⚛️फिटे अंधाराचे जाळे …! ⚛️ 🍁भाग सात 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे …! ⚛️
🍁भाग सात 🍁
रघूची अक्षरं डोळ्यापुढे फेर धरून नाचू लागली .किती सहज निरोप पाठवला त्याने .. जणू मधली तीन वर्ष गेलीच नाहीत ..मधे काहीच घडलं नाही ! इतकं सहजतेने कसं बोलावू शकतो तो मला . जेंव्हा गरज होती तेंव्हा तर ‘सगळ्यांची इच्छा पण महत्वाची ..फक्त आपल्या दोघांचा विचार करून कसं चालेल ..आपल्या घरच्यांचा विचारही व्हायलाच हवा ना ‘ असं आपल्या घाबरट पणावर समजूतदारपणाचा मुलामा चढवून बोललेला हा रघू ..अचानक कसा बदलला .त्याच्यातला बदल मला स्टँडवर दिसलाच होता . दादा समोर मान ही न वरती करणारा रघू ज्या निडरतेने उभा होता ते पाहून तो बदलला आहे याचा अंदाज आलाच होता मला . पण रघूने मालन बरोबर कसा निरोप दिला ? तिची आणि त्याची ओळख कशी ? मला तरी आधी मालनला कधी पाहील्याचं आठवत नाही . गाव ते केवढं ? जवळपास सगळे एकमेकांना ओळखतात ..मग मी कशी हिला ओळखत नाही . जर त्या दोघांचे संबंध चांगले असतील तर मग तिच्या नवऱ्याने आवर्जून दादाला रघू स्टँडवर आल्याचं का सांगितलं ? हे नेमकं काय आहे ? मला दिसतंय तसंच आहे की त्यापलीकडे अजून काही आहे . रघूच्या बाबतीत माई निवळल्यासारखी वाटली ..तिच्याशी बोलावं का ? की सत्याला सांगावं .. तसं ही सत्या आणि रघू बरोबरीचे ..दोघे मित्र ! माझ्यामुळे त्यांची मैत्री नाही राहिली ..
दादा आणि वहिनी निघाले ..ते दोघे गेल्यामुळे तर मी रघूला भेटणं माझ्यासाठी कदाचित सोपं होईल .पण दादा नसला तरी त्याचे हेर आहेतच .. ही मालन दाखवते तेवढी काही साधी नाही . मी सतत तिच्याकडे बघतेय पण ती मात्र माझी नजर टाळते आहे . म्हणजे नक्कीच हिच्या मनात चोर आहे . माझं कशातच लक्ष लागत नव्हतं .आज रखमाईचा चौदावा आहे आणि रघू मला भेटायला बोलवतो आहे . काही तरी गडबड आहे .. मी विचार करत होते पण नेमकं काय ते मला कळत नव्हतं . खरं तर रघूचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं .. म्हणजे नेमकं काय होतं ? लहानपणापासून सगळे एकत्र वाढलो ..अगदी तेंव्हा पासून मला रघू आवडायचा .मी काही मागितलं आणि त्याने ते दिलं नाही असं कधीच घडलं नाही . बांगडीशी खेळता खेळता बांगडी मुंग्यांच्या वारुळावर पडली .. रडून नुसते डोळे सुजवून घेतले होते मी ..दादा , सत्या म्हणाले जाऊ दे .. एक बांगडी गेली तर काही फरक पडत नाही .. पण रघूने ती बांगडी काढून आणून दिली . बांगडी सोन्याची की चांदीची हे त्याच्यासाठी महत्वाचं नव्हतंच .ती माझी बांगडी आहे आणि मला ती हवी आहे एवढंच त्याला माहिती होतं .मुंग्यांनी चावून हाताचं भजं केलं होतं त्याच्या..पण तो बेफिकीर होता . बांगडी मिळाली याचा आनंद होता पण रघूचा हात पाहून खूप वाईट वाटलं होतं .आणि आबा म्हणाले होते ‘ तुझ्या गरजा पूर्ण करण्याची त्याची ताकद नाही ‘ असं कसं ?
आठवी पर्यंत गावीच होते शिकायला ..नंतरचं शिक्षण त्याने तालुक्याला आणि मी जिल्ह्याच्या शाळा , कॉलेजात घेतलं .फक्त सुटीत गावी जाणं व्हायचं ..रघू कविता करायला लागला होता ..लिहीत होता .आणि ही गोष्ट त्याला इतरांपासून वेगळं करत होती . त्याने लिहिलेलं समजण्याची कुवत त्याच्या आजूबाजूच्या लोकांमधे नव्हती आणि मला आवड असून माझ्या आजूबाजूला असं कोणी हळवं , भावपूर्ण लिहिणारं ..बोलणारं कोणी नव्हतं . माझी आवड अन त्याची गरज आम्हाला जवळ आणत गेली . आम्ही भेटत गेलो अगदी सहज आणि तितक्याच सहजतेने एकमेकांमध्ये न कळत गुंतत गेलो . आम्ही एकमेकांना आवडतोय हे तर लक्षात आलं होतं .. पण हेच प्रेम हे मात्र समजत नव्हतं .आम्ही एकमेकांसोबत तासंन तास बोलत असू आणि वेळेचं भान नसे .प्रत्येक गोष्टीत रघू असता तर काय म्हणाला असता हा विचार येतच असे. उमाने त्याचं केलेलं कौतुक मला आवडत नव्हतं ..वाटायचं हा तर फक्त माझा अधिकार !तोपर्यंत एकमेकांच्या सोबत असण्याची खूप सवय झाली होती ..लहानपणापासून जे वाटत होतं त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं होतं . एकमेकांना कधी फारसा स्पर्श केला नाही पण तो करावासा वाटत होतं. पण त्याही पेक्षा त्याचा सहवास हवा ..अगदी कायमचा असं मनातून वाटायला लागलं होतं . बैलगाडीच्या शर्यतीत त्याला पाहिलं आणि पहिल्यांदा त्याची पिळदार शरीरयष्टी जाणवली . तो बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आला .. मी आबांच्या बाजूला उभी होते . माझ्या छातीत इतकं धडधडत होतं की वाटलं माझ्या हदयाचे ठोके त्याला ऐकू जातील . त्याचं ते मंद स्मित ..डोळ्यातली चमक ..धारदार नाक आणि सावळा रंग ! त्या सावळ्या तनू चे मज लागले पिसे गं …अशी माझी स्थिती ..दुपारी ढाल घेऊन माई च्या पाया पडायला आला होता .रखमाई विहिरीतून पाणी शेंदत होती ..तिथे जाऊन तिच्या ही पाया पडला ..मी खिडकीतून बघत होते . जाता जाता हळूच दगड गुंडाळलेला कागद आत टाकला . सुंदर मोत्यांची लड जणू असं अक्षर ..
तू निर्मल ,तू कोमल ,तू सोज्वळ तारका
भासे कधी ज्वाला तर कधी शीतलता
अप्राप्य सुंदर तेजमालिका तू विशाखा
प्राक्तन विटलेले माझे तू रेशीम धागा
तलम स्पर्शाने होती उत्कट प्रितीमाला
किती संयोजने दूर उभी तू ज्वाला
हा दाह हवासा , प्रीतमुक्ती दे मजला ..!
रघुवीर
इतकी सुंदर कविता .. मी वेडीच झाले . आम्ही एकमेकांना पत्र पाठवायला लागलो . कवितेतून प्रश्न उत्तरं असा खेळ खेळायला लागलो . पण कवितेच्या पलीकडे एक वेगळं आयुष्य असतं . त्या आयुष्यात नुसतं कवितेनं पोट भरणार नाही या दाहक वास्तवाची जाण असणारे लोक असतात . पत , प्रतिष्ठा , मानमरातब , ऐश्वर्य , जात , धर्म हे सगळं तोलामोलाचे असेल तर सगळं मान्य ..प्रेम म्हणजे सगळं थोतांड .. प्रेम लग्नानंतर आपसूक होतं .असं मानणारे दोघांच्याही घरातले लोक ..आमच्या प्रेमाच्या कवी कल्पनेला कशी मान्यता देणार .मुळात स्त्री पुरुष या दोघांमध्ये शारिर भावनेपलिकडे आणि कवी कल्पनेच्या अलीकडे एक नाजुकशी भावना असते ..ते हे प्रेम ! हे प्रेम कोणाला समजणं शक्यच नव्हतं ..प्रेम म्हणजे वासना अशी सरसकट आणि सरधोपट व्याख्या होती ..प्रेम फक्त लग्नानंतर आणि नवरा बायकोने एकमेकांवर करायचं ..हे असं काही वाटणं म्हणजे पाप ! प्रेमाला प्रत्येक वेळी सिध्द करून दाखवण्याचा शाप असतो . प्रेम ना सिध्द होतं ना बध्द ! आम्हाला शारीर आकर्षण नव्हतं का ? होतं म्हणजे कदाचित असेल.. कारण तेंव्हा ते ही काही कळत नव्हतं .त्यापेक्षा अधिक काहीतरी होतं . आमचे सूर जुळले होते .. रागदारीत एखादा स्वर विसंवादी असावा लागतो ..त्याने गाण्याला अजून उठाव येतो ..तसं अगदी टोकाची विरोधी परिस्थिती हा आमच्या गाण्यातला विसंवादी सुर असेल का ? विसंवादी तरी न टाळता येण्यासारखा ..असेल कदाचित !
