मनोरंजन

फिटे अंधाराचे जाळे !☸️ 🍁भाग एक 🍁

☸️ फिटे अंधाराचे जाळे !☸️

🍁भाग एक 🍁

‘ भैय्या .. थोडा जल्दी करो ना .. गाडी छूट जायेगी ..’ मी कासावीस होत म्हणाले .

‘ अरे मॅडम जी .. मैं तो चला लुंगा .. लेकीन ये ट्रॅफिक देखो ना .. बंबई मे कोई सोता भी हैं के नहीं .. देखो तो इतनी सुबह भी कैसे चींटीयों जैसे लोग निकल रहे ..’

त्याच्या बडबडी कडे ना माझं लक्ष होतं ना त्यात काही रस ! माझ्या गावाकडे जामगावला जाणारी एकमेव बस होती ..आणि ती मला चुकवायची नव्हती . म्हणुनच मी बाहेर पडताच समोर जी दिसेल ती टॅक्सी केली होती . खरं तर मला लोकल ने जाणं जास्त सोयीचं होतं पण ती गर्दी मला नकोशी वाटली .रोज मात्र हीच गर्दी आपलीशी वाटायची.माझं एकटेपण त्या गर्दीत हरवून जायचं . लोकल मधे रोजच्याच प्रवासात काही स्नेहाचे धागेही जोडले गेले होते .त्यामुळे घरापासून इतकी लांब असूनही माझ्या आयुष्यात जरातरी शीतलता होती . सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इथे कशी ? मी मूळची कुठली ? माझी सामाजिक पत काय ? माझी आर्थिक स्थिती कशी आहे ? असल्या कसल्याही अटी आणि कारणांशिवाय चा फक्त माणूस म्हणून असलेला निःस्वार्थ निव्वळ स्नेह होता तो आणि म्हणूनच सुखकारक ही ! नाही तर अपेक्षेशिवाय स्नेह , प्रेम असूच शकत नाही . पण मुंबईत तो स्नेह मला मिळाला होता . रोज सकाळी जातानाचा अर्धा तास आणि येतानाचा अर्धा तास हे माझं टॉनिक होतं . एकदा वाटलं ही लोकलने जाऊन सगळ्या ग्रूपला सांगावं का .. मी गावाला जाते असं .. पण त्यासाठी अजून एक तासभर थांबावं लागलं असतं आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता .

टॅक्सी मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या आत शिरली ..तसं मी घड्याळ बघीतलं .. आहेत अजून तीन मिनिटं . गाडी आत वळतानाच मी सगळीकडे नजर फिरवली तेंव्हाच मला ‘ मुंबई – जामगांव ‘ बस दिसली .

‘ रुको ..रूको भैया ..’
मी मधेच टॅक्सी थांबवली .. हातात असलेले पैसे त्याला दिले आणि बॅग घेऊन पळतच बस मधे चढले . माझ्या पाठोपाठ कंडक्टर आत आला आणि एक ते वीस नंबर सोडून बसा ..रिझर्व्हेशन आहेत असं सांगितलं . मी मागे नजर टाकली तर मागे गाडी रिकामीच दिसत होती . मला हायसं वाटलं . मी दोन सीटच्या सीटवर जाऊन बसले .. बाजूला बॅग ठेवली . उद्देश हा की शक्यतो बाजूला कोणी नको ..अगदीच सगळ्या सीट भरल्या तर मला जागा रिकामी करावीच लागणार होती ..पण आता मला माझ्या बाजूला कोणीही नको होतं . माझ्या आत चाललेला गोंधळ जणू ऐकायला जाईल बाजूच्याला अशी मला भीती वाटली .

कंडक्टरने डबल बेल दिली आणि मी निश्चिंत झाले की आता कोणीही येणार नाही . बरोबर तीन वर्षांनी मी गावाला चालले होते . मला गावाला जायचंच होतं पण अशी वेळ येऊन नको होतं ! काल रात्री दहा वाजता अंजना मला बोलवायला आली तेंव्हा मला आश्चर्यच वाटलं होतं . इतक्या रात्री मला कोणी फोन केला ..मी तिला अगदी तीन वेळेस विचारलं ‘ नक्की माझ्यासाठीच फोन आहे ना ..’ कारण मी इथे आहे हेच मुळी कोणाला माहिती नव्हतं ..एक माई सोडली तर ! आणि माई मला फोन करेल असं अजिबात नाही .. रघू .. छे ..काहीही .. तो का करेल फोन .गेल्या तीन वर्षात मी कुठे आहे , जिवंत आहे की मेलीये हे समजून घेण्याचा सुध्दा ज्याने प्रयत्न केला नाही ..तो का करेल मला फोन . की सत्या असेल .. असू शकतो ..पण तो तर हिमालयात गेल्याचं माईने सांगितलं होतं . परत आला असेल का ..की विश्वदादा ..अजिबातच नाही ..दोन जिने उतरून येई पर्यंत माझा सगळा विचार करून झाला होता आणि सगळा जीव गोळा झाला होता .मी रिसिव्हर हातात घेऊन एक खोल श्वास घेतला ..’ हॅलो ..’

‘ मन्या..’

म्हणजे हा सत्याच .. मला मन्या म्हणणारा एकमेव ! माझ्या घशात आवंढा आला .. डोळ्यात पाणी जमा झालं . आवाजच फुटेना ..

‘ मन्या .. ऐकतेयस ना .. मन्या .. मी सत्या बोलतोय ..’

मी स्वतः ला सावरत म्हणाले ‘ बोल सत्या .. तुला तू कोण बोलतोयस हे सांगण्याची गरज नाही ..’

‘ ऐक .. उद्या सकाळी जी गाडी मिळेल ती घे आणि जामगावला ये ..’

‘ असं काय झालं अचानक की तुम्हाला माझी आठवण यावी ..’

‘ मन्या ..ही वेळ तिरकस बोलण्याची नाही .. आबांना बरं नाहीये ..ते तुझी आठवण काढत आहेत ..’

‘ आबा .. काय झालं आबांना ‘

‘ आबांना अटॅक आला होता .. गेले महिनाभर पुण्यातच होते . सिव्हियर होता अटॅक .. पण आता बरेच बरे आहेत आणि घरी ही आणलं आहे . आज दिवसभर फक्त तुझं नाव घेत होते . माईने तुझा नंबर दिला .. ‘

‘ महिना झाला आबांना बरं नाही आणि तुम्ही मला आता कळवताय ..’

‘ हे बघ .. ही वेळ आहे का हे सगळं विचारण्याची ..’

‘ विश्वदादाला माहिती आहे ..तू मला फोन केला आहेस ते ..’

‘ त्याने काय फरक पडतो.. जर माहिती नसेल तर तू येणार नाहीस का ‘

‘ म्हणजे त्याला माहिती नाही ..असो .. माई कशी आहे ..’

‘ बरं ऐक .. उद्या निघ तू ..माई बरीये .. म्हणजे तसं म्हणायचं ..पण काळजी करते खूप ..सगळ्यांचीच ! बरं मी ठेवतो फोन ..निघ तू उद्या ..’

मी रीसिव्हर ठेवला . पाय आणि डोकं जड झालेल्या अवस्थेत रूम मधे आले . आज स्वातीचं डोकं दुखत होतं म्हणून ती आधीच झोपली होती . बेडवर बसले .. आबा , माझे आबा .. त्यांना एवढं बरं नाही आणि मला कळलं सुद्धा नाही . कोणी कळवलं ही नाही . बाकीचे जाऊदेत पण माई .. तू .. तू माझ्याशी असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं . सगळं जग माझ्या विरोधात होतं पण तू माझ्याशी बोलत होतीस आणि म्हणून फक्त तू माझ्याशी बोलतेस या एका कारणामुळे मला जगण्याचं बळ मिळालं होतं . मग महिनाभरात तुला एकदाही मला सांगावस वाटलं नाही . तुला माहितीये माझं आबांवर किती प्रेम आहे .. ते माझ्याशी कसेही वागले असले तरी ते माझे आबा आहेत. मला तीव्रतेने आबांची आठवण आली. सगळ्यात लहान असूनही मला ताईसाहेब म्हणणारे .. येता जाताना माझ्या डोक्यावरून हलकेच हात फिरवणारे , मला थोडं जरी लागलं किंवा माझ्या डोळ्यांत पाणी आलं तर हळवं होणारे माझे आबा .माझ्यापेक्षा काय महत्वाचं होतं त्यांच्यासाठी की ते इतके कठोर झाले होते माझ्या बाबतीत .आणि विश्वदादा कडून तर मला कसलीच अपेक्षा नव्हती आणि नाही पण ! पण तू आणि सत्याने तरी माझ्याशी असं वागायला नको होतं . मला रडायला यायला लागलं .. सारखा आबांचा चेहेरा डोळ्यासमोर यायला लागला . झोप येणं शक्यच नव्हतं . घरघर वाजणाऱ्या फॅन कडे टक्क डोळ्याने बघत राहिले .खोलीतल्या मिणमीणत्या दिव्याने अजूनच आत अंधारून आलं .घशाला कोरड पडली पण उठून पाणी ही प्यावंस वाटेना ..गेली तीन वर्ष असंच तर जगतेय मी ..घुसमटून , गुदमरून ! रघू आला असेल का तिथे ..आबांवर त्याचं सुध्दा किती प्रेम होतं त्यापेक्षा जास्त आदर होता . पण त्याला कोणी कळवल असेल असं वाटत नाही . रघूच्या आठवणीने माझं तोंड कडू पडलं . ज्या माणसासाठी मी घर दार सोडलं .. माझी माणसं सोडली ..त्याला तर काहीच फरक पडत नाही . ज्या माणसाला ‘ माझं प्रेम आहे हिच्यावर ‘ असं खंबीरपणे सांगता आलं नाही अशा माणसावर मी जीव लावलाच कसा ? गेल्या तीन वर्षात त्याने आपल्याला भेटण्याचा प्रयत्न ही केला नाही.. अशा कमकुवत आणि भ्याड माणसासाठी आपण आपलं सगळं सुख उधळून लावलं.. हे सगळं समजत असूनही रघूच्या बाबतीतला एक हळवा कोपरा हृदयात घट्ट बसला आहे . प्रेम माणसाला आंधळं करतं म्हणे पण मला तर पांगळं ही केलं आहे . विचारशक्ती खुंटली आहे माझी . सरळ सरळ धडधडीत रघूचं पळपुटं वागणं दिसत असून , समजत असूनही मी त्याकडे सोयीस्कररित्या का दुर्लक्ष करते . प्रेमामुळे ताकद मिळते म्हणतात पण मी तर कमकुवत झाले आहे .. नाही .. मी अजीबात कमकुवत नाही . तसं असतं तर या मुंबई सारख्या महाकाय शहरात तीन वर्ष एकटीने काढले नसते . पी जी मुंबई युनिव्हर्सिटीतच केलं पण तेंव्हा आबांचा हात होता डोक्यावर .. माईचं , सत्याचं प्रेम होतं , विश्वदादाचं कौतुक होतं .किती फुलपाखरी दिवस होते ते . रघू माझ्या आयुष्यात आला आणि सगळं जग बदललं माझं . माझी माझी म्हणणारी माणसं कधी परकी झाली ते कळलंच नाही .असा काय गुन्हा केला होता मी . गेल्या तीन वर्षात कितीदा घराची , माई , आबांची आठवण आली त्याला गणतीच नाही .हल्ली तर डोळ्यांतून पाणी यायचं ही थांबलं होतं..पार आटून गेले होते मी .
विचारांच्या भोवऱ्यात किती वेळ अडकले होते ते माझं मलाच कळलं नाही .डोळ्याला डोळा लागत नव्हता .. कधी एकदा पहाट होते आणि मी जामगावला जायला निघते असं मला झालं होतं .पण मी तिथे जाणं हे माझ्यासाठी आणि घरच्यांसाठी ही सोपं नसणारे याची जाणीव मला होती .पाहिली सहजता नक्कीच नसणार .. मनातलं दुखरेपण , खुपरेपण टोचणारच होतं .सत्याने फोन केला आणि माईने माझा नंबर दिला होता म्हणजे ते दोघे माझ्या बाबतीत थोडे मवाळ असतील कदाचित .. पण विश्वदादा कसा रिॲक्ट होईल काहीच सांगता येत नाही .पूर्ण आयुष्य गेल्यानंतर ही माणसाला स्वतः च्या स्वभावातले दोष समजत नाहीत इथे तर तीन वर्षच झाली होती .त्याचा अहंकार , मनमानी कमी झाली असेल की वाढली असेल ? मी आबांना भेटायला जाणार आहे मग मी त्याचा विचार का करावा ..तसंही त्याचा विचार फार काही सुखकारक नाही .
विचारांनी थकून माझा डोळा लागला असावा .. माझ्या डोक्यावर कोणाचा तरी हात फिरतोय हे जाणवलं आणि रात्र भर माई , आबांचा विचार केल्यामुळे मला माईचाच भास झाला .’ माई .. माई ‘ करत मी धडपडून उठून बसले .. तसं स्वाती म्हणाली ..
‘ अगं हो हो .. माई नाही ..मी आहे स्वाती .. काय झालं .. रात्रभर जागी होतीस का .. काय झालंय ..कपाळ बघ किती घामाने ओलं झालं आहे ..तब्येत बरी नसेल तर आज जाऊ नकोस कॉलेजला .. फोन करून सांग ..तसंही आता सुट्याच लागणार आहेत ना ‘

