मनोरंजन

☸️फिटे अंधाराचे जाळे …!☸️ 🍁भाग सहा 🍁

☸️फिटे अंधाराचे जाळे …!☸️

🍁भाग सहा 🍁

‘ वहिनी .. तू इथे का उभी आहेस ..’
तिने दचकून माझ्याकडे बघीतलं .. मग घाबरली आणि मला म्हणाली ‘ प्लीज .. प्लीज .. तुम्ही जा इथून .. हे बाहेर आले आणि त्यांनी जर पाहिलं तर अजून चिडतील माझ्यावर ..’

‘ अगं हो .. हो .. पण तू अशी का उभी आहेस .. काय झालंय आणि कधी पासून उभी आहेस ..’ मी खूप हळू आवाजात विचारलं .

तिने एक हुंदका दिला मग पदर तोंडावर धरत मला हातानेच मला मागच्या दाराकडे जायला खुणवलं . ती मला मागे जा असं का म्हणतेय ते काहीच समजलं नाही पण फक्त ती म्हणते आहे म्हणून मागच्या दाराकडे गेले . दार उघडुन बाहेर गेले ..अजून फारसं उजाडलेलं नसल्याने तसा काळोखच होता . मी पाखरांचा किलबिलाट ही नव्हता मी मागे वळणार एवढ्यात वहिनी तिथे आली ..तिने दार लावून घेतलं .मला घट्ट मीठी मारली आणि हुंदके देत राहिली . मला हे सगळं खूप अनपेक्षित होतं .. एकतर ती का रडतेय ते मला कळत नव्हतं आणि माझी आणि तिची इतकीही घसट नव्हती की तिने मला मीठी मारावी .मी तिचा कढ ओसरू दिला . हळुहळु ती शांत झाली . आम्ही दोघी तिथे आंब्याच्या झाडाखाली बसलो .बराच वेळ शांततेत गेला . मग ती उठली विहिरीजवळ जायला लागली तशी मी घाबरले ..मी तिचा हात घट्ट पकडला .माझ्या हातातून हात सोडवत फिकटसं हसत म्हणाली ..’ नाही .. जीव नाही देणार ..खूप हिम्मत लागते त्याला ‘ मी हात सोडून तिच्याकडे बघत राहिले . तिने बादलीभरून पाणी शेंदलं .. मग तोंडावर सपासप पाणी मारलं . हात पाय धुतले ..मग पदराने तोंड पुसत माझ्याजवळ आली म्हणाली ..’ चला .. जाऊ आपण आत ‘
एक दोनच मिनिटांपूर्वी माझ्या गळ्यात पडून रडणारी वहिनी हीच का असा प्रश्न पडावा इतका बदल तिच्या चेहेऱ्यात , देहबोलीत झाला होता . मी तिचा हात पकडत म्हणाले ..’ एक मिनिट ..हे काय आहे वहिनी ..तू का रडत होतीस आणि बाहेर का उभी होतीस ते मला कळलं च पाहिजे ‘

‘ माझं नशीब .. प्राक्तन ..काहीही म्हणा ..आणि तुम्हाला समजुन काय फरक पडणार आहे . तुमचं स्वतः चं दुःख काय कमी आहे म्हणून तुम्हाला अजून माझं जाणून घ्यायचं आहे ..’

‘ मग वहिनी तू मला मीठी का मारलीस .. तुला काही बोलायचं च नव्हतं तर आपण इथे का आहोत ..’

ती मान खाली घालून बसली ..हळूच एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली ‘ माझी गरज होती ती .. मोकळेपणाने रडण्याची सुध्दा गरज असते ना .. लग्न झालं तसं माझं रडणं आटलंच .. बांध घातला त्याला .सासूबाईंनी मला खूप समजुन घेतलं आहे , जीव लावला आहे पण त्यांचं आणि माझं नातं असं आहे की मी त्यांना मीठी नाही मारू शकत ..आतलं दुःख धडका मारत असतं मग फुटतो बांध ..तुम्ही मला समजून घ्याल असं वाटलं .. तुमच्या माझ्या दुःखाची जातकुळी वेगळी असेल पण का कोण जाणे तुमच्याजवळ मोकळं व्हावंसं वाटलं ..’

‘ हो ना .. मग पूर्ण मोकळी हो .. सांग मला .. ती मालन तर नाही ना कारण ..’

तिने माझ्याकडे चमकून बघितलं ‘ तो विषय तर अजूनच वेगळा आहे .. काही दुखणी ही स्वतः च सहन करावी लागतात . आपलेच दात आणि आपलेच ओठ . हे अजून तरी राजरोसपणे माझ्यासमोर तिला खोलीत बोलवत नाहीत पण .. पण तिच्या घरी जातात आणि तिचा नवरा बाहेर उभा रहातो .. किती दुर्दैव ..तिला तरी का दोष द्यावा .. कोणास ठाऊक ती हे सगळं मर्जीने करत असेल ? शी .. लाज वाटते ..पण काहीच बोलू शकत नाही ..सासूबाई , आबांच्या ही कानावर या गोष्टी येतच असतील मग ते का कानाडोळा करतात या गोष्टींकडे ..मी ..मी पण कोणाची तरी मुलगीच आहे ना …’ ती कासावीस होऊन माझ्याकडे बघत होती . काय बोलणार मी .. मी नजर खाली वळवली .
दोन मिनिटं शांत होत राहिली .. मग हळुवारपणे म्हणाली

‘ आज तो विषयच नाही ..माझी आई ..ती खूप आजारी आहेत ..दमा होताच तिला ..फक्त वीस टक्के फुफ्फुस काम करतायत म्हणे ..औषधं घेऊन घेऊन कडक झाली आहेत फुफ्फुसं ..कालच अनिल दादाचा फोन आला होता .. हे तुम्हाला घ्यायला आले होते स्टँड वर , सत्या भावजी ही नव्हते .. सासूबाई स्वयंपाक घरात होत्या म्हणून मीच उचलला होता फोन ..तुम्ही आल्यानंतर इतकं काय काय घडलं की सासूबाईंना सांगणं झालंच नाही . म्हणून रात्री यांना सांगितलं तर म्हणाले नाही जायचं ..तुला सोडवायला मला यावं लागेल . मनू इथे आली आहे , तो रघ्या हरामखोर पण आला आहे नेमका ..मी रिस्क घेऊ शकत नाही . फोनबद्दल आताच कोणाला काही सांगू नकोस ..मी फक्त एवढं च म्हणाले की का एवढं ताणताय ..त्यांचं प्रेम आहे तर बोलून समजुतीनं घ्या जरा ..एवढे चिडले माझ्यावर ..माझ्या बहिणीच्या बाबतीत तू काही बोलायचं नाही म्हणून संतापले ..मला आईला भेटायला जायचं म्हणाले तर म्हणाले ..जा पण मग पुन्हा येऊ नकोस आणि सोडायला मी येणार नाही ..’

तिला पुन्हा हुंदका आला ..मी तिच्या पाठीवरून हात फिरवला . दादाचा खूप जास्त राग आला होता .पाखरांचा किलबिलाट सुरू झाला होता ..हळू हळू उजेड यायला लागला .. तसं ती म्हणाली ‘ मी जाते .. पुन्हा आपल्या दोघींना त्यांनी पाहिलं तर अजून चिडतील ..’

ती घाईत आत निघून गेली .. खोलीत जाग जाणवली .माई उठलेली दिसत होती . माईला हे सगळं सांगायचंच असं ठरवून मी आत गेले .

वाड्यात नेहेमीप्रमाणे वर्दळ सुरू झाली . माईची आंघोळ पूजा आटोपली ..मी ही लवकरच तयार झाले .. आबांना भेटायचं होतं ..वहिनीचे हुंदके कानात वाजत होते .सत्या पण आला ..सत्याशी बोलावं का .. सांगावं का त्याला ..तो बोलू शकेल दादाशी ..सत्याने विचारलं ‘ काय झाली का झोप ..माईच्या जवळ किती दिवसांनी झोपलीस म्हणजे झालीच असणार ..’

‘ हो हो .. मस्त ..’ मी इकडे तिकडे बघत अंदाज घेत होते . वहिनी माझ्याकडेच बघत होती सशासारखी ..तो म्हणाला ‘ काय गं .. तुझं लक्ष कुठंय ..’

मी घाईतच म्हणाले ‘ सत्या .. ऐक ना .. वहिनींच्या ..’
माई आत येत म्हणाली ‘ चल .. हे उठले आहेत .. बोलवतायत तुला ..’
माझं बोलणं अर्धवटच राहिलं .. सत्या माझ्याकडे प्रश्नार्थक बघत होता ..पण आबांना भेटायच्या ओढीने मी त्यांच्या खोलीकडे जवळपास पळतच निघाले . मी , आणि माई त्यांच्या खोलीत गेलो .आबा उठून बसले होते . श्रांत आणि शांत होते .. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट , पांढरं शुभ्र धोतर , पांढरी टोपी ..कपाळावर नुकतंच माईने नाम ओढलेला होता . ते तक्क्याला टेकून मांडी घालून बसले होते . मला पहाताच त्यांच्या टपोऱ्या डोळ्यांत टपोरे थेंब साचून आले .मी त्यांच्या जवळ बसले ..’ कसे आहात आबा ..’

फिकटसं हसत म्हणाले ‘ आहे जिवंत अजून ..’

माई भरल्या गळ्याने म्हणाली ‘ का हो बोलता असं .. लाडकी लेक आलीय आता ..बघा तुमची तब्येत कशी सुधारते ..’

‘ तब्येतीच्या तक्रारींना घाबरतच नाही मी ..’ असं म्हणून आबा गप्प बसले . मी त्यांना नमस्कार केला ..माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले
‘ आयुष्यमान भव ..सगळं तुमच्या मनासारखं होऊ दे ‘ किती विरोधाभास हा .. माझ्या मनासारखं होऊ नये हीच त्यांची इच्छा पण आशिर्वाद देताना मात्र मनासारखं होऊ देत असा देत होते .वहिनी त्यांच्यासाठी पेज घेऊन आली ..मी माईला म्हंटल मी भरवते ..त्यावर माई हसत म्हणाली ‘ अगं ते माझ्याकडुन सुध्दा खात नाहीत ..त्यांना स्वतःच्याच हाताने खायचं असतं ..’
मी माईचं न ऐकता माझ्या हातात ते सूप घेतलं आणि विशेष म्हणजे काहीही खळखळ न करता आबांनी माझ्या हातानी ते घेतलं . नेहेमीचे करारी आबा अगदी निरागस भासले मला .. माई पण अगदी कौतुकाने प्रेम सोहोळा पहात होती .मी लहान असताना आबा नेहेमी म्हणायचे यांच्या रूपात आमच्या आईसाहेबच आल्या आहेत पुन्हा ..ते आठवून गेलं एकदम .वहिनी कडे बघून आबांनी विचारलं
‘ चिरंजीव उठले नसतीलच अजून ..’
वहिनी ने खाली मान घालून नकारार्थी मान हलवली . मान हलवत आबा
‘ पांडुरंग ..पांडुरंग ‘ म्हणत राहिले .वहिनी बाहेर गेली तसं मला म्हणाले ‘ या मुलीचा मी अपराधी आहे ..देव मला कधी माफ करणार नाही ..तुमचा ..तुमचा पण मी अपराधी आहे ..तुम्ही माफ कराल ना मला .’त्यांनी माझ्यासमोर हात जोडले .. एवढा पहाडासारखा माणूस ..माझ्या आत तुटलं ..मी त्यांचे दोन्ही हात धरून म्हटंल
‘ आबा .. नका हो असं बोलू .. मी ..मी तुम्हाला सोडून गेले ..मला तुम्ही माफ करा ..’

माझ्या हातावर त्यांच्या डोळ्यातला अश्रू टपकला .. अंगावर सरसरून काटा आला . ज्या आबांना मी कधी हळवं झालेलं ही पाहिलं नव्हतं .कायम खंबीर , कडक शिस्तीचे माझे आबा आज रडत होते . माई माझ्या पाठीवर हात फिरवत होती ..

सत्या घाईतच आत आला आणि म्हणाला ‘ माई .. आताच फोन आला होता.. वहिनींच्या आई खूप सिरियस आहेत ..वहिनींना भेटायचं म्हणत आहेत ..त्यांना जायला हवं ‘

आबा म्हणाले ‘ बोलवा त्यांना ..’
मी वहिनीला बोलावून आणलं ..ती घाबरतच उभी राहिली .

आबा म्हणाले ‘ सूनबाईंची निघायची तयारी करा ..थोडे पैसेही असू द्या बरोबर ..आजारी माणूस आहे घरात ..कमी जास्त लागलं तर असू द्यावेत ..चिरंजीव उठले नसतील तर उठवा त्यांना ..जेवढं लवकर निघता येईल तेवढं निघा म्हणावं ‘
वहिनीला वाटलं मीच आबांना आणि माईला सांगितलं .ती घाबरून म्हणाली ‘ न .. नाही .. नको .. मी जाईन नंतर ..’

‘ सूनबाई .. तयारीला लागा .. निघा तुम्ही ‘
आबा असं म्हणल्या वर तिचा नाईलाज झाल्यागत ती निघून गेली . माई आणि सत्या ही गेले . जाताना सत्याला दादाला उठव म्हणून आबांनी सांगितलं . मी आबांजवळ बसून राहिले .आम्ही दोघं फार बोलत होतो असं नाही पण त्यांच्याजवळ बसून मला छान वाटत होतं .
आबा म्हणाले ‘ पेपर आला आहे ना .. जरा वाचून दाखवता का ..’

मी त्यांना पेपर वाचून दाखवत होते . ते शांतपणे डोळे मिटून ऐकत होते . तितक्यात दादा तावातावात तिथे आला आणि म्हणाला ‘ मी हिच्याबरोबर जाणार नाही नांदगावला ..’

आबांनी डोळे उघडुन शांतपणे त्याच्याकडे बघीतलं आणि म्हणाले ‘ त्यांच्या आईंची तब्येत खूप खालावली आहे ..अशा वेळेस जायला नको का ..चार तासांचा रस्ता आहे फक्त ..जा ..तुम्हीही त्यांना भेटून या .. राहू द्या त्यांना आठ दिवस ..तुम्ही या हवं तर ‘

‘ माझा निर्णय झाला आहे .. मी जाणार नाही ..मी गेलो तर ..’

माझ्याकडे रागाने पहात बोलणं अर्धवट सोडून गप्प बसला . आबांचा चेहेरा बदलला ..आवाजात जरब आली ..ते म्हणाले ‘ निर्णय घेण्यासाठी मी अजून जिवंत आहे ..तुमची बहीण असल्या तरी आधी माझ्या मुलगी आहेत त्या ..त्यांची काळजी मी घेईन ..त्यासाठी तुम्ही तुमची कर्तव्य चुकवू नका ..’

‘ पण आबा .. रघू पण ..’

त्याचं बोलणं अर्धवट तोडत हात वर करून आबा म्हणाले ‘ बास .. तुम्ही निघा ..’
दादा पाय आपटत निघून गेला .
मी आबांना औषध देऊन .. त्यांना झोपवून .. अंगावर हळुवारपणे चादर ओढून मी दार हलकेच ओढून घेतले आणि बाहेर आले .

दादा तणतणतच होता माई जवळ ..’ आबांचं हे नेहमीचं आहे ..सगळे निर्णय हेच घेणार ..म्हणताना फक्त तुम्ही मोठे झालात , जबाबदारीने वागा म्हणायचं .
मला माहिती आहे मनुवर त्यांचा जास्त जीव आहे .. आता तर काय आजारी आहेत ..ती पण शहाणी आहे , गोड बोलून हवं ते कसं करून घ्यायचं तिला चांगलं च माहिती आहे .. पण मी पण सांगतो ..मी जिवंत असे पर्यंत त्या रघ्याला या घरचा जावई करून घ्यायची स्वप्नं पाहू नका .. तिला लागलेत भिकेचे डोहाळे .. घराची इभ्रत मातीत मिळवायची आहे तिला ..पण मी हे होऊ देणार नाही ..’

मी त्याच्याकडे लक्ष न देता वहिनी कडे गेले .. ती मला म्हणाली ‘ तुम्ही सांगितलंत ..’

‘नाही गं .. फोन आला होता .. सत्याने उचलला होता ..तोच सांगत आला होता .. घाबरु नकोस ..’
मी तिला जवळ घेत म्हंटल ‘ होईल सगळं व्यवस्थित .. काळजी करू नकोस ..’
तिने मान हलवली .
मालन खोली झाडण्यासाठी तिथे आली तसं मी आणि वहिनी गप्प झालो . माई वहिनीला बोलवत आहेत असा निरोप तिने दिला . वहिनी निघाली तीच्यापाठोपाठ मी ही जायला निघाले तसं मालनने एक चुरगळलेला छोटा कागद माझ्या हातात दिला . मला काही समजायच्या आत ती निघून ही गेली . मी कागद उघडुन पाहिला ..रघूचं अक्षर होतं ‘ आज .. फक्त एकदाच मला भेट ..संध्याकाळी मळ्यात ये .. वाट पाहीन ..’

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}