#प्रोतिमा_बेदी . . #टाईमपास
#प्रोतिमा_बेदी . . #टाईमपास
.
” आपल्या समाजानं अगदी काळजीपूर्वक बनवलेला प्रत्येक नियम न नियम मी मोडला . मी कसलीच बंधनं मानली नाहीत . मला जे जे कारावसं वाटलं , ते ते मी केलं ; अगदी सपाटून केलं . कोण काय म्हणेल याला मी काडीचीही किंमत दिली नाही . माझं तारुण्य , माझं लैंगिक जीवन , माझी बुद्धीमत्ता – सारं सारं काही मी दिमाखानं मिरवलं .आणि हे सारं मी निलाजरेपणे केलं . मी खुपजणांवर जीव ओतून प्रेम केलं , आणि माझ्यावरही काहींनी खूप प्रेम केलं . ” हे म्हणताहेत प्रोतिमा बेदी त्यांच्या टाईमपास ह्या आत्म चरित्रात !
.
प्रोतिमा म्हणजे एक वावटळ होती , जमिनीपासून उंच आकाशात गरगरत जाणारं चक्रीवादळ होतं . ते तिलाच फक्त झेपत होतं . जो त्या वादळात सापडला त्याला सावरणं पण शक्य नव्हतं . तिच्या सहवासात येणार्यांवर तिच्या धुंद आयुष्य शैलीचं गारुड पडायचं . तिचं स्वच्छंद आयुष्य ती आपल्या जबाबदारीवर जगली . तिची लढाई , तिची बंडखोरी , तिचं बेफाम -बेफाट आयुष्य , तिचं यश ..अपयश , तिची बेमुर्वतखोरी , तिची आढ्यता आणि जगाच्या दृष्टीने असणारा निलाजरेपणा .. निर्लज्जपणा ह्या सगळ्याची बरी वाईट फळ तिने धाडसाने , ताठ मानेने भोगली , जगाची पर्वा न करता .
.
.१२ ऑक्टोबर १९४८मध्ये जन्मलेली प्रोतिमा लक्ष्मीचंद गुप्ता , चार भावंडांतील दुसरं अपत्य . लहानपणापासूनच तिच्यावर कोणी प्रेम करत नाही अशी तिची भावना होती . ह्या प्रेमाचा शोध ती आयुष्यभर शरीराच्या माध्यमातून शोधत राहिली . त्यातून अधिकाधिक लढाऊ वृत्तीची , बिनधास्त आणि बंडखोर बनत गेली . रूढार्थाने जी समाजमान्य आहे अशी प्रत्येक गोष्ट तिने फाट्यावर मारली . बेधडक धुडकावून लावली . तंग , शरीरप्रदर्शन करणारे .. झिरझिरीत , बिन पाठीचे , मोठ्या ,खोल गळ्याचे , टाचके कपडे घालणे . नशा करणे , पार्ट्यांमध्ये रात्र जागवणे , अनेक पुरुषांबरोबर जवळीकीचे संबंध ठेवणे ; ही तिची जीवनशैली घरी पसंत पडणं शक्यच नव्हतं . वडिलांनी हात उगारल्यावर , एका रात्री , तडकाफडकी , कसलाही विचार न करता तिने घर सोडलं . अशीच होती ती .. झोकून देणारी ; स्वतःच्या मर्जीने , स्वतःला आवडेल तशी जगणारी ; आणि त्यासाठी जबरदस्त किंमत मोजणारी .
.
७० च्या दशकात ती नावाजलेली , प्रथमश्रेणीची मॉडेल होती . यशाच्या शिखरावर होती . स्तुतिपाठक भरपूर होते , तिच्या एका दृष्टीक्षेपासाठी कासावीस होणारे ! , पैसा , यश तिच्या पायाशी लोळण घेत होतं . १९६८च्या सप्टेंबर मध्ये एक देखणा , राजबिंडा , उंचापुरा मर्दानी मदनाचा पुतळा तिच्या सहवासात आला . अगदी ठरवून तिने त्याला तिच्या प्रेमात पाडलं . तो होता तेव्हांचा उगवता तारा , #कबीर_बेदी ! त्या काळात जेव्हां प्रेम चोरी चुपके केलं जात होतं तेव्हां ती बेछूटपणे त्याच्याबरोबर राहात होती . १९६९मध्ये त्यांनी लग्न केलं आणि त्या नंतर सात महिन्यांनी पूजा बेदी जन्माला आली .
.
