मनोरंजन

फिटेअंधाराचेजाळे…! भाग तीन

☸️फिटेअंधाराचेजाळे…!☸️

🍁भाग तीन 🍁

‘पण काय .. अर्थात मला काय करायचं आहे म्हणा ..चालत ये , पळत ये काहीही कर ‘

माझ्या बोलण्याने तो एकदम शांत झाला आणि जागेवर जायला लागला तसं मला राहवलं नाही . मी कितीही म्हणत असले काहीही कर ,माझ्याशी काही बोलू नकोस , मला काही देणं घेणं नाही तर आत खोलवर कुठेतरी उत्सुकता होतीच .मी थोडं नरमाईने म्हणाले ‘ रात्रीची वेळ असेल .. कशाला उगाच अंधारात येतोस ?’

‘ अंधाराची भीती नाहीच , कधीच वाटली नाही .अंधारासोबतच वाढलोय , त्याला काय घाबरायचं? पण थोरले मालक असतील स्टॅण्डवर ..’

‘ मग त्याने आता तुला का फरक पडावा ..दादाला फरक पडेल असं काही नाहीच ..मग का घाबरतोयस तू !की आता जगतानाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे जगणार ..तसंही उठ म्हंटल की उठायची आणि बस म्हंटल की बसायची सवय तुमची ,गाव सोडलं म्हणून बदलणार थोडीच आहे !’
माझ्या बोलण्यातला कडवटपणा त्याला जाणवला असावा ..तो कडवटपणा त्याला झोंबणं अपेक्षित होतं मला ..पण झोंबला तरी ते न दाखवण्याची काळजी त्याने घेतली किंवा सवयीने तो शांत होता .शांतपणे म्हणाला ..
‘ मला माहितीये तुम्हाला खूप राग आहे आमचा , भाऊचा ..पण भाऊ ला माहिती नाही आज तुम्ही येणार आहात ते ..तो मला घ्यायला येईल कदाचित स्टँडवर ..म्हणून मी आधी उतरतो असं म्हणालो . तुम्हां दोघांना पाहून थोरल्या मालकाचं डोकं काही ठिकाणावर रहाणार नाही आणि ही वेळ हे सगळे तमाशे करण्याची नाही .भाऊ पण त्या मनस्थितीत नसणार म्हणून मी आधी उतरतोय ..’

मी काही बोलण्याच्या आत झपझप पावलं टाकत तो निघून गेला .माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा केला या लोकांनी आता अजून काय तमाशा करणार ? माझं आयुष्य मी कसं जगायचं हे ठरविण्याचा अधिकार दादाला कोणी दिला ? मी तर नक्कीच दिला नाही ..मग घरातला मोठा मुलगा म्हणून आपसूक हा अधिकार त्याच्याकडे दिला गेला का ? मी नाही घाबरत त्याला ..पण आज तीन वर्षानंतर रघू पण समोर येईल , मला पाहिल्यावर काय वाटेल त्याला ? मला पाहून त्याचे डोळे चकाकतील का ? की आधी सारखं मंद स्मित करेल ? की पाहून न पाहिल्यासारखं करेल घाबरून ..नुसत्या विचारानेच माझ्या कपाळावरची शीर उडायला लागली . अचानक खूप गरम व्हायला लागलं ..कानातून गरम वाफा यायला लागल्या .मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करायला लागले ..पण ती तिरकी बसली होती आणि थोडा फार पाऊस पडून गेल्याने पाण्यामुळे अजूनच घट्ट बसली होती .आपल्या आयुष्यातही अशा घट्ट बसणाऱ्या गोष्टी असतात ज्यामुळे जीव गुदमरतोच आपला !एकही झरोका नसतो ..बाहेरचं काही पाहून मन रमवण्यासाठी ..आत तर नुसती राख असते आणि मग एखादी फुंकर ही पुरेशी ठरते ठिणगी पेटवायला !मी निकराने खिडकी ढकलली ..एक थंडगार झुळूक शहारा देऊन गेली . मरगळलेल्या मनाला थोडी टवटवी आली .संध्याकाळ होऊन गेली होती .. सूर्य लपला होता कुठेतरी ढगाआड ..सगळीकडे सोनपिवळा प्रकाश पडला होता .एखाद्या तासाभरात पोहचेन मी गावी. त्या थंडगार हवेत झाडं झुडपं डोलत होती . पक्ष्यांचे थवे ,त्यांच्या रांगा लांबच लांब दिसत होत्या. ते ही आपल्या घरट्याकडे परतत होते.घरट्यात असतील त्यांचीही पिल्लं .. गुरं ढोरं घराकडे निघाली होती .ती ही एका ओढीनं चालल्यागत वाटत होती .घराची ओढ कोणाला नसते ? पण आपली वाट पाहणारं घरी कोणीतरी हवं ना .. पत प्रतिष्ठा , मान अपमान , प्रेम , राग , द्वेष या सगळ्याच भावनांचं काटेरी झुडूप असतं का आपल्यात ..ते काटे काढून टाकणं जमतच नाही . मग त्या झुडुपाचं मोठ्या वृक्षात रूपांतर होतं आणि मग समूळ निघणं अवघड होऊन बसतं . आपल्याच घरी जाताना मी एवढी साशंक का असावे . मधला तीन वर्षांचा काळ पुसून फक्त माई , आबांची मुलगी म्हणून घरी का जाता येत नाहीये मला .वारुळातून मुंग्या बाहेर पाडाव्यात तसे विचार डोक्यात येऊ लागले ..

गाव जवळ आल्याच्या खुणा दिसायला लागल्या. दुरूनच यमाईचा डोंगर दिसायला लागला. हिरव्यागार पाचूची समृद्धी ल्यालेल्या त्या डोंगराकडे डोळे भरून पहात बसले .एखादं गाव हे फक्त तिथल्या आपल्या वावरामुळे किंवा आपल्या असणाऱ्या घरामुळे , माणसांमुळे ते आपलं असतं असं नाही तर तो अख्खा परिसर आपल्या जडणघडणीत ठसा उमटवून जात असतो .आपल्या मनोव्यापराचा एक अख्खा कोपरा त्या परिसराने व्यापलेला असतो ..तिथल्या आठवणींनी ठाण मांडलेलं असतं तिथे .एखाद्या हळव्या क्षणी त्यातली एक एक आठवणींची पूरचुंडी सोडावी अलगद आणि त्यातल्या नितळ , निर्व्याज भावनांशी समरस व्हावं . आताही यमाईचा डोंगर पाहिल्यावर किती आठवणींची गर्दी झाली ..माझीच कितीतरी रूपं मला दिसायला लागली ..हिरव्या परकरात माईचा हात धरून जाणारी मी , विठोबाच्या खांद्यावर बसून जाणारी मी ..विश्व दादा आणि सत्याच्या हाताच्या झुल्यात झुलत जाणारी मी , आबांबरोबर बैलगाडीत बसून जाताना मधेच डुलक्या खाताना आबांनी हळूच डोकं मांडीवर ठेवावं हे तर ठरलेलंच ..आणि ठेचकाळून धडपडले तेंव्हा रघुचा घट्ट हात धरणारी मी ! त्याच्या हाताची पकड आताही जाणवली .. रघू च्या आठवणीने पुन्हा जीव कासावीस झाला . का .. का हा माणूस माझा पाठलाग करतोय ..आणि कधीपर्यंत करणार ! की मी मेल्यावरच यातून माझी सुटका आहे . या यमाईच्या डोंगरावरच तर मरताना वाचवलं होतं त्याने मला . नुकतीच परकरातून साडीत आले होते मी .उमा , सावी आणि मी किती दंग होऊन गप्पा मारत चाललो होतो .कशाचंच भान नव्हतं ..पायाला काहीतरी टोचल्याची जाणीव झाली ..बाजूने सळसळत साप जाताना पाहिला . साप चावण्यापेक्षा त्याला बघूनच मी घाबरले आणि चक्कर यायला लागली ..उमा ओरडत होती .
‘ साप ..साप चावला ‘ रघू कुठून आला ते कळलंच नाही ..मी तिथेच आडवी पडले होते .. रघूने मला उचललं आणि पळतच निघाला . तेंव्हा सुध्दा मला का उचललं ?म्हणून दादा प्रचंड चिडला होता . आणि माझा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा रघू केविलवाणा झाला होता .ते सगळं आठवून आताही मला खूप त्रास झाला . तलाव दिसायला लागला ..नवसाचा तलाव म्हणत त्याला . नवसाचा तलाव का म्हणत त्यामागेही काही आख्यायिका होतीच . तलावात नारळ सोडला नाही तर कोणतंच काम पूर्ण होत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं ..त्यामुळे कोणाकडेही काहीही कार्य असो किंवा कोणाचं काही काम असेल तर तलावात नारळ सोडण्याची प्रथा होती .माझं आणि रघूचं सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून मी पण तर सोडला होता नारळ ! पण त्या तलावाला ही पाझर फुटला नाही. श्रद्धा , अश्रद्धा असं काही नसतंच ..आपण त्या नियतीच्या हातचं बाहुलं असतो .. ती आपल्याला हवं तसं वाकवत असते ..परिस्थिती ला शरण जाणं म्हणजे श्रद्धा .त्याचं अस्तित्व मान्य करून प्रयत्न चालू ठेवणं म्हणजे श्रद्धा ..त्याचं अस्तित्व मान्य न करता परिस्थितीशी जो लढतो तो अश्रद्ध असं म्हणता येईल का ? रघू आहे असाच .. अश्रद्ध ! तलावात नारळ सोडायला त्याच्या बरोबरच गेले होते .मी श्रद्धेने हात जोडत होते .. हा मात्र दूर उभा राहून हसत होता .मला खूप राग आला होता ..तर म्हणाला ‘ तू एवढी शिकलेली आहेस ..अशा गोष्टींवर विश्वास ठेवतेस?तुला खरंच वाटतं हा तलाव एका नारळासाठी सगळं व्यवस्थित करत असेल .. मुळात तलाव म्हणजे काही माणूस नाही , मला हे दे मग मी ते करतो म्हणायला .. निसर्ग मुक्त हस्ते देत असतो .. त्याला आपल्याकडून काही नको असतं. हे सगळे आपल्या मनाचे खेळ . आपल्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी माणसानेच हे सगळे प्रकार शोधून काढले आहेत .’
‘ असू शकेल .. पण हे असं काही केल्याने जर मनाला शांती मिळत असेल, ताकद मिळत असेल तर काय हरकत आहे .. तुला नाही करायचं तर नको करू .. मी तर करणारच ‘
‘ कर ना .. मी तुला अडवतच नाहीये .प्रत्येकाने आपल्या हिशोबाने वागावं .. मी म्हणतो तेच फक्त बरोबर हा आग्रह धरणं म्हणजे सुद्धा एक प्रकारची स्व श्रद्धाच !मी तर फक्त एका देवीचा भक्त आहे .. ती प्रसन्न झाली की आयुष्यात दुसरं काही नको ‘ माझ्याकडे बघून तो सहेतुक हसताना पाहून त्याचं म्हणणं मला समजलं होतं . कितीतरी आठवणींचं निर्माल्य या तलावात सोडून आले होते .

