⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️ 🍁भाग आठ🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️
🍁भाग आठ🍁
रघूने बोलवून ही मी गेले नाही . मी केलं ते योग्य की अयोग्य या विचारांचा भुंगा डोक्याला लागलेलाच होता . त्या क्षणी जे योग्य वाटलं ते केलं . तो क्षण महत्वाचा असतो .. त्या क्षणावर अधिराज्य असतं आपल्या त्या वेळी असणाऱ्या मनस्थितीचं ! ज्या माणसासाठी मी भांडून घर सोडलं , माझी माणसं सोडली .. आता संधी होती मला त्याच्याबरोबर जाण्याची किंवा त्याला भेटण्याची ..पण मी गेले नाही ! तीन वर्षांपूर्वीची मी आणि आजची मी यात फरक आहे का ? की तीन वर्षात माझं प्रेम कमी झालं .सहवासाने प्रेम वाढतं म्हणतात. आमच्या नशिबी तर फक्त विरह होता ..विरहाने तर प्रेम अधिक गहिरं होत असावं कदाचित . फक्त शरीराने बरोबर असणं म्हणजे बरोबर असणं नव्हे ..आम्ही बरोबर नव्हतो पण एक दिवस ही असा नव्हता की मला त्याची आठवण आली नाही . तो सतत माझ्या बरोबर असायचा कारण तो माझ्या डोक्यात ठाण मांडून बसला होता .मग आता मला संधी असूनही मी अशी का वागले . आत्मसन्मान महत्त्वाचाच .. पण हे मला आता कळतंय . कारण तेंव्हा असणारी निरागसता कदाचित हरपलीय ..प्रेमातली पण आणि माझ्यातली पण ! तेंव्हा ज्या गोष्टींचं अप्रूप वाटलं तितक्याच तीव्रतेने आता ते वाटेल का ? आपलं प्रेम आहे ना अजून ? की अप्राप्य गोष्टींचं जसं आकर्षण असतं ती जातकुळी आहे या प्रेमाची ? माझ्याच विचाराने मी दचकले.. छे ..भलते विचार आपण करतोय .. ती ओढ असल्याशिवाय का त्याने भेटायला बोलवलं ..पण तो तरी कुठे आला घरी ! नाहीच आला .. मला वाटत होतं , एक अंधुकशी आशा शिल्लक होती की तो येईल .. बोलेल आबांशी ..पण तो आलाच नाही .आज आठ दिवस झाले त्या घटनेला.
दादा एक दिवस कसाबसा थांबून परत ही आला . वहिनी थांबली माहेरी .. ती ही येईल चार एक दिवसांत . पण त्या दिवशी रघू काही आला नाही .दुखावले मी ..पण घरात कोणालाच काही कळू दिलं नाही . मालन मात्र माझी नजर चुकवत असते . फारशी माझ्यासमोर उभीच रहात नाही . आबांची तब्येत ही सुधारते आहे .. बघता बघता इथे येऊन दहा दिवस झाले . मला मुंबईला परत जायलाच हवं .. माझी नोकरी आहे ..माझं स्वतःचं असं वेगळं आयुष्य आहे . त्यात ही माझी माणसं , रघू नाहीये ..पण मला ते हवे आहेत मला . माझ्या आयुष्याचा हा भाग आहे तसा त्यांनी स्वीकारायला हवा .आज आबा आणि माईशी बोलायचं असं मी ठरवलं . रघू गेल्याचं दादाला कुठून तरी कळलं असणारच ..म्हणूनच तो ही थोडा मवाळ झाला आहे . मी इथे आल्यामुळे माझा आणि रघूचा काहीही संबंध राहिला नाही हे समजल्यामुळे माझ्याशी सगळ्यांचेच संबंध चांगले झाले होते . माझी काळजी कमी झाली असावी कदाचित . आज बोलूच ..
चारच्या चहाची वेळ झाली तसं मी आबांच्या खोलीकडे जावं असा विचार केला . मी इथे आल्यापासून माईने तसा नियमच केला होता . चारचां चहा आबांच्या खोलीत सगळ्यांनी एकत्र बसून घ्यायचा .मी वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवलं ..खिडकीतून बाहेर नजर फिरवली ..थंडगार वाऱ्याची झुळूक आली . रघूला कितीही डोक्यातून काढायचं म्हटलं तरी मला ते शक्य होत नव्हती . रखमाई गेली हे माहीत असूनही आपण त्याला भेटायला गेलो नाही ही बोचणी लागून राहिली होती . तो तरी कुठे आला आबांना भेटायला ? पुन्हा कधी आयुष्यात आमची भेट होईल की नाही कोणास ठाऊक ? खिडकीतून दिसलं ..मालन कपडे वाळत घालत होती . मी पटकन बाहेर गेले .. मला पहाताच तिने नजर खाली वळवली .
‘ मालन ..मी बघतेय तू माझी नजर टाळते आहेस ..’
‘ न्हाई .. तसं काई न्हाय ..’
‘ असं कसं .. मला कळतंय .. काय झालं .. रघूला तू माझा निरोप दिलास का ..’
ती घाबरून इकडे तिकडे बघायला लागली . मग माझ्या जवळ येऊन उभी राहिली . हळुच म्हणाली ..
‘ दिला तुमचा निरोप .. हसलं फकस्त.. गेले गावाला नोकरीच्या .. त्याच राती ..पत्र पाठवतू म्हनलेत .. माज्याकडं .. ताय .. भेटाय पायजे होतं तुमी ..’
‘ बास बास .. हे तू मला आधीच का नाही सांगितलंस .. खरं बोलतेस की खोटं मला खरंच समजत नाहीये .. तू का एवढं करतेस .. तुझा काय इंटरेस्ट ‘
ती हसत म्हणाली ‘ समदीकडं फायदा नस्तुय बगायचा .. भाऊ मानलं हाय त्येला ..दोन येळ खायची परवड हूती तवा त्येनीच हितं आनलं आमाला ..माझा धनी भावकीत हाय त्येंच्या .. हितं कामाला लावलं रखमामावशीनं .. तुमच्या साटी आय बापाशी भांडताना पाहिलं मी त्येला ..लई जीव हाय तुमच्यावर .. न भेटता , न बोलता येवढं जीव लावत न्हाई कुनी ताय ..’
‘ बरं .. बरं.. कळला तुझा शहाणपणा ..’
असं मी म्हणाले खरं .पण माझ्या डोक्यात जो सकाळपासून गोंधळ झाला होता त्याचं निराकरण तिने किती साध्या , सोप्या शब्दात केलं होतं .
मी आत आले आणि पाहिलं की आबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले आहेत . ओसरीवर आरामखुर्चीवर ते बसले होते . माई स्वयंपाक घरात होती . सत्या आबांना काहीतरी वाचून दाखवत होता . मला पहाताच आबा म्हणाले ‘ या या .. बसा .. बोलायचं आहे तुमच्याशी जरा ..’
‘ मला पण बोलायचं आहे ..’ मी म्हणाले . तसं सत्या म्हणाला ‘ आधी मी बोलणार .. आबा ..मी आता जाईन म्हणतो ‘
माईने आत येताना सत्याचं बोलणं ऐकलं आणि ती म्हणाली ‘ कुठे जायचं आता ? कुठेही जायचं नाही .. शांत रहा जरा .. तुझ्या लग्नाचं बघणार आहे मी ..’
‘ माई .. मी तुला कितीदा सांगितलं आहे ..मला लग्न करायचं नाही .लग्न करणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का ? सारखं काय लग्न .. लग्न .. लग्न ..’
‘ मग तुझ्या लेखी आयुष्यात येऊन काय करायला हवं . असं सडा फटिंग बनून सारखं फिरायला हवं का ..आयुष्याला काही स्थिरता हवी की नको ‘
‘ आयुष्याला स्थिरता फक्त लग्न करून येत असती तर दादाचं आयुष्य नसतं का स्थिर ! ‘
‘ बास .. हा विषय वाढवायला नकोय .. तुला लग्न करायचं नाही .. तुला नोकरी करायची नाही .. तुला डेरी सांभाळायची नाही .. शेती करायची नाही ..आम्हाला सांभाळायचं नाही मग तुला काय करायचं आहे ते तरी सांग . ‘ आबा म्हणाले .
सत्या दोन मिनिटं शांत बसला ..मग म्हणाला ‘ सध्या तरी मी नर्मदा परिक्रमेसाठी जाणार आहे .जन्माला यावं की न यावं हे माझ्या हातात नव्हतं .पण जन्माला आल्यावर आयुष्य मला हवं तसं जगण्याची मुभा असायला हवी ना ..माझ्या गरजा खूप कमी आहेत . दोन जोडी कपडे आणि दोन वेळच्या जेवणाची सोय झाली की झालं .मग कशासाठी मी उरीपोटी एक होऊन मी धावू .. भरपूर कमवून ठेवायचं ..कोणासाठी ?? माझा आनंद जर सत्येंद्र महाराजांच्या मठात जाऊन सेवा करण्यात आहे तर तो आहे . माझा आनंद मी ठरवायचा .. सतत दुसऱ्या साठी जगायचं आणि आयुष्याच्या शेवटी मी आयुष्यभर स्वतः साठी जगलोच नाही म्हणून खंतावायच .. मला भारतभर फिरायचं आहे . सगळी क्षेत्र पहायची आहेत ..मी हिमालयात गेलो होतो तेंव्हा मला खरं सुख कशात आहे ते कळलं .आत्मशोध घेण्यासारखं कशातच सुख नाही .माझ्या जगण्याचं प्रयोजन जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत भटकत रहाणार .तुमची काळजी घेण्यासाठी दादा आहेच ..तुम्ही स्वतः खूप खंबीर आहात ..मला अडवू नका ..’
माईच्या डोळ्यात पाणी आलं ..आबा मात्र दोन्ही हात हातात गुंतवून बसले होते . माईने डोळ्याला पदर लावला तसं म्हणाले ‘ काही कष्टी व्हायची गरज नाही .त्याने ठरवलं आहे आणि तो निर्णय तो आपल्याला सांगतो आहे . त्यात आता काही बदल होणार नाही . स्वतः चे निर्णय स्वतः घेण्याइतका सर्वार्थाने तो मोठा झाला आहे .आपली गरज नाही त्याला आता ..हात सोडून देण्यात शहाणपणा आहे . तो मोकळा झालाय कधीच ..आपणच आता किती गुंतून रहायचं . तुमचं आईचं काळीज ..मी समजू शकतो .पण तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल . सत्या ..कधी निघतो आहेस .’
आबांचा आवाज एकदम ठाम वाटत होता .
‘ उद्याच निघेन म्हणतो ..’
‘ दोन दिवस थांब जरा .. मला ही काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहे . गुंता थोडा कमी करायचा आहे .. आम्ही ही मोकळं व्हावं म्हणतोय सगळ्यातून ‘
‘ आबा .. मला कशाचाच मोह नाही ..मला काही नाही दिलं तरी चालेल ‘
आबांनी थांब अशा अर्थाने एक हात वर करून त्याला थांबवलं . माईचं रडणं काही थांबत नव्हतं ..तिच्याकडे बघून मलाही रडायला यायला लागलं . सत्या माई जवळ जात म्हणाला ‘ नको ना माई .. नको रडू .. मी सहा महिन्यातून एकदा येत जाईन ..मी वचन देतो तुला ..’ माई ने डोळे पुसले ..त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली ..
‘ तुझी आई मी .. पण तू काय बोलतोस ते नाही रे समजत मला .. कसला आत्मशोध ..कसलं आयुष्याचं प्रयोजन ..काही काही कळत नाही . काही समजायच्या आत लग्न लावलं वडिलांनी ..समरसून संसार केला ..तुम्हाला वाढवलं ..आयुष्यात जे जसं आलं तसं ते मनापासून स्वीकारत गेले ..त्यातच सुख मानलं . हे असंच का ..कसं ..कशासाठी ? असले प्रश्नच कधी पडले नाहीत . मोठी माणसं सांगतात ते आपल्या चांगल्यासाठी एवढाच विचार ..अगदी बाळबोध .त्यामुळे कधीच बंडखोरी नाही .माझे निर्णय मी कधीच घेतले नाहीत .तशी कधी वेळच नाही आली .आधी वडील आणि लग्ना नंतर हे ..पण का असा प्रश्न सुध्दा कधी मनात डोकावला नाही . त्यामुळे तुझं म्हणणं कितीही समजावलं तरी मी नाही समजू शकत . आपल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांना जपायचं ..एवढंच माहिती . स्वतः चा असा काही वेगळा विचार असतो तेच नाही माहिती ..म्हणून आम्ही खूप समाधानी , शांत आहोत ..स्वस्थ आहोत . तुझ्यातली ही अस्वस्थता तुला अशांत करते .. घराबाहेर नेते ..पण तुझी इच्छा असो नसो मी तुला जन्माला घातलं आहे म्हणालास ..काय अर्ज करायचा होता का रे .. असू दे ..आपली माई वाट पहात असते एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं ..तुमचं चालू द्या .. आले मी जरा समईत तेल घालून ‘
माई उठून गेली . आबा माझ्याकडे पहात म्हणाले ‘ तुमचं काय .. तुम्ही पण काहीतरी बोलणार होतात ना ..’
आता बोलायला नको असं वाटलं पण बोलावं तर लागणारच होतं ..’ मी पण मुंबई ला जाऊन म्हणतेय ..नोकरी आहे माझी .. किती दिवस रजा टाकणार ‘
‘ पांडुरंग … पांडुरंग ‘ म्हणत आबा शांत बसले होते . माई आतून तुळशीपुढे ठेवायला पणती घेऊन आली .तिने तुळशिपुढे पणती ठेवून मनोभावे हात जोडले .माझेही आपसूक हात जोडले .
दादा झुलत झुलत येताना दिसला . सत्या म्हणाला ते खरं आहे कोणी जन्माला कुठे यावं हे कोणाच्याच हातात नाही . माई त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत येऊन बसली .आबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सत्याला म्हणाले ‘ खोलीत सोडून ये ..’
‘ नाही .. आबा .. मला तुमच्याशी बोलायचं आहे ..बोलू ‘
‘ तुम्ही पण .. पांडुरंग .. पांडुरंग .. उद्या सकाळी बोलू आपण ..तुम्ही आता बोलण्याच्या स्थितीत नाही आहात ..’
‘ काय झालं .. मी अगदी व्यवस्थित आहे .. मला काही झालेलं नाही .. आणि तुम्हाला वाटतं तसं मी पिऊन आलेलो नाही ..मी आताच बोलणार ..’
‘ हे बघा .. मला तुम्हा तिघांशी ही बोलायचं आहे . मी वाटण्या करायचं ठरवतो आहे . तुम्हां तिघांना ही समान वाटणी द्यावी असं मी योजलं आहे ..सध्या मी जरा विश्रांती घेतो .. बराच वेळ बसलो आहे .. या विषयावर उद्या बोलू ..’
त्याच्याकडे न बघता माई आणि आबा उठून निघून गेले . दादा त्या ही अवस्थेत खूप चिडल्यासारखा वाटला .
‘ हे काय .. तीन हिस्से म्हणजे काय ..सगळं माझं ..मी करणार ..’
असं बडबडत होता .त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सत्याने त्याला ‘चल ..चल ‘म्हणून त्याच्या खोलीत नेले . सगळं वातावरण बिघडून गेलं होतं .
हे काय आबांनी मनावर घेतलं .. उद्याचा दिवस सोपा नसणारच ..दादा एवढ्या सहजी हे सगळं मान्य करेल असं नव्हतंच .
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी