या कॉलेजमधल्या गमती मला सांगत होता. मी तर कॉलेज लाईफ बाबा गेल्यावर विसरूनच गेले होते. परत आठवणींना उजाळा मिळाला.
“स्वप्ना, तुझ्यावर खूप मुलं फिदा असतील ना ग? त्यातला एकही नाही आवडला?”
“खरंच नाही रे! असं कधीच कोणाबद्दल वाटलंच नाही.”
“मग माझ्याबद्दल एकदम का? तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही. तरीही?”
“ह्याचं उत्तर नाही माझ्याकडे! खरं सांगू? तुझे डोळे आधी आवडले,मग तू मला जे जपायला लागलास ते आवडत गेलं,तुझं माझ्याशी हळुवार बोलणं, मला प्रोत्साहन देणं, सगळं आवडायला लागलं. तुझ्या दिसण्यावर मी भाळलेच नाही. तुला ती लैला-मजनूची गोष्ट माहितीय ना? ‘कैस’ त्याचं खरं नाव! लैलासाठी वेडा झाला म्हणून त्याला मजनू म्हणतात. तो ‘कैस’ दिसायला अत्यंत सामान्य होता,पण लैलावर जीवापाड प्रेम करत होता. लैलाला जेव्हा विचारायचे,ह्याच्यात तू काय बघितलं? तेव्हा ती उत्तर द्यायची,”कैस को लैला की आंखोसे देखो!” दोन प्रेमी जेव्हा एकमेकांवर जीव लावतात तेव्हा दिसणं,पैसा,हे काहीच नसतं रे! तिथे फक्त जीव लावला असतो.”
रितेशने माझा हात हातात घेतला.
“स्वप्ना, एक विचारू?”
“विचार की!”
“माझ्या मित्राची रूम इथून जवळच आहे. तुझी तयारी असेल तर तिथे जाऊन गप्पा मारू!”
रितेशचं हे बोलणं ऐकून माझे ठोके वाढले. काही न बोलता तशीच बसून राहिले.
“ओके! जबरदस्ती नाही. तुझी तयारी असेल तरच!” तो मला थोपटत म्हणाला.
“जाऊया चल!पण मित्राची का? तुझी असेलच की!”
“इथून माझं घर लांब आहे.”
रितेश पण सगळं ठरवूनच आलेला होता हे मला कळलं. मित्राच्या रूमची किल्ली त्याने आधीच मागवून ठेवली होती, हे माझ्या लक्षात आलं. मी उठून उभी राहिले. आज कुठलंच बंधन मला नको होतं.मला रितेशच्या कुशीत सगळी दुःख हलकी करायची होती. त्याच्या मजबूत खांद्यावर चार क्षण विसावा घ्यायचा होता. त्याच तयारीने मी आज आले होते.
रितेश मला मित्राच्या रूमवर घेऊन आला. बॅचलरची रूम असली तरी नीटनेटकी ठेवली होती. उजेड भरपूर होता,प्रसन्न वाटत होतं. गॅलरीत जाऊन एक चक्कर मारून आत आले. रितेश कॉटवर बसला होता. मी एका अनामिक ओढीने त्याच्या जवळ गेले. त्याच्या कपाळावर ओठ टेकून त्याला विचारलं,”काय दुःख आहे तुला?तुझे डोळेच सांगतात. मला सांगू शकतोस.मी शक्य असेल तर त्यातून तुला बाहेर काढेन.”
“स्वप्ना,आज दुसरं काही नको ग बोलायला! मला फक्त तू हवीस. काही क्षणांसाठी फक्त माझी!” तो तसाच मला बिलगला. मी ही नकळत त्याच्या कुशीत शिरले. डोळे भरून आले होते. माहिती नाही किती वेळ मी त्याला घट्ट बिलगून रडत होते. दोघेही कितीतरी वेळ निःशब्द होतो. मन जुळलीच होती,शरीर नकळत जवळ आलं होतं. दोन प्रेमी जीवांचं भान हरपायला किती वेळ लागणार? सगळ्या मर्यादा सोडून आम्ही एकमेकांचे झालो. पण मला कशाचीच भीती वाटत नव्हती. खूप दिवसांनी मन शांत शांत झालं होतं. ह्यापुढची माझ्या आयुष्यातील सगळी वळणं अगदी सहज पार पडतील असंच मनात आलं. रितेश माझा झाला होता,मी त्याची झाले होते. आता कुठलंही वादळ सुद्धा आम्हाला एकमेकांपासून दूर करणार नव्हतं. स्त्रीच्या आयुष्यात तिला हव्या असलेल्या जोडीदाराचं इतकं महत्व असतं हे आज कळलं. ज्याच्यासाठी ती माहेर, माहेरची माणसं, सगळं आनंदाने दूर करते. त्या क्षणी स्वराला मनोमन माफ करून टाकलं. मी पण रितेशला जन्मोजन्मी साथ द्यायची अस ठरवलं. त्यासाठी मी कुठलंही दिव्य करायला आता तयार होते…कारण माझं सगळं सुख फक्त रितेशच्या सहवासात होतं!
***
मन,शरीर सगळं मोरपिसासारखं हलकं हलकं झालं होतं. आज माझी मी नव्हतेच. रात्री शांत झोप लागली,जी बाबा गेल्यापासून लागलीच नव्हती. मला आणि रितेशला आता सहवासाची जबरदस्त ओढ लागली,आकर्षण वाढत होतं. मी घरी ओव्हरटाईम आहे असं खोटं बोलू लागले. रितेशला सतत भेटत होते.
पण एक दिवस श्रुतीला संशय आलाच. ऑफिस सुटल्यावर ती मला जबरदस्तीने कँटीनमध्ये घेऊन गेली.
“स्वप्ना! खरं सांग,कुठे गुंतली आहेस तू? आणि माझ्याशी खोटं बोलायचा जरा सुद्धा प्रयत्न करू नकोस. तुझं वागणं नॉर्मल नाहीय,हे अनेकदा हेरलं आहे मी! दोनवेळा मी तुला कॉल केला,तू उचलला नाही म्हणून मी काकूंना केला. त्या म्हणाल्या की तिचा ओव्हरटाईम आहे. का फसवते आहेस आईला? ती माऊली तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतेय. का असं वागतेय तू?”
“हो हो,फसवतेय मी तिला! मला आता सगळं असह्य झालंय ग श्रुती! एकटी पडलीय मी! आधार हवासा वाटतोय.” मी हमसून रडायला लागले.
“कोण देतंय आधार तुला? कळेल का मला?”
श्रुती हे बोलल्यावर मी चमकून तिच्याकडे बघितलं. आज मला श्रुतीला सगळं सांगावच लागणार होतं. तिचा उपदेश,तिचे सल्ले मी सगळं ऐकलं तरी मी रितेशला कधीच सोडणार नव्हते. रितेश माझ्यापासून दूर गेला तर मी माझं काही बरंवाईट…. माहिती नाही,ही चूक सुद्धा मी करू शकत होते. रितेशशिवाय मी अपूर्ण होते. त्याच्याशिवाय आयुष्य व्यतीत करणं हा विचार सुद्धा मला नको वाटत होता. प्रेमात मी आंधळी झालेय हे जरी कुणी म्हटलं तर मी ऐकून घ्यायला तयार होते. पण रितेशशिवाय जगणं? अशक्य आहे हे आता माझ्यासाठी….!
माझ्यासमोर चहाचा कप ठेवत श्रुती म्हणाली,”सांग कोण आहे तो? मला सगळं कळायलाच हवं. तू माझी फक्त मैत्रीण नाहीस,माझी लहान बहीण पण आहेस. स्वराची जबाबदारी जशी तुझ्यावर आहे,तशी मोठी बहीण म्हणून मी तुझी जबाबदारी स्वीकारली आहे.”
श्रुतीचे ते शब्द ऐकले आणि डोळे परत वाहायला लागले.
“श्रुती,मला रितेश आवडतो,प्रेम करते मी त्याच्यावर!”
“कोण हा रितेश? कुठे राहतो? काय करतो? सांग सगळं मला!”
मी आणि रितेश बसटॉपवर पहिल्यांदा भेटलो तिथपासून मी श्रुतीला सगळं सांगितलं.
“स्वप्ना,वेड लागलंय का तुला? ही असली प्रेमकहाणी फक्त सिनेमात बघायला छान वाटते. त्या मुलाचा काहीही बॅकग्राऊंड तुला माहिती नाही आणि तू त्याच्या प्रेमात पडली? हाऊ फनी!”
“प्रेम असं ठरवून होतं का ग? आवडला मला तो,अगदी मनापासून! त्याच्याबद्दल काहीच विचारावसं वाटलं नाही,इतका तो खरा वाटला. त्याचे आईवडील शिरूरला असतात. तो इथे पुण्यात एका कंपनीत सप्लायर आहे, इतकी माहिती पुरेशी नाहीय का? आणि तू पण प्रयागच्या प्रेमात पडलीच होती ना?
“हो,पडले मी प्रयागच्या प्रेमात! पण तुझ्यासारखी वाहवत गेले नाही. आवडायला लागला होता तो,पण त्याने जेव्हा मला प्रपोज केलं तेव्हा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती करून घेऊनच मी पुढचं पाऊल उचललं. तुझ्यासारखी भरकटले नाही.”
