☸️फिटेअंधाराचेजाळे !☸️ 🍁 भाग दोन 🍁
☸️फिटेअंधाराचेजाळे !☸️
🍁 भाग दोन 🍁
‘ ताई .. तुम्हाला बस मधे चढतानाच पाहिलं ..पण खूप घाईत होत्या म्हणून हाक मारली नाही ..’
मी काहीच न बोलता गप्प बसून राहिले . बाजूला असलेल्या बॅग वरची पकड अजून घट्ट केली .माझा चेहेरा कदाचित आक्रसला असावा . माझ्याकडे बघत हळुवारपणे तो म्हणाला ‘ इथं बसू का ..’
मी प्रश्नाचं उत्तर न देता तशीच बसून राहिले . बराच वेळ तो उभा राहिला मग बाजूच्या दुसऱ्या सीट वर बसला . मी सरळ त्याच्याकडे बघत नसले तरी डोळ्याच्या कोपऱ्यातून चाललेली त्याची चुळबुळ माझ्या लक्षात येत होती . मी काहीच बोलत नसल्यामुळे त्याची अस्वस्थता वाढत असावी . का बोलावं मी त्याच्याशी ..कोणत्या अधिकाराने ! माझ्याशी बोलण्यासाठी तो शब्द जुळवत असावा ..हळू हळू बोलायला लागला , कदाचित मी बोलणार नाहीच हे गृहित धरून .
‘ मी मुंबईत असतो . सहा महिने झाले..इथं मंत्रालयात लावलं मला आबांनी .’
आता मात्र मला धक्का बसला .. एवढं सगळं महाभारत झालं आणि त्यानंतर सुध्दा आबांनी याला नोकरी लावून दिली . स्वतः च्या मुलीची काळजी नाही वाटली .. मी कुठे असेन , कशी असेन , काय करत असेन .. जीवंत तरी आहे की नाही ..एकदा ही बघावस वाटलं नाही . हेच का माझ्यावरचं प्रेम . माझ्याजागी सत्या किंवा विश्व दादा असते तर इतकं निवांत राहिले असते का ते ..मग माझ्याच बाबतीत का ? मी मुलगी आहे म्हणून ? माझ्या बाबतीतल्या त्यांच्या संवेदना इतक्या टोकदार का ? भावना काटेरी का ? आता मात्र न राहवून त्याच्याकडे आश्चर्याने बघीतलं .. माझ्या डोळ्यातला प्रश्न त्याला समजला असावा .. खाली मान घालून हळूच पुटपुटला ..
‘ ते इलेक्शन मधे आमच्या समाजाची एकगठ्ठा मत देण्याची अट होती ..’
हे ऐकताना काय वेदना झाल्या मला . माझ्यापेक्षाही निवडणूक महत्वाची होती . सत्ता , पद , प्रतिष्ठा महत्वाची ! मग ती आपल्या मुलीचा बळी देऊन मिळवलेली का असेना . मधूला आबांनी नोकरी लावली म्हणून नाही वाईट वाटलं ..आबा सगळ्यांनाच मदत करत असत. पण माझ्या आणि रघू मुळे दोन घरात विस्तव जात नसताना ही फक्त मतांच्या लाचारी साठी ती लावली हे दुःख होतं . आणि आबाच का .. विठुकाकांनी पण काही वेगळं केलं नव्हतं आमच्या प्रेमाच्या चितेवर स्वतः ची पोळी भाजून घेतली होती . ही सगळी माणसं कुठल्या मातीची आहेत .आपल्या मुलांच्या सुखा पेक्षाही या व्यवहार्य गोष्टी त्यांना इतक्या महत्वाच्या वाटत होत्या त्यासाठी त्यांनी अव्यवहार्य मार्ग स्वीकारले होते .माझा संताप संताप झाला आणि तो निकराने थोपवून ही डोळ्यातून वहायला लागला . माझी अवस्था बघून तो अस्वस्थ झाला . हळुच म्हणाला ..
‘ ताई .. मी समजू शकतो ..’
‘ नाही .. नाही समजू शकत तू ..कोणीच नाही समजू शकत ..’
मी भावनातिरेकाने जवळपास ओरडले .. माझा आवाज चिरका झाला होता ..माझ्या पुढच्या दोन तीन सीट पर्यंत आवाज गेला असावा . बरेच जण मागे वळून बघायला लागले . काही जण गुंगीत असल्याने नेमका कसला आवाज आला , कुठून आला याचा शोध घ्यायला लागले .मधू घाबरला आणि ‘ सॉरी .. सॉरी ..’ म्हणत बसून राहिला . मी आबांना बरं नाही हे विसरून गेले क्षणभर ..त्यांचा खूप राग आला होता मला .कुठलीच भावना त्यांनी कधीच उघडपणे दाखवली नाही .. ना प्रेम ना राग ! त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे आबा आठवतात ते मी लहान असतानाचे ..मी मोठी झाले आणि त्यांचं प्रेम संपून फक्त काळजी राहिली . मुलीची जात म्हणून फक्त काळजी . आपल्याच पोटच्या दोन मुलांमधे सुध्दा भेदभाव ! मुलगा उच्च जातीचा आणि मुलगी ..ती मात्र खालच्या दर्जाची ..