माई ने माझ्या खांद्यावर हात ठेवला तशी दचकलेच मी .’ अगं काय मना .. कुठे हरवली आहेस ..’
मी हाताची मूठ अधिक घट्ट करत म्हणाले ‘ काही नाही गं ..असंच .. माई उमा कुठे असते गं .. काय करते ..’
‘ काय करणार ..लग्न झालं आहे ..पुण्याला असते ..सुखात आहे .चांगलं तोलामोलाचं स्थळ मिळालं तिला . मधे आली तेंव्हा आली होती घरी .. गाल चांगलेच वर आले होते . लग्न मानवलंय तिला ..तुझ्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झाली ..’
‘ माई ..’
‘ नाही .. मी काही बोलत नाही .. बोलले तरी माझं कोण ऐकणार ..’
सत्या बाहेर निघाला होता . तो आला आणि तो विषय तिथेच थांबला .
‘माई .. मी जाऊन येतो ..विठू कडे चाललोय ..आज ..’
त्याला तोडत माई म्हणाली ‘ हो माहिती आहे .. थांब मी पण येते ..मना तू आबांजवळ थांबशील ना ..’
मी खाली मानेनेच होकार दर्शवला . माई आणि सत्या गेले आणि मला मालनशी बोलण्याची संधी मिळाली .. ती ओसरीवर गहू पाखडत होती . पिवळी साडी ..हिरवा खणाचा ब्लाऊज , कोपरापर्यंत बाहीचा ! कपाळावर हिरवं गोंदण ..त्यावर लाल भडक कुंकू ..रंगाने काळी सावळी पण तुकतुकीत ! तिने डोक्यावर पदर घेतला होता .. एक पाय पसरून बसली होती . मला पहाताच स्वतः ला आवरून बसली . मी तिच्याकडे बघत होते .. पण ती वर न बघता गहू निवडत होती ..
‘ मालन .. मालन नाव ना तुझं ..’
‘ व्हय .. ताय जी ..’
‘ तुला हे नसते उद्योग कोणी करायला सांगितले..’
तिने कावऱ्या बावऱ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं ..’ हे बघ .. काहीच कळत नसल्याचं सोंग करू नकोस . तू मला जो निरोप दिलास त्याबद्दल बोलतेय मी ..’
‘ त्ये .. रघू दादांनी दिला व्हता ..’
‘ हो आणि तू दादाला सांगणार जाऊन ..तुला मी काय मूर्ख वाटले का गं..तुझ्या त्या रघू दादालाही जाऊन सांग .. हे असले चोरी छिपे उद्योग मी करणार नाही . वाघीण आहे मी .. वाघाचं काळीज असेल तर ये म्हणावं वाड्यावर भेटायला ..भेट म्हणावं आबांना ..त्याला माहिती आहेना ..आबांची तब्येत बरी नाही ते ..’
ती माझ्याकडे आश्चर्याने पहात होती
‘ न्हाई .. त्येला न्हाई म्हायती ..’
‘ मग तू नाही सांगितलंस ? आता जाऊन सांग .. आबांना बरं नाहीये ते आणि मी फक्त त्यांना भेटायला आले आहे ..’
‘ तायजी .. पोलीसात भरती झालंत त्यें .. मोटं सायेब झालेत ..’
‘ मग .. हे तू मला का सांगते आहेस ..’
‘ ताय जी .. मला भन मानलं हाय त्येनी .. मला म्हायती हाय .. त्येंच लई ..’
‘ बास .. जास्तीचा आगाऊपणा नको ..’
तेवढ्यात आबांच्या रूम मधली बेल वाजली . मी आबांच्या खोलीत गेले . त्यांनी विचारलं ‘ सत्या आणि तुझी आई कुठे आहेत ..’
‘ आबा आज रखामाईचा चौदावा आहे .. तिकडे जाऊन येतो म्हणाले ‘ माझा स्वर कदाचित हळवा झाला असावा . ते डोळे मिटून शांत बसून होते .मग हळूच म्हणाले ..’ तुम्ही नाही गेलात ?’
मी अविश्वासाने त्यांच्याकडे पाहिलं . ते माझ्याकडेच बघत होते . कदाचित माझ्या भावजगताचा अंदाज घेत असावेत . मी नकारार्थी मान हलवून बसून राहिले .
संध्याकाळी मळ्यात जायचं नाहीच हा निर्णय घेऊन झाला होता आणि तो रघूपर्यंत पोचेल ही खात्री होती. प्रेम पुन्हा एकदा सिध्द करायचं होतं ..मला संयम दाखवून आणि त्याला धाडस दाखवून !
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी