★★साखरतुला★★ ©® मधुर कुलकर्णी.
★★साखरतुला★★
भार्गवी गाडी पार्क करून लिफ्टजवळ आली तर तिला दोन माणसं एक मोठं पोतं घेऊन लिफ्टपाशी दिसली.
“कोणाकडे जायंचय?” भार्गवीने त्यांना विचारलं.
“ताई,चवथा मजला, आदिनाथ आपटे.”
“ओके, मी तिथेच जातेय,चला.” भार्गवीने लिफ्टचं दार उघडलं. त्या पोत्यात काय असणार ह्याची तिला पूर्ण कल्पना होती. चवथ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिने डोअरबेल वाजवली तर आदिनाथनेच दार उघडलं.
“आदि,तू आत्ता ह्यावेळी घरी?” भार्गवीने आश्चर्याने विचारलं.
“उद्याची तयारी करण्यासाठी हाफ डे घेतला ”
“उद्याची कसली तयारी? सगळं तर कॉन्ट्रॅक्ट दिलाय. हे साखरेचं पोतं आलं आहे बघ. त्या माणसांकडून आत खोलीत ठेवून घे,जड असेल.”
आदिनाथने पोतं आत ठेवून घेतलं. त्याची पोचपावती घेऊन त्याने जी-पे केलं.
“आदि,पोत्यातली पाकिटं आपण सांगितली तेवढीच आहे ना?” सुलेखाने आदिनाथला विचारलं.
“असतील ग आई! इतकी मोजत बसणार का? तेवढा विश्वास ठेवायला हवा.”
“आई,पपा कुठे गेले? त्यांचा नेहरूशर्ट आल्टर करून आणलाय.” भार्गवी सुलेखाच्या हातात कॅरी बॅग देत म्हणाली.
“गेलेत कट्ट्यावर! मित्रांना उद्याची आठवण करून द्यायला.”
“हं! कौतुकसोहळा!” भार्गवी हसत म्हणाली.
भार्गवी आणि आदिनाथचं नात्यातल्या ओळखीतूनच लग्न ठरलं. पहिल्या भेटीतच आदिनाथला भार्गवी आवडली. मोहक चेहरा,आकर्षक बांधा आणि अगदी मोकळ्या स्वभावाची! तिचा स्पष्टवक्तेपणा लग्न झाल्यावर सगळ्यांना कळला पण ती जे काही बोलायची त्याला कोणी विरोध करू शकत नव्हतं. सुलेखाला हवी ती मदत करून भार्गवी नोकरी करत होती. बायकोच्या नात्याने आदिनाथला सगळं सुख देत होती. पण आनंदशी; म्हणजेच आदिचे वडील,तिचे तात्विक वाद व्हायचे. भार्गवी त्यांना कधीही उलट बोलली नव्हती पण त्यांचा हेकेखोर स्वभाव तिला पटत नव्हता. माहेरी भार्गवी एकुलती होती पण तिच्या आईवडिलांनी नाहक धाक दाखवून तिचं संगोपन केलं नव्हतं. आणि आदिच्या बाबतीत अगदी विरुद्ध झालं होतं. आनंदचा घरात चांगलाच दरारा होता.
सुलेखाला नवरा म्हणून आनंदबद्दल आदर होताच पण त्यांचा हेकेखोर स्वभाव तिने अंगवळणी पाडून घेतला. लग्नानंतर सुरुवातीला तिला पटलं नाही तर ती बोलायची पण काही दिवसातच तिच्या लक्षात आलं,आनंदचा अतिशय हट्टी स्वभाव होता. त्यांना जे हवं तेच व्हायला हवं! घरातील वातावरणावर त्याचा परिणाम होत होता. सुलेखाच्या वाटलं,शब्दाने शब्द वाढून नातं कलुषित व्हायला नको. तिने तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली. आदिनाथ जे लहानपणापासून बघत आला होता, तेच त्यानेही स्वीकारलं. पण भार्गवी अतिशय बुद्धिमान आणि बंडखोर होती. तिला जर पटलं नाही,तर ती मुद्दा खोडून काढायची.
भार्गवी घरात सून म्हणून आल्यावर आनंदचा आणि तिचा वाद झालाच. भोरला आनंदची वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती. आनंद मोठा मुलगा आणि धाकटा संदेश! भोरला वडिलांचे कॅसेट विकण्याचे दुकान होते. आनंद इंजिनिअर होऊन पुण्यात नोकरीला लागला. उदंड पैसा कमावला पण संदेश फार शिकला नाही. वडिलांचे दुकान पुढे चालवण्याचे त्याने ठरवले. संदेशला एक मुलगा होता,प्रवीण! प्रवीणला वाईट संगत लागली आणि तो बारावीनंतर शिकलाच नाही. मित्रांच्या टोळक्यात उनाडपणा करायचा आणि व्यसनं करायची,हेच त्याचं आयुष्य झालं.
कालांतराने कॅसेट बंद पडल्या. संदेशने सी डी विकण्यास सुरवात केली,पण टेक्नॉलॉजी इतकी झपाट्याने बदलली की हे सगळं मागे पडलं. दुकान चालेनासं झालं. घरात कोणाचीच कमाई नाही. बँक बॅलन्स संपत आला,तेव्हा भोरचे घर विकायचे ठरवले. त्यावेळी आनंदने संदेशला सांगितले, “मला काही नको. ते सगळे पैसे तू ठेव.”
सुलेखाला हे कळल्यावर ती नाराज झाली. “आनंद,त्या प्रॉपर्टीवर आदिचा पण हक्क आहे,ती वडिलोपार्जित इस्टेट आहे.”
“मला काहीही कमी नाही,माझ्या मुलाला जे काय द्यायचं त्यासाठी मी समर्थ आहे. संदेशचा मुलगा काहीही करत नाही. त्याला गरज आहे. आणि तू ह्यात न पडलेली बरं! आम्ही भावंडं बघून घेऊ.” नेहमीप्रमाणे सुलेखाने माघार घेतली.
सह्या करण्यासाठी भोरला जेव्हा आनंद आणि आदिने जायचे ठरवले तेव्हा भार्गवी मध्ये पडली.
“पपा, संदेशकाकांचा मुलगा प्रवीण काहीच करत नाही,ही त्याची चूक आहे,त्यासाठी आदिला का शिक्षा? त्याचाही त्या इस्टेटीवर तितकाच हक्क आहे.”
“भार्गवी, हा माझा आणि आदिचा निर्णय आहे.”
“आदिचं मत? तुम्ही विचारलं त्याला?त्याचा होकार समजून मोकळे झाला. मी कुटुंबाची एक सदस्य म्हणून मला देखील बोलायचा अधिकार आहे. मान्य आहे,आपल्याला काही कमी नाही पण म्हणून हक्क का सोडायचा? आणि प्रवीणकडून काय अपेक्षा ठेवणार? त्याने तो मिळालेला पैसा सगळा खर्च केला तर संदेशकाका आणि काकूचं म्हातारपण भयावह होईल.आदिला मिळालेली रक्कम कदाचित उद्या आपण संदेशकाकांना देऊ शकू.”
भार्गवीचं हे वाक्य ऐकून आनंद चमकले. ही मुलगी इतका पुढचा विचार करतेय ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं.
भार्गवीने आपला हट्ट सोडला नाही. प्रॉपर्टीतला थोडा हिस्सा तिने आदिच्या नावाने करायला लावला. आयता पैसा हातात आल्यावर प्रवीणची व्यसनं वाढली आणि धाक दाखवून तो पैसा हडप करू लागला. पाण्यासारखा पैसा खर्च व्हायला लागला.
“पपा, मला असं वाटतंय की आता संदेशकाका आणि काकूला पुण्यात एक छोटा फ्लॅट घेऊन द्यावा. प्रवीणकडून आता कुठलीही अपेक्षा नाही. उद्या वेळ पडली तर मी आणि आदि त्या दोघांचे करू. काका हे वडिलांच्या जागीच असतात आणि त्यांना तरी प्रवीणने काय सुख दिलंय?” भार्गवी आनंदला म्हणाली.
कुणाचेही न ऐकणारे आनंद त्या दिवसापासून भार्गवीचे ऐकू लागले. भार्गवी जेवढी बंडखोर आहे तितकीच प्रेमळ,हळवी आहे हे त्यांना जाणवलं. भार्गवीने पुढाकार घेऊन संदेशकाका आणि काकूला एक बेडरूमचा फ्लॅट पुण्यात वाकडला घेऊन दिला.
दोन गोड नातवंडांचे आनंद आणि सुलेखा आजी-आजोबा झाले. ज्या घरात आनंदचा धाक होता तो आता निवळू लागला. आनंदची पंचाहत्तरी करायची असं आदि आणि भार्गवीने ठरवलं.
“आई,पपांची ‘साखरतुला’ करूया.”
भार्गवी उत्साहाने सुलेखाला म्हणाली.
“खरं तर आनंदच्या कठोर भाषेत माधुर्य आणायचं श्रेय तुलाच आहे ग बाई!” सुलेखा हसत म्हणाली.
साखरेच्या पोत्यातली पाकिटं नीट मोजून आदिने ती परत पोत्यात भरली आणि सगळे समारंभाच्या हॉलकडे जायला निघाले. जवळचे नातेवाईक, मित्र परिवार ह्यांनी हॉल भरला होता. आनंदची ‘साखरतुला’ करताना प्रत्येकजण स्टेजवर येऊन दुसऱ्या पारड्यात साखरेचे पाकीट टाकत होता. ‘साखरतुला’ जवळपास होतच आली होती. भार्गवी स्टेजवर आली आणि तिने पारड्यात साखरेचे पाकीट टाकल्याबरोबर ‘तुला’ झाली. नकळत आनंदने टाळ्या वाजवल्या. आनंदला हात देत भार्गवीने त्याला हात धरून उठवले. आनंदला गहिवरून आलं.
त्याने भार्गवीचा हात धरला आणि माईक हातात घेऊन म्हणाला,
“माझ्या जिभेवर साखर पेरण्याचे काम ह्या माझ्या मुलीने केलं. हो, मुलगीच! सून म्हणून घरात आली आणि मुलगी कधी झाली कळलंच नाही.”
आनंद भरभरून बोलत होता, सुलेखा आणि भार्गवी डोळे टिपत होत्या आणि आदिचे डोळे देखील पाणावले…!
——-×——-
©® मधुर कुलकर्णी.