बराच वेळ माझ्या डोळ्यातून पाणी वहात होतं. तो ही शांत बसून राहिला . मी उगाच खिडकीतून बाहेर बघत राहिले .. ओसाड प्रदेश दिसत होता .. माझ्या मनासारखा च ..एखादी ही हिरवी खूण नाही .. वैराण , भकास ! बस पळत होती .. अंतर कापत होती पण ओसाडपणा मात्र सारखाच जाणवत होता . माझं पण तर नाही का आयुष्य चाललं आहे पण ओसाड असणं नियमीत आहे .
‘ ताई .. मी तुम्हाला खूप शोधलं ..तुम्ही मुंबईत असता हे ऐकून होतो ..पण एवढ्या मोठ्या शहरात कसं भेटणार तुम्ही ..’
‘ का .. मला का भेटायचं होतं ..’
‘ नाही म्हणजे तुम्ही इथेच आहात हे कळलं म्हणून ..’
‘ मग त्याने काय फरक पडतो .. तसं तर एका गावात रहात होतो आपण ..तेंव्हा तर नाही काही बोललास ..’
‘ ताई .. माफ करा ..’
‘ नको मागू माफी .. ती कधीच मिळणार नाही .. कोणालाच नाही ..’
‘ ताई .. भाऊ पण ..’
मी त्याच्याकडे रागाने पाहिलं .माझे डोळे बघून त्याने शब्द गिळले . मी मान हलवत म्हणाले ..
‘ नाही .. यापुढे एक शब्द ही नको .. माझा कोणाशीच काहीही संबंध राहिलेला नाही . चहा तली माशी काढून टाकावी इतक्या सहजतेनं आयुष्यातून काढून टाकलं मला ..आता कोणा बद्दलच काहीच ऐकायचं नाही मला ..प्लीज तू तुझ्या जागेवर जाऊन बस ..’
मी हात जोडलेले पाहून तो कसंनुसा झाला . ‘ ताई हात जोडू नका .. जातो मी .. पण एक सांगायचं होतं ..’
‘ नको .. मला काहीच ऐकायचं नाहीय ..’
मी त्याला बोलूच दिलं नाही .त्याच्या डोळ्यांत पाणी आल्याचं मला जाणवलं .मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर बघत बसले . तो उठून उभा राहिला .. बोलू की नको या द्विधा मनःस्थितीत असल्यासारखा . खाली वाकत म्हणाला ..
‘ ताई .. आई गेली ..उद्या चौदावा आहे तिचा ..म्हणून चाललोय जामगाव ला ..नवी नोकरी दोन दिवसच रजा मिळाली होती .’
तो माझी प्रतिक्रिया न पहाता पुढे निघून गेला . त्याची आई .. म्हणजे माझी रखमाई गेली . खूप खूप भरून आलं . बाहेर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला .. मी खिडकी लावण्याचा प्रयत्न करत होते .. तेवढ्यातच दोन चार टपोरे थेंब अंगावर पडलेच . अवकाळी पाऊस आला होता .. आतही आणि बाहेरही ..!
माझ्या डोळ्यासमोर रखमाई आली . सावळी पण नीटस .. हातात कोपरापर्यंत बांगड्या ..कपाळावर रुपया एवढं ठसठशीत लाल भडक कुंकू .हातावर गोंदण , कपाळावर गोंदण . तीन ठिकाणी ठिगळ जोडलेली नऊ वार ..पण अतिशय स्वच्छ ! मूळचा सावळा रंग रापून गेलेला ..डोळ्यात मात्र अपार माया ! माझ्यावर तर लहानपणापासूनच जरा जास्त माया .. कदाचित तिला मुलगी नव्हती म्हणून असेल .पहिल्या तीन मुली राहिल्या नाहीत ..नऊ महिन्यांच्या आत पडायचं म्हणे बाळ ! आता वाटतं पडायचं की पाडायचे ..देवच जाणे ! त्यानंतर रघू आणि मग चार वर्षांनी मधू ! मुलीची हौस असावी तिला .परिस्थिती अशी होती की मुलीची हौस पुरवावी ही लक्झरी होती तिच्यासाठी कदाचित .लहानपणी मला आंघोळ घालणं ,माझे कपडे धुणं ,माझ्याशी काही बाही गप्पा मारणं हे आनंदाच निधान होतं तिच्यासाठी . मग शिक्षणासाठी म्हणून मी जिल्ह्याच्या ठिकाणी गेले .. सुटीत गावाला आले की काय करू नी काय नको असं व्हायचं तिला . तिचं नाव रखमा .. सगळे एकेरीच बोलवत . मी मात्र आधीपासून रखमाई म्हणायचे . आईला कोणी आहो जाहो करतं का ? असं वाटून एकेरी बोलवताना अपराधी नाही वाटायचं मग ..अगदी आता आता पर्यंत तेल लावून द्यायची .तिची खरखरीत बोटं अगदी मायेनं केसातून फिरायची ..मग तोच हात माझ्या चेहेऱ्या वरून फिरवून अलाबला काढायची .’ अगं नको ना .. तेलकट होतो चेहेरा ‘ म्हंटल तर म्हणायची ‘ काई होत नाई .. कसा तुकतुकीत दिसतंय बगा तोंड ,अक्षी लक्षुमी वानी ‘
मला तिच्या हातावरच्या शिरांवर हात फिरवायला गंमत वाटायची ..काबाड कष्ट करून त्या अगदी ठसठशीत होत्या . माईचं आणि तिचं विशेष गुळपीठ होतं . तिच्याशिवाय माईचं पान हलत नव्हतं.त्यामुळे ती घराचाच एक भाग होती. विठुकाका शेतावर आणि ही घरी ..इतकी सवय झाली होती की त्या दोघांशिवाय मी घराची कल्पना ही करू शकत नव्हते .किती छान होते ते दिवस ..मी आणि रघू लहान होतो तेच बरं होतं ..मोठे झालो आणि हा सगळा घोळ होऊन बसला .
माझ्या आणि रघूबद्दल जेंव्हा कळलं तेंव्हा तणाव निर्माण झाला होता . सगळेच खूप पॅनिक झाले होते कारण खूप अनपेक्षित घटना घडल्या होत्या . रखमाईबद्दल मला खात्री होती ..ती मला सून करून घ्यायचं म्हणून खूप खुश असेल असं मला वाटलं होतं .पण आपल्याला वाटतं तसंच घडत नसतं ..किंबहुना आपल्या वाटण्याचं आणि असण्याचं प्रमाण नेहेमी व्यस्त असतं ! एक तर हे सगळं समजल्यावर माझ्याशी तिचं बोलणं शून्य झालं . मी अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ती मला टाळत होती आणि ते खूप त्रासदायक होतं . नंतर तर तिचं घरी येणं ही बंद झालं . तरी एकदा मी तिला गाठलंच ..विचारलं तू नाराज आहेस का ? तर म्हणाली तुमच्यावर नाराज होण्याईतकी मी मोठी नाही . हे मोठं असणं काय होतं तिच्या लेखी ..लेकीसारखी माया केली माझ्यावर , मला लेक म्हणत होती मग मी तिच्यापेक्षा मोठी कशी ? मी हळवी झाले बोलताना पण ती खंबीर होती ..खंबीर म्हणण्यापेक्षा टणक होती .ही वेगळीच रखमाई होती ..माझी रखमाई नव्हतीच. हलाखीच्या लाटा सोडून सोसून खडक झाली होती ..अभेद्य असा ! त्यामुळे माझ्या डोळ्यातल्या पाण्याचा तिच्यावर काय परिणाम होणार .
निर्वाणीचं आणि निर्णय सांगितल्या सारखं म्हणाली ..’ तुमचा अन् आमचा कायीच मेळ नाई .. येड्यागत वागू नका .. तुमाला मुलगी मानलं मी .. मुलीचं चांगलं व्हावं असं परतेक आई बापाला वाटतं ..सून गरीबाघरची आनावी अन् लेक मोठ्याघरी द्यावी असं मोठे लोक म्हनत्यात ..मी अडाणी बाई .. तुमचं समदं चांगलं हू दे ‘
‘ काय वाईट होणार माझं .. रघू तुझा मुलगा आहे तरी तू असं म्हणतेस ..काय कमी आहे त्याच्यात ..एम पी एस सी देतोय ..आज ना उद्या चांगली नोकरी लागेल ..मग तू तरी समजुन घे ना आम्हाला .. माझं प्रेम आहे त्याच्यावर ..’
माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाली ‘ बास .. असलं काय बी वंगाळ बोलू नगासा ..ऐकल कुनी ..तुमच्या पेक्षा धा इस पावसाळे जास्त बगीटलेत मी ..राजकन्या हायसा तुमी .. कर्नाला पन दुरपदीनं झीडकरलं व्हतं ..आपली पायरी बगून ऱ्हावं मानसानी .. नायतर म्हाभारत ठरलेलंय . माज्या रघू ला जगू द्या सुखानं ..येड्या आईचं एवडं म्हननं ऐकाच तूमी .. पाया पडते तुमच्या ‘ तिचं वागणं जिव्हारी लागलं होतं . माझी माझी वाटणारी माणसं दूर जात होती आणि मी बघण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते .
मधू माझ्याकडे येताना दिसला ..मी मुद्दाम डोळे मिटून घेतले .त्याच्या ते लक्षात आलं तरी जवळ येऊन म्हणाला ‘ ताई .. मी आधीच उतरेन तीन किलोमीटर ..चालत येईन मी ‘
‘ का .. बस गावापर्यंत जाते की ..’
‘ हो पण ..’
एवढंच बोलून तो गप्प बसला ..
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी