☸️फिटे अंधाराचे जाळे …!☸️ 🍁भाग चार 🍁
☸️फिटे अंधाराचे जाळे …!☸️
🍁भाग चार 🍁
कंडकटरने हातातला पंचर जोरजोरात खांबावर आपटला आणि म्हणाला ‘ ओ ताई .. चला ,जामगाव आलं ‘
एक दोघे तिघे सोडले तर बस रिकामी होती . कंडक्टर नवखा असावा नाहीतर जामगावला येणाऱ्या बसचा कंडक्टर आबांना , दादाला ओळखत नाही असं होणारच नाही ..कित्येकदा रात्रीचं जेवण वाड्यावरूनच जात असे . दादा समोर उभा आहे आणि त्याला नमस्कार केला नाही असं घडणं शक्यच नव्हतं . एकतर दादाचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्याच्या कडे पाहिलं की त्याची भीती वाटावी . सहा फूट उंची ..कमावलेलं शरीर , गोरा रंग आणि भेदक घारे डोळे . रघू मला म्हणायचाही तू त्यांची बहीण फक्त दिसण्याच्या बाबतीत शोभतेस ..स्वभाव अगदी विरुद्ध आहे .’ म्हणजे माझी भीती वाटते तर ‘ असं गमतीत विचारल्यावर म्हणाला होता ..’ थोरले मालक देखणे आहेत पण त्यांच्या स्वभावातली मग्रुरी त्यांच्या व्यक्तिमत्वात उतरली आहे .. तसं तुझा गोड स्वभाव तुझ्या व्यक्तिमत्वात उतरलाय ..देखणी त्यातून गोड .. तू अगदी नूतन सारखी दिसतेस ..प्रगल्भ , देखणी आणि तरीही गोड ..प्रगल्भ असणाऱ्या स्त्रिया गोड वाटत नाहीत त्या करारी वाटतात ..पण तू अपवाद आहेस ‘
मी हसतच म्हणाले होते ‘ अरे वा .. बराच अभ्यास आहे की तुझा स्त्रियांचा ‘
‘ स्त्रियांचाच नाही माझा माणसांचा अभ्यास आहे .. पुस्तकं कमी आणि माणसं जास्त वाचलीत मी ..’ तो गंभीर झाला होता . आता दादाला पहाताना हे सगळं पटकन डोळ्यासमोरून गेलं .
कंडक्टरने पुन्हा एकदा आवाज दिला तशी मी उठले आणि सावकाश खाली उतरले .
मला पहाताच दादा बरोबरचा एकजण पळत आला . माझ्या हातातली बॅग मी’ नको नको ‘ म्हणत असताना घेतली . दादा मात्र जागेवरचा ढिम्म हलला नाही . दूर उभा असलेला रघू , अगदी समोरच उभा असलेला दादा , तीनेक वर्षांनी गावात आलेली मी ..नाही म्हंटल तरी खूप अवघडले होते .छातीचे ठोके वाढले होते ..माझ्या चेहेऱ्यावर माझी अस्वस्थता दिसत असावी . आता दादा बरोबर बसावे लागणार या विचाराने मी अजूनच कावरी बावरी झाले .तितक्यात सत्या घाईतच येताना दिसला आणि मला हायसं झालं .माझ्याजवळ येत तो आपुलकीने म्हणाला ..’ चल , माई वाट बघते आहे ..कसा झाला प्रवास ‘
काय बोलावं ते न सुचून मी फक्त होकारार्थी मान हलवली . मी आणि सत्या जीपमध्ये बसलो . मी हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून दूरवर दिसणाऱ्या रघू कडे बघीतलं ..इतक्या दूरवरून मी जसं त्याला ओळखलं तसं त्यानेही मला ओळखलं असावं ..कदाचित ! दादाने जीप सुरू केली तेवढ्यात त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाने दादाच्या कानात काही तरी सांगितलं ..तसं दादाने एक जोरदार शिवी हासडत जीपला खूप वेगात यू टर्न दिला . त्यामुळे मी आणि सत्या एकमेकांच्या अंगावर धडपडलो ..काय होतंय काही कळायच्या आत दादाने जीप अगदी रघूसमोर नेऊन फर्लांग भर अंतरावर उभी केली . जीपच्या लाईटचा उजेड रघूवर पडला ..आता मी त्याला नीट पाहिलं. होता तसाच आहे .. फक्त आता जाणवले ते त्याच्या चेहेऱ्यावरचे करारी भाव ..लाचारी अजिबातच दिसत नव्हती .हाताची घडी घालून तो शांतपणे बघत उभा होता .दादा जोरात हॉर्न वाजवत होता आणि तोंडाने शिव्यांचा भडीमार चालू झाला. पण रघू जागेवरून हलला देखील नाही . हे माझ्यासाठी नवीन होतं .त्याच्या या वागण्याने दादा अजूनच बिथरल्यासारखा झाला . शिव्या देताना आपली लहान बहीण आपल्याबरोबर आहे याचं भान देखील सुटलं .सत्याच्या आणि माझ्या गोष्टी लक्षात यायला वेळ लागला नाही .. तो माणूस दादाच्या कानात काय खुसपुसला त्याचा अंदाज आला . सत्या दादाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला ..