दुतर्फा आंब्याची , बोरांची , बाभळीची , चिंचेची आणि कसली कसली झाडं दिसायला लागली .आणि गाव आल्याची खूण पटली . मी केसांवरून हात फिरवला . तोंडावरून रुमाल फिरवला ..आता इथेच फाटा लागेल आणि मधू इथेच उतरणार हे लक्षात आलं .मी पुढे पाहिलं तर मधू दाराशीच उभा होता . तो माझ्याकडेच पहात आहे हे लक्षात आल्यावर मी नजर बाहेर वळवली . गाडी थांबली .. मधू उतरला असावा ..कंडक्टरने डबलबेल देताच गाडी सुरू झाली . मी मधू दिसतोय का म्हणून पाहिलं पण तो दुसऱ्या बाजूने उतरल्यामुळे मला दिसलाच नाही . गडद अंधारात तो गुडूप झाला होता . आता रातकिड्यांची किरकिर ही जाणवायला लागली होती . तुरळक मिणमिणत्या टॉर्च मधे कोणीतरी चालताना दिसत होतं . झाडांच्या फांद्या बसवर येऊन आपटत होत्या . मी पुढे रिकाम्या झालेल्या जागेवर येऊन बसले . स्टँडवरच्या बत्त्या दिसायला लागल्या . ते भलं मोठं पिंपळाचं झाड दिसलं . दादा जीप घेऊन उभा दिसला .. त्याच्याबरोबर दोन चार टाळकी होतीच . गाडीचा वेग मंदावला ..दूध डेअरी दिसली आणि तिथे खांबाला टेकून उभा असलेला रघू दिसला . इतका दूर उभा असून आणि म्हणावा तेवढा उजेड नसतानाही मी त्याला ओळखलं .. त्यात नवल काहीच नव्हतं . माझ्या पोटात खड्डा पडला , तोंडाला कोरड पडली . मी सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली.

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}