. प्रोतिमा सर्व सिने मासिकांची आणि वृत्तपत्रांची अत्यंत आवडती होती . प्रदर्शन करणं आणि त्याचा गाजावाजा करणं तिला अत्यंत प्रिय होतं . ती ह्या सर्वांना खुशीने भरपूर मालमसाला पुरवायची . आता सिद्धार्थचा पण जन्म झाला होता . विवाहित , दोन मुलांची आई असुनही तिच्या वागण्यात काहीही फरक पडला नव्हता . जगप्रसिद्ध उद्योगपती , वंदनीय कलाकार , केंद्रीय मंत्री , देखणे परदेशी असे अनेक पुरुष तिच्या सहवासात होते . आणि १९७४मध्ये तिने एकच खळबळ उडवून दिली . तिने streaking केलं . जुहू बीचवर ती विवस्त्रावस्थेत धावली . सिने ब्लिट्झच्या मुखपृष्ठावर तिचा नग्न फोटो झळकला ; त्या मासिकाचा प्रचंड खप झाला आणि सर्वत्र एकच धुरळा उडाला .
.
. लहानग्या पूजाने तिला बिथरून जाऊन म्हटलं, ” माझ्या शाळेतील सगळी मुलं म्हणतात , तू नंगी पळत सुटली होतीस ! ”
प्रोतिमाने धारदार स्वरात सांगितलं , ” हे माझं आयुष्य आहे , मी ते कसं जगावं , हे मला सांगायचा कुणालाही अधिकार नाही …ज्या माणसांची स्वतःची कंटाळवाणी आयुष्य असतात , त्यांना शिळोप्याच्या गप्पांसाठी मी खाद्य पुरवलं याचा मला आनंद वाटतो . ..! ” तिच्या आयुष्यावर तिने कोणालाच अधिकार गाजवू दिला नाही . अगदी तिच्या मित्रांनाही ! त्यांनाही हवं तेव्हां जवळ केलं , नको तेव्हां भिरकावून दिलं.
.
.पूजा बेदी पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणते , ” तिचं चैतन्य ,तिच्यातील सर्जनशीलता , तिच्यातील अमर्याद ऊर्जा आणि तिचं बिनशर्त प्रेम , यांच्यामुळे सिद्धार्थच्या आणि माझ्या जीवनात सुखाची हिरवळ फुलली . अतिशय खुल्या मनाची आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होण्याची इच्छा असणारी आई लाभण हे आमचं खरोखरच भाग्य होतं . ”
.
प्रोतिमा सगळीकडे पूजाला घेऊन जायची . अगदी डिनर डेटला पण ! मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या . मला कळत नव्हतं का वाचतेय मी हे पुस्तक ? वेळ फुकट घालवतेय . माझ्या मातृत्वाच्या , पालकत्वाच्या कल्पनां मध्ये हे सर्व बसत नव्हतं. तिच्यासारखं वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं आयुष्य अभावानेच आढळेल . या तिच्या अत्युत्कट स्मृती आहेत . धक्कादायक वाटतील इतक्या मुक्तपणे लिहिलेल्या . एक स्वच्छंद आयुष्य जगलेली , निर्भीड स्त्री ..काळाच्या खूप लवकर जन्माला आलेली ! खरं म्हणजे आजही तिच्यासारखं जगणार्या आणि ते उजळ माथ्याने कबूल करणाऱ्या स्त्रिया नाहीत .सगळं सगळं कबूल आहे , पण ते मला कळून माझा काय फायदा होणार आहे !
.
भारतात नव्याने उदय पावणाऱ्या मुक्त जीवन पद्धतीचे प्रोतिमा आणि कबीर मूलाधार होते . पण आता हळूहळू त्यांच्यात दुरावा यायला लागला होता . दारिद्र्य , आजारपण , म्हातारपण , दु:ख अशा जगातल्या कुरूप गोष्टी कधी तिच्या जवळपास पण फिरकल्या नव्हत्या . मॉडेलिंग , इंटिरियर डिझाईनिंग , दागिने -कपडे यांचे डिझाईनिंग अशा विविध क्षेत्रात तिने भरपूर काम केलं . मुंबईत डिस्कोथेक , बुटिक सुरु करणारी ती सर्वात लहान वयाची उद्योजिका होती . पार्ट्या , क्लब , गाड्यांच्या शर्यती तिच्या जीवनाच्या अविभाज्य गोष्टी होत्या . सर्व कसं परिपूर्ण होतं . पण एक अनामिक बचैनी तिला छळत होती . १९७५च्या ऑगस्ट महिन्यात तिचं सगळं जीवनच बदलून गेलं .
.
.धो धो पाऊस कोसळत होता . डिनरला जाईपर्यंत कुठेतरी वेळ काढायचा म्हणून ती भुलाभाई ऑडिटोरियममध्ये शिरली . तिथे मंचावर जे नृत्य चाललं होतं ते बघून तिचं देहभान हरपलं . तो होता ओडिसी नृत्य प्रकार . त्या नृत्यासाठी ती व्याकूळ झाली . गुरु केलुचरण महापात्रा यांच्या समोर तिने अक्षरशः लोटांगण घातलं , पदर पसरला , त्यांचं शिष्यत्व देण्याची भीक मागितली . ” इंडीयाज क्वीन ऑफ आउटरेज ” हा किताब मिळवणारी आणि ते भूषण मानणारी प्रोतिमा नखशिखांत बदलून गेली .कटकमध्ये गुरुकुल पध्दतिने ती नृत्य शिक्षण घेऊ लागली . सुती साड्या हा तिचा वेश बनला .तिने व्यसनं सोडली . वयाच्या २६व्या वर्षी तिने ओडिसी नृत्याचा रियाज सुरु केला . रोज १२ ते १४ तास ती सराव करायची . नाचून पाय दुखायचे , पायांची कातडी सोलवटून निघायची . ती निरीश्वरवादी होती . पण ती कालीमातेच्या दर्शनाला जाऊ लागली . तिच्यात प्रत्यक्ष कालीमातेची प्रचिती येऊ लागली . तिचे गुरु ही एकमात्र व्यक्ती होती , ज्यांना तिने चरणस्पर्श करून वंदन केलं . अफाट श्रम , अथक मेहनत .. तिचं अवघं आयुष्य नृत्यमय झालं . थोड्याच काळात ती नामवंत ओडिसी नृत्यांगना झाली . १९७८मध्ये ती कबीर पासून विभक्त झाली . तिच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला .कबीरला जेव्हां नावलौकिक मिळत होता , तेव्हांच ती त्याच्यापासून दूर होती . त्याच्या यशाची चव आपल्यालाही मिळावी असं मनातून तिला वाटत होतं , पण तो आता परवीन बाबीच्या प्रेमात पडला होता .
.
नृत्य आता तिच्या जगण्याचा , अस्तित्वाचा भाग बनलं . तिने पृथ्वी थिएटरमध्ये स्वतःची नृत्य शाळा काढली . नंतर तिचं ओडिसी नृत्यकेंद्रात रुपांतर झालं . आता ते एसएनडीटी महिला विद्यालयाशी संलग्न आहे .
.
प्रोतिमा आणि कालीमातेत एक घट्ट दुवा तयार झाला . तिचं नृत्य अधिकाधिक अर्थपूर्ण आणि सखोल झालं . चैतन्यपूर्ण आणि उत्कट झालं . भारतभर , परदेशात तिचे आणि तिच्या शिष्यांचे कार्यक्रम होऊ लागले . तेव्हां सुद्धा सत्ताधारी तिच्या सहवासात होते . प्रोतिमा म्हणते ,” जसजशी मी अधिक यशस्वी आणि श्रीमंत झाले , तशी स्वच्छंद वृत्तीच्या , माझ्यात रस घेणाऱ्या पुरुषांची संख्या कमी झाली . माझ्यापर्यंत कसं पोचावं , संभाषण कुठून सुरु करावं , तेच त्यांना कळायचं नाही . आपली तेवढी पात्रता नाही , वकूब नाही , याची जाणीव झाल्यामुळे कुणीही तसं धाडस करू धजत नसे . ..खंबीरपणे उभं राहण्याकरता त्याला अहंकाराचा भक्कम आधार हवा असतो …तो नसेल तर तो अधिकाधिक दांभिक होत जातो . अहंकार हीच त्याची कवचकुंडले होतात . ”
.
प्रोतिमाच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी होत होत्या .. ती म्हणते , ” मी माझ्या वैयक्तिक लैंगिक सुखासाठी मी हवा तेव्हां अन्यत्र आश्रय घेत होते ; परंतु मला जे तीव्रतेनं , उत्कटतेनं हवं होतं ; ते समाधान दुर्दैवाने मला कुठंच लाभलं नव्हतं . ” प्रोतीमाचा प्रवास साध्वी , भिक्षुणी होण्याकडे चालला होता . तिचा आयुष्यातला रस संपत चालला होता . पण तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण व्हायचं होतं .अथक प्रयत्न करून बेंगळूरुला गावाबाहेर तिने एक ओसाड जमीन मिळवली .गेरार्ड दा कुन्हा ह्या अशाच एका पछाडलेल्या वास्तुशिल्पकाराच्या सह तिने नृत्यग्राम उभारलं . तिथे ७ प्रकारच्या नृत्य शैली आणि मार्शल आर्टचे दोन प्रकार शिकवले जातात . १९९०मध्ये मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं . ह्या स्वप्नपूर्तीसाठी , त्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी तिने अनेक दारं ठोठावली .