‘ दादा प्लीज .. आता आपण घरी जाऊ ..माई ,आबा वाट बघत आहेत ..’
दादा रागाने धुमसत होता ..’ हा .. हा इथे कसा आला .. बरोबर आजच कसा स्टँडवर आला ..याची एवढी हिंमत ?जित्याची खोड आहे मेल्याशिवाय जायचीच नाही .. आज याला मी सोडणार नाही .. ए तू थांब रे इथंच ..येतोच मी ..थांब तुझा आज सोक्षमोक्षच लावून टाकतो ..’
रघू शांतपणे उभा होता . आणि विशेष म्हणजे ताठ मानेने दादाकडे बघत होता . त्याही परिस्थितीत मला बरं वाटलं .सत्याने दादाला पुन्हा एकदा माई वाट बघते आहे आणि मी त्यांच्याबरोबर आहे अशी आठवण करून दिली आणि दादाने जीप वळवली . मी आल्यापासून तो एक शब्द ही माझ्याशी बोलला नव्हता ..मला ते अपेक्षित ही नव्हतं .ज्या बहिणीवर प्रेमच नाही अशा बहिणीच्या आयुष्याची याला एवढी का काळजी .माझी लाज , इज्जत याला एवढी महत्वाची वाटते तर ज्या भाषेत तो आता बोलत होता तेंव्हा नाही का वाटली .सत्या मात्र माझा हात हातात घेऊन थोपटत राहिला . त्याने दाढी वाढवली होती ..तब्येत चांगलीच खराब झाली होती .. खराब म्हणण्यापेक्षा काटक वाटत होता .. मूळचा गोरापान सत्या आता अधिक तेजःपुंज वाटला मला .आणि दादा ..तो मात्र जसा होता तसाच होता .. सतत केसातून हात फिरविण्याची लकब ..हातातलं चांदीचं जाडजूड कडं ..रागाने कान सुध्दा लाल झाले होते . त्याचे घारे डोळे आग ओकत होते .जीप वळून कच्चा रस्ता पार करून पक्क्या सडकेवर आली . ही सडक सुध्दा आबांनीच बांधलेली . अगदी वाड्यापर्यंत . जाताना मारुतीचा पार दिसला ..सरकारी शाळा ..सरकारी विहीर ..मग मळा ..झालं आता दोनच मिनिटांत वाडा येईल . वाडा दिसायला लागला .. काळ्या चिर्यांचा मजबूत दिमाखदार ..अगदी आबांसारखाच ! मोठं अंगण .. सडा रांगोळी केलेलं ..त्यात तुळशी वृंदावन ..तिथे नेहेमीप्रमाणे दिवा तेवत होता .भव्य लाकडी कमान आणि मजबूत दरवाजा ..माई दारात औक्षणाचं ताट घेऊन उभी होती आणि वहिनी भाकर तुकडा घेऊन ! आम्ही उतरलो .. तसं दादा म्हणाला ‘ तुम्ही व्हा पुढे .. मी येतोच जरा ..’
सत्या त्याच्या हाताला धरून उतरवत म्हणाला ‘ दादा .. सोड हे .. तो आतापर्यंत थांबला असणार आहे का ? उद्या रखमाचा चौदावा आहे .. कोणीतरी येणार असेल म्हणून तो न्यायला आला असेल ..’
रखामाईच्या चौदाव्याच्या उल्लेखामुळे कदाचित पण दादा उतरला . माझ्या डोळ्यात पाणी आलं .मी आले आणि दारात रखमाई नाही असं पहिल्यांदा घडत होतं . माईला पाहून अजूनच रडायला यायला लागलं .. किती शांत पण तरी थकल्यासारखी वाटली थोडी . वहिनीने तुकडा ओवाळून टाकला , माई औक्षण करेपर्यंत पण दादा तिथे थांबला नाही ..
‘ चालू द्या तुमचं ..’ असं म्हणून फणफणत आत निघून गेला .त्याच्या जाण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही .औक्षण झाल्यावर माईने मला घट्ट मिठी मारली . माझ्या तोंडावरून हात फिरवून अला बला काढली . डोळ्यातलं पाणी थांबेना . सत्या म्हणाला ..’ इथेच उभं रहायचं आहे का ..चला .. ‘
वहिनी दादाच्या मागे निघून गेली . तिच्या आणि दादाच्या लग्नानंतर सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीच माझ्या आणि रघू बद्दल समजलं होतं आणि महिनाभरात तर मी घर सोडलं होतं .त्यामुळे माझी आणि तिची फारशी ओळख नव्हती .येतीजाती साठी चार दिवस गेलेल्या तिला दादाने माझ्यामुळे आठ दहा दिवस माहेरीच ठेवलं होतं. का तर म्हणे मी गड्याच्या मुलाच्या प्रेमात आहे त्यामुळे याचं नाक कापलं जाईल आणि सासुरवाडीला छी थू होईल. तिला यातलं काही समजायला नको म्हणून तिला आणयलाच तयार नव्हता ..शेवटी तिच्या भावाने तिला आणून सोडलं . ते चार आठ दिवस काय तो आमचा संपर्क .. त्यातही माझं उपोषण , असहकार धोरण त्यामुळे तिच्याशी फारसं बोलणं झालंच नव्हतं .
मी माई कडे बघत म्हटलं ‘ फार काही नाही बदललं ..’
माई दुखावल्यागत म्हणाली ‘ असं तुला वाटतं .. हात पाय धुवून घे .. जेवणाची वेळ झालीच आहे मी पानं घेते ..’
‘ नाही माई .. मी आधी आबांना भेटणार आहे ..मग बाकी जेवण वगैरे ..’
‘आताच रात्रीचं जेवण देऊन गोळ्या दिल्या आहेत त्यांना .. त्या गोळ्या घेतल्या की झोपच येते .. झोपलेत ते ..सकाळी भेट ..उठवायला नको ..’
‘ नाही ..मी नुसतं बघून तरी येते ..’
‘ बरं चल ..’
मी फ्रेश होऊन आले . घरात एक नवी बाई वावरताना दिसत होती .. कदाचित रखमाईच्या जागी असावी .पण तरुण होती ..माझ्या , वहिनीच्या वयाची असावी असं वाटलं . चेहेरा आणि बांधा खूपच रेखीव होता ..अगदी कोणाच्याही लक्षात यावा इतपत . मी मनातले विचार सारून माईच्या मागे गेले .. आबांच्या खोलीजवळ गेले आणि घशात आवंढा आला .मी माईचा हात घट्ट पकडला ..माई हळूच म्हणाली ‘ तुझा धोसरा घेतला होता .. आज तर गोळ्या घ्यायलाच तयार नव्हते ..म्हणाले त्यांना येऊदे ..मला डोळेभरून पाहू दे मग घेतो .. कसं बसं तयार केलं ‘
‘ माई .. तुला नाही आली माझी आठवण कधी ..’
माई ने मला जवळ घेतलं अपार मायेने डोक्यावरून हात फिरवला .डोळ्यातलं पाणी पुसलं ..पण बोलली काहीच नाही .एवढ्याशा रडण्याने ही तिच्या नाकाचा शेंटा लाल लाल झाला .निळ्या रंगाच्या नऊवारीतील सगळी सुहासिनींची आभूषणं घातलेली माई मूर्तीमंत सात्विकता दिसत होती . माईने हळूच दार लोटलं ..आम्ही दोघी आत गेलो ..मंद समया तेवत होत्या .. तेवढाच काय तो उजेड .त्या उजेडात आबांचा चेहेरा पाहिला आणि मला भडभडून आलं . माई ने ‘ शू..’ करत मला जवळ घेतलं . आबा शांत झोपले होते . मी त्यांच्याजवळ बसले ..सत्या ही तिथे आला . मी , सत्या , माई आबां कडे बघत शांत बसून राहिलो . आंबांचा हात हातात घ्यावा .. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवावा असं खूप खूप वाटत होतं पण मी जशी मोठी झाले तसं कधी आबांना स्पर्श केल्याचं आठवत नाही ना त्यांनी कधी मला जवळ घेतल्याचं आठवतं !
दादा खोलीत आला आणि वातावरणात एक अवघडलेपण आलं .. माई म्हणाली ..’चला जेऊन घ्या सगळे ..’
आम्ही कोणी काय म्हणतोय याची वाट ही न बघता माई निघून गेली . तीच्यापाठोपाठ मी ही जायला निघाले तसं दादाने विचारलं ..
‘ अजून ही संपर्कात आहात तुम्ही ..’
मी काहीच न बोलता बाहेर निघून आले . मी त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर न दिल्यामुळे तो चिडला आणि माझ्या मागे बाहेर येत म्हणाला ..’ मी तुला काहीतरी विचारतोय ‘
‘ मला नाही गरज वाटत तुला उत्तर देण्याची ..’
मी त्याच्याकडे न बघताच तिथून निघून आले .
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी