मनोरंजन

व्हॉट्सअपवर आलेला मेेसेज. “अहो”.

व्हॉट्सअपवर आलेला मेेसेज.

“अहो”.

समस्त नवरे मंडळींसाठी धडकी भरणारा हा शब्द.

ही साधी दोन अक्षरे, पण तमाम नवरे मंडळीना सळो की पळो करून टाकतात.

झोपडी राहणारा साधा कामगार असू देत नाहीतर एखाद्या करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक. या नुसत्या दोन अक्षरी “अहो” शब्दाच्या पुढे नतमस्तक असतो.

या ‘अहो’ मध्ये वचक आहे, धाक आहे, प्रेम आहे, माया आहे. असं खूप काही आहे या ‘अहो’ त.

तुम्हाला सांगतो. लग्नाच्या आधी अरे-तुरे करणारी ती आपल्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून आपल्याचं नावाचं कुंकू लेवून जेंव्हा अचानक आपल्याचं घराचा उंबरा ओलांडत हळूच ‘अहो जाहो’ वर येते ना तेंव्हा छाती दोन चार इंच अशीच फुगते. ऊर भरून येतो. ती आपली पत्नी असल्याचा जबरदस्त अभिमान, गर्व आणि काही प्रमाणात माज ही असतो. दोन फूट पावले हवेत असतात आणि या ‘अहो’ च्या प्रवासाला सुरुवात होते.

“अहो, नाश्त्याला पोहे करू का उपमा ?” असं गोड आवाजातील ते पहिलं ‘अहो’ तनामनाला गुदगुदल्या करून जातं. तिच्या त्या ‘अहो’ मध्ये पराकोटीचे प्रेम असते. हा तिचा पहिला वहिला ‘अहो’ ऐकला की वाटायचं जाऊन तिला गच्च मिठी मारावी.

मग हळूहळू हा ‘अहो’ रुळू लागतो. जसजसा तो जुना होतो तसतसा तो मुरलेल्या लोणाच्यासारखा होऊ लागतो.

आता त्याच्या वेगवेगळ्या छटा आणि रंग दिसू लागतात.

या ‘अहो’ च्या उच्चारात, आवाजाच्या चढ उतारात, बोलण्याच्या लयीत जो काही अदृश्य, गहन अर्थ किंवा इशारेवजा सूचना असते ना, ते सर्व भाव माझ्यासारखा अस्सल मुरलेला नवराच समजू शकतो. आता त्यासाठी अनुभवाचे कितीतरी ‘अहो’ खर्ची पडलेले असतात. अभ्यास दांडगा झालेला असतो.

आताशा मी केवळ आवाजावरून तिच्या म्हणजे म्हाळसाच्या चेहऱ्याकडे न बघताही या ‘अहो’ चा अर्थ लावू शकतो.

आता एक एक करून या ‘अहो’ चा प्रवास बघु या.

आता या ‘अहो’ मधला अ पासून ते हो पर्यंतचा आवाजाचा प्रवास कोमल स्वर ते मध्यमा पर्यंत गेला आणि भुवयांचा धनुष्यबाण झाला की आपण समजून जावे की आपलं काही तरी चुकलय. जागेवर सुधारायला पाहिजे आणि तसे लगोलग दुरूस्त ही करून घ्यावे म्हणजे मग पुढची शाब्दिक उठाठेव टळते.

सीआयडी प्रद्युन्म टाईपचा.” अहो, मला एक सांगा.” असा शंकास्पद ‘अहो ‘ ऐकू आला की समजून जायचं की आपलं काहीतरी भांड फुटलं. काही तरी बिंग उघडं पडलंय. पण हा ‘अहो’ शंकेखोर असतो. त्याला नक्की खात्रीने काही माहीत नसतं बरं का. अश्यावेळी लगेच उत्तर द्यायचे नाही. अनुभवाने तसा मेंदू तल्लख झालेला असतोच, तो लगोलग बचावाचे दोन चार पर्याय फटाफट पुढे करतो. आपण परिस्थिती सांभाळून घ्यायची.

चढ्या आवाजातील. “अहोsss हे कायं हे.” असं तीक्ष्ण बाणासारखे कानाला शब्द येऊन टोचले की यावेळी सपशेल माफी मागायची तयारी ठेवायची कारण हा ‘अहो’ चूक आपलीच आहे हे खात्रीने ठणाणा सांगत असतो. तिकडे बचाव नकोच. अर्धा तास वादळ घोंघावत आणि शांत होतं. अशा वेळी शक्य होईल तेवढा ‘पडेल’ चेहरा तुम्हाला ठेवता आला पाहिजे. वादळ शमलं की आपला ‘पडेल’ चेहरा बघून ‘आपण जरा जास्त बोललो का?’ हा अपराधीपणा तुम्हाला बायकोच्या चेहऱ्यावर पेरता आला पाहिजे. पुढच्यावेळी मग असं जरा वादळ विचारपूर्वक येतं.

मधूनच कधीतरी “अहो ऐका ना प्लिज.” असं अगदी फुलासारख्या मऊ भाषेत ऐकू आलं की समजून जावे आज तुमचा बकरा होणार आहे. हा ‘अहो’ जरा कोमल, थोडा तुटक तुटक अगदी मधूर लयीत असतो. अशा वेळी संधीसाधूपणा करायचा. आता आपला बकरा बनणार आहेच तर मग आपण उगाच नाही म्हणण्यात काही अर्थ नसतो. मग वाद घालत बसण्यापेक्षा सरळ मान पुढे करून कापायला द्यायची पण या खालमानेने व कपटी मनाने तुमच्या काही अटी आणि शर्थी शिताफीने मान्य करून घेण्याइतका कावेबाजपणा तुमच्याकडे असलाच पाहिजे. कारण एकदा का या त्या ‘अहो’ ची मागणी मान्य झाली की तो मऊ मुलायम “अहो” अचानक गायब होतो आणि त्याचा सावत्र भाऊ ‘अहो ला काहो’ हजर होतो.

“अहो ऐका ना ! मी काय म्हणते.” असं विलक्षण मृदू आवाजातील ‘अहो ‘ ऐकलं की कानात प्राण आणून ऐकावे… तुम्हाला सांगतो या ‘अहो’ मध्ये बराच धूर्त डाव असू शकतो. या ‘अहो’ मध्ये तिच्या द्विधा मानसिकतेचा भाव असतो. यात काहीही गुगली असू शकते. अशा वेळी तुमच्या अंगात सचिन आणि राहुल दोघेही असायला हवेत. वेळ पडली सिक्स किंवा नाहीतर साधा बॉल तटवता आला पाहिजे ते ही जास्तीत जास्त तोशीस लागू न देता.

कधी कधी बायको उगाचच आपल्या अगदी जवळ येत परीटाने शर्टच्या बाहीवर मारलेल्या इस्त्रीच्या घडीला आपल्या तर्जनी आणि अनामिकेच्या बोटाच्या नखाने पून्हा पुन्हा इस्त्री करत जेंव्हा लाडाने तोंडाचा चंबू करून “अहो” म्हणते ना तेंव्हा पुन्हा ते लग्नाचे नवनवेले नवीन दिवस आठवतात. या ‘अहो’ मध्ये मात्र काही खास डिमांड असते. काही नवीन खरेदी, सासुरवाडीचे कोणी येणार असतं किंवा हिला माहेरी जायचं असतं आणि सगळ्यात भीती त्या दागिन्यांची. याची तर काही मागणी नसेल अशा वेळी नीट ऐकून घ्यावे. उगाच लगेच प्रतिक्रिया देऊ नये. ‘नवरा’ म्हणून आता तुमच नाणं खणखणीत वाजवायची ती वेळ असते. अशी संधी फार कमी वेळा येते. तेंव्हा अजिबात आततायीपणा करायचा नाही. कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. ‘आता जरा कामात आहे बोलू आपण नंतर ‘. असं सांगून वेळ मारून सांगोपांग विचार करून कमीत कमी फटका कसा बसेल असं तुम्हाला बघता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो हा ” अहो ” तसा खूप डेंजर बरं का. व्यवस्थित नीट नाही हाताळता आला तर लवकर ‘तह’ सुध्दा होत नाही.

आणि हो एक महत्त्वाचं. या इस्त्रीच्या घडीच्या ‘जवळकीचा’ लगोलग लाभ घेणं हे तुमच्या हातात. ती एक कलाच.

कधी कधी “अहो ऐका ना माझं जरा. ” अशी प्रेमाची आर्जव त्या ‘अहो’ मध्ये असते. या ‘अहो’त खरोखर काही कळवळा असतो. त्याचाही सन्मान करता आला पाहिजे. येथे मात्र सपशेल समर्पण द्यावे. तिच्या मताला प्राधान्य द्यावे. आदर करावा या ‘अहो’चा. यात तुमचाच फायदा असतो.

जसं वय वाढत जातं तसं हा ‘अहो’ जरा प्रगल्भ होतो.

जरा उतार वयाकडे लागलो की एखादी बायको नुसत्या जाणिवेने आपल्या नवऱ्याला “अहोsss” अस जोरकस आवाजात धाकाने किचनमधून म्हणते तेंव्हा हॉलमध्ये बसलेल्या डायबिटीस झालेल्या नवऱ्याचा बर्फीकडे जाणारा हात आपोआप थांबतो. येथे खरं जाणवतं या ‘अहो’ च महत्व आणि अस्तित्व. येथे ते दोघेही एकमेकांच्या समोरासमोर नसतात. पण असतो तो ‘अहो ‘.

हा ‘अहो’ हळूहळू उतारवयाकडे झुकू लागतो. आता तिच्या बरोबर तो ही तिला ‘अहो जाहो’ करू लागतो. त्याच्याही ‘आहो जाहो’ मध्ये तेच प्रेम, धाक आणि हक्क असतो.

“अहो बसा जरा येथे निवांत, कामवाली बाई आली की करील ती. कशाला उगाच किचनमध्ये डोकावताय” अशा त्याच्या कापऱ्या आवाजातील त्याची वाक्ये त्या ‘अहो’ मधलं एकरूपता दाखवतात.

” अहो तुमची औषध घेतली का.” हे त्याचं वाक्य त्याची काळजी दाखवत.

या दोघांचे हे ‘अहो’ आता एकरूप झालेले असतात. येथे स्वतंत्र ‘अहो’ नसतोच.

हा ‘अहो’ कायम दुकटा असतो.

आणि जरा कुठे या दोघांतला एक धागा तुटला की हा “अहो” सैरभैर होतो. एकाकी होतो.

सगळ्यांचा हा ‘अहो’ सदैव दुकटा राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}