.
ह्याच सुमारास प्रोतिमा बेदीची प्रोतिमा गौरी झाली . प्रोतिमा म्हणते , ‘ कानडी भाषेत बेदी म्हणजे पोट बिघडणं , जुलाब होणं . मला मिस डायरिया म्हणून ओळखलं जाण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे मी बेदी आडनाव वगळलं आणि मी गौरी अम्मा झाले . ” नृत्यग्राममध्ये तिने हरितक्रांती केली , देखणी शिल्पं केली .तिला आणि गेरार्डला अनेक पुरस्कार मिळाले . पण प्रोतिमा विझत चालली होती .
.
तिचे आणि पुत्र सिद्धार्थचे भावबंध घट्ट होते . अमेरिकेला शिकत असणारा सिद्धार्थ हळू हळू मनोविकाराचा शिकार झाला . खूप औषधोपचार करूनही तो निराशेच्या गर्तेत कोसळू लागला . त्याला स्किझोफ्रेनियाने वेढलं . जुलै १९९७मध्ये त्याने आत्महत्या केली . आणि प्रोतिमा पूर्णपणे कोसळली
.प्रोतिमाने संन्यास घेतला . मुंडण केलं . निळ्या रंगाची कफनी परिधान करू लागली .सिद्धार्थच्या मृत्यूच्या आधीपासूनच तिच्या अंतर्बाह्य परिवर्तनाला सुरुवात झाली होती . हृदयविकार होता . तीन झटके येऊन गेले होते . ती हिमालयात भ्रमण करीत होती . धम्मगिरी विपश्यना केंद्रात शांती शोधत होती . नृत्यग्रामची तिने नीट व्यवस्था लावली .त्याचं योग्य व्यक्तींकडे हस्तांतरण केलं . निपुण शिक्षकांची तिथे योजना केली . तिची इच्छा होती जिप्सी सारखं भारतभर फिरून साऱ्या जगावर करुणेचा वर्षाव करत , रंजल्या गांजल्यांची सेवा करत आपल्या पैशाचा योग्य विनियोग करावा .
.
हेमकुंड साहिब , गंगोत्री , हृषीकेश , तिरुपती आणि लडाखच्या मठांत ती यात्रा करीत होती . भविष्य कळल्यासारखी तिने सर्व निरवानिरव केली होती . कैलास मानसच्या खडतर यात्रेला निघाली . १७ ऑगस्ट १९९८ च्या रात्री तिच्या समूहाचा हिमालयात गढवालमध्ये पिठोरगड जवळ मालपा इथं मुक्कामाचा तळ पडला . त्या दिवशी बेभान पाऊस कोसळत होता . रात्री दरड कोसळली . यात्रेकरूंपैकी कोणीही वाचलं नाही (१८ ऑगस्ट ). प्रोतिमाच्या वस्तू आणि पासपोर्ट सापडला . मृतदेह मिळाला नाही .
.
तिला , तिचा शेवट निसर्गाच्या सोबत व्हावा असं वाटायचं . सर्वसामान्य , वेदनामय , क्लेशकारक मृत्यू आणि त्यानंतर एखाद्या रुक्ष स्मशानात देह अग्नीच्या स्वाधीन करणं , याकल्पनेने ती शहारायची .मृत्यूला कवटाळतानासुद्धा तिनं आपल्याला हवा तोच मार्ग तिने निवडला .
.
प्रोतिमाच्या जीवनाचे दोन भाग होतात . पण तिच्या बेफाम जीवनाचीच जास्त चर्चा होते .जशी ओशोंच्या ‘संभोगातून समाधीकडे ‘ ह्याचीच जास्त चर्चा होते ! तिच्या जीवनातील हा कर्तबगारीचा आणि अध्यात्माचा भाग तुमच्या पर्यंत पोचावा हीच इच्छा
..
प्रोतिमाने हजारो कागद लिहून ठेवले होते . तिच्या मृत्युनंतर , त्यातील मजकुराची निवड करून मांडणी करायचं अत्यंत कठीण काम पूजा बेदीने केलं, त्याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला . टाईमपास ! त्या पुस्तकाच्या आधारेच , अपरिमित ऊर्जा आणि धैर्य असणाऱ्या ह्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी मी तुमच्यापर्यंत पोचवली आहे . पुस्तक विकत घेऊन जरूर वाचा .#सुरेखा_मोंडकर
छान व्यक्तिचित्रण