“श्रुती प्लिज! भरकटली, वाहवत गेली असं काहीही बोलू नकोस. फक्त शारीरिक आकर्षण म्हणून आम्ही जवळ आलो नाही.”
“स्वप्ना,हे तुझ्यापुरतं मी समजून घेईन. त्याचं काय? इतक्या वेळा तुम्ही भेटला तरीही तू त्याला त्याच्या घरच्यांविषयी काहीच विचारलं नाही,आणि त्याने पण तुला डिटेल काही सांगितलं नाही? धिस इज रिडिक्युलस स्वप्ना! भानावर ये. त्याची पूर्ण माहिती मला दोन दिवसात हवी आहे. आणि तुला जमणार नसेल तर मी ते करेन!”
“तू आम्हा दोघांना एकमेकांपासून दूर करणार? का असं करतेय? जगू दे की ग मला शांतपणे! आत्ता कुठे आनंदाने जगावसं वाटतंय मला श्रुती! आणि ह्यापेक्षा जास्त काय माहिती काढणार आहेस तू?”
“मी कधी म्हणाले की तुम्हाला दूर करेन? स्वप्ना,तुझं ह्यापुढचं आयुष्य सुखात जावं हीच माझी मनापासून इच्छा आहे ग! पुढे जाऊन तुला पश्चाताप व्हायला नको. ह्या क्षणिक सुखासाठी तुझ्या आयुष्याची वाताहत नको. मी उद्या स्टॉपवर येतेय सकाळी! मला भेटायचं आहे रितेशला!आणि मला त्याचा नंबर दे!”
“ये उद्या आणि तो किती प्रामाणिक आणि खरा आहे हे उद्या तुला कळेलच.आणि फोनवर तू काय बोलणार त्याच्याशी?”
“मी फोनवर बोलणारच नाहीय. डायरेक्ट उद्या सकाळीच त्याला भेटेन. उद्या भेटू! आणि शक्य झालं तर मी उद्या स्टॉपवर येतेय,हे रितेशला कळवू नकोस. निघते मी आणि तू आता घरी जा. उद्या भेटू.”
श्रुती गेली आणि माझ्या डोक्यात कोलाहल माजला. ती असं काहीतरी बोलून गेली की मला देखील मी खूप चुकतेय असं वाटायला लागलं. रितेश खरंच जर प्रामाणिक नसेल तर? कोण असेल त्याच्या घरी,त्याच्या कुटुंबात कोण कोण असेल? त्याने आईवडील आहेत हे सांगितलं होतं पण त्या पलीकडे मी देखील काहीच विचारलं नव्हतं. प्रेमात पडल्यावर ह्या असल्या प्रश्नांना काही अर्थ उरतो का? एकदा प्रेम केलं की ते निभवायचं, तीच खरी निष्ठा,तेच खरं प्रेम!
घरी आले तरी विचारचक्र थांबत नव्हतं. कसंतरी जेवण उरकलं.झोपही नीट लागत नव्हती. कधी एकदा उद्या रितेशबद्दल सगळं नीट कळतंय असं झालं. आणि रितेश प्रामाणिक नसला तर? धस्स झालं मला! प्रेमाबरोबर मी माझं कौमार्य पण त्याच्या स्वाधीन केलं होतं. भयंकर अस्वस्थ झाले मी! रितेशला फोन करावासा वाटला पण इतक्या रात्री कसा करू? देवापुढे बसून हात जोडले,”देवा,माझं मन शांत कर! सगळं चांगलं होऊ दे! रितेशला मी माझा पती मानलाय, जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप अजिबात नाहीय पण माझ्या समर्पणाची लाज राख! परत हात जोडले आणि झोपण्यासाठी कॉटवर आडवी झाले.
**
मी स्टॉपवर आले. रितेश उभाच होता. आज पिस्ता कलरच्या शर्टमध्ये फार देखणा दिसत होता. मी हुरळून गेले.कालंच सगळं विसरले. त्याचा हात धरणार इतक्यात “स्वप्ना” ही हाक ऐकू आली. मी वळून बघितलं. श्रुती येत होती. क्षणभर घाबरले पण लगेच नॉर्मल झाले.
काहीही झालं तरी रितेशला मी सोडणार नव्हते. त्याचं कुटुंब,त्याचं इन्कम, ह्या सगळ्याशी मला काही देणं घेणं नव्हतं.मला माझं प्रेम निभवायचं होतं आणि कितीही अडथळे आले तरी मी ते निभावून नेणार होते…..!
क्रमशः!
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