मी उठून बसले . काल रात्री काय झालं ते सगळं आठवलं आणि जामगाव ला जायचं आहे हे लक्षात आलं .मी स्वातीला सगळं सांगितलं ..माझ्या कॉलेज मधे फोन करून सांग असंही सांगितलं ..पंधरा दिवसांच्या रजेचा अर्ज लिहून दिला .आणि माझे सामान भरायला लागले .स्वाती माझ्याजवळ येत माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली ..
‘ मनू तू खरंच जाणारेस ..’
‘ हो .. जायलाच हवं ..’
‘ पण त्यांनी तुला परत इथे नाही येऊ दिलं तर ..’
‘ आबा माझी आठवण काढतायत .. मला जायलाच हवं ‘
‘ हे खरं असेल कशावरून ..’
‘ नाही .. इतकं खोटं ते माझ्याशी बोलणार नाहीत .. आणि आबांच्या आजारपणाचं खोटं तर नक्कीच नाही ..आणि त्यासाठी तीन वर्ष त्यांनी कशाला वाट पाहिली असती ..’
‘ तू म्हणतेस तसंच असू दे ..पण मनू तिथे गेलीस की मला फोन करशील ना नक्की .. किंवा खुषालीचं पत्र पाठवशील ना प्लीज ..’
‘ प्लीज काय स्वाती ..नक्की पाठवीन..आणि तू तुझी काळजी घे ‘

तीने मला मीठी मारली . खरं तर एक रूम मेट या पलीकडे आमचं काही नातं नव्हतं .नात्याच्या असणाऱ्या सगळ्या माणसांनी पाठ फिरवली होती पण ही माझा आधार झाली होती ..की मी तिचा ..किंबहुना आम्ही एकमेकींचा आधार झालो होतो .स्वाती रत्नागिरीची .. माझ्यापेक्षा फक्त तीनेक वर्षांनी मोठी असेल पण तिला एक मुलगी होती पाच वर्षांची . रत्नागिरीत आपल्या आई वडिलांजवळ तिला ठेवलं होतं . नवऱ्याने तिला सोडली होती ..खूप संशय घ्यायचा ..अगदी मारायचा ही .मुलगी झाल्यावर ही माझी मुलगी नाहीच म्हणायचा ..मुलीलाही मारायला लागल्यावर माहेरी निघून आली ..कायमची रहा म्हणाला तिकडेच .सिव्हील मधे डिप्लोमा केला होता .. इथे पी डब्ल्यू डी मधे लागली ..ती ही तीन वर्षांपासून इथे रहाते आहे . चांगुलपणा वरचा विश्र्वासच उडून गेला आहे त्यामुळे सतत आपल्याबरोबर काहीतरी वाईट होणार ही भीती बाळगून जगत आहे . तीने मला साईंचा अंगारा लावला .. अपार श्रध्दा आहे साईंवर .. या वाईट जगात ते एकमेव तारणहार आहेत ही तिची ठाम समजूत आहे . या श्रध्देमुळे तिला जगण्याचं बळ मिळतं हे नक्की .तिचा निरोप घेऊन बाहेर पडले आणि समोरच टॅक्सी दिसली अन् हायसं वाटलं होतं ..

बस मधून बाहेर नजर टाकली .. मुंबई सोडली होती आणि मोकळं वारं अंगाला स्पर्श करू लागलं . किती तरी वेळ मी डोळे मिटून ते थंड वारं अनुभवत बसून राहिले ..

‘ ताई ..’

हाक कानावर आल्यामुळे डोळे उघडुन बघीतलं आणि मला आश्चर्यच वाटलं . मधू होता तो .. रघू चा लहान भाऊ हा याच गाडीत होता आणि आपल्याला दिसला कसा नाही ..आणि हा मुंबईत काय करतोय ?? मी भांबावलेल्या नजरेने त्याच्याकडे पहात होते ..

क्रमशः

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}